STORYMIRROR

Pandit Warade

Horror Thriller

3  

Pandit Warade

Horror Thriller

झपाटलेले घर (भाग-२३)

झपाटलेले घर (भाग-२३)

6 mins
294

*झपाटलेले घर*

 *(भाग-२३)*


   सुजीतचा अपघाती मृत्यू आणि राधिकेचे बेपत्ता होणे, कॉलेज मधील सर्वांसाठी अतिशय धक्कादायक होते. सर्वजण हळहळत होते. अंतिम संस्काराचे तेरा दिवस पूर्ण झाल्यावर जेव्हा रमेश कॉलेजला आला, तेव्हा सर्व विद्यार्थी त्याच्या भोवती जमा झाले. राधिकेविषयी विचारू लागले, सुजीतच्या अपघाताबद्दल विचारायला लागले. त्यानेही अतिशय दुःख भरल्या स्वरात सर्व माहिती पुरवली. शक्य तितका दुःखाचा आव आणत, डोळ्यातून आसवं गाळत त्याने अपघाताची माहिती कळवली. अपघात घडण्या मागे नक्कीच काही भुताटकीचा प्रकार असावा, अशी शंकाही त्याने बोलून दाखवली. राधिकेच्या बेपत्ता होण्यामागे नक्की हेच कारण असावे. असे मतही त्याने व्यक्त केले. कारण एवढा शोध घेऊन सुद्धा राधिका सापडली नाही, तिला नक्कीच एखादे भूत, पिशाच्च घेऊन गेले असावे असे वाटते हे ही त्याने सांगितले.


  सर्व घोळका पांगल्या नंतर रमेश गीताला नदी काठी एकटीला घेऊन गेला. एका झाडाखाली निवांत जागा बघून ते दोघे जण बसले. 


  "रमेश, खूप वाईट झाले, सुजीतचा अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू होणं हे तर फारच धक्कादायक! चांगला मुलगा होता. कुणाच्या अध्यात मध्यात नव्हता. सरळ मनाचा माणूस. बिच्चारा!" गीता शोक व्यक्त करत होती. 


   "अध्यात मध्यात नव्हता असं कसं म्हणत्येस? माझ्या अन् राधिकेच्या मध्ये आडवा येत होता. मग केला आडवा." रमेश.


   "क्काय?" जवळ जवळ ओरडलीच गीता.


   "होय. त्याला मीच आडवा केला. मला राधिके सोबत लग्न करायचं होतं. त्यात त्याची आडकाठी होती. ती दूर केली." शक्य तेवढ्या शांत स्वरात त्याने माहिती पुरवली.


  "तुला जर राधिके सोबत लग्न करायचे होते, तर मला का खेळवत ठेवलंस? माझ्याशी प्रतारणा करून तू त्याच्याशी लग्न करून सुखी झाला असता असं कसं वाटलं तुला?" गीताला त्याच्या या दुटप्पी धोरणाचा राग यायला लागला होता.


  "अगं, आपण दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकत नाही का? राधिका एक चांगली मुलगी होती, संसद सचिव होती. कॉलेजमध्ये फायदा होईल म्हणून तिच्याशी मैत्री करायला गेलो, पण काय सांगू? हळूहळू तिच्यात गुंतायला लागलो होतो. इकडे तुझ्यावरचे जीवापाड प्रेम कमी होते की काय असे वाटून तिलाही आपल्या मार्गातून दूर केले." गीता नाराज होते आहे असे बघून त्याने विषयाला अलगद कलाटणी दिली, तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. 


  "म्हणजे? तू राधिकेलाही संपवलंस?" गीताचा आश्चर्य भरला प्रश्न.


   "होय. आपल्या दोघांच्या मार्गातला तिचा अडथळा मीच दूर केलाय. ती डोळ्यांपुढं असली की तुला विसरायला व्हायचं. ते मला नको होतं. म्हणून मीच तिला मारलं अन् दिलं नदीत फेकून. 


   "मग ती बेपत्ता झाली असं कसं म्हणतात सारेजण? ती सापडत कशी नाही अजून?" गीताचे प्रश्न. 


    "तिचे प्रेत सापडले नाही म्हणून. नदीच्या प्रवाहा सोबत गेली असेल समुद्रात वाहून, खाल्ली असेल समुद्र माशांनी. मग कशी सापडेल?" रमेश एक एक नवीन माहिती देऊन तिला आश्चर्याचे धक्के देत होता. 


  "तू एकट्याने केलंस हे सारं?" गीताने विचारलं. 


   "अगं, एवढं सारं एकट्याने कसं शक्य होणार होतं? गावातले दोन तीन मित्र माझ्या मदतीला होते ना. गणेश, शंकर आणि ओंकार. आम्ही चौघांनी या दोघांचा अपघात घडवला. खाली पडल्यावर गळा दाबून मारले. राधिकेला तर उचलून पाण्यातही फेकले." त्याने सविस्तर पणे घटना कशी घडली ती माहिती तिला दिली. 


  "पण! हे बघ तुला दिलेली ही माहिती फक्त तुझ्या माझ्यातच राहिली पाहिजे. चुकूनही याची कुठे वाच्यता करू नकोस. नाही तर तुलाही राधिकेला भेटायला पाठवीन मी." त्याने तिला इशारा दिला. 


  "नाही रे बाबा. मी नाही सांगणार कुणाला. तुझ्या गळ्याची शप्पथ!" तिने स्वतःच्या गळ्याला हात लावत त्याला आश्वस्त केले. ती मनातून फारच घाबरली होती. त्याच्या सोबत मैत्री करून आपण फार मोठी चूक केली असे तिला वाटू लागले. पण आता इलाज नव्हता. त्याला नाराज करून स्वतःवर संकट ओढवून घ्यायचे नव्हते. 


   बराच वेळ ते दोघे त्या ठिकाणी बसलेले होते. त्या वेळेत त्याने तिच्याशी सलगी करण्याचा, तिच्या शरीराशी लगट करण्याचा प्रयत्नही करून पाहिला पण तिने तो सफल होऊ दिला नाही. 'मूड खराब असल्या'चे कारण सांगून तिने त्याला टाळले. ती नाराज होऊ नये म्हणून त्यानेही आग्रह केला नाही. तो उठून घरी जायला निघाला. तिने त्याच्या सोबत जायचेही टाळले. 'मला थोडसं निवांत फिरायचे आहे'. असं सांगून ती तिथेच थांबली. तो निघून गेला. 


   नदी काठी अस्वस्थ होऊन फिरतांना तिला सारखं राधिका, सुजीत, त्याच्या सोबतचे नृत्य, अभिनय, रमेश सोबतची मैत्री हे सारं आठवत होतं. सुजीत सोबत नाटकात गायिलेले गीत...


*ऊरात घेऊन स्वप्न सुखाचे खुशीत विहरते आहे*

*एक अनामिक भीती मनामधि उगाच शिरते आहे*

*प्रीत फुलांनी सजल्या हृदयी मूर्ती सख्याची शोभे*

*पण काळाचे दुष्ट पाखरू कशास फिरते आहे*


आठवून तिच्या मनात एक अनामिक हुरहूर दाटली होती, भीती दाटली होती. तर दुसरीकडे रमेशच्या गूढ अशा पाताळयंत्री स्वभावाचे आज नव्याने झालेले दर्शन तिला घाबरवत होते. त्याच्या सोबत पुढील जीवन अंधारमय दिसत होते. हळूहळू त्याच्या सोबत असलेली मैत्री तोडण्याच्या निर्णयाप्रत ती आली होती. अचानक......

   

   बाजूच्या झाडीतून तिला कुणीतरी आवाज दिल्याचा भास झाला. भास? हो भासच असावा, आजूबाजूला कुणी दिसत नव्हतं. तरी ती मनातून हादरली होती. ती घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. पुन्हा एकदा आवाज आला,


  "गीताssss!" आवाज जवळून आला होता, ओळखीचाही वाटत होता. होय, राधिकेचाच आवाज आहे हा. राधिका? पण राधिका तर मेलेली आहे आत्ताच तर रमेशने तिला मारल्याचे कबूल केले आहे. मग? तिचे भूत तर नाही ना? राधिकेच्या भुताच्या कल्पनेने तिला भर थंडीतही घाम फुटला होता. तेवढ्यात.......


  बाजूच्या झाडा आडून राधिकेचा परत आवाज आला,


  "गीताsss, घाबरू नकोस गीता. मी तुला काहीही करणार नाही. मी फक्त तुला सावध करायला येते आहे." असं म्हणत राधिका समोर आली. 


  "अगं, तू तर मेली होतीस ना? मग इथे कशी?" गीता गोंधळून गेली होती.


   "घाबरणार नसशील तर सर्व काही सांगते." असं म्हणत ती गीताच्या अगदी जवळ येऊन बसली. तिचे ते नवीन रूप गीता अचंबित होऊन पहात होती. केसांचा अंबाडा बांधलेला, अंगावर पांढरी शुभ्र साडी, केसात खोचलेली पांढरी फुले, चेहऱ्यावर हलकेसे स्मित, गीता पहातच राहिली. 


  "राधिका, हे सारं काय आहे?" न राहवून गीताने विचारले.


  "गीता, घाबरू नकोस. मी खरंच मेली आहे पण माझे अंतिम संस्कार न झाल्यामुळे मी पिशाच्च होऊन फिरते आहे. मला माहित आहे, सुजीतला माझ्यापासून दूर करण्यासाठी तू प्रेमाचे नाटक केलेस, आणि नाटक करता करता तूच त्याच्या प्रेमात पडलीस. अगं, माझा सुजीत होताच तसा, कुणीही प्रेनात पडावं असा. रमेश पाताळयंत्री आहे गीता, त्याच्या सोबत तू कधीही सुखी होऊ शकणार नाहीस वेळीच सावध हो, त्याच्या पासून दूर हो. त्याला मी शिक्षा करणार आहे. माझ्या खूनाचा मी बदल जरूर घेणार आहे. त्यावेळी तुला खूप दुःख होईल, म्हणून आत्ताच सांगायला आले. सुजीतला आणि मला अपघात झाला नसून रमेशने केलेला घात आहे, त्याने आमचा खून केला आहे. त्याला मी शिक्षा करणारच आहे. तू त्याच्याशी लग्न करशील तर तुला लवकरच वैधव्याचे जिणे जगावे लागेल. म्हणून सावध हो." राधिका सांगत होती, गीता लक्ष पूर्वक संमोहित होऊन ऐकत होती. 


   "मला माफ कर राधिका. मी तुझा फार मोठा गुन्हा केला आहे. मी तुमच्या प्रेमात अडथळा बनण्याचा असफल प्रयत्न केला आहे" गीता सांगू लागली.


   "हे घडणारच होते गीता. तू एक निमित्त आहेस. तू आमच्या प्रेमात अडथळा आणावास अशी रमेशचीच कल्पना होती, तू फक्त त्याच्या प्रेमात आंधळी होऊन ती सांगेल तसे काम करणारी एक कळसूत्री बाहुली बनली होतीस. त्यात तुझा दोष नाही. म्हणून मी तुला शिक्षा नाहीतर सावध करायला आले. तू त्याचा नाद सोड, एखाद्या सुंदर तरुणाशी लग्न करून सुखी हो." राधिका समजावत होती.


  "पण तुझे काय? तू काय करणार आहेस पुढे? किती दिवस याच योनीत फिरत राहशील? यातून तुझी मुक्तता कधी आणि कशी होईल?" गीता उत्सव होऊन विचारत होती. राधिकेच्या सांगण्या नुसार ती आता शांत झाली होती.


   "माझा सुजीत जोवर मला भेटत नाही तोवर मला असेच भटकत राहावे लागणार आहे. माझे नी त्याचे मिलन होईल आणि त्याच्या हाताने माझ्या हाडांवर अंतिम संस्कार होतील तेव्हाच मला या योनीतुन सुटका होईल. तोवर मी अशीच फिरत राहणार, रमेशला मदत करणाऱ्या सर्वांचा बदला घेत राहणार. तुझाही बदला घेण्यासाठीच मी आले होते, पण तुझ्या मनात झालेली उपरती मला समजली. तू त्याची मैत्री तोडण्याचा निर्णय घेतलास हे मला समजले आणि म्हणून मी तुला हे सारे सविस्तर सांगितले. एकच काम करशील माझ्यासाठी. रमेशच्या कृष्णकृत्याची माहिती जगजाहीर होण्यासाठी इन्स्पेक्टर सावंतांना सविस्तर सांग. मला अजून गणेश, शंकर, आणि ओंकार यांचाही हिशेब चुकता करायचा आहे. येते मी जपून रहा." असं म्हणत ती क्षणात अदृश्य झालीसुद्धा. गीता केवळ पहातच राहिली. इंस्पेक्टरची भेट घेऊन हे सारं कथन करायचेच असे मनाशी पक्के करूनच ती तेथून उठली.


*क्रमशः*


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror