सुट्टी, पालक आणि मुलं
सुट्टी, पालक आणि मुलं


मार्च महिन्यातच मुलांना अचानक सुट्टी जाहीर झाली आणि परीक्षाही रद्द झाल्यामुळे मुले एकदम खुष झाली. आता मज्जाच मज्जा भरपूर खेळायला मिळणार असं त्यांना वाटलं, पण आता दिवसभर घरातच राहायचं आहे, बाहेर अजिबात पडायचं नाही असं समजल्यावर मुले खट्टू झालीत. पण आता आई-बाबांचीही जबाबदारी वाढली आहे. मुलांना दिवसभर कशात ना कशात गुंतवून ठेवायचं हे खूप महत्वाचे काम आता मागे लागले आहे.
लहान मुले म्हणजे त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. सतत धडपडत त्यांना काही ना काही करायचे असते. आता तर मोठी सुट्टी मिळाली आहे, आई-बाबांची जबाबदारी अजून वाढली आहे. यावेळी बैठे खेळ मुलं खेळू शकतात. सापशिडी, ल्युडो, बिझनेस गेम, कॅरम, बुद्धिबळ असे खेळ आता मुलं खेळत आहेत.
माझ्या छोट्या मुलीबरोबर जेंगा हा मुलांची एकाग्रता वाढवणारा खेळ आम्ही सगळे मिळून खेळतो. अगदी मी माझ्या लहानपणी खेळत असलेला काचपुरणी हा खेळही मी तिला शिकवला. तिने या खेळाचा खूप आनंद घेतला.
मुलं कार्टुन बघणार, ते बघायला त्यांना आवडतं, पण मुलांना कोणते कार्टुन उपयोगी आहे, हिंसक नाही हे आपण निवडून द्यावे. जिअॉग्राफी चॅनेल, अॅनिमल प्लॅनेट पाहू द्यावं पण त्यांना दिवसभर टीव्हीला चिकटून राहू देऊ नये. घर कामातही त्यांची थोडीफार मदत घ्यावी.
सध्या नोकरदार
आई-बाबांनाही भरपूर वेळ मुलांसोबत जास्त घालवण्यासाठी मिळाला आहे. तर त्यांच्या लहानपणीचेही बैठे खेळ मुलांना शिकवायला हवेत. मुलांना क्राफ्ट, कोलाज शिकवावे. चित्र काढायला द्यावी. हॉलमध्ये सगळीकडे रंग पडतील, क्राफ्टवर्क करताना कागदांचे कपटे सर्वत्र झाले तरी चालतील पण त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल असे काम आणि खेळ मुलांनी खेळायला हवेत. त्यांच्या कौशल्य विकासासाठी हे खेळ फार उपयुक्त आहेत.
आई-बाबांनी मुलांबरोबर लहान होऊन खेळायला हवं. स्वत:च्या लहानपणीच्या गोष्टी त्यांना सांगाव्या. बोधपर कथा, पंचतंत्र, इसापनीति, थोर संतांच्या, शास्त्रज्ञांच्या कथा मुलांना सांगाव्या. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी पालकांनी स्वत: पुस्तकं वाचायला हवीत, मग मुलं नक्कीच पुस्तकं वाचतील.
सध्या मुलांच्या आई-बाबांनाही मुलांसोबत राहण्यासाठी जास्त वेळ आहे. हा वेळ विविध खेळ, गप्पा, गाणी, गावांच्या नावांच्या भेंड्या, कलाकौशल्य याबरोबर मधूनच पाढे म्हणून घ्यावे, स्तोत्र शिकवावी. म्हणजेच सर्वांचे आरोग्य जपत हा मिळालेला वेळ मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवेल व केवळ घरातच बंदिस्त राहावं लागतंय म्हणून नाराज झालेली मुले खुष राहतील व हा वेळ नक्कीच सत्कारणी लागेल. या सुट्टीने पालकांना आणि मुलांना अधिक जवळ आणलं हे मात्र अगदी खरं आहे.