STORYMIRROR

Archana Borawake

Others

3  

Archana Borawake

Others

तिचे जीवनगाणे

तिचे जीवनगाणे

7 mins
159

        दीप्ती, देशपांडेंच्या घरातून बाहेर पडली. बरोबर तिची छोटी प्रांजल पण होती... कॉलनीतल्या मंदिराबाहेरील बाकांवर कॉलनीतल्या सगळ्या जेष्ठ महिला बसलेल्या होत्या...त्यांचे हे रोजचेच! आधी देवदर्शन मग तासन्‌तास गप्पा... शिवाय जाणार्‍या येणार्‍यांशीही बोलता यायचे आणि कॉलनीतील सगळ्या खबरबात समजायच्या..... मग बोलायला विषयही मिळायचे आणि टाइमपास व्हायचा तो वेगळाच! दीप्ती लगबगीने निघाली होती...तोच काळे काकूंनी तिला हटकलेच, 

   " बरे आहेत ना देशपांडे आता? आम्ही दवाखान्यात भेटून आलो होतो...पण तुला बाई रोजच वेळ मिळतो.. रोज न चुकता दोन वेळचा डबा घेऊन येते त्यांच्यासाठी....त्यांची स्वयंपाकवाली अजून येत नाही का? की तुझ्याच हातचं आवडायला लागलंय त्यांना?"

    "'मी निघू का, काकू? मला कामावरही जायचंय ... "

     "हो, जा बाई... माणसे ज्या वेळी घरी येतात, त्या वेळी ही कामाला बाहेर पडते... धन्य आहे तुझ्या सासूची....तुला असले काम करू देते... ".

     दीप्ती काही न बोलता झपझप घरी निघाली तरी त्यांचे शेवटचे वाक्य तिने ऐकलेच, 

" देशपांडेच्या बँकेतूनच हिने कर्ज घेतलंय ना! त्यांनीच हमी दिली म्हणुन हिला कर्ज तरी मिळाले... मग आता त्या उपकाराची परतफेड करते आहे.... डबाच देते की आणखी काही, काय माहीत?" 

       

    डोळ्यातले पाणी लपवत ती घरात आली. सासूबाईंनी खिडकीतून पाहिलेच होते.. कोपर्‍यावर नेहमीप्रमाणे दीप्तीला त्यांनी हटकले असेल.. हे त्यांनी ओळखले. 

 " दीप्ती तू आवर. तुझी जाण्याची वेळ झाली आहे. मी मागचे सर्व आवरून घेईन. "

    दीप्ती गेली. तिच्या सासुबाई, मालूताईंना तिची ही ओढाताण पहावत नव्हती.. त्यात लोकांचे टोमणे मारणेही तिला सहन करावे लागत होते. 

 दोन वर्षापूर्वी सुशांत गेला आणि जणू सगळेच ग्रह फिरले. उणापुरा नऊ वर्षांचा संसार झाला. 

      

       दीप्तीने नावाप्रमाणे घरात येताच घर उजळून टाकले होते. अगदी लाघवी बोलणे, कामात तत्पर, प्रेमळ स्वभाव आणि सगळ्यांना आपलेसे करून घेण्याची वृत्ती! यामुळे घरातच काय पण सगळ्या कॉलनीची ती आवडती झाली. मध्यमवर्गीय लोकांची ती कॉलनी... सगळे वातावरण खेळीमेळीचे! कोणी हाक मारली की दीप्ती लगेच मदतीला धावायची. कुणाच्या घरी कार्य असले तर दिवसभर ही तिथे कामाला हजर... मेहंदी काढून दे, रांगोळी घाल, फुलांचे हार बनव... ही जणू तिचीच कामे. 

कुणी बोलावले की, पापड लाटायला जा, कुणाची मुले सांभाळ, कुणी आजारी असेल तर त्यांचे जेवण बनवून दे... संपूर्ण कॉलनीचं हक्काचं आणि प्रेमाचं माणूस म्हणजे दीप्ती! कुणीही कधीही बोलवा दीप्ती कधीच नाही म्हणत नसे. 

     

    त्या कॉलनीत छोटेसे मंदिर होते, तिथे सर्व सण, आणि उत्सव साजरे होत. दीप्तीचा गळा गोड ! त्यामुळे भजन म्हणायलाही ती पुढे असे... सगळ्यांना तिच्या आवाजाने ती तृप्त करायची. मालूताईंना तिचे कोण कौतुक! प्रांजलच्या घरात येण्याने घरात अजूनच आनंदाची बहार आली होतीं. कमाई भलेही माफक होती पण समाधान भरपूर होते आणि इतकी माणसे दीप्तीने जोडलेली होती हीच त्यांची श्रीमंती होती. ..

    

    पण कधी-कधी अचानक एखादे वादळ येते आणि आणि सारे भुईसपाट करून जाते, तसे दीप्तीच्या आयुष्याचे झाले. सुशांतचा भीषण अॅक्सीडेंट झाला. खूप इलाज झाले...मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला अ‍ॅडमिट केले. पण परिस्थिती सुधरेना.. दिवसाला हजारो रुपये बिल येत होते... दीप्तीने दागिने मोडले.. सगळी शिल्लक खर्च झाली... पण खर्च रोज वाढतच होता. कॉलनीतील सगळ्यांकडे तिने मदतीची याचना केली.... 'पैसे लवकर परत देऊ' असे आश्वासन दिले, पण कुणीही मदत करेना. त्यांनी सुशांतची अवस्था पाहिली होती, तो वाचणे अवघड आहे हे त्यांना कळून चुकले होते... त्यांचे कुणी नातेवाईकही असे नव्हते की, पैसे परत मिळू शकतील... आणि दीप्ती एकटी काय करणार? तिला ना नोकरी, ना चांगले शिक्षण! दिलेले पैसे परत मिळाले नसतेच... सगळ्यांनी काही ना काही बहाणे करून हात वर केले... आता एकच उपाय घर गहाण टाकून कर्ज घेणे. 

      पण तेही तिच्यासाठी सोपे नव्हते. शेवटी तिने देशपांडेंना खूप विनवणी केली, तेव्हा त्यांनी त्यांच्या बँकेतून कर्ज मिळवून दिले.. पण त्यांनाही धाकधूक होतीच, कारण दीप्ती हप्ता कुठून भरणार? 

     

  दीप्तीने खूप धावपळ केली. पण नियतीचा डाव उलटा पडला. सुशांत सर्वांना सोडून गेला. आणि दीप्तीपुढे अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले. कमावणारे कोणीच नाही, लहान प्रांजल, सासुबाईंचा दवाखाना, घरावर आता कर्ज, त्याचे हप्ते .. काय करायचे? 

      कुठून तरी सुरुवात करायची होती... दुसरे काम मिळेपर्यंत मग कॉलनीतच काही तरी सुरू करू या, असे तिने ठरवले. तिच्या हातच्या लोणची पापड्या सर्वांनाच आवडत होत्या.. शिवाय चिवडा, लाडू ही बनवून विकता येईल. पण तिला एकही ऑर्डर येईना... ज्या आल्या त्याही अगदी कमी भावात करून मागत होते........मेहंदीच्या ऑर्डर आणि गरज असेल त्यांना जेवणाचा डबा योग्य किमतीत देण्याचाही प्रयत्न केला . पण तिच्याकडून सगळे काम विनामूल्य करून घेणाऱ्यांना आता हे पैसे देणं जड वाटू लागलं.... सणासुदीला फराळ आणि पक्वान्ने बनवून विकण्याचाही प्रयत्न करून पाहिला.. त्यालाही यश येईना.... चव बघायला एक पॅकेट बरेच जण घेऊन जायचे पण ऑर्डर द्यायची वेळ आली की लगेच हात मागे घ्यायचे.

   मालूताईंना खूप वाईट वाटायचे. पोरीने कधी या लोकांसाठी पैशाचा विचार केला नाही. वेळ तर त्यांना दिलाच पण , प्रसंगी स्वतः झळ सोसून इतरांची मदत केली, पण आज जेव्हा तिला गरज आहे तेव्हा कुणीच पुढे येत नाही....कुणी तिला काम मिळवून द्यायचाही प्रयत्न करत नाही. हळहळ करायला मात्र सारे पुढे.... 

" आता काय करशील दीप्ती? कसे भागणार तुमचे? "

असे नकाश्रु ढाळायला मात्र सगळे होते . आता त्यांना लोकांचे खरे रूप कळले.

          

एके दिवशी दीप्तीने एक जाहिरात पाहिली... आणि ती लगेच त्या कामाला तयार झाली. रेस्टॉरंटमध्ये आर्केस्ट्रात गाण्याचे काम होते. पैसा भरपूर होता.. शिवाय त्या आर्केस्ट्राचे बाहेर आणि लग्न कार्यात गाण्याचे कार्यक्रम होत... त्याचेही वेगळे पैसे मिळणार होते. जेव्हा पाणी गळ्यापर्यंत येते तेव्हा माणूस आधार शोधताना, तो आधार कसा आहे.. तो टिकेल की नाही याचा विचार न करता, हातात जे येते, त्याला धरून राहण्याचा प्रयत्न करतो.... तिनेही आता काहीही विचार न करता हे काम स्विकारले. सासूबाईंना विश्वासात घेतले 

     "आई, मी रेस्टॉरंटमध्ये गाणार आहे,  आर्केस्ट्रामध्ये सुद्धा गाण्याचे काम आहे.... आपल्याला आता पैशांची खूप गरज आहे. पण मी तुम्हाला विश्वास देते, मी कधीही अयोग्य काही करणार नाही...मी या घरची सुन आहे, हे मी कधीच विसरणार नाही. " 

    "माझा तुझ्यावर विश्वास आहे दिप्ती... आणि कोणतेही काम वाईट नसते... तुला योग्य अयोग्य समजते... माझी काहीच हरकत नाही. "

       

दीप्तीने हे काम सुरू केले, पण त्यामुळे आता तिला कॉलनीतले लोक भलतेसलते बोलू लागले...रात्रीच्या तिच्या या कामामुळे, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात केली.

  " तुम्ही, दूसरे घर शोधा.... ही सभ्य लोकांची कॉलनी आहे. अशा बायकांना इथे जागा नाही."

दीप्तीला खूप वाईट वाटायचे, 

 "जे लोक आधी, माझ्या इतके जवळ होते, माझी आणि माझ्या गाण्याची इतकी स्तुती करायचे, त्यांना आता माझे असे रेस्टॉरंटमध्ये गाणे वाईट वाटते आहे... पण गाणे माझ्यासाठी पूजा आहे. ते भजन असो, वा फिल्मी गाणे, वा डिस्को गाणे, माझे अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे, तोपर्यंत माझ्यासाठी काहीही गैर नाही... मी माझे काम चालूच ठेवणार. "

     

दोन वर्ष होत आले होते त्या कामाला....दीप्तीचा चांगला जम बसला, अनेक इव्हेंट्समध्ये तिला गाण्याच्या ऑफर येत होत्या... पैसे चांगले मिळत होते.... रात्रीचा दिवस करावा लागत होता पण ती कष्टाला कधीच मागे पाहणारी नव्हती.

      आपले काम सांभाळून, ऐपतीप्रमाणे गरजूंना मदत करणे चालूच होते. हॉटेलचा स्टाफ असो, कुणी सहकलाकार असो, कुणाच्याही मदतीला धावून जाणारी अशी तिची ओळख बनली होती.

      मालू ताईंचा विचार चालूच होता, 

" या कॉलनीतल्या लोकांची मानसिकता कोण बदलणार? काही दिवसांपुर्वी देशपांडे अ‍ॅडमिट होते. एकटा जीव... म्हणुन दीप्ती दवाखान्यात जेवण घेऊन जायची... नंतर घरीही त्यांचं पथ्याचं बनवून न्यायची तर तिचे कौतुक करायचे सोडून तिचा यामागे काहीतरी डाव आहे, तिचे आणि त्यांचे काही तरी संबंध आहेत, या चर्चांना ऊत आला. इतकी वर्षे ती सगळ्यांसाठी हे करतच होती, तेव्हा नाही कोणाला तिच्या हेतूंबद्दल शंका आल्या? आता ती एकटी आहे, गरजू आहे, म्हणुन लगेच तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह?"

   मालूताईंच्या डोळ्यात पाणी यायचे..." परमेश्वर चांगल्या लोकांच्या बाबतीत असे का करतो.. त्यांनाच कायम सत्वपरीक्षेला का समोरं जायला लावतो." 

   

    दुसर्‍या दिवशी संध्याकाळी दीप्ती नेहमीप्रमाणे कामाला निघाली होती... तेव्हड्यात कोपर्‍यावरच्या मंदिराकडे निघालेल्या काळेकाकूंना एका गाडीने उडवले.... गाडीवाला लगेच पळून गेला..दीप्तीने क्षणाचाही विचार न करता, लगेच रिक्षा बोलावली आणि त्यांना दवाखान्यात नेले... त्यांच्या घरच्यांना फोन केला... ते आल्यावरच ती कामाला गेली. 

         मालूताईंना हा प्रकार कळताच त्या म्हणाल्या, " कशाला त्या काळेबाईंना मदत केली? .. पडू द्यायची ना तिथेच.... दोन वेळा मंदिरात जाते, पण मन किती अशुद्ध! तुझ्याबद्दल कायम भलतेसलते बोलत असते...मंदिराबाहेर बसुनही तुझाच विषय... किती वेळा तिला तू, मोदक बनवून दिले, आजारी असल्यावर हक्काने तुझ्याकडून काढा बनवून नेते... पण तुझ्याशी कशी वागली... "

  " जाऊ द्या आई, आपल्या मनाला जे पटतं ते आपण करावं... दुसर्‍याने कसे वागावे, हे आपल्या हातात थोडेच आहे... आणि मी काय मोठे केले? कुणीही अशा रस्त्यात पडलेल्या माणसाला दवाखान्यात नेलेच असते की.. ".  

   " कुणीही नेले असते? अगं आपला सुशांत एक तास रस्त्यावर विव्हळत पडला होता... कुणीही त्याच्या मदतीला धावले नाही.... लगेच दवाखान्यात नेले असते तर आज तो जिवंत असता... सगळे लोक तुझ्यासारखे नसतात....या परिस्थितही दुसर्‍यांची मदत करायला तू मागे पुढे पहात नाही. 

किती शुद्ध मनाची आहेस तू... त्यामुळेच तुला कधी या लोकांच्या बोलण्याची चीड येत नाही, ना आलेल्या संकटांची भीती वाटते..." 

    " आई, इतक्या दिवसात एक गोष्ट मला कळून चुकली आहे.... आपले विचार पवित्र असतील, मन सात्विक असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर कशाचीच भीती आपल्याला नसते.. कोणत्याही संकटाशी आपण लढू शकतो ...आपले जीवन हे एका गाण्यासारखे आहे... ते आपल्याला कोणत्याही स्थितीत गायचेच असते... मीही माझ्या पद्धतीने माझे जीवनगाणे गात आहे... आणि गातच राहणार. "

   दीप्तीसारख्या शुद्ध मनाच्या व्यक्ति या समजात आहेत म्हणून अजूनही चांगुलपणावर लोकांचा विश्वास आहे. 

    वाचकहो कशी वाटली माझी कथा ? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. 

माझे सर्व लेख आणि कथा वाचण्यासाठी मला like आणि follow ही करू शकता.


Rate this content
Log in