Pandit Warade

Horror Romance Thriller

3  

Pandit Warade

Horror Romance Thriller

झपाटलेले घर - भाग १३

झपाटलेले घर - भाग १३

5 mins
415


   सुजीत आणि राधिका गाडीवर घरी जायला निघाले. परंतु रोजच्या सारखे एकमेकांशी मोकळे बोलत नव्हते. सुजीतला एका मुलीसोबत कॅन्टीनमध्ये बसलेले पाहिल्यानंतर राधिकेच्या मनात कालवा कालव झाली होती. 'माझा माझा म्हणता म्हणता सुजीत हातातून जातो की काय?' असे तिला वाटत होते. एक मन म्हणत होते की, आबांच्या कानावर घालावे, पण त्याच्या प्रेमात गुंतलेले दुसरे मन नको म्हणत होते. सुजीत कुठेही जाऊ शकत नाही या विषयी दुसरे मन ठाम होते. 


   सुजीतला वाटत होते की राधिकेला सांगावं, _'आबाला तिने याविषयी काहीच सांगू नये.'_ परंतु ती काहीच गोष्ट काढत नाही हे पाहून तोही गुपचूप गाडी चालवत राहिला. वरवर शांत दिसणाऱ्या दोघांच्याही मनात खळबळ होती. 


   आपल्या अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी सुजीतने लघुशंकेच्या निमित्ताने गाडी थांबवली. झाडाच्या आडोशाला जाऊन लघुशंका करून येऊन तो झाडाखाली बसला. काही शंकांचे निरसन राधिकेलाही करून घ्यायचे होतेच. ती ही त्याचे शेजारी बसली. गीताला सुजीतसोबत पाहिल्या पासून तिच्याही मनात सवती मत्सर उभा राहिलेला होताच. महिलांचे हृदय हे विविध भाव भावनांनी युक्त बनलेले असते. कधी कोणता भाव व्यक्त होईल हे स्थळ, काळ आणि घटनाच ठरवतात. भगवान श्रीकृष्णाची पत्नी असूनही सत्यभामेच्या मनात सवती मत्सर उभा राहिलाच होता, आणि म्हणून तर तिने पारिजातकाचे झाड स्वतःच्या अंगणात लावून घेतले होते. 


   "काय मज्जा आहे एका माणसाची कॉलेजमध्ये. नाही का? सुंदर मुलीसोबत कॅन्टीनला जाता यायला लागलं आता. व्वा! चांगली प्रगती होत आहे ना?" राधिकेने मूळ विषयाला हात घातलाच.


   "अगं, तू कुठे होतीस पण त्यावेळी?" सुजीतने विचारले. 


   "मीही कॅन्टीनमध्येच होते. रमेश सोबत. पण तुझ्या सोबत गीताला बघून माझं डोकंच उठलं. ती पोरगी काही फार चांगली नाही. तिचं रेकॉर्ड फारसे बरे नाही." राधिका उत्तरली.


   "तुझा माझ्यावर विश्वास नाही का? ती फारच गळ्यात पडू पहात होती म्हणून तिथे आलो होतो. अप्सरे सारखी सुंदर मुलगी सोबत असतांना अशा छैल छबिल्या पोरींना कोण भीक घालेल?" सुजीत तिला खुश करण्याच्या हिशोबाने बोलला.  


   "बरं बरं खूप झालं मखलाशी करणं. खूप चढवता येतं. गोड बोलणं तुझ्याकडूनच शिकावं. बरं एक सांग मला वाऱ्यावर तर सोडणार नाहीस ना? सांगता येत नाही एखादी मेनका मिळाली तर." तिने आपल्या मनातील विचार बोलून दाखवला.


  "नको असं बोलुस राधिका. तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचारही करू शकत नाही मी. हां जर तुला मी सोडून दुसरं कुणी आवडत असेल तर मात्र माझी काही हरकत असणार नाही." सुजीत असे बोलताच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवत त्याला चूप बसवलं.


   "सुजीत, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार नाही करू शकत. काही झालं तरी मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही." राधिका भाव विभोर होत बोलली. 


   "आणि आबांना नाही आवडलं तर? त्यांनी जर दुसरं एखादं स्थळ सुचवलं तर?" 


   "तुझ्यासाठी मी त्यांनाही सोडू शकते सुजीत. मात्र तुझ्याशिवाय राहण्याची मी कल्पनाही सहन करू शकत नाही." असं म्हणत तिच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब ओघळला. 

 

   "ठीक आहे. निघूया आपण. आबा वाट बघत असतील." असं म्हणत सुजीत उठला, गाडीवर बसला. गाडी सुरू केली आणि ते दोघे घरी जायला निघाले.  


  गाडी उभी करून हातपाय धुवून सुजीत आपल्या खोलीत गेला तो जेवायलाच बाहेर आला. सर्वांचे जेवण झाल्यावर आबा राधिकेला घेऊन बैठकीत बसले. 


   "राधिके, तुला दूर करणे माझ्या जीवावर आले असतांनाही तुझ्या लग्नाचा विचार करावा लागतोय. मला एकदोन ठिकाणाहून विचारणा होत आहे. तुझा विचार घ्यावा म्हणून तुला इथे बोलावले." आबा भावविभोर होत बोलत होते.


  "आबा, मला आधी माझे शिक्षण तर पूर्ण करू द्या. काही झाले तरी मी शिक्षण पूर्ण झाल्या शिवाय मी लग्नाला उभीच राहणार नाही. तुम्ही सध्या डोक्यातून हा विषय काढून टाका.


  "अगं, पण मला आता लोकं विचारायला लागलेत. त्यांना कुठवर आणि कसे थोपवून धरू?" आबा मजबुरीच्या सुरात बोलत होते. 


  "ते काही नाही आबा. त्यांना सांगा मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून. मी नाहीच करणार तोवर लग्न." राधिका आपल्या मतावर ठाम होती.


   "अगं, पण तोवर चांगली स्थळं थोडीच आपणासाठी थांबणार आहेत?" आबांचा प्रश्न.


   "आबा, त्याची नको काही काळजी करायला. _'काखेत कळसा आणि गावाला वळसा.'_ मी तुम्हाला आज स्पष्टच सांगते. मी सुजीत सोबतच लग्न करणार आहे, ते ही दोघांचे शिक्षण पूर्ण झाल्यावरच." राधिकेने निक्षून सांगीतले.


  "माझ्याही मनाविरुद्ध?" आबा विचारते झाले. 


   "तशीच वेळ आली तर मला तुमच्या विरुद्धही निर्णय घ्यावा लागेल. पण देवाला प्रार्थना करते की ती वेळ माझ्यावर येऊ नये आणि मला आबांना सोडावं लागू नये. आणि आबा, सुजीत सोबत लग्न लावून दिल्यास मला याच घरात रहाता येईल." राधिका मना पासून परंतु निक्षून बोलत होती. 


  राधिकेच्या या निर्णयावर आबा मात्र नाखूष होत डोक्याला हात लावून बसले.


   इकडे संध्याकाळचे जेवण झाल्यावर बापूंनी रमेशला आणि त्याच्या आईला आपल्या खोलीत बोलावून घेतले. अभ्यास, कॉलेज यावर थोडीफार चर्चा करून त्यांनी लग्नाचा विषय काढला. 


  "बापू, एवढी काय घाई लागून गेली तुम्हाला? माझं शिक्षण तर पूर्ण होऊ द्या. करियर बद्दल विचार करू द्या. आत्ताच काही लग्नाचा विचार डोक्यात भरू नका." रमेशने अंगावरचे झुरळ झटकावे तसे बापूंच्या विचारांना झटकून टाकले. त्याला राधिके शिवाय दुसऱ्या मुलीचा विचार करणे शक्यच नव्हते. त्याला कुठे माहीत होते, ते राधिके संदर्भातच विचार करतील म्हणून? 


  "अरे, आता माझं वय होत आलं. काम होत नाही आता मला पहिल्या सारखं. घरात कुणी तरी मदतीला पाहीजेच." आई रखमाबाई बोलल्या. 


   "एखादी बाई ठेवून घे ना आई घरकामाला. काही फारसा पगार घेणार नाही. आपण देऊ शकतो तेवढा पगार तिला." रमेशने पर्याय सांगितला. 


   "त्यापेक्षा, घरचं हक्काचं माणूस घरात असलं तर बरं असतं. तसंही तुझं लग्नाचं वय झालंच की आता." बापू म्हणाले.


   "बापू, एवढ्या लवकर कुठे अडकवता मला लग्नाच्या बेडीत? एक दोन वर्षे शिकू द्या, मग बघू. तोवर आईला मदत करण्यासाठी एखादी बाई बघा." रमेश आपल्या मतावर ठाम होता.


   "अरे, आज जरा आबांकडे जाऊन आलो." बापूंनी हळूच विषयाकडे वळत म्हटले. 


   "काय? तुम्ही आबांकडे गेला होतात? आणि कशासाठी?" आश्चर्य दाखवत त्याने विचारले.


   "हो. अरे, तू आणि राधिकेने कॉलेजमध्ये जे यश मिळवलं त्या बद्दल अभिनंदन करायला गेलो होतो आबांचं." बापूंचा खुलासा.


   "बरं मग? त्याचा आणि माझ्या लग्नाचा काय संबंध?" कळूनही न कळल्या सारखे करत रमेशने विचारले. 


   "ते राधिकेला आपल्या घरात द्यायला तयार झालेत. फक्त ती तयार असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ती आणि तू एकाच कॉलेज मध्ये शिकत आहात तर तिला आपलंसं करू शकलास म्हणजे झालं." बापूंनी बैठकीत ठरलेलं सारं काही सविस्तरपणे समजावलं.


   "ठीक आहे बापू, जशी आपली इच्छा. आशीर्वाद असू द्या." असं म्हणत रमेशने बापूंच्या पायावर डोके टेकवले. 


   "आई वडिलांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या मुलांच्या पाठीशी असतो बाळा, तुझ्या भल्यातच आमचं भलं आहे. जा उद्यापासून कामाला लाग." बापूंनी रमेशला प्रेमाने मिठी मारली. 

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror