मराठी इज अवर मदरटंग
मराठी इज अवर मदरटंग
उद्याच्या मराठी दिवसाच्या कार्यक्रमाला कोणती साडी नेसायची याचा विचार करत मी कपाट उघडले. एक साडी निवडून ती बाहेर काढतच होते की, लेक धावत आली, " ओह माय गॉड mumma, How did I forget this? अगं, उद्याच्या मराठी डे साठी मला पण साडी घालून जायचेच ना. किती request केली ma'am ला , की साड़ी नको, मी ड्रेस घालते पण ma'am didn't listen. एक गाणेच म्हणायचे आहे, त्यासाठी कशाला ती साडी?"
परत mumma! आई म्हणा म्हणून दमले पण.... यांच्या तोंडून मम्माच निघते.
" अगं, चिऊ नेस ना मग साडी, किती गोड दिसेल माझी सोनुली. "
"इइइइइ सगळे चिडवतील मला स्कूल मध्ये. How boring! "
मी पटकन एक सुंदरशी साडी काढून ठेवली. चिऊची गाण्याची प्रॅक्टिस सुरू झाली
"जय जय महाराष्ट्र माझा...."
किती सुरेल आवाजात गात आहे. गाणे ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून आला. एरव्ही कधी मराठी गाणे म्हण म्हंटले की, बाईसाहेब कायम नाक मुरडतील. कायम हिन्दी नाही तर इंग्लिश गाणी गात असते.
कामे आवरली, जरा पाठ टेकवावी म्हंटले तर चिरंजीव धावत आले, " मम्मा, अगं मॉलला जायचेय ना, माझ्या birthday ची शॉपिंग करायची, तू प्रॉमीस केले होते."
" अरे बापरे! विसरलेच. रविवार म्हटले की, जरा उसंत नसते. चला सगळे पटकन तयार व्हा. लवकर जाऊन येऊ, मला उद्याच्या भाषणाची तयारीही करायची आहे. "
चिऊचे गाणे थांबले, लगेच मॅडम तयार व्हायला पळाल्या. पटकन चहा बनवला आणि आवरून मी आणि अहो तयार झालो.
" what is this mumma, तू सलवार सुट का घातलाय? मॉलला चाललोय आपण, जीन्स घाल ना. "
" अगं काय वाईट आहे या ड्रेसमध्ये? मॉल आणि जीन्सचा काय संबंध."
" जाऊ दे, तुला सांगून काय उपयोग?"
चौघे मॉलला पोहोचलो. मुले आपापल्या कपड्यांच्या विभागात पळाली. मी व अहो गिफ्ट बघत होतो.
" इसकी क्या प्राइस है? कलर तो टिकेगा ना? " अहो तिथल्या विक्रेत्याला विचारात होते.
" अहो, मराठीतून बोला की तो चांगले मराठी बोलतोय बघतेय ना मी मघापासून .."
यांचे आपले हे नेहमीचेच. कधीही दुकानात किंवा कुठेही बाहेर गेलो की, हिंदी सुरू करतात. पुढचा माणूस मराठी असला तरी यांचा आपला हिंदीचा सोस काही कमी होत नाही.
मुलांनी हाका मारायला सूरू केल्या आणि आम्ही तिकडे गेलो. काही कपडे घेतले आणि ट्रायलरूम मध्ये गेलो.
चिऊ आत गेली आणि मी बाहेर उभी होते.
" mom how is this?"
" wow! it's awesome dear, I think you should try this one also."
शेजारच्या ट्रायलरूम जवळ कुणा मायलेकींचा संवाद सुरू होता.
तेव्हड्यात त्या स्त्रीचा फोन वाजला . फोनवर तर ती चांगले छान मराठी बोलत होती. म्हणजे या दोघी मराठीच आहेत तरी एकमेकींशी इंग्रजीत बोलत होत्या .
मॉल असो वा हॉटेल किंवा एखादे सार्वजनिक ठिकाण, आजकाल बरेचशी कुटुंबे एकमेकांशी इंग्रजीतच बोलत असतात. मला हे कळत नाही घरातल्यांशी बोलताना यांच्या तोंडात आपली भाषा सोडून दूसरी भाषा कशी येते? माझ्या मुलांच्या शाळेतही एकदा शिक्षिकेने सांगितल होत,
"तुम्ही मुलांशी इंग्रजी बोला म्हणजे त्यांची fluency वाढेल."
मी किती प्रयत्न केला. पण मला बाई कधी जमलेच नाही.
"चिऊ कम डियर, डिनर इज रेडी," असं म्हणायला माझी जीभ कधी वळलीच नाही.
"चिऊ, चिराग, ऐकू येत नाही का, किती हाका मारल्या , जेवण थंड होतंय, आलात की येऊ तिकडे? "असं म्हंटल्यावर कसं बरं वाटतं. ते इंग्लिश हळुवार बोलणे मला घरात जमलेच नाही .
मुले याच्याउलट. सदानकदा इंग्लिश नाही तर हिंदी. परवा चिऊ बरोबर बाहेर गेले होते. तिची मैत्रीण आरोही भेटली. दोघींचे बोलणे हिंदीतून सुरू झाले.
" अगं, ती पण मराठी आहे ना. मग हिंदीतून कशाला बोलत होता दोघी?"
" मम्मा अगं, स्कूलमध्ये सगळे फ्रेंड्स हिंदीतूनच बोलतात. "
चिरागचं तर सतत इंग्लिश सुरू असतं. पुस्तके मराठी वाचतो. गाणीही इंग्रजीच ऐकतो . ते ठीक आहे. पण त्यामुळे मराठी मागे पडतंय ना!
आधी वाटलं होतं, मुले इंग्रजी माध्यमात आहेत म्हणून काय झाले, घरी तर मराठी वातावरण आहे ना, मी शिकवीन त्यांना मराठी. आधी ती दोघे माझे ऐकायची. चांगलं मराठी बोलायची ,लिहायची वाचायची. पण आता मराठीचे नाव काढत नाही. चिरागने मराठी विषय केव्हाच सोडला. आणि आता चिऊही त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढच्या वर्षी मराठी सोडणार आहे. दोघांनाही फ्रेंच आवडतंय. मराठी प्रेमी आई, उद्या मराठीवर भाषण देणार आहे, आणि मुले?
आज बर्याच घरात हीच स्थिती आहे. आईवडील चांगल्यापैकी मराठी माध्यमात शिकलेत, सुंदर मराठी बोलू शकतात, मराठी पुस्तके वाचतात, पण मुलांना मराठी येत नाही. मराठी विषय शाळेत आता अनिवार्य केला आहे. पण कुणीच तो आवडीने शिकत नाही आणि शिकवतही नाही. फक्त मार्क मिळवण्यासाठी शिकलेल्या मराठीचे सौंदर्य मुलांपर्यंत कसे पोहोचणार.
काही दिवसांपूर्वीचा प्रसंग मला आठवला. मराठीच्या धड्यात शब्द होता 'भंबेरी उडाली' . वर्गातील मुलांना या शब्दाचा अर्थ मी समजावून सांगितला. पण एक मुलगी म्हणाली, " ma'am, त्या शब्दाऐवजी 'गोंधळ उडाला' शब्द लिहू का?"
मराठी भाषेत अनेक एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत. पण प्रत्येक शब्दाची जादू वेगळी. आणि त्याचा अर्थही वेगळा. मुले मला बर्याच वेळा, उत्तरे सोपी करून द्या, असे सांगतात. मीही मग त्यांना कळावे म्हणून पर्यायी सोपे शब्द देते. पण त्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह वाढेल का? अनेक वैशिष्टय़पूर्ण आणि अस्सल मराठी शब्द त्यांना कधी कळतील का?
एकदा एका मुलाने डब्यातला भात खाताना तो सांडला. मी म्हणले " सगळी शिते गोळा कर, नाही तर ती पायाखाली येतील."
त्याला 'शिते' शब्द कळला नाही. कण शब्द कळला. पण भाताचे 'शित' असते, 'कण' नाही.. हे मला नंतर सांगावे लागले.
कधी कधी वाटते मराठी भाषा शाळेत अनिवार्य करून तिची स्थिति सुधारेल का? अनेक वर्ष मराठीवर अन्याय होत आला आहे. पण ही भाषा सगळ्यांना सामावून घेते. इंग्रजी शब्द घाला, हिंदी घाला वेलांट्या चुकवा नाही तर शुद्धलेखन चुकवा , मराठीसारखी सहनशील भाषा दुसरी नाही. मला तर वाटते मराठीवर अन्याय करणारा दुसरा कोणी नसुन मराठी माणूसच आहे. आपल्याला कायम चारचौघात मराठी बोलण्याची लाज वाटते, आपले हिंदी आणि इंग्लिश भलेही कसेही असो, आपण त्यांना जवळ करतो आणि आपल्या भाषेकडे दुर्लक्ष करतो.
संध्याकाळी घरी आलो. येताना मी निर्णय घेतला. आपण घरातूनच सुरुवात का करत नाही? मी प्रयत्न करत होते, पण ते कमी पडत आहेत. मी आता नव्या जोमाने प्रयत्न करणार. आपल्या भाषेचे भविष्य आपल्याच हातात आहे. एक पालक आणि एक शिक्षिका म्हणून मी माझ्या मुलांना मराठीकडे पुन्हा वळवणार.
जेवताना मी सर्वांना ताकीद दिली, " सर्वांनी घरात व्यवस्थित मराठी बोलायचे. मराठी पेपर रोज वाचायचा. बाहेरही जिथे शक्य आहे तिथे सर्वत्र मराठीच बोलायचे, काय?"
" मम्मा , आम्हाला येते गं मराठी. पण कुणी बोलतंच नाही, मग आम्ही कसे बोलणार?"
" तुम्ही आधी सुरू करा मग आपोआप दुसरे पण बोलायला लागतील. महाराष्ट्रात राहून मराठी नको का बोलायला? विसरून जाल तुम्ही अशाने ?
" आम्ही कसे विसरू मराठी? Afterall Marathi is our mother tongue!"
