STORYMIRROR

Archana Borawake

Drama Action Inspirational

3  

Archana Borawake

Drama Action Inspirational

लढा एका मर्दानीचा

लढा एका मर्दानीचा

6 mins
129

लढा एका मर्दानीचा! 


 वहिनी साहेब जरा रागातच सदरेवर आल्या.

" हरबा, बोला, असे बेवक्ताला का वर्दी दिली? इतक्या रात्री असे कोणते काम आले?"

मुजरा करून हरबा घाबऱ्या घाबऱ्या बोलू लागला,

" माफी असावी वहिनीसाहेब, पण सरदार इथं नाहीत..... अन्‌ आपल्या जहागिरीवर लई मोठं संकट आलंय...... मुघल सरदार फत्तेखान, दक्षिणेतून आपलं काम संपवून दिल्लीला परत निघाला आहे. तसं त्याने जहागिरीकडं वाकड्या नजरेने बघितलं नसतं.... पण त्याला कळलंय की .... , सरदारच काय पण कोणीही तरुण सध्या जहागिरीत न्हाई......त्यामुळे त्याच्या तोंडाला पाणी सुटलंय ..... नेहमीच्या रस्त्याने जायचे सोडून मुद्दाम वाट वाकडी करून तो आपल्या जहागिरीत घुसून लूट करायचा बेत आखतोय....... आणीबाणीची येळ आली हाय..... आता काय हुकूम हाये वहिनीसाहेब? "

   हे ऐकताच रमाबाई अस्वस्थ झाल्या.....

रामचंद्रराव जेधे पाटील आपली सारी फौज घेऊन स्वराज्याच्या कामगिरीवर गेले होते .......राजांच्या फ़ौजेत भर्ती करण्यासाठी, जाताना जहागिरीतील सर्व तरुण पोरंही घेऊन गेले होते ..... प्रत्येक घरातील तरणी पोरं स्वराज्याच्या स्थापनेसाठी..... राजांच्या एका हाकेवर घरदार सोडून निघाली....... जेधेंची ही जहागिरी कर्नाटकच्या सीमेजवळची.... पण , सध्या दक्षिणेत शांतता होती , तिकडून धोका असणार नाही असा पाटलांचा अंदाज होता ...... म्हणुन तर ते जहागिरी अशी रमाबाईंवर सोडून गेले होते. 

   स्वारी इथे नसताना आता केव्हढे हे संकट! हा मुघल सरदार फत्तेखान कुठून असा अनपेक्षितपणे उपटला? आता काय करायचे?  लेकी बाळींना या संकटातून कसे वाचवायचे?...... गढ़ी कशी सांभाळायची?."................या विचारात रमाबाई पडल्या. पण लगेच सावरल्या. जे काही करायचे होते ते तात्काळ करणे भाग होते. 

  

  " हरबा , पंतांना बोलवा...... लगेच खलिते लिहायचे आहेत सांगा."

  पंत येईपर्यंत रमाबाईसाहेब विचार करत सदरेवर येरझाऱ्या घालत बसल्या.... खरं तर त्यांना पायातले त्राण नाहीसे झाल्यासारखे वाटत होते..... अशी वेळ त्यांच्यावर पहिल्यांदाच आली होती....... त्यांचे वडीलही सुभेदार होते..... लहानपणापासून राजकारण आणि लढाया त्यांना काही नव्या नाहीत...... पण जहागिरीची सगळी धुरा अशी खांद्यावर कधी आलीच नाही......

  

 " मुजरा वहिनी साहेब! "

  " पंत, दोन खलिते तातडीने लिहून घ्या..... पहिला स्वारींना पाठवा, जहागिरीवर आलेल्या संकटाबद्दल लिहून तातडीने मदत पाठवण्याविषयी कळवा."

  " पण खलिता पोहोचून मदत येईपर्यंत खानाला कसे रोखणार.. तो तर दहा कोसांवर पोहोचलाही आहे...."

  " पंत, म्हणुनच दुसरा खलिता खानाला लिहायचाय..... मी सांगते तसं लिहा


  " खान साहेब,

        आपण सरळ दिल्लीला निघाला होतात, मग मधेच वाट का वाकडी केलीत? आपल्या मनात काय आहे? आपल्या अशा अनपेक्षित येण्यामुळे आमची रयत हवालदिल झाली आहे... जेधे पाटील सध्या गढीवर नाहियेत......  आम्ही बाई माणूस आपल्याशी कुठल्याही प्रकारची बोलणी करू शकत नाही..... त्यामुळे आपण आपल्या मार्गाला सरळ लागावे..... जहागिरीत येऊन जनतेला त्रास देऊ नये....  आपणापासून आम्हाला काही धोका नाही असं आम्ही समजतो......"

     

" पंत, मोहोर उमटवून लगेच स्वाराला खलिता रवाना करण्यास पाठवा.

   हरबा , खानाबरोबर किती फौज आहे? "

 

" त्याची फौज तर आधीच उत्तरेत निघून गेली हाये...... तो आराम करत मागंच थांबला व्हता म्हणुन फक्त तीनशे हत्यारबंद सैनिक हाये. पण आपण कसा मुकाबला करणार? आपल्याबरोबर उणेपुरे पन्नास लढवय्ये गडी हायेत....... "

   " मुकाबला तर शक्यच नाही.... पण त्याच्यापासून गढ़ी कशी वाचवायची या विवंचनेत आम्ही आहोत. बघू त्याचा काय निरोप येतो ते.... "


रमाबाई त्यांच्या कक्षात आल्या.... खानाजवळ फारशी फौज नाही... पण तरीही त्याने काही आगळीक केली तर काय करायचे...... स्वराज्याचे दैवत शिवाजी राजांना त्यांनी मनोमन मुजरा केला..... राजांनी अशा परिस्थितीत काय केले असते?...... कशी वाचवली असती आपली प्रजा?.... शक्ति की युक्ति?..... इकडची स्वारी कायम म्हणत असते, ' मराठ्यांच्या स्त्रिया खऱ्या हिम्मतवान असतात... मोहिमेवर जाणार्‍या आपल्या माणसांच्या तलवारीला खरी धार येते ती अशा खंबीर स्त्रियांमुळे! '..... खरंच जमेल का मला या संकटाला सामोरे जायला? " 

   त्यांच्या समोर रामचंद्ररावांचे ते राजबिंडे रूप समोर आले...... बाहेरून ते जितके करारी दिसत, तितकेच आतून प्रेमळही होते.... रमाबाईंवर त्यांचे विलक्षण प्रेम होते.... आणि रमाबाई तर त्यांची सावलीच!... रामचंद्ररावांनी स्वराज्याच्या प्रयत्नात शिवरायांना साथ द्यायची ठरल्यावर, रमाबाईंना कोण आनंद झाला होता! ... त्या शिवशंभू नंतर दोघांचेही एकच दैवत होते.... शिवाजी महाराज! ...... 

   आज अशा प्रसंगी पतीच्या आठवणीने त्यांचा जीव कासावीस होत होता..... परत भेट होईल की नाही अशी परिस्थिती ओढावली होती. 


दुसर्‍या दिवशी दुपारी खानाचा खलिता आला. 

" आपणाला त्रास देण्याचा आमचा मनसुबा नाही...... गढ़ीतील सारी संपत्ति , सोने नाणे, धन धान्य सगळे आमच्या हवाली करा.....हम आपको बक्श देंगे. "

 

 " पंत आपल्याला हे सर्व त्याला द्यावे लागेल. पण आपले उणेपुरे पन्नास लढाऊ गडी सामान घेऊन खानाकडे पाठवले अन त्यांना दगा फटका झाला तर......... "


" वहिनी साहेब, तसाही खान वाटतो तितका सरळ नाही.... त्याच्या मनात काही काळंबेरं नक्की असेल.... नुसती संपत्ति घेऊन तो मानणार नाही...... तो क्रूर आहे...... कधीही धावा बोलू शकतो. ...... कसं टाळायचे हे संकट? "

  

"  त्याला लिहा, आम्ही बाहेर येणार नाही.... शंभर निशस्त्र माणसे आत गढीत पाठव..... त्यांच्याबरोबर आम्ही सारी संपत्ति देऊ...... "


" पण खानाची माणसे आत बोलवायची म्हणजे......... "


" पंत, आता इतकेच करू शकतो आम्ही...... आपल्या हातात काही नाही..... परमेश्वरच रक्षण करेल आता.. " 

असं म्हणुन रमाबाई आत निघून गेल्या. 


इकडे खानला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. जेध्यांच्या दौलतीबद्दल त्याने बरंच ऐकलं होतं.... काहीही लढाई न करता मोठी संपत्ति हाती लागणार होती.... शिवाय रमाबाईंच्या सौंदर्याबद्दलही त्याला हेरांकडून बरंच समजलं होतं.... एकटी बाई काय करील? .... दौलत तर मिळेलच पण बाईही मिळेल.. या विचाराने तो उतावळा झाला. आपली शंभर माणसे गढीत पाठवायला तयार झाला...."नंतर घुसू आत... कोण येणार तिच्या मदतीला?" 

      

दोन दिवस झाले होते.... रमाबाईंच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता . गढीमध्ये धावपळ सुरू होती...... भटजी अनुष्ठानाला बसवले गेले.....सर्व वृद्ध आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले ...... कठीण प्रसंग आल्यास स्त्रियांना काय करायचे हेही सांगण्यात आले... 

गढीतील सर्व स्त्रियांचे दागिने, मौल्यवान वस्तू, धान्याची पोती सर्व एकत्र केलं गेलं. दुपारच्या प्रहरी गढीचा दरवाजा उघडला गेला.... खानाच्या माणसांना आत घेऊन दरवाजा परत लावला गेला . दोन प्रहर झाले..... गेलेले लोक काही परत आले नाहीत. खान कंटाळला . त्याचा संयम सुटला... उरलेल्या दोनशे लोकांसह तो गढीवर चालून गेला..... पण त्याला कुणीच प्रतिकार केला नाही.... दरवाजे लगेच उघडले गेले..... दोन स्वार आत गेले.... सर्वत्र शांतता होती..... मधल्या चौकात सर्व धन दौलत गाड्यांवर लादलेली दिसत होती..... स्वारांनी खानाला जाऊन सांगितले..... खान आनंदला..... पण आधी पाठवलेले सैनिक गेले कुठे?..... 

 'लालची सारे.... घुसले असतील गावात.... बायका पाहून बेभान झाले असतील...लुटालूट करत फिरत असतील' . या विचाराने तो आपल्या स्वारांसमवेत आत आला......गढीचे दार लावले गेले..... आणि काही कळायच्या आतच त्या गाफील गनिमांवर गरम तेलाचा वर्षाव होऊ लागला .... एका बाजूने दगड गोट्यांचा मारा सुरू झाला..... जो कुणी त्यातून वाचला...आणि पुढे धावला त्याच्यावर मिरचीची फवारणी सुरू झाली...... आणि सगळ्यात शेवटी हातात तलवार घेऊन उभी होती ती मर्दानी रमाबाई आणि त्यांची सेना .. ..... पन्नास लढवय्या मराठ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या अजून पन्नास रणरागिणी! समोर येणार्‍या प्रत्येक गनिमाच्या शरीराचे चिथड़े होऊ लागले... आपल्या मोजक्या स्वारांनिशी, ती मर्दानी गनिमांना रक्ताने न्हाऊ घालत होती.... साक्षात दुर्गाच अवतरली होती.... या अनपेक्षित प्रतिकाराने खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली...... त्यांना पळता भुई थोडी झाली...... आणि तितक्यात दोरखंडाचा विळखा खानाच्या गळ्याभोवती रमाबाईंनी फेकला... खान जायबंदी झाला.... उरलेल्या गनिमांची आधीच वाताहात झाली होती........ गढ़ी अबाधित राहिली होती अन्‌ मराठ्यांची इज्जतही! 

   

  रात्रंदिन दौड़ करत रामचंद्र जेधे दोन दिवसात गढ़ीवर पोहोचले. रमाबाईंच्या शौर्याची अन्‌ हुशारीची खबर आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती........ स्वागताला खुद्द रमाबाई द्वारावर आल्या होत्या. ते मोठ्या कौतुकाने रमाबाईंना न्याहाळत होते..... 

  " आपण आम्हाला ओवाळता आहात, पण खरं तर हा मान तुमचा आहे..... मोठ्या खुबीने तुम्ही खानाशी दोन हात केले..... आम्हाला तुमचा अभिमान वाटतो." 

 असं म्हणुन त्यांनी सुवासिनींना, रमाबाईंचेच औक्षण करायला लावले. 


   आता खाजगीत फक्त रमाबाई आणि रामचंद्रराव बसले होते. 

" खानाची बातमी ऐकून तर आमचा जीव तुमच्या अन् रयतेच्या काळजीने वेडापिसा झाला होता... तुम्ही हिम्मतवान आहात हे माहीत होते.. पण हा अनपेक्षित लढा कसा दिलात?" 

  " शिवाजी महाराजांची प्रजा आहोत..... शक्ति आणि युक्तीचा मेळ राजांकडूनच तर शिकलो आहोत. आपण गढीच्या आतल्या बाजूस खणलेले खंदक कामी आले या वेळी! पहिले शंभर गनिम त्या खंदकात पाडण्याचा डाव होता..... ते आत येताच खंदकावरील लाकडी आच्छादन हटवले गेले आणि ते खोल खंदकात सापडले.... मग त्यांचेओऐ काम तमाम करायला कितीसा वेळ लागणार? आणि रात्रीतून तेल , दगड-गोटे, मिरची जमा केले..... गनिमी कावा उपयोगी पडला. आणि आपण आमचे तलवारबाजीचे शिक्षण बंद पडू दिले नाही याचा उपयोग झाला.....आमच्याबरोबर अजून पन्नास बायकांना आम्ही शिकवले होते..... स्वराज्यासाठी पुरूषच नाही तर आम्हा स्त्रियांचाही उपयोग व्हायला हवा ना... तुम्ही मोहिमेवर गेलात तर स्वसंरक्षण नको का करायला? "

  " रमाबाई आम्हाला आपला अभिमान वाटतो..... आज तुमच्यामुळे आपली गढ़ी वाचली.... दौलत वाचली..... महाराजांपर्यंत तुमची बातमी गेली आहे. त्यांनीही तुमचे कौतुक केले आहे.  

अशा लढवय्या स्त्रीया असतील तर कुणाही गनिमाची त्यांच्याकडे वाकडी नजर करण्याची हिम्मत होणार नाही. या अनपेक्षित हल्ल्याला, तुम्ही दिलेला अनपेक्षित लढा सर्वांच्या कायम स्मरणात राहील . मुजरा तुमच्या हिमतीला... मुजरा तुमच्या लढ्याला!!! "

    ( काल्पनिक) 

वाचकहो कशी वाटली माझी ही कथा? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. माझे सर्व लेख, कविता आणि कथा वाचण्यासाठी

" मनस्वी" या माझ्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या. 

आवडल्यास कृपया नावासह शेअर करा. 

                                       


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama