STORYMIRROR

Archana Borawake

Drama Inspirational

4  

Archana Borawake

Drama Inspirational

आणि तिच्यात दुर्गा अवतरली...

आणि तिच्यात दुर्गा अवतरली...

4 mins
175

   मानसी, तिचा पती विक्रम आणि छोट्या प्रियाचं छोटं पण आनंदी कुटुंब! प्रियाच्या येण्याने मानसी आणि विक्रमच्या आयुष्यात कशाची कमी उरली नव्हती. दोघेही तिच्यावर जीवापाड प्रेम करत. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात असल्याने घरचे कुणी जवळ नव्हते, म्हणून ते प्रियाची खूप काळजी घेत. प्रिया दोन वर्षाची होत आली होती.....आणि तिच्या बोबड्या बोलांनी आणि बाललीलांनी सगळं घर जणू गोकुळ बनून गेलं होतं.

        एके दिवशी विक्रम चिंताक्रांत चेहर्‍याने घरी आला. त्याला कंपनीच्या कामासाठी एक महिनाभर मंगलोरला जायचे होते. परराज्यात इतक्या छोट्या मुलीसह मानसीला , एक महिना एकटं कसं ठेवायचं, या विचाराने तो काळजीत पडला होता. मानसी म्हणाली , " मी राहीन व्यवस्थित काही काळजी करू नको."

    पण विक्रमचं मन मानेना. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांच गाव मनमाडपासून तीन तासांच्या अंतरावर होतं. आणि मंगलोरला जाणारी रेल्वे मनमाडवरुनच जाणार होती. मानसी आणि प्रिया मनमाडला उतरतील, तिथे भाऊ येईल त्यांना घ्यायला..... आणि विक्रम तसाच पुढे जाईल. असा प्लॅन ठरला. त्याने लगेच ट्रेनची तिकिटे बुक केली. एक महिना मानसी तिकडे राहील... तोपर्यंत दिवाळी येईल आणि येताना तो घरी येऊन दिवाळी झाल्यावर त्या दोघींना घेऊन परत येईल. सगळं ठरलं. 

        एक महिन्यासाठी जायचे त्यात आता दसरा आणि दिवाळी येणार..... म्हणुन कपड़े आणि सामानाच्या दोन तीन मोठ्या मोठ्या बॅग झाल्या. प्रिया लहान असल्याने तिच्या कपड्यांची आणि खाण्याची वेगळी पिशवी..... असं सर्व घेऊन ते कानपुर स्टेशनवरून प्रवासाला निघाले. 

        लांबचा प्रवास.... ट्रेन सकाळी सहाला मनमाडला पोहोचणार होती. दोन मिनिटांसाठी फक्त थांबणार होती. ते गजर लावून झोपले. पहाटे तीनला शेजारच्या माणसाने विक्रमाला उठवले. 

" अहो उतरायचे आहे ना ताईंना... मनमाड येते आहे." 

  विक्रम आणि मानसी गडबडून गेले..... ट्रेन तीन तास लवकर कशी पोहोचली? पटकन सामान दारात नेले.... तोपर्यंत मनमाड आले.... विक्रमने भराभर समान प्लॅटफॉर्मवर ठेवले..... 

 मानसीशी बोलायलाही वेळ नव्हता. 

  " तू घाबरू नकोस... मी फोन करतो दादाला.... येईल तो लवकर ......." 

  तो असे बोलत असतानाच ट्रेन सुरू झाली...... त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती..... पण तोही काही करू शकत नव्हता.... ट्रेन दिसेनाशी झाली. 

     मानसी उतरली तो प्लॅटफॉर्म, मुख्य स्टेशनपासुन खूपच दूर होता...... ती जिथे उभी होती तिथे पूर्ण अंधार होता.... पहाटे तीनची वेळ.... प्रिया कडेवर झोपलेली.... बरोबर सामानाच्या मोठमोठ्या पिशव्या...... संपूर्ण प्लॅटफॉर्मवर कुणीही नाही...... मुख्य स्टेशनवरचे लांबचे दिवे थोडा प्रकाश देत होते. तेव्हा मोबाईल नुकतेच आले होते.... विक्रमकडे फोन होता... पण मानसीकडे नव्हता...... ट्रेन लवकर आल्याने दीर घरून निघाले की नाही, कुठपर्यंत पोहोचले काहीच कळायला मार्ग नव्हता.... विक्रम आता जवळ नाही, त्याच्याशी संपर्क नाही..... लहानग्या प्रियाला घेऊन निर्जन ठिकाणी अंधाऱ्या जागेवर भीतीने ती थिजून गेल्यासारखी उभी होती. 

        बर्‍याच अंतरावर एक बेंच दिसला..... पण सामानाचे काय करायचे...... प्रिया कडेवर झोपलेली.... सामान कसे वाहून न्यायचे? तिने तसंच उभं राहायचं ठरवलं......डोळ्यात प्राण आणून स्टेशनच्या बाजूला पहात राहिली.... कधी एकदा दीर येतात असं तिला झालं होतं...... पहाटेच्या गार वाऱ्यातही तिचे अंग घामाने भिजून गेलं होतं..... 

        थोड्या वेळाने एक हमाल आला, "कुठे जायचंय? समान न्यायचंय का स्टेशनच्या बाहेर, असं म्हणुन सामान उचलू लागला....." 

    " नाही नाही.... कुठे नाही जायचंय..... राहू द्या सामान इथेच!"

     असं ती कसंबसं म्हणाली. तो हमाल स्टेशनकडे गेला..... तिथल्या अजून दोन हमालांबरोबर तिच्याकडे बघून काही तरी बोलत होता. आता मानसीच्या मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या...... पूर्ण स्टेशन वर एकही प्रवासी नाही..... ते दोन तीन हमाल फक्त!

" यांच्या मनात काही असेल का?"

 तिला नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. मनात देवीचा धावा सुरू केला. "मला या संकटातून वाचव." 

 तिने प्रियाला छातीशी घट्ट धरले.... पर्स गळ्यात अडकवून पुढे घेतली.

काहीही झाले तरी प्रिया आणि पर्स सांभाळायची..... सामान गेले तर जाऊ दे. देवीनेच तिला जणू शक्ति दिली.... धैर्य दिला..... तिच्यातील आईने दुर्गेचे रूप घेतले. तिला आठवले प्रियासाठी फळे कापायला फोल्डिंगचा चाकू पर्स मध्ये ठेवला आहे..... तिने तो बाहेर काढला.

देवी जशी त्रिशूळ घेऊन राक्षसांचा वध करायला सज्ज होते, तशी तीही चाकू घेऊन येणार्‍या कोणत्याही संकटाशी मुकाबला करायला तयार झाली..... ती आता घाबरणार नव्हती......जेव्हा कोणतेही संकट स्वतःवर आणि आपल्या बाळावर येते तेव्हा स्त्रीमधील दुर्गा जागी होते..... ती मग काहीही करायला तयार होते.

      एव्हाना प्रियाही झोपेतून उठली..... ती कडेवरून खाली उतरायचे म्हणत होती पण मानसीची तिला खाली ठेवायची हिम्मत नव्हती.... तिने प्रियाला अजूनच छातीशी घट्ट धरून ठेवले...... आणि तिला त्यातले दोन हमाल तिच्याकडेच येताना दिसले...... मानसीमध्ये आता कुठून बळ आले काय माहीत..... पण तिने तो चाकू त्यांना दिसेल असा धरला.... पिशवीत प्रियाचा खेळायचा मोबाईल होता.... तो हातात घट्ट धरला आणि मोठ्याने फोनवर बोलू लागली, " हो का, स्टेशनजवळ पोहोचला तुम्ही.... मी जरा दूरच्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे..... हो हो या लवकर ....." 

   असं काहीतरी बोलत बसली.... चेहर्‍यावरचे आधीचे भीतीचे भाव गेले होते..... आता तिच्यातील दुर्गा जागी होऊन चेहरा निग्रही झाला होता..... ते दोघे जवळ आले.. 

   " तुम्हाला सांगितले ना.... मला कुठे जायचे नाही ते... समजत नाही का..... आलेत माझ्या घरचे आता... चला निघा इथून....." 

   तिचा आवेश, हातातला सुरा आणि मोबाईल यामुळे ते थोडे चपापले.... आणि दूर निघून गेले....... ते गेल्यावर मानसीने निश्वास सोडला..... पाच वाजून गेले होते..... दूसरी एक ट्रेन आली त्यामुळे प्लॅटफॉर्मवर थोडी वर्दळ झाली..... तिला आता कशाची भीती उरली नव्हती...... तेव्हड्यात दीर येताना दिसले..... तिचा जीव भांड्यात पडला...... त्यांच्याबरोबर स्टेशनच्या बाहेर पडताना मनावरचं ओझं उतरल्या सारखं झालं तिला! 

    किती मोठ्या दिव्यातून आपण गेलो, याची जाणीव होताच तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू बाहेर पडू लागले. दीरांच्या फोनने विक्रमशी ती बोलली.... त्याची अवस्थाही काही वेगळी नव्हती...... दोघेही मोठ्या अग्निदिव्यातून बाहेर पडले होते. दोन दिवसांनी नवरात्र सुरू होणार होते..... पण दुर्गा मातेने आधीच येऊन तिला आशिर्वाद दिला होता.... प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गेचा अंश असतो.... राक्षसांच्या त्रासापासून पृथ्वीला वाचवायला देवीला आपले शांत रूप सोडून चंडीचे रूप घ्यावे लागते.... तसेच एका सामान्य स्त्रीलाही वेळ आल्यावर आपल्यातील रणचंडिका जागी करावी लागते..... घाबरून हिम्मत सोडण्याऐवजी संकटाचा मुकाबला करावा लागतो.... आणि मानसीने हेच केले.... तिच्यातील नवदुर्गा जागी झाली आणि जवळ जवळ अडीच तास ती एकटी लढली आणि संकटातून स्वतःला आणि बाळाला वाचवले....जणू दुर्गाच तिच्यात अवतरली! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama