हिरकणी
हिरकणी
रेल्वेच्या छोट्याशा क्वार्टरमध्ये अनुसया आणि केशवरावांनी आपला संसार थाटला. अनुसयेच्या माहेरची परिस्थिती चांगली होती. सासर त्या मानाने गरीब. पण किसनराव रेल्वेत ड्रायवर. सरकारी नोकरी म्हणून तोलामोलाचे स्थळ नसतानाही अनुसयेच्या घरच्यांनी हे लग्न लावून दिले. पुढेमागे परिस्थिती सुधारेल असे त्यांना वाटले होते. काळ स्वातंत्र्यापूर्वीचा! स्वातंत्र्याचे वेध देशाला लागले होते पण अजून राज्य मात्र ब्रिटिशांचे सुरू होते. सरकारी नोकरीला मान होता. त्या वेळच्या रीतीप्रमाणे थाटामाटात त्यांचे लग्न लागले. गोर्या रंगाची, घाऱ्या डोळ्यांची, सुंदर, सुकुमारी अशी छोट्या चणीची पंधरा-सोळा वर्षांची अनुसया आपली अवजड नऊवारी साडी सांभाळत माप ओलांडून सासरी आली.
घरात वृद्ध सासरे, एक लहान दीर आणि नणंद . समजून घेणारे, शिकवणारे कुणीच नाही. नवी नवलाई कधी सरली आणि अनुसयेच्या नाजूक खांद्यावर जबाबदारीचे ओझे कधी पडले हे तिलाही समजले नाही. लाडाकोडात वाढलेली ती आता कामाचे ढिगारे उपसू लागली. नाजूक हातांवरची मेंदी कधीच मिटली. दळण दळून, घरकामाचा डोंगर उपसून अनेक आडव्या-उभ्या चिरांची नक्षी मात्र हातावर उमटू लागली. दिवस, वर्ष सरु लागले. घरात एकामागून एक पाळणे हलू लागले. त्या छोट्याशा रेल्वे क्वार्टरमध्ये दहा मुलांच्या रूपाने गोकुळ अवतरले. पाच मुले, पाच मुली त्यांच्या संसारवेलीवर बागडू लागल्या. बघणार्याला हेवा वाटावा अशी सारी सुंदर आणि गुणी मुले! पण अनुसया आणि केशवरावांना मात्र या वाढत्या संसाराच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले. तरीही दोघांचा संसार हिमतीने सुरू होता. परिस्थिती बेताची पण आनंदाची कमी नव्हती.
अनुसयेचा भाऊ त्या काळी पोलीस खात्यात वरच्या पदावर होता... मोठा रुबाब होता त्याचा! पण भावजयी मात्र अनुसयेचा रागराग करी.... गरीब नणंद , तिच्या अंगावर धड लुगडे नाही, मुलांच्या अंगावर जुनकट कपडे! यामुळे ती अनुसयेला घालून पाडून बोली. अनुसया बिचारी ऐकून घेई. आई वडिलांच्या मागे आता फक्त भावाचाच आधार होता तिला. एकदा ती मुलांना घेऊन ती अशीच भावाकडे आली होती..... वहिनीचे बोलणे नेहमीचेच असायचे. पण यावेळी भाऊही म्हणाला, " कशाला मुलांना शाळेत घालून पैशाची नासाडी करते? काय शिकणार तुझी मुले? रेल्वे लाइनवर राहणारी मुले टुकारच होणार.. पुढे चोर्यामाऱ्याच करणार.....". अनुसयेला हे बोलणे जिव्हारी लागले.....स्वतःचा अपमान ती सहन करत होती. पण पोटच्या गोळ्यांना कुणी असे म्हणावे? तिच्यातील स्वाभिमानी माता जागी झाली. ती उठली. आपले कपड्यांचे गाठोडे उचलले. मुलांना घेतले आणि त्या घराच्या बाहेर पडली. तेव्हापासुन तिचे माहेर तुटले ते कायमचे!
आता एकच ध्यास! मुलांना चांगलं शिकवून भावाची ही भविष्यवाणी खोटी ठरवायची. पण हे सोप्पे थोडेच होते? कपड्यांना ठिगळ लावणं सोपं, पण फाटक्या संसाराला ठिगळ कसं लावायचं? मुले मोठी होऊ लागली ... शाळेचा खर्च, कपडेलत्ते, वह्यापुस्तके, कुठून आणायचे इतके पैसे ? देश स्वतंत्र झाला होता. तो काळ होता 1955 च्या दरम्यानचा. कर्ज मिळायचं तेही व्याजाने.....सगळा पगार ते कर्ज फेडण्यातच जायचा.... त्यात आजारपण पाचवीला पुजलेले....केशवराव कायम पोटदुखीने आजारी असायचे. त्यामुळे कामावर सुट्ट्या व्हायच्या. आणि पगाराचे पैसे कापून यायचे. आधीच तुटपुंजा पगार , त्यात तोही अर्धा यायचा. एव्हड्या मोठ्या कुटुंबाचे कसे भागवायचे? वाण्याच्या दुकानात उधारी, शिंप्याकडे उधारी, इतकेच काय पण न्हाव्याकडेही उधारी व्हायची. ....... पण अनुसयेने ठरवले होते..... काहीही करेल पण मुलांना शिकवीनच. दहा बाळंतपणात शरीर थकले होते, बाळंतवात पाठी लागला होता, पण मन मात्र वज्राहून कठीण झाले होते... ध्येयाने ते पछाडले होते.
तिने मुलांना काटकसरीचे शिक्षण दिले, घरात कोंड्याचा मांडा करून मुलांचे पोट ती भरू लागली, कधी रेशनवरची लाल ज्वारी, हुलगे आणून, कधी भाकरी-ठेचा तर कधी नुसते वालाचे कढण करून कसंबसं मुलांचे आणि आपले पोट भरू लागली. कमीत कमी वस्तूंतही चविष्ट पदार्थ कसे बनवता येतील याचाच ती विचार करायची. रद्दीवाल्याकडून जुन्या वह्यांची कोरी पाने आणायची, ती शिवून त्यापासुन वह्या बनवून मुलांना द्यायची. वर्षातून एकदाच कापडाचा मोठा तागा आणून त्याच्यातूनच मुलींना परकर पोलके, तर मुलांना शर्ट विजार शिवली जायची. तेच कपड़े विटून जाईपर्यंत घालायचे. स्वतःला तर नवीन लुगडे कधी माहीतच नव्हते... लग्नाकार्यात आलेल्या लुगड्यालाच ती गोड मानून अंगावर ल्यायची ... ते फाटल्यावर त्यालाच ठिगळ जोडून लाज राखायची. पती किसनराव बर्याच वेळा घरात आजाराने झोपूनच असायचे. त्यांचीही काळजी घ्यावी लागायची. स्वतःच्या परिस्थितीबद्दल कधी कधी तिला खूप रडू यायचे, " देवाने माझ्याच बाबतीत असे का केले? काय दोष माझ्या मुलांचा? त्यांना पोटभर अन्न मिळत नाही की ल्यायला अंगभर कपडा मिळत नाही..... कधी सुधारणार माझी स्थिती?"
पण हा विचार क्षणभरच रहायचा..... ती अशिक्षित जरूर होती, पण एक गोष्ट तिला पक्की ठाऊक होती, आपली परिस्थिती आपणच बदलू शकतो, आणि शिक्षणामुळेच हे भविष्य बदलू शकते..... ती पदर खोचून कामाला लागली. कुणाच्या कुरडया, कुणाच्या पापड्या, शेवया , पापड करून दे, शेतावर रोजंदारीच्या कामाला जा.. कुणाच्या गोधड्या शिवून दे... असं करुन संसाररथ दिवसरात्र हाकू लागली. दिवसभर अनेक कामे, रात्री चिमणीचा उजेडात गोधडी शिवणे , पहाटे जात्यावर दळण दळणे... त्या हातांना विश्रांति माहीत नव्हती. माहित होते ते फक्त अव्याहत कष्ट. तिला ते हात अजून बळकट करायचे होते.... कामाचा गाडा ओढायला स्वतःला अजून सक्षम बनवायचे होते. थांबायचे नव्हते. तिचा थांबा तिने ठरवला होता... पण तो खूप लांब होता.
देवाला ती रोज हात जोडायची. पण त्याला कधी धन दौलत ती मागत नव्हती. ती म्हणायची , " माझ्या हातांना बळ दे, त्यांना इतके कणखर बनव की, माझ्या आयुष्याच्या यज्ञकुंडात प्रयत्नांची आहुती कमी पडता कामा नये. माझे यज्ञकुंड धगधगत राहू दे ... मला माझ्या ध्येयाची जाणीव ते करत राहू दे."
तिची सर्व मुलेही समंजस होती. सुट्टीच्या दिवशी मुली शेतावर कामाला जायच्या , मुले पडेल ती दुसर्याची कामे करून द्यायची......मुलांनी कधी हट्ट केला नाही.... आई वडिलांना प्रत्येक बाबतीत सहकार्य केले. उपाशी पोटी खोटा ढेकर देऊन कित्येक वेळा ते ताटावरुन उठले..... मोठ्या भावंडांनी स्वतः अर्धपोटी राहून धाकट्या भावंडांना आपल्या घासातील घास खाऊ घातला..... घरातील स्वयंपाकापासून सर्व कामे मुले-मुली मिळून करत.... त्या काळीही अनुसयेने मुलींप्रमाणे मुलांनाही घरातली सर्व कामे शिकवली..... मुलगा मुलगी असा भेद नव्हता..... पडेल ते काम प्रत्येकाने केले. रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात, रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला...... प्रसंगी लांबच्या नातेवाईकांकडे राहून त्यांची कामे करून शिक्षण चालू ठेवले. सगळ्यांनीच परिस्थितीचा गाडा ओढायला सुरुवात केली. आईच्या भागीरथ प्रयत्नांना सहकार्य करून खारीचा वाटा तीही उचलू लागली. ही सर्व कामे करताना एक शिकवण मात्र आईने मुलांना जरूर दिली, " कोणतेही काम कमी समजू नका, कष्टात कसली लाज? पण काम करताना आपला स्वाभिमान जपा, कुणापुढे लाचार कधी होऊ नका.... हात कधी पसरू नका. "
तिनेही कधी कुणाकडे हात पसरला नाही. तिच्या दुबळ्या शरीरात बळ होते ते हिमतीचे! त्या हिमतीने तिने अशक्य वाटणारे शिवधनुष्य पेलायचे ठरवले होते.
मुलांनीही ठरवलं आईच्या कष्टाचं चीज करायचं...... सर्व मुले गुणी निघाली..... त्या काळाप्रमाणे मुलींची शिकून चांगल्या घरात लग्ने झाली.... मुलींनी आपल्या आईच्या संस्कारांचा वारसा पुढे चालवला. आईच्या शिकवणूकीप्रमाणे वागून आपापल्या घरी नाव काढले. आपले संसार सुखाचे केले. मुलेही एकामागून एक चांगल्या पदावर नोकरी करू लागली. घरात पैसा येऊ लागला. हळूहळू परिस्थिती सुधारली. समाजात किंमत प्राप्त झाली. अंगावर चांगल्या साड्या आणि दागिने शोभू लागले. दहा पैकी दहा मुले जीवनात यशस्वी झाली.... त्यांचे संसार सुरू झाले..... सगळे एकत्र जमल्यावर तर गोकुळाचा साक्षात्कार अनुसयेला आणि केशवरावांना होऊ लागला. आपल्या मुले, सुना, जावई आणि नातवंडांकडे बघून अनुसया आणि किसनरावांचा ऊर अभिमानाने भरून यायचा. प्रत्येकाची मोठमोठी घरे झाली, गाड्या आल्या. मुलांच्या अंगावर सुंदर कपड़े आले. स्वप्न सत्यात उतरले. याचे सर्व श्रेय होते अनुसयेला.... जी स्वतः अवघड परिस्थितीतही खंबीर राहिली...... मेहनतीवर आणि सद्विचारांवर श्रद्धा ठेवली....... आपल्या पतीला साथ दिली, त्यांची हिंमत ती बनली. जे ठरवले ते तिने करून दाखवले....... इतक्या मोठ्या संसाराचा गाडा चालवला आणि आपल्या मुलांना जीवनात उभे करून दाखवले. भावाची भविष्यवाणी तीने खोटी करून दाखवली. तिची झुंज यशस्वी ठरली. इतिहासातल्या हिरकणीने आपल्या बाळासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घातले होते . ही हिरकणीही आपल्या लेकरांसाठी दिव्याची वात होऊन अखंड जळत राहिली. त्यांना मार्ग दाखवत राहिली.... संकटांचा सोसाट्याचा वारा, रस्ता धूसर करणारी अडचणींची वावटळे आणि ऊर दडपून टाकणार्या दुःखाश्रूंचा पाऊस झेलत ती वात आपल्या पिलांसाठी तिने तेवत ठेवली.
खरंच एक स्त्री जेव्हा आई बनते, तेव्हा तिला दूसरे काही दिसत नाही... तिला दिसतात फक्त तिची मुले! .... त्यांच्यासाठी ती कोणतेही दिव्य करू शकते. अनुसयेने सगळ्यांना दाखवून दिले की एक अशिक्षित स्त्री अशक्यही शक्य करून दाखवू शकते. कारण तिच्यात असते आदिमायेची शक्ति, ती जितकी कोमल दिसते त्याहीपेक्षा ती अनेक पटीने कणखर असते. परिस्थितीनुसार ती दुर्गा, कधी भवानी आणि कधी तीच रणचंडी बनते. आणि आपल्या दिव्यत्वाने स्वतःच्या कुटुंबाला अंधकारातून प्रकाशाकडे नेते.
(ही सत्य कथा माझ्या आजीची!.. तिच्या कष्टाची, तिच्या लढाईची आणि तिच्या विजयाची! ती आता हयात नाही. पण तिची ही असामान्य विजयगाथा आम्हाला कायम प्रेरित करत असते. आम्हाला तिचा खूप अभिमान आहे.)
