Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Supriya Jadhav

Others

4  

Supriya Jadhav

Others

'जीवनाचा योग्य जोडीदार'

'जीवनाचा योग्य जोडीदार'

4 mins
411


रावसाहेब पाटलांच्या घरी सकाळपासून लगबग सुरू होती. कारण ही तसचं होत त्यांची लाडकी लेक मधुराला आज पाहुणे बघायला येणार होते. "समद येवस्थित होऊ द्या बरका, लै तोलामोलाची माणसं हायत ती, आन मधुरा तु छान काठपदराची साडी नेस बरका" त्यावर मधुरा म्हणाली, "अहो बाबा माझं एवढ्यात लग्न नका हो करू, मला अजून शिकायचं आहे, मला स्वत:च्या पायावर उभे रहायचे आहे" त्यावर रावसाहेब बोलले "पदवी घेतलीस, बास झालं शिक्षण आता. पार्टी मोठी पैसवाली हाय, तुला नोकरी करायची बी गरज नाय, राणीवाणी राहशील तू त्यांच्या घरात. माणस तोलामोलाची हायत. त्याचा बाप कारखान्याचा संचालक हाय. पोरगा बी लय शिकलाय, मोठ्या हुद्द्यावर हाय. आस स्थळ सोदून बी सापडत न्हाय. "मधुरा बाबांसमोर निरुत्तर झाली.

   


 दुपारच्या दरम्यान घरासमोर एक आलिशान मोटार. येऊन थांबली. मोटारीतून साहेबराव देसाई त्यांचा मुलगा आणि अजून चार-पाच जण उतरले. रावसाहेबांच्या घरी मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता ना..! मधुरा ने छान गुलाबी रंगाची साडी नेसली होती. साडीत ती खुप सुंदर दिसत होती. पोहे, चहा घेऊन ती बाहेर आली देसायांचा मुलगा सचिन तिला बघतच राहिला. तिला काही प्रश्न विचारले आणि त्यांनी आपली पसंती लगेच सांगुन टाकली. देणे-घेणे व्यवहाराची बोलणी लगेच झाली. आम्हाला शोभेल असं लग्न लावून द्या, योग्य तो मानपाण करा असं साहेबराव देसायांनी बोलताच रावसाहेबांनी लगेच संमती दिली. चार दिवसांत साखरपुडा होऊन लग्नाची तारीख ही ठरवून टाकली.

  


मधुराच लग्न ठरलंय ही बातमी तिच्या सगळ्या मित्रमंडळींना समजली. रवीलाही समजली तेव्हा त्याला धक्का बसला. त्याने लगेच मधुराचा भाऊ संदिप ला फोन लावला. संदिपही बोलला अरे आम्हालाही असंच वाटतं मधु ने स्वावलंबी व्हावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे पण बाबा काही ऐकतच नाहीत. एवढं मोठं स्थळ हातचं घालवायचं नाही असं म्हणुन त्यांनी आमच्या सर्वांच्या मनाविरुध्द लग्न ठरवलयं. तसा मुलगाही चांगला आहे. तू लग्नाला ये बरं. अस दोघांच्यात बोलणं झालं.


  


   ‌रवी मधुराच्या भाऊ संदीप चा खास वर्गमित्र,तो संदिप बरोबर नेहमी घरी यायचा. मधुराला गणित विषयासाठी मार्गदर्शन करायचा.सध्या तो पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर दीड वर्षापासून नोकरी करत होता. तिघे चांगले मित्र होते.

 


 मधुरा अतिशय लाघवी, अभ्यासात हुशार असणारी मुलगी. तिच्या बोलण्यात एकप्रकारचा नम्रपणा असायचा. हसताना तिच्या गालावर गोड खळी पडायची. तिच्या सौंदर्यात ती खळी अजुनच चार चॉंद लावायची. आईच्या संस्कारात वाढलेली ती रावसाहेबांची एकुलती एक मुलगी होती. रवीला मधुरा आवडायची पण त्याने ते तिला कधीच बोलून दाखवलं नव्हतं. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर संदिप जवळ तिला मागणी घालण्याची ठरवलं होतं , पण आता तिचा साखरपुडा झाला व लग्नाची तारीख ही निश्चित केली या बातमीने तो अस्वस्थ झाला होता.

    


लग्नाची तारीख जवळ येत होती तशी देसायांकडून बऱ्याच मागण्या येत होत्या, ही वस्तू हवी, ती वस्तू हवी , मुलाला जाडजुड सोन्याची चेन हवी अशा मागण्या येेत होत्या. रावसाहेब त्या पुर्ण करण्याच्या तयारीत होते. घरात या मागण्यांवरून संदीप बाबांना बोलला "माणसं स्वार्थी वाटतायत. नाव मोठं अन लक्षणं खोटं वाटतंय. पुढे जाऊन काही त्रास व्हायला नको. त्यावर बाबा बोलले एकुलती एक लेक हाय, करूया काय ती हौस, मौज तसं बी आता लगीन ठरलंय, मध्येच मोडवायचा म्हणजे, चांगला न्हाय ते , लोक न्हाय न्हाय ते बोलतील. परत तीच लगीन ठरताना मुश्किल व्हायल. तसबी संसाराला लागणाऱ्या वस्तू आपण देणारच हाय त्यात हे थोडस" असं म्हणून त्यांनी देसायांनी ज्या काही वस्तू मागितलेल्या त्या सगळ्या घेतल्या.

  


  लग्नाचा दिवस उजाडला. रावसाहेबांच्या दारात मोठा मंडप घातला होता. सगळे वराडी मंडळी आले. भेटीगाठी झाल्या आणि त्याच वेळी मानपानावरून काहीतरी धुसफुस झाली. सगळी मिटवामिटव केली. लग्नाची वेळ जवळ आली . ब्राम्हण माईक वरून पुकारत होता नवरानवरीने मंडपात लवकर यावे. तरीही नवरदेव मांडवात आला नव्हता. थोड्यावेळाने घोड्यावर बसून वाजत गाजत नवरदेवाची स्वारी मंडपाजवळ आली पण नवरा घोड्यावरून उतरायला तयारच नव्हता. नवरीकडील लोकांनी जवळ जाऊन मंडपात चलण्याची विनंती केली तशी त्याने अजुन एक मागणी केली. मोठी महागडी गाडी तो मागत होता. रावसाहेबांचे आता चांगलेच धाबे दणाणले होते. आता याची ही मागणी कशी पुरी करू. आप्पासाहेबांच्या बरोबर संदीप आणि रावसाहेब बोलत होते ,"अगोदर लग्न तर लावुया मुहुर्त टळून जाईल"त्यांनी त्यांच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. अगोदर मागणी पुरी करा मग बघु असाच ठेका धरला. मांडवात सगळे पै पाहुणे, वराडी मंडळी कुजबुजत होती. नवरीच्या वेशात सजुनधजुन उभ्या असलेल्या मधुरा पर्यंत ही बातमी तिच्या मैत्रिणीने पोहोचवली. ती पाहत होती आता रावसाहेबांनी आपला फेटा काढला होता व आप्पासाहेब देसायांच्या पायावर ठेवून विनवणी करत होते. तेवढ्यात चपळतेने जाऊन तिने त्यांना रोखले. बाबा काय करताय हे. हे करण्याची अजिबात आवश्यकता नाही , बस्स झाला यांचा लोभी पणा मला आता याच्याबरोबर लग्न नाही करायचे. आप्पासाहेब "गुरगुरले कोण करतंय तुझ्याबरोबर लगीन बघुया." मधुरा मंडपात आली एकवेळ तीने सगळ्या मंडपात नजर टाकली आणि बोलली,"आत्ता या क्षणी जो माझ्याशी लग्न करायला तयार असेल त्याने पुढे यावे." संदिपच्या जवळ उभ्या असलेल्या रवीने एकवेळ संदीपकडे बघीतले, संदीपने त्याला मानेनेच संमत्ती दिली, आणि रवी पुढे गेला. ब्राम्हणाने रवीच्या हातात माळ दिली आणि दोघांनी ही एकमेकांना माळ घातली. पै पाहुण्यांनी टाळ्या वाजवल्या,आणि सनई चौघड्याच्या मंजुळ सुरांनी वातावरण प्रसन्न होऊन गेले.


     रिकाम्या हातानेच लोभी देशमुखांना आपला नवरदेव घेऊन परत जावं लागला. त्यांनी लगेच काढता पाय घेतला. सगळे बोलू लागले जे झालं ते चांगलंच झालं. रावसाहेबांना अगदी भरुन आलं होतं. शेवटी पैशापेक्षा माणसं, त्यांचा स्वभाव महत्वाचा हे आपल्या मुलांचं बोलणं त्यांना पटलं. उभयता दोघांनी वधूवरांना तोंड भरुन आशिर्वाद दिले.एका सुंदर नव्या कहाणीला आता सुरवात होणार होती...


(ही सत्य घटनेवर आधारित कहाणी आहे,कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा,आवडली असेल तर शेअर करा माझ्या नावासह)


Rate this content
Log in