STORYMIRROR

Pandit Warade

Horror Romance Thriller

3  

Pandit Warade

Horror Romance Thriller

झपाटलेले घर - भाग १७

झपाटलेले घर - भाग १७

5 mins
313

     "आबा, तुमच्या लेकीनं बघा काय आणलं?" असं म्हणत राधिका घरी आल्या बरोबर आबांच्या पायावर वाकली. मिळालेला सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेत्री चा पुरस्कार त्यांच्यापुढे ठेवला. तोवर सुजीतही सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेता पुरस्कार घेऊन आला. "नमस्कार करतो मी मामा." असं म्हणत तोही पायावर वाकला.


         "व्वा! माझ्या बाळांनो आज खुश केलंत मला. अभिमानानं छाती फुगली चार इंचानं. जीवनात सदैव असेच यशस्वी व्हा." असं म्हणत आबांनी दोघांच्याही पाठीवर मायेचा हात फिरवला. 


        "जा राधा, तुझ्या आईला सांग तुझा हा प्रताप. तिलासुद्धा कळू दे, मी तुला कसे सांभाळले? कसे कसे संस्कारित करून वाढवले? तुझा हा आजचा पुरस्कार नेऊन दाखव तिला." त्यांनी ते मानपत्र वाचून तिच्या हातात देत सांगितले आणि बाहेर निघून गेले.


      आबांच्या सुचने प्रमाणे दोघंही मैनावतीच्या प्रतिमे समोर आपापले पुरस्कार ठेऊन, नमस्कार करून उभे राहिले. जणू त्यांना सांगत असावेत की, बघा आमची जोडी कशी एकमेकांना पूरक आहे? दोघंही कसे एका पेक्षा एक सरस आहेत?


  "राधिका, जरा येतेस का इकडे?" स्वयंपाक खोली मधून गंगुबाईंची हाक आली म्हणून राधिका आत गेली. सुजीत मात्र पहिल्यांदा एवढा वेळ प्रतिमेसमोर उभा होता. राधिका आत गेली असे बघून तो मैनावतीला सांगू लागला,


  "मामी, तुमचा सहवास मला फारसा लाभला नाही, पण जो काही लाभला त्याचा हा परिणाम तुमच्या समोर आहे. आज जे काही यश मिळाले मला, ते तुमच्या आशीर्वादाचे फळ आहे. मामी, राधिका मला लग्ना विषयी विचारत होती. मी जरी तिला हो म्हणून सांगितले असले तरी पण मला तुमच्या कडून होकार पाहिजे आहे. मला कल्पना आहे तुम्हाला ही जोडी नक्कीच आवडेल. तुमच्या सुजीतने आजवर तुम्हाला काही मागितले नाही, आज काही मागतले तर तुम्ही नाकारणार नाही. पण मामी, मी मागतोय म्हणून नाही तर तुमची राधा माझ्याकडे सुखात राहील असे वाटत असेल तर आणि तरच तिचा हात माझ्या हातात द्या. तुमच्या संमती शिवाय मी तिच्याशी लग्न करणार नाही." सुजीत अतिशय भावविभोर झाला होता. राधिका केव्हा जवळ येऊन उभी राहिली ते सुद्धा कळले नाही त्याला. त्याची नजर मैनावतीच्या प्रतिमे कडे लागलेली होती, जणू त्यांच्या होकाराची प्रतीक्षा करत होती. आणि तेवढ्यात- त्याला प्रतिमा हसल्याचा भास झाला, नव्हे तो भास नाही तर त्या चेहऱ्यावर खरोखर हास्य उमलल्याचे जाणवले. त्याला अतिशय आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्याने टुणकन उडी मारली अन् राधिकेचा धक्का लागला तेव्हा तो दचकलाच.


  "राधा, तू केव्हा आलीस?" 


      "जेव्हा स्वारी अत्यानंदात मग्न होती तेव्हाच, जा तुला आत्याने बोलावलंय आत." राधिकेने सांगीतल्या वर तो आत निघून गेला. राधिकाही आईशी हितगुज करायला लागली.


  "आई, बघितलास? कसा आहे गं तुझा जावई? माझी निवड योग्य आहे ना आई? आई, बघ ना आबा माझ्या मनाविरुद्ध लग्न लावू बघताहेत त्या रमेश सोबत. तो बिलकुलच आवडत नाही मला. मग मी कशी सुखी होईन तिथे? तू जरी मला सोडून गेलीस तरी मी नाही जाणार तुला सोडून. मी सुजीत सोबत लग्न करून इथेच राहणार आहे तुझ्याच सहवासात. चालेल ना आई? सांग ना माझं काही चुकतंय का? चुकत असेल तर कान धरून सांग, पण तुझ्या पासून दूर नको करुस मला. आई तू नाहीस असे कधीच नाही वाटले मला. ही केवळ प्रतिमा नाही तर साक्षात तूच आहेस. तुझी प्रेमळ नजर माझ्यावर सदैव आहे. आबा केवळ आणि केवळ त्यांच्या तथाकथित प्रतिष्ठे साठी मला घराबाहेर काढायला बघताहेत. माझ्या मनातील भावना त्यांना कळत नसतील का? असा हट्ट का करत असतील ते? मी सुजीत सोबत लग्न केले तर त्यांच्या प्रतिष्ठेला कुठे काही धक्का पोहोचणार आहे? त्यांना काय कळणार भावना? त्यासाठी स्त्रीचं हृदय लागतं. पुरुष तर फक्त व्यवहार बघत असतात. भाव भावना या गोष्टींसाठी लागणारं कोमल हृदय त्यांच्याकडे नसतंच. नाही का? पण? पण तसं कसं म्हणता येईल? सुजीत बघ कसा कोमल हृदयाचा आहे. तुला काय सांगू आई, अगं माझ्या डोळ्यातले आसवं बघून खूपच रडवेला झाला होता तो. मला तर बाई, खूपच संवेदनशील वाटला स्वभाव त्याचा. तू हयात असतीस ना तर तू माझा हात त्याच्या हातात आबांचा विरोध पत्करून सोपवला असतास. आताही तू तेच करणार आहेस म्हणा. मी बघितलं तुला सुजीत खूप आवडलाय. चेहऱ्यावरचं हसू पाहिलंय मी तुझ्या. आई, खरंच एकदा सांग ना आबांना. मी कधीच सुखी होणार नाही त्या रमेश सोबत. आबांनी हट्टच धरला तर मी माझ्या जीवाचं काही तरी...." तिनं वाक्य पूर्ण करण्याच्या आत सुजीतने तिच्या तोंडावर हात ठेवला. प्रतिमेच्या चेहऱ्यावर क्षणात भीतीचे, काळजीचे, तर क्षणात आनंदाचे भाव उमलत राहिलेले दिसले. 


  'बाळांनो, तुम्हाला असे सोबत पाहून तर मी खूप खुश झाले आहे. आता एकच इच्छा उरली आहे, ती म्हणजे तुम्हाला लग्नाच्या पोशाखात बघायची. मला खात्री आहे, तुमची जोडी जगात नंबर एक असणार आहे. भगवंताने तर तुम्हाला एकमेकांसाठीच निर्माण केलेले आहे. तुम्हा दोघांना कुणीही, अगदी काळ सुद्धा अलग करू शकणार नाही. कुणी प्रयत्नही करून पाहिला तर अवश्य हाणून पाडा, माझा शुभाशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. सदा सुखी रहा. रेशमी बंधनात अतूट रहा. जा, लग्नाच्या पोशाखात बघू द्या. मगच मी आनंदाने मुक्त होईल.' मैनावतीच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव उमटलेला दिसला. दोघेही तृप्त पण सलज्ज नजरेने एकमेकांकडे बघून हसत होते. तेवढ्यात बाहेर आबांच्या येण्याची चाहूल लागली, तसे दोघेही स्वयंपाक घरात पळाले. जेवणाची तयारी झालेलीच होती. सर्वांनी प्रसन्नतेने जेवण केले. आबा, सुजीत आपापल्या खोलीत निघून गेले. राधिका आणि गंगुबाईंनी सर्व आवरा आवर करून त्याही झोपायला निघून गेल्या. सर्वांनाच अगदी शांत झोप लागली.


   "राधिके, खूप खूप मनापासून अभिनंदन हं पुरस्कारासाठी." रमेशने शेतात जाणाऱ्या राधिकेला रस्त्यात गाठून गुलाबाचे फुल देत म्हटले. 


  "तुझेही मनःपूर्वक अभिनंदन! तुलाही पुरस्कार मिळाला आहेच ना." प्रत्युत्तरादाखल तिने तेच फुल परत त्याच्या हातात सोपवले.


   "का गं, आवडले नाही का मी दिलेले फुल?" रमेशचा नाराजीचा सूर.


   "आवडले ना. आता दुसरे फूल कुठून आणू? तसेही आता हे फूल माझेच झाले, त्याचे काय करायचे हा माझा अधिकार आहे. म्हणून ते तुला माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. स्वीकारायचे नसेल तर राहू दे." असे म्हणताच त्याने ते फूल स्वतःकडे ठेऊन घेतले. बोलत बोलत ते रस्त्या जवळ असलेल्या रमेशच्या शेताजवळ पोहोचले. रमेशच्या आग्रहास्तव ती जराशी थांबली. 


   "बघितलंस आमचं शेत? कसं बहरात आलेलं आहे? डाळींब बघ कसं अगदी तुझ्या गाला सारखं लालचुटुक दिसतंय." रमेश रंगात येऊन बोलत होता. 


  "हं! फारच रोमँटिक मूड झाला दिसतोय आज साहेबांचा. भुलायचं कुणी तरी अशा बोलण्यानं." राधिकाही त्याला उत्तेजन देण्याचा उद्देशाने बोलली. 


  "म्हणजे? पसंत पडली म्हणायची आमची बाग. मालकीण व्हायची इच्छा झाली वाटतं मनात". रमेशने खडा टाकून बघितला. 


  "अहं! असं काही समजूत करून घेऊ नकोस. मी तुझ्या बरोबर भूमिका केली म्हणून तुझी झाले असं काही समजू नकोस." राधिकाने आपली मनोभूमिका स्पष्ट केली.


  "राधिका, ही डाळिंबाची बाग बघितलीस ना? मला खूप आवडते डाळिंब म्हणून बागच लावली. मला जे आवडते ते मी मिळवतोच. लहानपणा पासूनचा स्वभावच आहे माझा तो." त्याने इशारा दिला.


  "मी पण तशीच आहे. मला जी जागा आवडत नाही तिथे मी कधीच पाऊल देखील टाकत नाही. आपण केवळ चांगले मित्र होऊ शकतो, जर तुला वाटत असेल तर. तू जर ही अपेक्षा ठेऊन मैत्री करत असशील तर आजपासून आपली मैत्रीसुद्धा बंद." राधिकेनही निर्वाणीचे सांगून टाकले.


  "जे मला मिळाले नाही ना, ते दुसऱ्याला सुद्धा कधी मिळू देत नाही मी. माझ्या सुखाच्या आड येणाऱ्याला दुःखा शिवाय काहीही मिळू शकत नाही. मी ते मिळूही देत नाही." रमेशची धमकी. 


  "ठीक आहे. तुला जे करता येते ते कर. माझ्या सुखाच्या आड तर येऊन बघ. तुझ्या जीवनाची बरबादी नाही केली तर बापाचे नांव नाही सांगणार कधी." राधिका रागाने निघाली तेवढ्यात सुजीत गाडीवर आला. ती गाडीवर बसून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जायचे होते, म्हणून राधिका लवकरच उठली होती. चहाचा कप घेऊन जेव्हा ती आबांच्या खोलीत गेली तेव्हा आबांनी पुन्हा लग्नाचा विषय छेडलाच,

    "राधिका, तुला पुरस्कार मिळाला आणि छाती माझी फुगली. आता तेवढी लग्नाची गोष्ट माझ्या मनासारखी झाली की मी भरून पावलो. तुझा काय विचार आहे?"

     "आबा, मी तुम्हाला तेव्हाही स्पष्ट सांगितले आहे की मी सुजीत शिवाय दुसऱ्या कुणाचा विचार नाही करू शकत. आजही तेच सांगते आहे. माझ्याही मनाचा जरा विचार करा आबा. मला सुखाने नांदतांना बघायचे असेल तर सुजीतशी लग्न लावून द्या. जर तुम्हाला मी डोळ्यासमोर नको असेल तर खुशाल दूर दूरवर निघून जाते मी." राधिकेने परखड शब्दात सांगितले.

    "ठीक आहे तुला जे करायचे ते कर. मी बघतो तू सुजीत सोबत कशी लग्न करतेस ते." आबा रागाने थरथरत होते. 'त्यालाच दूर करावं लागेल इथून तेव्हाच ही त्याचा नाद सोडेल.' असं स्वतःशीच म्हणत त्यांनी मनात काही तरी निश्चित ठरवले आणि बाहेर निघून गेले. सुजीत आणि राधिका कॉलेजला निघाले.

क्रमश:


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi story from Horror