Pandit Warade

Horror Romance Thriller

3  

Pandit Warade

Horror Romance Thriller

झपाटलेले घर (भाग-१६)

झपाटलेले घर (भाग-१६)

6 mins
408


   "सुजीत, बराच वेळ गेला आपला. जरा स्पीड वाढव गाडीचा. एवढ्यात दोन पिरियड्स झालेही असतील. नाही का?" राधिकेला आता कॉलेजची आठवण झाली होती.


   "ठीक आहे राणी सरकार. हे बरंय, आपणच वेळही करायचा आणि गाडी वेगात पळवायलाही सांगायचं." सुजीतचे मस्करीत बोलणे.


   "हो ना रे, उशीर माझ्यामुळेच झाला खरा. पण आता काय करायचं? तिसरा तासही जाऊ द्यायचा का? म्हणून म्हटलं जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं जोरात गेलेलं बरं." तिचं स्पष्टीकरण.


  अशा गप्पा मारतच त्यांची गाडी कॉलेजच्या प्रांगणात येऊन पोहोचली. पार्किंग मध्ये काही मुले उभी होती. त्या मुलांनी या जोडीच्या उशिरा येण्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले. पिरियड्स नसल्यामुळे बरेच विद्यार्थी आज बाहेरच फिरत होते. कॉलेज मध्ये आज स्नेहसंमेलना संदर्भात विद्यार्थी संसदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि प्राध्यापकांची बैठक आयोजित केलेली होती. पण संसद सचिवच हजर नसल्यामुळे बैठक थोडीशी रेंगाळली होती. 


   "या मिस राधिका, रोज वेळेच्या आत येणारे सचिव आज नेमके उशिरा आले. काही अडचण आली का प्रवासात?" अध्यक्षांनी विचारले. 


   "होय! अध्यक्ष महोदय रस्त्याने येतांना जरा गाडी बंद पडली होती ती लवकर सुरूच होईना. त्यामुळे उशीर झाला. क्षमा असावी, माझ्यामुळे सर्वांना ताटकळत बसावं लागलं." हात जोडत तिने सर्वांची क्षमा मागितली आणि आपले स्थान ग्रहण केले. विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीपासून आजपर्यंत झालेल्या सर्व कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सहलीच्या खर्चाला मंजुरी दिली गेली. सहलीसाठी अजिंठा लेणीची निवड केल्या बद्दल राधिकेची सर्वांनी प्रशंसा केली. अजिंठा गावात असलेली *पारोची समाधी* आणि पारोची प्रेमकहाणी आवर्जून पुन्हा सर्वांना आठवली. स्नेह संमेलनाची तारीख ठरवली गेली. अनुभवी अशा प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. खास सचिवांच्या आग्रहास्तव दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त एक तीन अंकी नाटक बसवायचे ठरवले गेले. त्याची जबाबदारी अर्थातच प्राध्यापक लुकतुके यांच्या कडे गेली.


   प्राध्यापक लुकतुकेंनी लगेच नाट्य कलाकार होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनींना एकत्र बोलावले, त्यांची एकेक नाट्य उतारा वाचायला लावून आवाज आणि संवाद फेकीची टेस्ट घेतली. त्यातून चार विद्यार्थिनी आणि आठ विद्यार्थी असा बारा जनांचा संच निवडला गेला. बारा पात्राचे नाटक निवडले गेले. प्रमुख नायकाच्या पात्रासाठी सुजीतची निवड झाली. नायिकेची निवड करतांना बरीच गडबड झाली. लुकतुके सरांनी सुजीतसाठी नायिका म्हणून राधिकेचीच निवड केलेली होती. परंतु गीता हुंडीवाले ही नायिकेच्या भूमिके साठी, हट्टच धरून बसली, म्हणून तिला मुख्य नायिकेची भूमिका द्यावी लागली. पर्यायाने राधिकेला रमेश बरोबर सहनायिकेची भूमिका निभवावी लागली. 


   प्राध्यापक लुकतुके सर आणि सहकलाकार यांच्या आग्रहास्तव गीताचे मन वळवायचे कामही सुजीतला करावे लागले. परंतु गीता मानायलाच तयार नव्हती. तिचे एकच पालुपद होते,


  "मला तू आवडतोस, अन् तुझ्या सोबतच काम करायचं आहे."


   "अगं बाई, आपण सर्व बारा जणही सोबतच काम करणार आहोत. कोणतीही भूमिका असली तरी आपण एकाच रंगमंचावर असणार आहोत. अगदी दिग्दर्शक लुकतुके सरांसहित. तेव्हा तू हा हट्ट सोडून दे. ज्या अर्थी सरांनी मुख्य नायिकेचा रोलसाठी राधिकेची निवड केली त्याअर्थी ती त्या भूमिकेला योग्य न्याय देईल असे त्यांना वाटले असावे." सुजीत समजावत होता. परंतु सारेच्या सारे तिच्या डोक्यावरून जात होते. 


   "ते काही नाही. मला हीच भूमिका करायचीय. तुझ्या सोबत जी भूमिका मिळेल ती करायची. तू तुझी भूमिका बदल मी माझी बदलते." मानता न येणारी अट तिने घातली.


   "हे बघ गीता. दिगदर्शकांनी जी भूमिका सोपवली ती साकार करण्यासाठी कलाकाराने प्रयत्नशील असले पाहिजे. त्यांच्या नजरेतून ते कथानकाला साजेसे पात्र निवडत असतात. त्या पात्राला कोण कसा न्याय देऊ शकेल हे त्यांच्या अनुभवी नजरेनं हेरलेलं असतं, म्हणून त्यांनी दिलेली भूमिका मी बदलू शकत नाही. तो प्रांत त्यांचा आहे." सुजीत स्पष्ट बोलत होता. 


  "तू जे काही सांगतो आहेस ते सारे मला मान्य आहे. माझं एकच मागणं आहे, ते म्हणजे तुझ्या बरोबर जास्तीत जास्त राहता येईल अशी भूमिका मला पाहिजे आहे. मला समजून घेशील सुजीत, तुझ्या सोबत आयुष्यभराची साथ द्यायची मनीषा आहे. तू नाही म्हणू नकोस. मी लहानपणा पासून अशीच आहे. जे जे हवे ते मी मिळवतेच मिळवते, काहीही करून मिळवते. मी तसे सोडत नाहीच." तिने निर्वाणीचा इशारा केला.


   "मी ही तुला स्पष्ट सांगतो आहे, तुला जे हवे आहे ते आधीच दुसऱ्याला दिलेले आहे. ज्या प्लॉटवर तू ताबा करण्याची इच्छा करतेस त्या प्लॉटची रजिस्ट्री आधीच कुणाच्या नावे झालेली आहे. तेव्हा तू तो नाद सोडून दे. मनातील आशा आकांक्षांना आवर घाल. आणि जी भूमिका सरांनी दिली ती साकारण्याचा प्रयत्न कर. हा सुजीत भूमिका सोडून देईल परंतु या हृदयात बसलेल्या देवीला हलवून तिथे दुसऱ्या कुणाला बसवणार नाही." सुजीतचे स्पष्टीकरण गीताच्या पचनी पडले नाही. ती रागारागाने पाय आपटत निघून गेली. सुजीत ही गोष्ट प्राध्यापक लुकतुके सरांकडे सांगायला निघाला. पण रस्त्यातच त्याला राधिका भेटली. सुजीत- गीता भेटीत काय ठरले ते त्याने तिला सांगितले.


   गीताचे सुजीतवर प्रेम बसले आहे, हे ऐकून राधिकेला जराशी गंमत करण्याची लहर आली. ती सुजीतला म्हणाली,


   "अरे, 'आली अंगावर तर घ्यायची शिंगावर'. उगाच बिचारीचं मन दुखावलंस. बिच्चारी मरते आहे तुझ्यावर आणि तू आपला राजा हरिश्चंद्राचा अवतार बनून सत्य उगाळत बसलास तिच्या समोर." ती म्हणाली.


   "राधा, तू बोलतेस हे? त्या दिवशी तर माssरे रडत होतीस, माझ्याशी खरंच लग्न करशील का ? विचारत होतीस. मग आज असे कसे म्हणू शकतेस तू?" सुजीत कोड्यात पडला होता. 


   "अरे, आपले ठरले होते ना उंदीर मांजराचा खेळ खेळायचं? आता चान्स आला आहेच तर मस्त एन्जॉय करू ना. जा. पटव तिला." राधिका बिनधास्तपणे त्याला सांगत होती. 


   "बघ बरं. पुन्हा तक्रार करशील नाही तर. आबांकडे जर तक्रार गेली तर मी संपलोच समज. तू म्हणतेस तर माझी काही हरकत नाही परंतु एका अटीवर, तू माझ्यावर लक्ष ठेवायचस आणि जरा काही चुकायला लागले तर लगेच सावध करायचं." सुजीतने तिला करारबद्ध करून घेतले.


   सुजीत-राधिकेत ठरल्या प्रमाणे गीताला हवी ती प्रमुख भूमिका मिळाली. प्राध्यापक लुकतुके सरांनी सुद्धा मान्यता दिली. ती खूपच खुश झाली, जेव्हा सुजीतने स्वतः ही बातमी तिला सांगितली. आता मिळालेल्या भूमिकेला न्याय देण्या साठी प्रयत्न करणे आवश्यक होते. सारेच तयारीला लागले. तीन अंकी नाटक स्नेह संमेलनाचे, तर रमेश-राधिका तसेच गीता-सुजीत या दोन्ही जोड्या त्या नाटकाचे प्रमुख आकर्षण होते. सराव झाला. नाटक झाले. स्नेह समेलनातला शेवटचा कार्यक्रम होता, बक्षीस वितरणाचा. सर्व क्षेत्रातील बक्षीस वितरण झाल्यावर नाटकाचे बक्षीस जाहीर होणार होते. *सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेता* म्हणून जेव्हा सुजीतचे नाव पुकारले गेले, तेव्हा सुजीतच्या आधी गीतालाच आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ती जाग्यावर उभी राहून नृत्य करायला लागली. तिचा हा आनंद काही जास्त काळ टिकला नाही. *सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेत्री* साठी जेव्हा राधिकेचे नाव पुकारले गेले, तेव्हा तिच्या अंगाचा तिळपापड झाला. इकडे रमेशची अवस्था याहून वेगळी नव्हती. आतल्या आत जळत त्याने कसे तरी पुढे जाऊन सुजीत आणि राधिकेचे अभिनंदन केले. गीता तर तेवढेही करू शकली नाही. पुरस्कार प्राप्त कलाकारांचा कॉलेज तर्फे सत्कार करण्यात आला आणि स्नेह संमेलन समाप्त झाल्याचे आणि दोन दिवसांची सुटी असल्याचे जाहीर झाले. सर्वजण बाहेर पडत असतांनाच रमेशने या दोघांना गाठले आणि कॅन्टीनमध्ये चहा घेण्याची विनंती केली. गीता, राधिका, रमेश, सुजीत सारे जण कॅन्टीनमध्ये बसले. रमेशने चहाची ऑर्डर दिली. चहा येईपर्यंत गप्पा म्हणून गीताने नाटकाचा विषय पुन्हा चर्चेला घेतला. गीताने अर्थातच तिची आणि सुजीतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली असल्याचे सांगितले. आणि त्याच बरोबर ही जोडी आता इथून पुढे आयुष्यातही कायमसाठी एकत्रच राहील असे एक तर्फीच सांगून टाकले. त्यावर सुजीतने लगेच नाकारले आणि नाटक हे नाटकच असते. ते सत्य जीवन असू शकत नाही, असे सांगितले. रमेशने जेव्हा राधिकेचा हात कायमसाठी मागितला तेव्हा राधिकेने त्याला खडे बोल सुनावले, 


   "ज्याला तीन तासाच्या तीन अंकी नाटकाच्या मंचावरील भूमिकेला व्यवस्थित न्याय देता आला नाही, त्याला संसाराच्या मंचावरील भूमिका काय निभावता येईल? आमची राजा राणीची जोडी देवानेच बनवली आहे. दुसऱ्या कुणीही आमच्या फाटाफुटीची स्वप्ने पाहू नये." 


  राधिकेच्या या खणखणीत उत्तरावर गीता आणि रमेशचे चेहरे एरंडेल प्यायल्या सारखे झाले. दोघांनी एकमेकांकडे बघितले. नजरेने काहीतरी सुचवले, ठरवले आणि रागाने तेथून काढता पाय घेतला. 


   "विजयाची हवा जास्त नाकात जाऊ देऊ नकोस. परिणाम वाईट होतील." राधिकेकडे पहात गीता एखाद्या टिटवी सारखा शाप उच्चारत निघून गेली. तिला अनुमोदन म्हणून रमेशही तसाच रागाने निघून गेला. सुजीत-राधिकाही पुरस्कार गाडीच्या डिकीत ठेऊन, कधी नाही ते कॉलेजच्या इमारतीला नमस्कार करून (जणू काही परत यायचेच नाही) परत निघाले.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror