'आसरांच्या ढवातली पळी''
'आसरांच्या ढवातली पळी''
"आय बाहीर यं ते बघ काय हाय" गण्या घाबरून जोरजोरत वरडत हुता. तशी रकमा धावतच घराबाहीर आली. "आर देवा हे काय पळी चालतीया, परतेक जण म्हणत हुता, ती बघा, ती बघा पळी चालत्या!.." ती पळी म्हणजे साधीसुधी पळी न्हवती. ती खुप आकर्षक, मोठ्या दांड्याची खोलगट अशी शाक वाढायची पितळी पळी हुती. पळी नदीच्या दिशेने टणाटणा उड्या मारत निघाली हुती. "पळी वळखीची वाटत्या", म्हाद्या बोलला. त्यावर किस्ना बोलला "आर ही तर सातीआसरांच्या ढवातली पळी, ही हिकडं गावात गल्लीतन कशी चालत्या बरं?..मोठं आब्जूक हाय!.." बाया बापड्या घराच्या भायेर येऊन कुजबुजत होत्या. म्हातारी माणसं म्हणत हुती, "आमी आमच्या उभ्या हयातीत असं इपरीत बघीलल न्हवत". गावातली सगळी बायाा- बापडे हे आब्जूक बघून चांगलीच टरकली व्हती.
शामराव पाटील, गावचा पोलीस पाटील त्यानं बी हे इपरीत बघीतलं. "पळी तर आयांच्या ढवातन निघणाऱ्या भांड्यातली वाटत्या", जमलेली माणसं बोलत हुती. आता पाटलांच्या डोक्यात उजेड पडला. "चार दिसा माग कुणाच्या घरात लगीन झालं हुतं बरं?.."पाटलान लोकांना इचारलं. "वरच्या आळीच्या पांडबाच्या घरात" दोन चार लोकं एकदम बोलली."मग १०० टक्के पळी ढवातल्या भांड्यातलीच हाय." असं म्हणत पोलीस पाटलानं लगेच शिरपा कोतवालाला पांडबाच्या घरी पाठवून दिल, त्याला घेऊनच चावडीवर याला सांगितलं.
पांडबाच्या दारात उभं राहूनच शिरपान त्याला हाक मारली. पांडबा तंबाखू मळतच घराच्या भायर आला. "कायरं काय काम हाय? पांडबा बोलला. "आवं पाटलांनी तुम्हाला चावडीवर बोलिवलयं." कशा पाय? "मला काय म्हाईत न्हाय, पण यक आकरीत घडलयं , बघीतल न्हाय व्हय तुमी?.. नाय बा! ..काय झालयं? आवं ती आसरांच्या ढवातली पळी नदीच्या बगलला चालत गेली समद्या गावानं बघितली." काय म्हणतूयास !.... चल- चल जाऊया लवकर चावडीवर म्हणत. दोघ लगेच चावडीवर गेले.चावडीवर पोलीस पाटील वाट बघत बसले व्हते. आता चावडीवर सगळा गाव गोळा झाला व्हता.
पांडबा चावडीवर पोचला. "रामराम पाटील काय काम हाय ?.. असं इचारू लागला "वार्ता कळली का तुला" पाटील बोलले. पांडबा बोलला कसली पळीची व्हय? ..शिरपान सांगितली आत्ताच". बरं मगं मला कशा पाय बोलीवलयं? पळी बद्दलच बोलायचं हाय? आता माझा काय संबंध?" पाटील बोलले चार दिसामाग कुणाच्या घरात लगीन झालं?" "माझ्याच घरात"पांडबा बोलला. "ढवातली भांडी आणली हुती न्हव ?" त्यावर पांडबा बोलला " हो आणली हुती की." पाटील बोलले "समदी परत केली व्हती का? पांडबा बोलला " हो केली व्हती. पाटील बोलले "खातरजमा केली हुती का?" आणि परत करायला कोण गेल हुत?.. "हो खातरजमा करून मीच बैलगाडीत घालून परत ढवाजवळ ठिवून आलो. माझ्या कारभारनीनच भांडी माझ्या हवाली केली हुती. "पांडबा बोलला. समदी भांडी दिली हुती का?.."म्हंजी तुम्हाला काय म्हणायच हाय ?..शिरपाला पाटलांनी पांडबाच्या कारभारणीला पावलावल्या पावलावर घेऊन यायचा आदेश दिला. शिरपा धावतच पांडबाच्या घरी गेला आन तिला घेऊन चावडीवर निघाला. शेवंता काळजीत पडली "आदी धन्यांना आणि आता मला कशाला बोरिवल बरं? .. आस शिरपाला इचारू लागली. शिरपा बोलला ,"ते चावडीवर गेल्यावर कळलं".
शेवंता चावडीवर गेल्याबरूबर तिला पाटलांनी आसरांच्या ढवातल्या भांड्याबद्दल इचारले. ती चांगलीच टराकली, चाचरत बोलू लागली ,"समदी दिली हुती मी." जमलेल्या माणसांच्या गर्दीतन पुढं येत धोंड्या बोलला, "तुझ्याच घरातन पळी बाहेर पडलेली मी बघीतल्या खरं काय ते बोल, आसरांना लांडीलबाडी केलेली चालत न्हाय, तू करणी केली आण समद्या गावाला भोगाया लागलं. आता शेवंता लटालटा कापत चाचरत बोलू लागली, "समदी भांडी दिली हुती पण पळी तेवढी मी ठिवून घेतली हुती, माफ करा मला, माफ करा," असं बोलून गयावया करू लागली. पांडबा शेवंता वर खेकासला काय कमी हुतं तुला म्हून ती पळी ठिवून घेतलीस. समद्या गावासमोर नाक कापलस माझ " पाटील बोलले "आम्ही कोण माफ करणारे ?..माफी त्या आसरांची (ढवातल्या सातीआसरा) मागा, गुरवाला बरूबर न्या आण आसरांची माफी मागा. आता काय इपरीत होऊ नये म्हंजे झालं .' आता समद्या लोकांना पळीच्या चालण्याचा उलगाडा झाला हुता.
गावात कुणाच लगीन कार्य असल्यावर नदीवरच्या सातीआसरांच्या ढवाजवळ भांडी मिळायची. पुजाअर्चा करून ,लगीन कार्यासाठी जेवण बनवायला लागणारी भांड्यांची चिट्टी ठेवायची. दुसर्यादिवशी काठावर भांडी मिळायची. मोठमोठाले हंडे, उलातन,पळी, वाढपाच सामान सगळं मिळायच. लगीन कार्य संपल्यावर ती भांडी साफसूफ करुन परत काठावर ठेवून द्याची.
समदा गाव शेवंतान केलेल्या लबाडीवर बोलत हुता.शेवंता बी चांगलीच टराकली हुती आणि समदा गाव काळजीत पडला हुता,काय तरी इपरीत हुइल असंच समद्याना वाटतं हुतं. शेवंता,पांडबा,गुरव नदीवरल्या आसरांच्या ढवाजवळ गेले, पुजा करून शेवंतान "आयांनो हुवू नये ती चुकी झाली आम्हाला माफ करा, लेकराची चुकी पदरात घे, अशी कान धरून माफी मागितली. खणा नारळान नदीची वटी भरली. धया-भाताचा निवद दावला. तरी बी गावातली माणसं लै दिवस काळजीत हुती. काय इपरीत घडलं नाय पण तवापासन भांडी मिळायची बंद झाली.
(प्रिय वाचक अस्सल ग्रामीण भाषेतील 'लोककथा' आहे.मी लहानपणी ऐकलेली. माझी आज्जीआणि आज्जेसासूच्या तोंडून ऐकलेली ही कथा आमच्या शेजारच्या गावात घडलेली आहे असं त्यांनी सांगितले होते. तीच ही लोककथा ग्रामीण भाषेत लिहलेय. कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा)