जबाबदारी सर्वांचीच...
जबाबदारी सर्वांचीच...
शाळा म्हणजे असंख्य सुंदर फुलांनी बहरलेली बाग! त्या बागेतील फुले हसताना, डोलताना आणि फुलताना बघणे, ही शिक्षकी पेशातील प्रत्येकाच्या वाट्याला येणारी परमसुखाची अनुभुती! आपले वय विसरून मग आपणही त्यात सामील होतो आणि त्या हसर्या बागेचा एक भाग होऊन जातो.
माझ्या शिक्षकी जीवनात मी अनेक सुंदर क्षण अनुभवले. काही अगदी शांत वाहत्या पाण्यासारखे, तर काही विचार करायला लावणारे, तर बरेच काही मला शिकवून जाणारे. कोण म्हणतं शिक्षकच मुलांना शिकवतात? विद्यार्थीही अनेक गोष्टी शिक्षकांना शिकवतात आणि शिक्षक दिवसेंदिवस अजूनच प्रगल्भ बनत जातात. माझा शिक्षकी जीवनाचा प्रवास असाच प्रत्येक दिवसागणिक अजूनच सुंदर बनत चालला होता.
पण काही कारणाने मला माझे हे आवडीचे काम सोडावे लागले.... त्या काळात घरी असताना सतत शाळेचे आणि मुलांचे विचार मात्र मनातून जात नव्हते. मग ठरवले आपण एक शिक्षक आहोत. शाळेत शिकवले काय आणि घरी शिकवले काय एकाच... अंतिम ध्येय मुलांचा सहवास, ज्ञानदानाचा आनंद आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानाला तर कशाचीच तोड नाही. म्हणून शिकवणी वर्ग घरीच सुरू केले. आणि आनंदाचा झरा पुन्हा वाहू लागला, घराचाच बगीचा झाला... हसर्या फुलांना पुन्हा बहर आला.
शाळेत फक्त विज्ञान आणि गणित हेच दोन विषय मी शिकवायची. पण शिकवणी वर्ग म्हणजे सगळेच विषय शिकवावे लागतात. आणि हे माझ्या आवडीचे काम! मला सर्वच विषय आवडतात....पुन्हा त्या जुन्या कविता, धडे आणि इतिहासात रमताना खूप मजा येते.
असेच एकदा शिकवणी घेत होते... तेव्हाचा एक प्रसंग :
मी : काल शाळेत हिस्ट्रीच्या तासाला
काय शिकवले?
श्लोक : 'बाजीप्रभू अॅण्ड द बॅटल ऑफ घोडखिंड'
मी : खूप छान आहे ना धडा! कळला ना
तुम्हाला?
श्लोक : नाही मॅम , थोडेथोडेच कळत
होते.
मग मी सर्व मुलांना घोडखिंड पावनखिंड कशी बनली याची गोष्ट मराठीतून सांगायला सुरुवात केली.
शिवाजी महाराज पन्हाळगडावरुन सुटून विशालगडाकडे जातानाचा सर्व प्रसंग डोळ्यासमोर दिसू लागला आणि मला जणू स्फुरण चढले. बाजीप्रभूंनी घोडखिंड अडवून ठेवताना प्राणाची लावलेली बाजी, गनिमाच्या एकेका तुकडीला दगड गोट्यांच्या माराने पळता भुई थोडी कशी केली हे सांगताना रोमांच उभे राहत होते. हजारोंच्या संख्येने आलेल्या गनिमांना मूठभर मावळ्यांनी दिलेली झुंज, सांगताना हृदयाचे ठोके जोरात सुरू होते. आपला राजा गडावर सुखरुप पोहोचावा म्हणुन शत्रूला एक इंचही पुढे न येऊ देण्याची धडपड, घावांनी रक्तबंबाळ झालेले बाजींचे शरीर, अंगात वीरश्री संचारल्याप्रमाणे शत्रूवर तुटून पडल्याचे वर्णन ऐकून मुले तर भारावूनच गेली होती. अनेकांची खांडोळी करून गलितगात्र झालेले जखमी शरीर, जमिनीवर पडूनही प्राणाला देहत्याग करायची परवानगी नाकारत होते. का? तर माझा राजा, माझा शिवबा.. अजून विशालगडावर पोहोचला नाही. तोफेच्या आवाजाकडे कान लावून वाट पाहणारा बाजी सांगताना माझ्या घशात आवंढा आला, डोळ्यात पाणी येऊ लागले, पुढे बोलवेना.
मुले मात्र फार आतुर झाली होती पुढे काय झाले ते ऐकायला.
तोफ कडाडली, बाजी प्रभूंच्या शौर्याने घोडखिंड पावन झाली. "माझा राजा पोहोचला, आता मी सुखाने मरतो. " असे म्हणत बाजीप्रभूंनी प्राण सोडले
मुले स्तब्ध! मी निःशब्द! काय जादू होती महाराजांमध्ये! त्यांच्यासाठी त्यांच्या मावळ्यांनी स्वतःचा जीवही ओवाळून टाकला..
श्लोक तर भारावूनच गेला होता. मला म्हणाला, "खरंच, हे सगळे आहे lesson मध्ये? मला कळलेच नव्हते. "
मग माझ्या लक्षात आले तिसरी, चौथीच्या मुलांना आपला इतिहास, आपल्या शिवरायांची महती इंग्रजीतून शिकवताना तो जोश, ते स्फुरण कसे येणार ? कारण सामान्य मुलांचे इंग्रजीही तोपर्यंत पक्के झालेले नसते. लहान मुलांनाच नाही तर आठवी, नववीच्या मुलांनाही स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास मराठीतून सांगितल्यावर चांगला समजतो असा माझा अनुभव आहे. इंग्रजीतून इतिहास शिकवणे म्हणजे सोपी गोष्ट अवघड करून सांगण्यासारखे आहे. हेच कारण आहे मुलांना इतिहास, भूगोल अवघड वाटण्याचे! जे हृदयापर्यंत पोहोचतच नाही ते पाठ कसे होणार? मग सुरू होते घोकंपट्टी! आणि येथेच तडा जातो तो आपल्या शिक्षणाच्या मूळ हेतूला!
आजकाल बहुतेकांची बदलीची नोकरी असते... वेगवेगळ्या राज्यात त्यांना नोकरीनिमित्त फिरावे लागते. मग आपोआप इंग्रजी माध्यमाचा पर्याय निवडावा लागतो.... शिवाय वाढत्या स्पर्धेला तोंड देताना आपली मुले कुठे कमी पडू नयेत म्हणुनही आता अगदी ग्रामीण भागातही बहुतांश पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. काळाची गरज म्हणूनही बर्याचदा पालक इंग्रजी मध्यमाकडेच वळतात. पण माझा असा अनुभव आहे की, फारच थोडी मुले इंग्रजीशी समन्वय साधून खरे ज्ञान आत्मसात करतात..... सामान्य मुले फक्त पाठांतरावर भर देतात कारण जी भाषा आपल्या रोजच्या वापरात नाही, तिच्या माध्यामातून शिकताना त्यांना विषयाच्या खोलीपर्यंत पोहोचताच येत नाही. त्यामुळे शाळेबरोबरच मुलांना खाजगी शिकवण्या लावाव्या लागतात..... आणि मग हे दुष्टचक्रच सुरू होते..... मुले दिवसभर अभ्यासाबरोबर झुंजत राहतात.....त्यांना मोकळा वेळ मिळत नाही.... आणि अभ्यास आनंददायी न ठरता ओझे होऊन जातो. मुलांना अभ्यासाविषयी नावड उत्पन्न होते.
खरं तर विज्ञान आणि गणित शिकतानाही मला मराठीची मदत घ्यावीच लागते... मुलांना आपल्या भाषेतून कोणतीही संकल्पना चांगली समजते. म्हणून मला अजूनही वाटते की, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवे.... आणि मातृभाषेबरोबर इंग्रजीही शिकवावी... पण मुख्य भर फक्त भाषाज्ञानावर असावा... दोन्ही भाषा एकत्र शिकताना त्यातील समानता आणि फरक मुलांच्या लक्षात आणून द्यावा.... मुलांचे शब्दज्ञान वाढावे, त्यांचे वाचन सुधारावे. वाचन करताना आपण काय वाचतोय ते त्यांना समजू लागले की मग हळू हळू इतर विषयांशी त्यांची ओळख व्हावी. मगच त्यांना शिकवलेले समजेल. आधीच अनेक विषय, तेही परक्या भाषेत शिकवल्याने पाया कधीच पक्का होत नाही.
शिक्षणात भाषेचा सर्वाधिक संबंध आहे. त्यामुळे इथे पालकांचीही जबाबदारी येते की मुलांचे भाषाज्ञान वाढतेय की नाही याकडे लक्ष देणे! आणि भाषेचा विकास तेव्हाच होतो जेव्हा ती भाषा सहजसोप्या रुपात आपल्या कानांवर पडते. त्यामुळे लहान मुलांना सुंदर कविता, गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आजकाल वेगवेगळ्या सीडी मिळतात... यू ट्यूब वीडियो आहेत. निरनिराळे apps आहेतच. इंग्रजी कविता आणि गोष्टींबरोबरच मराठी बडबड गीते, गाणी, गोष्टी मुलांना ऐकवाव्यात. त्यामुळे दोन्ही भाषांची ओळख एकाच वेळी होईल. अंक आणि अक्षरांची ओळख या दृकश्राव्य माध्यमातुन दिल्याने मुले लवकर लक्षात ठेवतात. लिखाणाचा आग्रह न धरता आधी ऐकणे, समजणे, बोलणे या पद्धतीने जावे. मी माझा अनुभव सांगते. माझ्या मुलीला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे अनेक शब्द शाळेत जाण्याआधीच वाचता येऊ लागले होते. ती लिखाणाआधी वाचायलाच शिकली. कारण अनेक वेळा बघून, त्या शब्दांची चित्रे तिच्या मनात पक्की झाली होती. ऐकून-ऐकून स्वरज्ञान ( phonics) पक्के झाले. एकदा वाचायला आले की वाचता वाचता आपोआप वाचलेले समजू लागेल.... भाषा विकसित होईल. आणि या टप्प्यावर मुलांना अनेक चित्र असणारी छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तके हातात दिली तर त्यांना वाचनाची गोडी लागेल. शाळेत भलेही मराठी असो वा नसो..... मुले आपली भाषा आपोआप शिकतील. असा प्रयत्न आपणही नक्कीच करू शकतो.
मराठी आपली मातृभाषा आहे... ती आपल्या मुलांना लिहिता आणि वाचता आली पाहिजे. इंग्रजी जागतिक भाषा आहे तीही त्यांना आत्मसात झाली पाहिजे. अभ्यासाची पुस्तके सोडून मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील इतर साहित्य मुलांनी वाचायला हवं.....आपण त्यांना ते उपलब्ध करून द्यायला हवं....
कोणतीही भाषा मुलांवर थोपवून तीची
आवड निर्माण होत नाही, तर मुले स्वतः होऊन भाषेकडे वळली पाहिजेत यासाठी त्या भाषेचा परिचय आपणच त्यांना करून द्यायचा असतो. एक सोपी गोष्टही आपण करू शकतो. रोज रात्री झोपताना घरातील सर्व मिळून एक कथा किंवा लेख वाचण्याचा उपक्रम आपण सुरू करू शकतो... प्रत्येकाने आलटून पालटून रोज नवे वाचायचे. यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाची आवड विकसित होईल.
माझ्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणुन मी त्यांना कायम चांगल्या पुस्तकांची ओळख करून देते, त्यांना त्यातील काही सुंदर गोष्टी सांगते, त्यांनी वाचनाचा छंद जोपासावा म्हणुन प्रोत्साहन देते. त्यांच्या पालकांनाही या बाबत मार्गदर्शन करते... कारण 'भाषा' ही कोणतेही ज्ञान आत्मसात करण्याची पहिली पायरी आहे....आणि ही भाषा कोणतीही असो, ती चांगल्या प्रकारे समजणे हा शिक्षणाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा आहे.... आणि यासाठी वाचन हे सर्वात महत्वाचे आहे.
मुले शाळेत जाऊन शिकतात, तरीही त्यांना ते धडे परत शिकवणीत समजावून द्यावे लागतात. म्हणुन मी त्यांना कायम सांगते. शिकवणीला यायच्या आधी शिकवलेला धडा वाचून या..आणि आल्यावर तुम्हाला काय समजले ते मला सांगा.... यामुळे ते मन लावून वाचतात.. त्यांना स्व-अभ्यासाची सवय लागते आणि काय समजले ते सांगण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना व्यक्त होता येते.. बोलण्याची सवय लागते.
शिक्षणात प्रयोगांना नेहमीच वाव असतो. एकच पध्दत नेहमी उपयोगी पडत नाही. पण शिक्षक स्वतः सुद्धा यातून शिकत असतो. माझ्या विद्यार्थ्यांना चांगले आणि सक्षम नागरिक बनवण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि संस्कार कधीही शिकवून येत नाहीत... ते आपोआप, मुलांच्या नकळत आणि रोजच्या व्यवहारातून घडले पाहिजेत अस मला वाटतं... म्हणुन शिक्षणाबरोबर त्यांच्यावर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडावा याची मी काळजी घेते. मुले अगदी स्वच्छ मनाची आणि निर्मळ अंतःकरणाची असतात....ती मोठ्या आनंदाने या सर्व उपक्रमात सामील होतात... सांगितलेले सर्व मनापासून करतात.... त्यांची चांगल्या मूल्यांवर, आणि शिकवणुकीवर श्रद्धा बसते... यापेक्षा मोठे सुख एका शिक्षकासाठी अजून कोणते?
