Pandit Warade

Horror Romance Thriller

3  

Pandit Warade

Horror Romance Thriller

झपाटलेले घर - भाग 6

झपाटलेले घर - भाग 6

5 mins
223


    निसर्ग नियमा प्रमाणे काळ त्याच्या गतीने पुढे पुढे सरकत राहतो. सृष्टीमध्ये नवं नवीन बदल घडत राहतात. तसे ते माणसाच्या जीवनातही घडत असतात. माणूस लहानचा मोठा होत जातो तसे शरीरात सुद्धा बदल घडत असतात. राधिका आता अंगाने चांगलीच भरली होती. मूळचीच सुंदर त्यात तारुण्य फुलून आलेलं. जणू स्वर्गीची कुणी अप्सराच पृथ्वीतलावर अवतरली असावी. भल्या भल्यांची नजर खिळून रहायची तिच्यावर. गावातील तरुण मुले दृष्टी सुखाच्या आशेने वाड्या भोवती फिरू लागले. त्यात बापूंचा रमेश सुद्धा होताच. रमेश तिला बघताच शाळेतून येतांनाचा *तो* प्रसंग आठवून मनातल्या मनात काही बेत ठरवायचा. त्याला *त्या* अपमानाचा बदला घ्यायचा होता. 


    इकडे राधिका सुजीतचे प्रेम वसंतातल्या नव्हाळी प्रमाणे दिवसागणिक फुलू लागले होते. बारावीचे वर्ष असूनही ते अभ्यासा पेक्षा जास्तीत जास्त वेळ एकमेकांच्या सान्निध्यात राहू लागले. कधी कधी रानात झाडा खाली बसून गुज गोष्टीही करू लागले. मात्र, आबांच्या धाकाने आणि गंगू बाईच्या संस्काराने दोघांनी कधीही नीती मर्यादांचं उल्लंघन केलं नाही. 


   "सुजीत, आपण विवाह कधी करायचा रे?" एक दिवस झाडाखाली बसून राधिकेने लाजतच सुजितला विचारले. 


    "मी तर एका पायावर तयार आहे. मात्र ते माझ्या हातात थोडेच आहे? आबांना आवडले पाहिजे. त्यांनी ठरवले पाहिजे. ते ठरवतील तसंच होईल ना?" सुजीतने व्यावहारिक उत्तर दिले.


   "आबांनी नाही म्हटले तर?" तिने उत्तराच्या अपेक्षेने त्याच्या कडे कटाक्ष टाकला. 


    "त्यावर मी काय करू शकतो? मी आधीच त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेलो आहे. मला त्यांच्या शब्दाबाहेर नाही जाता येणार." तो उत्तरला. 


   "सुजीत, पण आबा कशाला नाही म्हणतील? मला तू आवडतोस हे त्यांना सांगितले की ते नाही म्हणणार नाही. आपल्या लाडक्या मुलीचा आग्रह ते टाळणार नाही." ती विश्वासपूर्वक म्हणाली.


   "नाही राधिका, तू अजून आबांना ओळखले नाहीस. आबांच्या मनात काय आहे ते सहज कळू शकत नाही. एकुलत्या एक मुलीसाठी ते नक्कीच श्रीमंत, धनाढ्य, गडगंज संपत्ती असलेलं स्थळ शोधतील. माझ्या सारख्या गरिबाला ते आपली मुलगी कदापिही देणार नाहीत." सुजीत म्हणाला.


   "नाही तसे होऊ देणार नाही मी. मी बंड करेन त्यांच्या विरुद्ध." राधिकेचा निर्धारयुक्त स्वर. 


    तेवढ्यात दुरून कुणीतरी तिकडे येतांना पाहून ते दोघे उठून घराच्या रस्त्याला लागले. 


    लामणगाव ग्रामपंचायतीची निवडणुकीची धामधूम सुरू झाली होती. आबांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना *छत्री* निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्यांचे पारंपरिक विरोधक रामराव बापूंनीही अर्ज भरला होता. त्यांचे चिन्ह होते *हत्ती*. रमेश त्यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होता तर आबांच्या प्रचाराची जबाबदारी सुजीत आणि राधिका दोघे सांभाळत होते. प्रचार सभा, मोर्चे, पदयात्रा यांनी लामणगाव दुमदुमले होते. सुजीत आणि राधिकाची जोडी टीमसह एका गल्लीत तर रमेशची टीम दुसऱ्या गल्लीत असा प्रचार सुरू होता. 


    मात्र एक दिवस दोन्ही टीम एकाच गल्लीत एकमेकांच्या समोर आल्या. गल्ली एकदम अरुंद होती. कुण्या तरी एक टीमला मागे फिरावे लागणार होते. मध्ये बाहेर निघायला कुठेच रस्ता नव्हता. मागे कुणी फिरायचे? यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. शब्दाने शब्द वाढत गेला. सोबतचे कार्यकर्ते चेकाळले. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. वास्तविक रमेशची टीम नेमकीच गल्लीत घुसली होती. ते मागे फिरू शकत होते. पण माघार घेऊन कमीपणा घ्यायला रमेश तयार नव्हता. त्याला *त्या* प्रसंगाचा बदला घ्यायचा होता. त्याच्यासाठी ही नामी संधी आली होती. राधिका त्याला म्हणाली,

  

    "रमेश, तुझी टीम नेमकेच गल्लीत आली आहे. तुम्ही इथून सहज मागे फिरू शकता. तेव्हा.."


    "ते शक्य नाही. आम्ही मागे फिरणार नाही. मात्र तू म्हणत असशील तर बापूंना अर्जही मागे घ्यायला लावतो. फक्त तू माझ्याशी लग्न करायला *होकार* दे." रमेशने गुगली टाकली.


     "अरे, हट्. तोंड बघ आरशात एकदा. मोठा आलाय माझ्याशी लग्न करायला. दात घासून बस." राधिका उतरली.


     "अरे व्वा! एवढी घमेंड? महाग पडेल." अशी धमकी देत तो आपल्या कार्यकर्त्यांकडे वळून म्हणाला, 


    "अरे, बघता काय उचला तिला आणि घ्या बाजूला. रस्ता मोकळा करा"


    "अंगाला हात तर लावून बघ, नाही हात कलम केले तर नावाचा सुजीत नाही." प्रथमच सुजीत कोपिष्ट होत, रमेशच्या अगदी जवळ जात बोलला. 


   दोन्ही कडील कार्यकर्ते गोंधळले होते. शेवटी सारे एकाच भावकीतले. भांडून जाणार कुठे? गावातच रहायचे ना. भांडण विकोपाला जाऊ नये म्हणून त्यातील एका वयस्कर व्यक्तीने मध्यस्थी केली. त्याने रमेशच्या कानात काही तरी सांगितले आणि त्यांची टीम माघारी फिरली. राधिका सुजीतची टीम प्रचार झेंडे फडकवत पुढे गेली. 


   या घटनेची वाच्यता सर्व गावात झाली. रमेशने राधिकेपुढे माघार घेतल्याचे सर्व गावात पसरले. आबांच्या तसेच बापूंच्या कानावरही गेले. निवडणुक नसती तर आबा आणि बापू दोघेही एकमेकांना मारायला उठले असते. मात्र निवडणूक होई पर्यंत चूप बसणे भाग होते. मतदानावर याचा परिणाम होऊ नये, उलट या घटनेतून फायदा कसा होईल? याचाच विचार दोघांच्या डोक्यात घुमत होता. निवडणुकीची नशा इतकी बेधुंद करते की तिथे स्वतःचे आणि परके यातला फरक कळत नाही. स्वतःच्या मुला मुलीची सुद्धा किंमत केवळ मतावरच केली जाते. संध्याकाळी दोघांच्याही गोटात याच घटनेची चर्चा होती, पण यातून आपला फायदा कसा करून घेता येईल यावर.


   "बापू, मी काय म्हणतो. तुम्ही रमेशला तयार केले लग्नासाठी तर जमणार नाही का? तिची जिरवल्याचे समाधान त्याला लाभेल. आणि आबांचा प्रतिकार सुद्धा कमी होईल." बापूंचा एक खास माणूस, बाजीराव म्हणाले. 


   "पण रमेशचा अपमान झालेला कसा विसरेल तो?" बापू विचारत होते. 

 

   "बापू, ते माझ्याकडे लागलं. त्याला कसा तयार करायचा, मी बरोबर करतो." एक तरुण कार्यकर्ता, सुरेश म्हणाला.


    बापूंच्या घरात ही सर्व चर्चा सुरू होती. तसेच इकडे आबांच्या घरात सुद्धा अशाच प्रकारची चर्चा सुरू होती.


    "गुलाबराव, काय करायचं या बापूचं? लई माज चढलाय त्याला. त्याचा तो टगा पोरगा माझ्या पोरीसंग भांडतो काय? त्याला दाखवतोच इंगा." आबा मिशीवर ताव देत बोलत होते.


   "आबा, त्यापेक्षा आपण त्याला फॉर्म मागे घ्यायला तयार करूया ना. तुम्ही फक्त राधिकाला लग्नाला तयार करा. राधिका सून म्हणून घरात येत असेल तर बापू नक्कीच फार्म मागे घेतील." गुलाबरावने सल्ला दिला. 


   "अरे, तू पण ना! काहीही बोलतोस. आबांचा जावई घरातच आहे. त्यांना मुलगा शोधण्याची गरजच काय?" माणिकराव म्हणाले. 


   माणिकरावांच्या या म्हणण्यावर आबांचे तोंड कडू कारले खाल्ल्या सारखे झाले. 


   "अरे, जावई कसा तोला मोलाचा पाहिजे. रमेश चांगला हुशार मुलगा आहे, श्रीमंत आहे. आणि हे दोन्ही घर एकत्र आले तर ग्रामपंचायत सुद्धा यांच्याच ताब्यात राहील." गुलाबराव.


  "बघू, सध्या या गोष्टीवर चर्चा करून काय फायदा. मला मुलीला विचारावं लागेल. तिच्या मनाविरुद्ध करून नाही जमणार." आबा. 


   आबांनी असे म्हटल्यावर चर्चा तिथेच थांबली. सर्वजण उठून घरी जायला निघाले. जाता जाता माणिकरावांनी आबांना या गोष्टीवर चांगला विचार करायला सांगितले. 

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror