Pandit Warade

Horror Romance Thriller

3.5  

Pandit Warade

Horror Romance Thriller

झपाटलेले घर (भाग-२१)

झपाटलेले घर (भाग-२१)

7 mins
425


  *(भाग-२१)*


  गॅदरिंग संपले आणि कॉलेजला दोन दिवसांची सुटी जाहीर झाली. गॅदरिंगमधील नाटकात रमेश आणि राधिकाची जोडी बऱ्यापैकी गाजली होती. त्याचे सारे श्रेय राधिकेच्या अभिनयाचे, तिच्या आवाजाचे, संवाद फेकीचे. तिने गायिलेले ते गीत खूपच गाजले होते, तीनदा तर त्या गाण्याला 'वन्स मोअर'ची मागणी झाली होती. रमेश तर केवळ राधिकेसोबत जास्तीत जास्त वेळ राहता येते म्हणून ती भूमिका करत होता. त्या काळात त्याने राधिकेशी जवळीक करण्याचाही प्रयत्न करून पाहिला होता, पण राधिकेनं काही त्याची डाळ शिजू दिली नव्हती. त्याला किंचित सुद्धा न दुखावता त्याच्या पासून सुरक्षित अंतर राखण्यात ती यशस्वी झाली होती. 


  रमेशने दोन दिवसाच्या सुटीत राधिकेला गाठून लग्नाचा प्रस्ताव मांडून बघितला पण राधिकेनं तो फेटाळला होता. त्यावर त्या दोघांमध्ये बरीच वादावादीही झाली होती. आणि तेव्हाच त्याने, _'राधिका माझी नाही तर कुणाचीच नाही'_ या हेतूने राधिका कुणालाच मिळू द्यायची नाही हे मनाशी ठरवून टाकले होते. कॉलेजला जाण्याची वेळ जसजशी जवळ येत होती, त्याचा प्लॅन मनात आकार घेत होता.


  राधिका आणि सुजीत तयारी करून कॉलेजला निघाले. त्यांच्या मागे ठराविक अंतर राखून दोन मोटार सायकली चालत होत्या. रमेश सहित चौघे जण त्यांचा पाठलाग करत होते. रस्त्याने वर्दळ अशी फारसी नव्हती. सुजीत राधिका जसे खांडवी पुलावर आले. मागच्या एका गाडीने त्यांच्या गाडीला पाठी मागून जोराची धडक दिली. सुजीतची गाडी खाली पडली, बरेच दूरवर घसरत गेली. गाड्या उभ्या करून तोंड बांधलेले ते चौघे जण खाली उतरले, जवळ आले. सुजीतच्या डोक्याला थोडासा मार लागलेला होता. रक्त निघाल्या मुळे त्याची शुद्ध हरपली होती. राधिकेलाही चांगलाच मार बसला होता, परंतु ती शुद्धीवर होती. तिने बघितले, सुजीत निपचित पडलेला होता. दोघेजण त्याच्याजवळ आले आणि एकाने त्याचे पाय घट्ट पकडले, तर दुसऱ्याने त्याच्या गळ्यावर हाताने दाबले. ते बघून राधिका उठून धावायला लागली तसे रमेश आणि एकजण तिच्याकडे धावले. तिला पकडले एकाने तिला घट्ट पकडून धरले तर दुसऱ्याने गळा दाबायला सुरुवात केली. तिने खूप झटापट केली. त्या झटापटीत रमेशचा चेहरा उघडा पडला. तशी राधिका ओरडली, "रमेश, अरे हे काय करतोस? मी तुझी मैत्रीण राधिका ना? मदत करायची सोडून हे काय करतोस तू?" 


    "कोण कुणाचा मित्र आणि कोण कुणाची मैत्रीण? तू जर माझी मैत्रीण असतीस तर मला नकार दिला नसतास. माझा लग्नाचा प्रस्तावही ठोकरला नसतास. मी नावाचा रमेश आहे, मला आवडलेली गोष्ट मिळवल्या शिवाय कधी गप्प राहत नसतो. आणि जर ती गोष्ट मला मिळत नसली तर दुसऱ्यालाही मिळू देत नाही. बघतो तू कशी सुजीत सोबत लग्न करतेस ते?" रमेश सूड भावनेने अगदी भडकलेला होता. त्याने आणखी जोराने गळा दाबायला सुरुवात केली. राधिकेनेही सुटकेसाठी भरपूर धडपड केली. तिच्या धडपडीला शांत करण्यासाठी दुसरे दोघेही तिथे आले. ती मेली असे समजून चौघांनी तिला उचलले आणि पुलावरून पाण्यात फेकून दिले. तिने पाण्यात पडता पडता ती काहीतरी म्हणत होती. ......


*संपविलेस जरी पृथ्वीतलाहून जन्माला पुन्हा येईन मी*

*नारी जातीवरील अत्याचाराचा बदला जरूर घेईन मी*


   पाण्यात पडल्यावरही ती त्या ओळी जोरात म्हणत म्हणत वहात जात होती. ती आता बुडून मरणारच होती, तिच्या हाता पायात थोडेसेही त्राण उरलेले नव्हते. तिला दूरवर वहात जातांना त्यांनी बघितले आणि ते सुजीतला तिथेच सोडून आपापल्या गाड्यांवर बसून निघून गेले होते. 


    आपण जिला मेली असे समजून पाण्यात वाहतांना पहात होतो. ती अजून जिवंत आहे की काय? रमेश विचार करत होता. तो सत्य समजून घेण्यासाठी थोडासा पुढे गेला. त्याला आपल्याकडे येतांना बघून राधिका की राधिकेचा आत्मा जे काही होते ते जोरात गीत म्हणत पुढे पुढे चालत गेले. रमेशने न्याहाळून बघितले, ती राधिकाच होती. आपण पाण्यात फेकतांना ती जिवंतच होती. नक्कीच ती मेली नसून त्यातून वाचली असावी. आता थोडेसे नरमाईने घेऊन जवळीक साधावी हेच बरे. असे म्हणत तो तिच्या मागोमाग जायला निघाला.


  सावज जाळ्यात सापडतय असं दिसताच राधिका हळूच मदमस्त चालीने पुढे पुढे चालू लागली. राधिका जरी नाजूकपणे पावले टाकत चालत असली तरी रमेशच्या टप्प्यात सापडत नव्हती. तो खूप जोरात चालत होता. त्याची गाडी, ड्राइवर कितीतरी मागे राहिले होते. तो कितीही चालला तरी ती तितकेच अंतर ठेवून पुढे असायची. त्याने तिला आवाज देऊन पहिला, परंतु ती काहीही न ऐकता पुढेच चालत होती. 'बहुतेक तिला ऐकू जात नसावे.' असे वाटून त्याने तिला हाका मारायचा सपाटाच लावला. तिने हळूच मागे वळून बघितलं. त्याच्याकडे पाहून हलकेच स्मितहास्य केले. तसा त्याच्या जीवात जीव आला. 


  राधिका एका झोपडीवजा घराजवळ थांबली. घराच्या अंगणात अंधुकसा प्रकाश होता. एक खाट होती त्यावर छानसा बिछानाही होता. राधिकेने सांगितल्या नुसार तो त्या खाटेवर बसला. तिथली टापटीप बघून तो भारावून गेला होता, मंत्रमुग्ध झाला होता. आपण शोध मोहिमेवर आहोत हेच तो विसरला होता. राधिका आता काय काय करते याकडेच त्याचे लक्ष लागून राहिलेले होते. तो सारे काही न्याहाळून पाहत होता. राधिकेने हे सर्व महिन्याभरात कसे जमवले असेल? तिने लग्न केले असेल काय? तसे तर वाटत नाही, तिच्या गळ्यात मंगळसूत्र तर दिसत नाही. तो विचार करून करून चक्रावला होता. तेवढ्यात राधिका एका ट्रेमध्ये पाण्याचे दोन ग्लास घेऊन आली होती. त्याला तहान लागलेली होतीच परंतु तो विसरला होता. ग्लास बघून त्याला पाणी प्यायची आठवण झाली. त्याने पट्कन एक ग्लास उचलून तोंडाला लावला सुद्धा. पण हे काय? तहान का भागली नाही? पुन्हा दुसरा ग्लास ही उचलला आणि तोंडाला लावला.


   रमेशचा हा अधाशीपणा पाहून राधिकेला जरासे हसूही आले. ती अनिमिष नजरेने त्याच्या कडे पहात होती. तोही तिच्याकडे मंत्रमुग्ध होऊन बघत होता. 


   "काय बघतोस एवढा टक लावून. दृष्ट बिष्ट लागायची मला." राधिकेनं लडिवाळ पणे विचारले. 


   "अं? कुठं काय? काही नाही, काही नाही. ते आपलं sss..." तो काहीसा गोंधळला होता. 


   तिला त्याचं हसू आलं. "अरे, मी तर तुझी राधिका. असा काय करतोस? ओळख विसरलास की काय? अरे, आपण नाटकात सोबत काम नाही का केलं? होय, तीच तुझी राधिका तुझ्या डोळ्या समोर उभी आहे." राधिका सांगत होती. 


  "तुला आठवतं सगळं? आपण नाटकात काम केलेलं?" त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता.


   "म्हणजे? तू विसरलास की काय? त्यातलं ते गाणं किती सुप्पर झालं होतं रे? तीनदा वन्स मोअर पण झालं होतं त्याला. कोणतं गीत होतं आठवतं?" तिने त्याला आठवण करून दिली. 


  "तेच ना? _*किती वाट पाहू....?*_ व्वा! ते जन्मातही विसरणार नाही मी. काय गायली होतीस तू! तुझी ती अदाकारी पाहून तर भले भले चक्रावून गेले होते तेव्हा." त्याच्या डोळ्या समोर नाटकाचा संपूर्ण रंगमंच उभा राहिला होता. हळू हळू तो आता रंगात यायला लागला होता.


  "अन् तुझे ते नृत्य? काय अफलातून नाचला होतास तू? नुसता टाळ्यांचा पाऊस पडत होता. दहा मिनिटांकरता नाटकही थांबले होते तेव्हा." ती त्याला आणखी रंगात आणण्याचा प्रयत्न करत होती. खरे तर त्याच्या नृत्यापेक्षा तिचीच अदाकारी भावली होती प्रेक्षकांना. पण त्याचं श्रेय त्याला देऊन ती त्याला उत्साहित करत होती.


  "अगं, माझं नाचण्याचं कारण तर तूच होतीस. तुझ्यावर भाळूनच तर तो नाच केला होता. त्यावेळचं तुझं ते लाजणं, लाजून हासणं, त्यावेळची तुझी ती अदा, तेव्हाच तर हा रम्या झाला होता फिदा. आणि म्हणूनच तर तुला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. पण त्यावेळेस तू तो धुडकावून लावलास." तो ही तिला मोठेपण देत होता.


  "अरे, तुम्हा पुरुषांना काहीच कसं कळत नाही? बायकांचा होकार आणि नकार ज्याला समजून येत नाही त्याला पुरुष म्हणायचं तरी कशा साठी?" ती आणखीच लाडात येत म्हणाली. 


   "म्हणजे? तुमचं नाही म्हणजे हो, आणि हो म्हणजे नाही असतं असं समजायचं होय? अरे रे मी उगाच डोक्यात राख घालून तुझ्या साठी त्या बिचाऱ्या सुजीतचा ...." तो बोलता बोलता थोडा थबकलाच. 


  "बोल बोल. थांबलास का? सुजीतचा अडसर दूर केला म्हण की मार्गातला. बरं केलंस. एक दिवस सर्वांना जायचं आहेच. सुजीत गेला त्या पाठोपाठ तुलाही जावं लागेल. त्या..." ती असं म्हणताच तो गांगरला. 


  "क्काय? मला?" तो एकदम दचकलाच.


   "हो तुलाच. अरे, तुला, मला सर्वांनाच जायचं आहे. कुणी कायमचं थोडंच राहतं इथं?" फरक एवढाच की कुणी कसं जातं, तर कुणी कसं जातं. तसंच तुला मला सर्वांना जायचंच आहे." असं म्हणत राधिकेनं धमकी वजा इशाराच देऊन टाकला. 


  "बरं जाऊ दे. आपल्या लग्नाचा काय विचार केलास तू? मी खरंच तुझ्या शिवाय नाही जगू शकत गं. बघ आपला जोडा कसा शोभून दिसतो?" असं म्हणत तो तिच्या जवळ जाऊन उभा राहू इच्छित होता. पण राधिकेनं लाजून अस्सा काही मुरका मारला की, बघणाऱ्याच्या काळजाचे हजार तुकडे नक्कीच व्हावे. 


  "इश्श! मी नाही जा." असं म्हणत ती पळायला लागली. तसा तोही तिच्या पाठीमागे पळायला लागला. पळता पळता ते दोघेही नदीच्या काठावर येऊन पोहोचले.


  "ऐ, आपण पोहायचं का नदीत?" असं म्हणत तिनं नदीत उडी मारली सुद्धा. तिच्या पाठोपाठ त्यानेही उडी मारली. दोघेही मस्त पोहण्याचा आनंद घेत होते. ती अतिशय उत्तेजित होऊन त्याच्या अंगावर पाणी उडवत होती, ती ही तिच्या अंगावर पाणी उडवत होता. बराच वेळ पर्यंत तिने त्याला खेळवले. दोघांचा खेळ चांगलाच रंगला होता. पाण्यात भिजल्याने तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. त्याचे लक्ष पोहण्या कडे कमी आणि तिच्या सौंदर्या कडेच जास्त होते. त्याला हे लक्षात येत नव्हते की, हिच्यात एवढी शक्ती आली कुठून? या अगोदर तर पोहतांना कधी दिसली नव्हती? त्याला कुठे माहीत होते की, तो नाजूक स्त्रीदेह नसून एक अतृप्त आत्मा आहे ते? ती त्याला चांगलेच खेळवत होती. बराच वेळ खेळवल्या नंतर तिने पोहता पोहता त्याच्या गळ्याला मिठी मारली. पाण्यात बुडण्याच्या भीतीने मारली असेल असे त्याला वाटले. परंतु तिने त्याला सोडलेच नाही, हळू हळू पाण्यातच त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. 


   "अगं, असं काय करतेस? मी मरेन ना?" जीव वाचवण्यासाठी तो तडफडत होता. मात्र तिच्या हाताचे पंजे त्याच्या गळ्या भोवती आणखीच घट्ट आवळले जाऊ लागले. 


  "असाच आवळला होतास ना माझा गळा? मी अशीच भीक मागत होते तुझ्याकडे, पण तुला दयामाया अली नाही. आठवतं तुला मी मरते वेळी काय म्हटले होते ते? मी म्हटले होते...

*संपविलेस जरी पृथ्वीतलाहून जन्माला पुन्हा येईन मी*

*नारी जातीवरील अत्याचाराचा बदला जरूर घेईन मी*

  एका निष्पाप स्त्रीवरील अत्याचाराचा सूड घेत आहे मी. मर आता तडफडून." असं म्हणत तिने त्याचा गळा आणखी जोरात दाबायला सुरुवात केली. त्याने बघितले, आता मात्र ती राधिका नसून ते एक प्रेतात्मा आहे. अक्राळविक्राळ चेहरा, एक डोळा मोठ्ठा, दुसऱ्या डोळ्यातून आगीचा लोळ बाहेर पडतोय, बाहेर आलेले नांगराच्या फाळा सारखे सुळे दात, बोटांची लांब लांब वाढलेली धारदार शस्त्रासारखी नखे, विस्कटलेले केस. हे सारे पाहून त्याला समजून चुकले, की राधिकेचे भूत आपला सूड घेते आहे. भीतीनेच त्याच्या हृदयाची धडधड बंद झाली. खेळ खल्लाssस. निष्प्राण मृतदेह पाण्यावर वहात होता.


*क्रमशः*


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror