STORYMIRROR

Pandit Warade

Horror Thriller Others

2  

Pandit Warade

Horror Thriller Others

झपाटलेले घर - भाग १९

झपाटलेले घर - भाग १९

6 mins
174

  गंगुबाई आज सकाळपासूनच जराशी अस्वस्थ होती. का कुणास ठाऊक, मन बेचैन होत होतं. मुले कॉलेजला गेल्यापासून मनात बेचैनीने घर केले होते. सकाळच्या घटनेने मनात कसे काहूर उठले होते. सकाळीच राधिका आणि आबांमध्ये शाब्दिक चकमक झडली होती. आबा आपल्या प्रतिष्ठेसाठी राधिकेचे लग्न रमेश सोबत करण्याचा आपला विचार बदलायला तयार नव्हते, राधिका मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. राधिकेचा निर्णय योग्यच होता. लहानपणापासून सुजीतला ती ओळखत होती. त्याचा संयमी स्वभाव तिला फार आवडला होता. त्याच्या सोबत लग्न करून तिला याच घरात राहता येणार होते. आबांचा 'हम करेसो कायदा' हा स्वभाव माहीत असल्यामुळे पुढे काय होणार? हा विचार तिला अस्वस्थ करत होता. बेचैनीमुळे कुठले कामही उरकत नव्हते.


  इकडे आबाही जरासे अस्वस्थच झाले होते. आज ते राधिकेला नको इतके बोलले होते. पण करणार काय? सुजीत जरी भाचा असला तरी मनातून तो नको वाटत होता. बापूही पारंपरिक विरोध दूर सारून स्वतःहून मागणी घालताहेत. त्यांच्या मागणीला डावलले तर आणखी धार चढेल विरोधाला. गावातही नाव जाईल. 'मुलगी फारच लाडावून ठेवली' असे लोकं म्हणतील. एक मुलगी धाकात ठेवता आली नाही, गावाचा कारभार काय करतील? हा विचार करून लोकं आपल्या पासून दूर जातील. एकटेच हॉल मध्ये बसून ते विचार करत होते. विचार करून करून डोकं गरगरायला लागलं होतं. सकाळची घटना पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होती. 


  "राधिका, काय ठरवलंस मी सांगितलेल्या गोष्टीवर?मला आज बापूंना कळवायचं आहे." आबा राधिकेला कॉलेजला जाण्याचा अगोदर म्हणाले. 


  "आबा, माझा निर्णय मी या अगोदरच तुम्हाला सांगितलेला आहे. पुन्हा पुन्हा का विचारताय? मी निर्णय बदलेन असं वाटतं का?" राधिकेचे प्रतिउत्तर.


  "का असा हट्ट करून त्रास देतेस बेटा? हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तू जर माझं ऐकलं नाहीस तर लोकं काय म्हणतील मला?" आबांनी आपली मजबुरी सांगितली. 


  "आबा, तुम्हाला तुमची प्रतिष्ठा जास्त की माझं जीवन? मी सुजीतवर खूप प्रेम करते. त्याच्या शिवाय मी दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही. रमेशचा तर मुळीच नाही." आपल्या मता वर ठाम रहात राधिका म्हणाली. 


  "माझं ऐक राधिका, मला कठोर बोलायला लावू नकोस." 


  "आबा, मलाही जास्त बोलायची इच्छा नाही या विषयावर. तुम्हाला दुखवावे वाटत नाही, पण तुम्ही जर तुमच्या निर्णयावर ठाम असाल तर मला नाईलाजाने टोकाचा निर्णय घ्यावा लागेल." राधिकेने शेवटचा निर्णय सांगितला. 


   "सुजीतला जर या घरातून काढले गेले तर?"


   "तर मी तुम्हाला सोडून त्याच्या बरोबर घराबाहेर पडायला मागे पुढे पाहणार नाही."


   "ठीक आहे बघतोच सुजीत कुठवर तुला साथ देतो ते? मलाच काही तरी करावे लागेल. तो इथून दूर गेल्यावरच तू त्याचा नाद सोडशील. तशी तू ऐकायची नाहीस."


   "तुम्हाला जे करता येतं ते करा. मी माझं बघेन काय करायचं ते. आता मला कॉलेजला जायला उशीर होतोय. मी येईपर्यंत तुम्हीच विचार करा. मी आल्यावर या विषयावर शेवटची चर्चा करू." असे म्हणून ती त्यांच्या होकाराची वाट न बघता तिथून निघून गेली. 


  हा सगळा घटनापट त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता.


  एवढ्यात बाहेर पोलीस व्हॅन येऊन उभी राहिली. रमेश सोबत इन्स्पेक्टर सावंत आत येण्याची परवानगी मागत होते. त्यांना पाहून आबांच्या छातीतच धस्स झाले.


  "या साहेब! मी शामराव किसनराव देशमुख. काय काम काढलंत साहेब?" काळजीयुक्त स्वरात विचारले.


   "तुम्ही सुजीतचे मामा ना?" सावंतांचा प्रश्न.


   "हो. काय झालं साहेब? काय केलं त्यानं?" आबांचा प्रतिप्रश्न.


   "त्यानं काही नाही केलं, त्याच्या बाईकचा अपघात झालाय. तुम्हाला हॉस्पिटल मध्ये यावं लागेल." सावंतांनी मोजक्या शब्दात सांगितलं.


  "माझी राधिका पण त्याच्या सोबत होती. ती कुठाय? अन जास्त लागलंय का त्यांना?" घाबरलेल्या स्वरात आबांनी विचारले.


   "आधी गाडीत बसावे. आपण गाडीतच सविस्तर बोलू या विषयावर. आपण लवकर जायला पाहिजे." असे म्हणत सावंत लगेच उठून उभे राहिले. त्यांच्या मागे आबांना उठावेच लागले. आबांनी खुंटीवरचा शर्ट काढून अंगावर चढवला आणि ..


  "गंगू, मी जरा शहरात जाऊन येतो. बघतो काय झालंय ते." आत डोकावून गंगूला सूचना केली व सावंतांना स्वतःच्या गाडीत घेऊन बसले. रमेशला पोलीस गाडीत बसवून दोन्ही गाड्या रस्त्याला लागल्या. 


   "साहेब, फार मोठा झालाय का अपघात?" आबांनी काळजीयुक्त स्वरात विचारले. घरात गंगूला ऐकायला जाईल म्हणून त्यांनी जास्त चौकशी केली नव्हती. 


   "देशमुख साहेब, माफ करा. पण यो आता आपल्यात नाही राहिला. त्यासाठीच आपल्याला हॉस्पिटलला जायचंय." सावंतांनी खुलासा केला. 


   "माझी राधिका? ती पण होती त्या गाडीवर. ती कशी आहे?" आबांनी अधीरतेने विचारले. 


   "अपघात स्थळी केवळ सुजीतचाच मृतदेह सापडला. ती जिवंत असावी बहुतेक. आमचे शोध पथक तिचा शोध घेत आहे." सावंतांनी सांगीतल्यावर आबांना हुंदका आवरता आला नाही. त्यांनी गाडी बाजूला घेतली, अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सावंतांनी त्यांना सावरले.

  

   "देशमुख साहेब, मन आता घट्ट करावे लागेल तुम्हाला. समोर आलेल्या प्रसंगाला सामोरे जावेच लागणार आहे. आपण एकदा हॉस्पिटलला जाऊ तिथले सोपस्कार पूर्ण करू तोवर राधिकेचाही शोध लागलेला असेल." सावंत म्हणाले तसे आबा गाडी सुरू करून रस्त्याला लागले. 


  दोन्ही गाड्या हॉस्पिटलला पोहोचल्या. सावंत खाली उतरले. तिथल्या रजिस्टरवर सही केली. तोवर आबाही तेथे आले. त्यांची सही झाली आणि ते मृतदेह असलेल्या खोलीत पोहोचले. तिथल्या एका कर्मचाऱ्याने सुजीतच्या मृतदेहा वरील कपडा बाजूला सारून तोंड उघडे केले. 


  समोर सुजीतचा मृतदेह बघताच आबांना रडूच कोसळले. त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. तोवर रमेशही तेथे पोहोचला होता. आबांच्या सुरात सूर मिसळून तोही रडायला लागला. थोडा वेळ रडून झाल्यावर सावंतांनी त्यांना सावरले. तिथल्या एका फार्मवर दोघांच्या सह्या झाल्यावर तो मृतदेह पोस्टमार्टेम साठी हलवला. पोस्टमार्टेम होईपर्यंत ते घटना स्थळी जाऊन येण्यासाठी निघाले. 


  "हवालदार, काही शोध लागला की नाही?" घटनास्थळी पोहोचताच सावंतांनी हवालदाराला विचारले.


  "नाही सर. अजून तरी नाही सापडला. प्रयत्न सुरूच आहेत सर." हवालदाराने सॅल्युट मारत माहिती पुरवली.


   "हवालदार, एखाद्या शिपायाला सोबत घेऊन तुम्ही जवळ पासच्या सर्व दवाखान्यात तपास करा. ओढणीचा तुकडा कठड्याला अडकलेला सापडला म्हणून आपण सारे पाण्यात शोध घेत आहोत. परंतु असंही होऊ शकतं की, आपण येण्या अगोदरच राधिकेला जिवंत बघून कुणी एखाद्या हॉस्पिटलला पोहचतं केलं असेल. त्या दिशेनंही शोध घेतला पाहिजे." सावंतांचे म्हणणे हवालदाराला पटले, त्यांची परवानगी घेऊन एका जवानाला बरोबर घेऊन हवालदार शहरात जायला निघाले. 


   "आबा, मीही उतरतो पाण्यात राधिकेच्या शोधा साठी." असे म्हणत रमेशने आबा नको नको म्हणत असतांनाही पुलावरून पाण्यात उडी मारली. आबा नुसते बघतच राहिले. पोलिसांचे पथकसुद्धा पुन्हा एकदा शोधकार्यात मग्न झाले. पथकाच्या प्रमुखाला सावंतांनी जवळ बोलावले, तपास कामात मदत होईल अशा काही महत्वाच्या सूचना दिल्या. तेवढ्यात सावंतांच्या मोबाईल वर हॉस्पिटलमधून, पोस्टमार्टेम पूर्ण झाल्याचा डॉक्टरचा कॉल आला. 


   "चला देशमुख साहेब, डेथ बॉडी ताब्यात घ्यायला बोलावलंय डॉक्टरांनी. आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं." असं म्हणत सावंत गाडीत बसले सुद्धा. 


  आबांनी रमेशला आवाज देऊन वर बोलावले. त्याने कपडे बदलले आणि तोही गाडीत येऊन बसला. दोन्ही गाड्या पुन्हा एकदा हॉस्पिटलकडे जायला निघाल्या.


   हॉस्पिटल मधील कागद कारवाई पूर्ण करून भारावल्या अंतःकरणाने सुजीतचा मृतदेह ताब्यात घेतला. अम्ब्युलन्स मध्ये मृतदेह ठेवून रमेशला सोबत ठेऊन पुढे आबांची गाडी आणि मागे अम्ब्युलन्स अशा गाड्या रस्त्याला लागल्या. 


   अम्ब्युलन्स गावात पोहोचली. भराभर लोकं जमा झाले. सुजीतचा मृतदेह बघताच एकच आक्रोश झाला. आबा तर एकदम शून्य नजरेने बघत बसले होते. गंगूबाईला चार चार जणी आवरत होत्या. सर्व जण या दुर्घटने बद्दल आणि राधिके बद्दल विचारत होते. रमेशची तर माहिती पुरवता पुरवता तारांबळ होत होती. ' _अपघात झाला, आणि राधिका दवाखान्यात आहे_ ' सांगून तो स्वतःची सुटका करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. तेवढ्यात रामराव बापूही तिथे हजर झाले. त्यांनी उपस्थितांपैकी दोघ जणांना मयताचं सामान आणायला पाठवले. लाकडं जमा करायला एक दोन जणांना पाठवलं. बापूंनी सर्व सूत्रं हातात घेतले होते. 


   आक्रोश जास्तच वाढत गेला. आबांचे रडणे बंदच झाले. ते कुणाला काहीच बोलेनासे झाले. गंगूबाईची दातखिळी बसू लागली. हे सर्व पाहून बापूंनी घाई करून प्रेत लवकर स्मशान भूमीत घ्यायला लावले. नटूनथटून यज्ञवेदीवर चढण्याच्या वयात सुजीत सरणावर चढला होता. ज्याच्या मागे उभे राहून अक्षता टाकायच्या, त्याच्यापुढे हातात मडके घेऊन पाणी धरायची वेळ नियतीने आबांवर आणली होती. मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी सुजीतला अग्नी दहन दिले. कुणास ठाऊक नियतीने पुढे काय काय दाखवायचे ठरवले होते?


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror