आठवणीतला श्रावण
आठवणीतला श्रावण
'हासरा नाचरा, जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला.'
आषाढातील मुसळधार पाऊस कोसळून गेलेला असतो आणि श्रावण महिन्याचे आगमन होते, तेव्हा अवघी सृष्टी नव्या नवरीसारखा हिरवागार शालू नेसून, विविध रंगांचा साज लेवून लाजत मुरडत हळूहळू पदन्यास करत अवतरते आणि
आल्हाददायक वातावरण, मनाला भुरळ घालणारा, डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग श्रावण महिन्यात अनुभवायला मिळतो.
रिमझिम पडणारा पाऊस, ऊन पावसाचा खेळ आणि आकाशात अवतरणारे इंद्रधनुष्य, सोनेरी किरणे सृष्टीच्या सौंदर्यात अजूनच भर घालत असतात अन् चैतन्याचा सगळीकडे शिडकावा करत राहतात .
मला आठवतो माझ्या लहानपणीचा श्रावण
श्रावण मासी
हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे"
बालकवींची 'श्रावणमास' ही कविता अक्षरशः मी अनुभवलेली आहे. प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात, शेतात, शिवारात जाऊन. फुलांची आवड असल्याने मी आणि माझ्या बहिणी आम्ही आमच्या शेता जवळ असलेल्या माळरानावर फेरफटका मारायला जायचो.
शेताजवळील हिरव्यागार टेकडीवर, रंगीबेरंगी इवली नाजुक फुले फुललेली अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडायची.
लाल, गुलाबी, पिवळी, पांढरी, निळी अशी असंख्य गवत फुले उमललेली असायची. गौरीची फुले म्हणून प्रसिद्ध असलेला गुलाबी रंगाचा तेरडा सर्वत्र फुलायचा जणू गुलाबी रंगाची मखमली चादर अंथरली आहे असे वाटायचे.
आषाढ आमरी ( एन्जल ग्राउंड ऑर्किड ) पांढरी मखमल, गुलाबी भुईचक्र( अर्ली नॅन्सी), यलो स्टार ग्रास फुल फुललेली असायची. आषाढ आमरीला आम्ही कोल्ह्याची मका म्हणायचो .हे फुल मोगऱ्याच्या फुलासारखे म्हणून ती फुले आम्ही खुडून घ्यायचो त्याचा गजरा करून केसात माळायचो.
भारंगीची निळी फुलं, तिळाची फुलं अशा अनेकविध रंगीबेरंगी फुलांची उधळण पहायला मिळायची. ही रंगांची उधळण बघून डोळ्याचं पारणे फिटायचे. फुलांचे तुरे घेऊन मी घरी यायचे आणि घरातील फुलदाणीत ठेवायचे.
जीवतीच्या पुजेसाठी, माका, आघाडा, दुर्वा आईला देवपूजेसाठी आणून द्यायचे, जीवतीची पूजा दर शुक्रवारी असायची. नागपंचमीला मातीचा नाग बनवायचा, कुंभाराने दिलेल्या नागासोबत या नागाची ही पूजा करायची. आई ज्वारीच्या लाहया भाजायची .तडतड उडणाऱ्या, फुललेल्या लाह्या बघायला व खायला मजा यायची. राखी पौर्णिमेला नारळी भात, वडी,पुरणपोळी असा बेत असायचा.भाऊरायांच्या हातावार बांधलेल्या राख्या मनगटापासून कोपरापर्यंत असायच्या. मेरे भैया लिहिलेल्या मोठ्या राख्या ते एकमेकांना दाखवत फुशारकी मारत मिरवत असायचे.
गोकुळ अष्टमीला फराळासाठी राजगिरा लाडू बनायचे, रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा पाळणा म्हणून जन्माष्टमी साजरी व्हायची. नंतर सुंठवडा खाऊन उपास सुटायचा.
नागपंचमीच्या दिवसापासून झिम्मा,फुगडी असे खेळ खेळायला सुरुवात व्हायची. आमच्या गावातील स्त्रिया, मुली संध्याकाळी जेवण झाल्यावर गावातील चौकात झिम्मा फुगडीचे खेळ खेळायला एकत्र यायच्या, पण आमचा फेर मात्र आमच्या अंगणात धरलेला असायचा. आम्ही भरपूर बहिणी असल्यामुळे आमच्या खेळालाही छान रंगत यायची. आम्ही सहा वाजल्यापासून गाणी म्हणत फेर धरायचो. धम्माल मजा करत अंगणात भरपूर खेळायचो.
नागपंचमीला गावातील सगळ्या मुली एकत्र मंदिरात नाग पूजेला निघायचो.
'चल गं सखे वारुळाला...
नागोबाला पुजायाला...
अशी गाणी म्हणत रंगीबेरंगी साड्या नेसून आमचा मुलींचा घोळका मंदिराच्या दिशेने निघायचा. मुले कटकं उडवायचे.
सायंकाळच्या वेळी शेत शिवार, सोनेरी किरणांनी उजळून निघणारं रान आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलणारे हिरवे पोपटी शिवार, सोनेरी, हळदुल्या रंगात न्हाऊन निघायचं. अहाहा!...काय तो सुंदर देखावा असायचा. मोराचे दर्शन, विविध फुलपाखरांचे नर्तन, डोळ्यांना सुखावायचे. श्रावण सगळ्या प्राणीमात्र, पशू पक्षांवर आपली मोहिनी घालायचा.
शेता शिवारात खळखळ वाहणारे निर्झर फेसाळणारे धबधबे, त्याचे उडणारे तुषार हे सगळं अनुभवायला सुंदर खेड्यात जन्म घ्यावा लागतो.
श्रावणात गावोगावी धार्मिक वातावरण असायचे. सणवार उत्सवांची रेलचेल असलेल्या या महिन्यात घरोघरी सत्यनारायणाची पूजा असायची. गावात रोज लाऊड स्पिकरचा आवाज यायचा त्यावर धार्मिक गाणी सुरू असायची.
"श्रावणी सोमवार आला...
चला जाऊ रामेश्वराला...
अशी गाणी गुणगुणत हातात पुजेच ताट घेऊन महिला प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाच्या मंदिरात पुजेसाठी जायच्या.
मंदिरातून घंटांचा नाद घुमायचा. रात्री भजन, किर्तनाला रंग चढायचा. वातारणात चैतन्य भरुन रहायचे.
निसर्ग भूल पाडणारा, धार्मिक,नात्यांची महती सांगणारा, कृषी संस्कृतीशी निगडीत असलेला 'आनंदाचा धनी' श्रावण महिना.
असा रंगतदार,रंगीला, चैतन्यदायी माझ्या आठवणीतला श्रावण गावाला जाऊन पुन्हा अनुभवासा वाटतोय.