झपाटलेले घर (भाग-२६)
झपाटलेले घर (भाग-२६)
"आमच्या अपघाताची तपास फाईल अशा रीतीने बंद करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केला असता. कदाचित आरोपींना शिक्षा केलीही असती. परंतु मला माझ्या पद्धतीने बदला घ्यायचा होता, मी घेतला. रमेशला पाण्यात बुडवून मारला. त्याच्या तिन्ही दुष्ट साथीदारांना एकमेकात लढवून मारले. आता केवळ शेवटची एकच इच्छा बाकी राहिली होती, माझे आणि माझ्या सुजीतचे मिलन. तेही आता पुरे होणार. सुरेशच्या रुपात माझा सुजीत आता माझ्या समोर हजर आहे." राधिका सांगत होती.
"अगं, पण मीच तुझा प्रियकर सुजीत आहे हे कशावरून म्हणत्येस? या जगात असे अनेक सुरेश, सुजीत हयात असतील." सुरेशने शंका उपस्थित केली.
"सांगते, सर्व काही व्यवस्थित पणे सांगते. तीही एक वेगळी कथा आहे." असे म्हणत ती व्यवस्थित बसून सांगू लागली.
"या पिशाच्च योनीतुन मुक्त होण्यासाठी माझ्या मृतदेहावर म्हणजेच सर्व हाडांना एकत्र करून त्यावर अंत्यसंस्कार होणे आवश्यक होते. त्यासाठी माझ्या परीचयातीलच नव्हे तर माझ्या आप्तस्वकीयां मधील कुणीतरी भेटणे आवश्यक होते. मी बराच काळ कुणी तरी भेटण्याची वाट पहात भटकत राहिले. माझ्या दुश्मनांना शोधून शोधून मारले. हे तुला सांगितलेच आहे. राहता राहिले आबा, गंगुबाई अन् लामणगावचे इतर लोकं, त्यांना पाहण्यासाठी जायचा विचार करून मी एक दिवस तिथेही जाऊन आले. तिथे गेल्या वर आणखीच खिन्न व्हावे लागले. आबा आणि बापू म्हणजेच शामराव पाटील आणि रामराव पाटलांच्या घराण्याचा अस्त झालेला दिसला. बापूंना एकुलता एकच मुलगा होता, रमेश. तो त्याच्या पाप कर्माचा बळी ठरला, मी तर त्याला पाण्यात बुडवून मारला. त्याच्या मृत्यूने नव्हे तर त्याच्या वाईट कर्माच्या कलंकामुळे बापू आणि रखमा बाईंनी रमेश गेल्या पासून स्वतःला घरातच कोंडून घेतले, ना कुणाशी बोलायचे ना कुणाला भेटायचे. अखेर एक दिवस दोघांनीही सोबतच विष प्राशन करून इहलोकीची यात्रा संपवली." राधिका सर्व काही आठवण करून सांगत होती. अन्त सुरेश लक्षपूर्वक ऐकत होता.
"आबा आणि गंगुबाईचे काय झाले?" सुरेशच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते.
"त्यांचे तरी दुसरे काय होणार? पत्नीच्या दुःखद मृत्यू नंतर एकुलत्या एका मुलीचा सांभाळ करण्यासाठी एकाकी जीवन जगून शेवटी दुःखा शिवाय दुसरे काहीच हाती लागले नाही. लाडक्या मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू व्हावा आणि अंत्यदर्शना साठी तिचा देहही हाती सापडू नये. यापेक्षा मोठे दुःख काय असणार? खचलेले आबा एक दिवस हृदय बंद पडून वारले. त्यानंतर गंगू आत्याचेही तेच झाले. पती निधनानंतर एकुलत्या एका मुलाला सांभाळतांना झालेल्या हाल अपेष्टांचे फळही दुःखद मिळावे यापेक्षा दुर्भाग्य दुसरे काय असू शकते? तिनेही आबांच्या मागेच आपली जीवन यात्रा संपवली." राधिकेचा स्वर खूपच हळवा झाला होता.
"रमेशच्या त्या तिन्ही साथीदारांच्या मायबापाचे सुद्धा असेच हाल झाले असतील, नाही का? की त्यांना अजून दुसरे मुले मुली होते?" सुरेशला आता आणखीच उत्कंठा लागली होती.
"रमेश प्रमाणेच ते तिघेही एकेकटेच होते, त्यामुळे त्या तिघांचे आई बाप सुद्धा अशाच दुःखाने गेले. अशा पद्धतीने हे पाचही कुटुंब लामण गावातून नामशेष झाले. माझे सारेच आप्तस्वकीय गेल्याने मी सैरभर होऊन इकडे तिकडे भटकत फिरत होते. फिरता फिरता मी जामखेडच्या यात्रेत आले तेव्हा तिथे मला एक सुंदर तरुण सापडला तोच माझा सुजीत मला तुझ्या रुपात दिसला. तुला मिळवण्या साठी मी खूप खूप प्रयत्न केले परंतु मला यश मिळाले नाही. याला कारण तुझ्या घरातील संस्कार. रोज सकाळी ईश्वर स्मरणाने सर्वजण उठणार स्नान संध्या करून देवपूजा करणार, उठतांना, जेवतांना, एवढेच काय झोपतांना सुद्धा देवाचे समरण करून मंत्र म्हणणार. ज्या घरात तिन्ही त्रिकाळ देवाचे किंवा देवाच्या दूतांचे वास्तव्य असेल तेथे आम्हा पिशाच्च योनीतील आत्म्यांना प्रवेश करता येत नाही. किंबहुना आम्ही तिथे जाण्यास घाबरत असतो. म्हणून मला तुझ्या तारुण्याचा उपभोग घेता आला नाही. तू नोकरी निमित्त गाव सोडल्यावर आपलं काम सोप्प होईल असं मला वाटलं होतं. परंतु तू तिथेही हेच संस्कार सुरू ठेवलेस. माझा नाईलाज झाला. देवाच्या नाम स्मरणाने अभिमंत्रित स्थळी मी जाऊ शकले नाही. मी सतत संधी शोधत होते परंतु मला ती सापडत नव्हती. मी भटकत होते. शेवटी मी मनाशी नक्की केले की, मिलन नाही तर नाही किमान याच्या हाताने मुक्ती तरी मिळेल. म्हणून याच्या मागेच राहायचे. कारण माझ्या अति जवळच्या नातेवाईकां पैकी केवळ तूच तेवढा पुनर्जन्म घेऊन आलेला आत्मा होतास." ती तिच्या पिशाच्च योनीतील भटकंतीचे वर्णन करत होती.
"पण हा वाडा? हे सारे वैभव? हे तू कुठून आणि कसे मिळवलेस?" सुरेशचे प्रश्न काही संपत नव्हते.
"हे सारे मायावी आहे. आम्हा अतृप्त आत्म्यांना सर्व काही उभे करता येऊ शकते. परंतु ते सारे क्षणिक असते. इच्छित हेतू साध्य झाल्यावर हे सारे सोडावे लागते. हा वाडा केवळ फक्त आणि फक्त तुझ्यासाठी उभा केलेला आहे. तो इथे अगोदर नव्हता, आता आहे, तू गेल्यावर तो राहणार नाही."
"मला इथे येण्यासाठी मार्ग दाखवणारा तो म्हातारा कोण होता? की तोही मायावीच होता?" त्याला हा वाडा दाखवणाऱ्या वृद्धाची आठवण झाली.
"अग्नी दहन करतांना मुलगा किंवा मुलगी नसल्यामुळे आणि पूर्वजन्माच्या कर्माचे फळ म्हणून आबांनाही या योनीत यावे लागले होते. माझ्या मुक्तीसाठी, तुझी नि माझी भेट घडवून यशस्वी प्रयत्न केले म्हणून त्यांना या योनीतुन मुक्तता मिळाली." तिने माहिती पुरवली.
"मग आता तुझ्या मुक्ततेसाठी मी काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे? मला काय काय करावे लागेल? मी खरंच काही मदत करू शकतो का?" त्याच्या अंतरात आता तिच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली होती.
"जर तुला त्रास होणार नसेल, तुला मनापासून वाटत असेल तर माझ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कर. माझा मृतदेह म्हणजे तरी काय?, केवळ हाडांचा सापळा, तो मिळवण्यास मी तुला मदत करीन. मी दाखवील ती हाडं एकत्र कर आणि त्यांना विधिवत अग्नी दे. म्हणजे मला या योनीतून मुक्ती मिळेल." असं म्हणत ती उठून उभी राहिली. तोही तिच्या पाठोपाठ उभा राहिला. ती पुढे अन तो मागे असे ते चालायला लागले.
दोघेही एकामागे एक मौन होऊन चालत चालत खांडवी पुलाजवळ आले. नदीच्या पात्रात पाणी कमी झालेले होते. पुलाजवळून दोघेही खाली पत्रात उतरले. पुलाच्या एकदम खाली किनाऱ्याला कपारीमध्ये हाडाचा सापळा होता. तो तिने दाखवला. तिने सांगितल्या प्रमाणे त्याने ती सर्व हाडे गोळा केली. नदी पात्रात कोरड्या जागेत वाळूवर ठेवली. काठावर पाण्या बरोबर वाहून आलेली लाकडे गोळा केली. चिता रचून ती सर्व हाडे त्यावर ठेवली. अग्नी पेटवण्या साठी दोन गारगोटी दगड घेतले, एकावर एक घासून अग्नी पेटवला. हे सर्व तो एखाद्या कळसूत्री बाहुली सारखे निमूटपणे करत होता. बाजूला उभी असलेली राधिका केव्हा त्या चितेवरील हाडांत सामील झाली ते त्याला कळले सुद्धा नाही. तिचा केवळ आवाज त्याच्या कानावर येत होता आणि यंत्र मानवा प्रमाणे तो कृती करत होता. तिने सांगितल्या प्रमाणे मंत्र म्हणत खांद्यावरचा रुमाल ओला करून मृतदेहाला पाणी पाजले, चितेला अग्नी दिला. बाजूला पडलेल्या एका मडक्यात पाणी आणून चितेला प्रदक्षिणा घातल्या. विधिवत ते मडके फोडले आणि अश्रू भरल्या डोळ्याने बाजूला उभा राहून पाहू लागला. तेवढ्यात चितेतून आवाज आला.
"सुजीत, चल आता आपल्या मधुर मिलनाची घटिका जवळ आली आहे. ये सुजीत, मी तुझी वाट पाहत आहे. ते बघ ते दार तुझ्यासाठी उघडून ठेवले आहे. आता उशीर करू नकोस सुजीत. चल लवकर ये." आणि पाठोपाठ सुरेल आवाजात गीत ऐकू यायला लागले.
ये जवळ सख्या तू साजना, मनमोहना
चंदनापरी जळते काया सख्या तुजविना
मज साहवत नाही विलंब एका क्षणाचा
असा नकोस पाहू अंत या विरहिणीचा
सुजीत ऐकत होता आणि हळूहळू चितेकडे चालत होता. चालत चालत तो हळूच जळत्या चितेत शिरला. ना अंगाला चटके बसत होते ना चेहऱ्यावर कसले दुःख दिसत होते. दिसत होते फक्त आणि फक्त मधुर मिलनाच्या तृप्तीचा आनंद. अतृप्त आत्म्याचे चिरंतन मिलन होत होते.
समाप्त.


