STORYMIRROR

Archana Borawake

Inspirational Others

3  

Archana Borawake

Inspirational Others

श्राद्धाचे प्लॅनिंग

श्राद्धाचे प्लॅनिंग

4 mins
328

      सुधाताई आणि जयंतराव सकाळचा चहा घेत बागेत बसले होते. 

   " तीन दिवसांनी बाबांचे श्राद्ध आहे. सर्व सामान आहे ना?"

    " हो! आणि ते वृद्धाश्रमाचे सामान सुद्धा पिशव्यांत भरून तयार आहे."

    "सुधा, तुझ्यामुळे आपल्या हातून हे चांगलं काम होतंय... त्या वृद्धाश्रमात राहणार्‍या लोकांनाही त्यांच्या पितरांचे श्राद्ध करावेसे वाटत असणार....हे तुझ्या लक्षात आले.. आणि तेव्हापासून दर सर्वपित्री अमावस्येला आपण सगळी तयारी करून तिथे जातो. आधी तर तू कित्येक भाज्या स्वतः करुन न्यायची.... तब्येतीमुळे आता जमत नाही, पण आपण सर्व अगदी व्यवस्थित बनवून घेतो..... किती समाधानाने ते लोक मग पिंडदान करतात.... आपल्या पितरांच्या आठवणी त्यांच्या डोळ्यात दाटून येतात.... त्यांच्या चेहर्‍यावरचे समाधान आणि डोळ्यातले ते कृतज्ञतेचे भाव बघून सार्थक होत गं या जीवनाचं! "

     " आपल्याने शक्य होईल तोपर्यंत आपण हे करतंच राहू....पण आज माझ्या डोक्यात एक वेगळीच गोष्ट सुरू आहे. आज दीनू भाऊजींचं श्राद्ध असतं... पण राधा आणि मिलिंद दोघेही सकाळीच गेले ऑफिसला... मागच्या वेळी आपल्या बागेतली आळूची पाने घ्यायला आली होती सकाळीच! आज काहीच केलेले दिसत 

नाही. "

   " अगं तुझ्या लक्षात नसेल.... आज नसेल श्राद्ध! "

  " नाही हो आजच आहे..."

    दारावरची बेल वाजली .. सीता आली होती कामाला....मग तो विषय तिथेच संपला.

  संध्याकाळी सुधाताई आणि जयंतराव फेरफटका मारून येत होते... रस्त्यात राधा आणि मिलिंद भेटले. सुधाताईंनी विचारलेच 

   " अरे आज बाबांचे श्राद्ध होते ना तुझ्या?"

 " हो काकू. पण या वेळी दादा करणार आहे... मागच्या वेळी आम्ही केले होते ना!"

   पुढे काही न बोलता हे दोघे घरी आले.

   " कशी मुले आहेत हो? श्राद्धाचीही वाटणी! दीनू भाऊजींनी अशीच वाटणी केली होती का त्यांच्या प्रेमाची? आयुष्यभर आपल्यासाठी झटणाऱ्या बापाला एक दिवस प्रेमाने घास भरवला तर काय होईल? किती प्रॅक्टिकल विचार करतात आजकालची मुले! बरं झालं आपली मुले अशी नाहियेत. किती काळजी करतात आपली! परदेशात राहूनही दर दोन-तीन दिवसांनी न चुकता फोन असतो, तब्येतीची विचारपूस असते, आपलं सर्व व्यवस्थित करतील ते! "

    " आपली मुले चांगली आहेत, पण आपण कशाला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायच्या?...... त्यांना पटलं तर ते करतील... आणि नसेल करायचं तर नको करू देत ना! परदेशात राहणारी , आधुनिक विचारांची मुले आहेत ती! .... त्यांना हे सर्व करणं आवडेलच असं नाही... आणि हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आपल्या आई-बाबांसाठी आपण करतो, कारण त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे, कृतज्ञतेची भावना आहे आणि आपला या गोष्टीवर विश्वास आहे.... श्रद्धा आहे .... "

  " असं नका म्हणु.... आपली मुले अशी नाहीत. "

  " हो! पण आपण कधीही त्यांच्यावर आपल्या प्रथा पाळायचे बंधन घातले नाही....त्यांनी काही करो वा ना करो, पण आपण दोघे तर एकमेकांसाठी हे करू शकतो ना! "

  " मला जरा समजेल असे बोलाल का?"

  " आपलं आता वय झालं... कुणाचे बोलावणे कधी येईल काही सांगता येत नाही. जर मी आधी गेलो तर तू माझ्यासाठी हे करायचे.....माझी आठवण म्हणुन! हो, पण इतक सगळं शास्त्राप्रमाणे नाही करत बसायचे बरं! तुला आता काम झेपत नाही..... आणि थोडा मॉडर्न टच पण पाहिजे ना जुन्याला. म्हणुन श्राद्धाला इतके प्रकार करण्यापेक्षा फक्त गोड खीर कर.... माझ्या डायबेटिस मुळे मला गोड खाता येत नाही .... आणि माझ्यामुळे तूही गोड खात नाही...... म्हणुन त्या दिवशी तू दोन वाट्या भरून खीर घेऊन या झोपाळयावर यायचे.... मी त्या झाडावर बसलेला असेल.... मी तुला दिसलो नाही ना, तरी मी असणारंच आहे तिथे.... मी ती खीर चाखून नक्कीच बघेन.... पण नंतर दोन्ही वाट्या तू संपवायच्या .... एक माझ्यासाठी आणि एक दूसरी तुझ्या त्यागासाठी ! माझं पोट आपोआप भरून जाईल. मला तू खाल्लेली खीर पोहोचेल... माझा आत्मा तृप्त होऊन जाईल. "

    " आणि मी आधी गेले तर.... "

   " तर मी त्या दिवशी असाच झोक्यावर बसेल..... मला तुझ्यासारखा छान स्वयंपाक थोडाच येतो? मी काही बनवत नाही बसणार बरं..... मी बाजारातून आइस्क्रीम आणणार... दोन कप.. तुझ्यासाठी खास! आइस्क्रीम किती आवडते तुला! पण आताशा या दम्यामुळे तुला खाताच येत नाही........ मीही तुला कधी खा म्हणत नाही. किती स्वार्थी आहे ना मी! तुला जपतो तेही माझ्यासाठी! .... तुला त्रास होऊ नये म्हणुन, तू माझ्या सोबत कायम राहावी म्हणुन!

    पण तुझ्या श्राद्धाला मात्र भरपूर आइस्क्रीम घेऊन असा बसेन.... मग तूही हळूच येऊन ते चाखून जा.... मनसोक्त खा.... शेवटी श्राद्धाला तरी काय करतात? आपल्या जवळच्या लोकांना प्रेमाने खाऊच घालतात ना! त्यांच्या आठवणींना उजाळा देतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात! पण सुधा, माझ्यावर ही वेळ कधी येऊ नये असे वाटते... तुझ्याशिवाय मी जगणार तरी कसा? "

    " परत स्वार्थी झालात तुम्ही! पण जे बोललात ते पटलं मला.... कुणी आपल्यासाठी काही करो वा न करो.... आपण कायम एकमेकांसाठी असणार आहोत.... आताही आपण पत्थ्य पाळून जमेल तसं एकमेकांच्या इच्छा पूर्ण करतो आहोत आणि नंतरही त्या इच्छांना पूर्ण करत राहू... सुंदर आठवणी गोळा केल्यात... या बागेत बसुन त्या जगत राहू... 

    खीर आणि आइस्क्रीमचा घास भरवण्याचे दिवस अजून दूर आहेत म्हंटल ..... ते प्लॅनिंग परत नंतर करत बसू. आत्ता जेवायला काय करायचे ते 

सांगा!" 

  " डाळखिचडी करू!मी मदत करतो तुला... चल. "

  आपल्याच श्रद्धाचं प्लॅनिंग करून ते दोघे हसत हसत आत गेले. जगावं असं दिलखुलास ... ना मृत्यूचे भय... ना कसली अपेक्षा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational