इंद्रधनू फुलले
इंद्रधनू फुलले
आज परत नवीन स्थळ! वैदेही यांत्रिकपणे तयार झाली. तिला या सगळ्या प्रकाराचा आता वीट आला होता. मागच्या काही वर्षांपासुन हेच चालले होते. दर महिन्याला तीन-चार स्थळं बघायला यायची. तीच निरर्थक प्रश्नउत्तरे, तेच कांदेपोहे आणि आई बाबांचे तेच होकाराची वाट बघणे! काही उत्तर आले नाही की, तेच नाराज होणे, बाबांच्या चेहर्यावर पुन्हा चिंतेचे सावट आणि आईचे नवनवीन नवस-सायास! सगळंच नकोसं वाटणारं! पण करणार काय? आधीच आई-बाबा तिच्या लग्नाच्या चिंतेने ग्रासून गेलेले, आणि त्यात आपणही नाराजी का दाखवायची? त्यांच्या समाधानासाठी ती नाईलाजाने दर वेळी उसन्या उत्साहाने तयार व्हायची. पण आहे त्या परिस्थितीचा तिने स्विकार केला होता. तिचे जीवन ती एकटीच चांगल्या प्रकारे जगु शकते याची तिला खात्री होती.
दराची बेल वाजली. पाहुणे मंडळी आली. आईने देवाला मनोमन साकडे घातले. वैदेही चहा-पोहे घेऊन बैठकीत गेली. नेहमीचा प्रश्न-उत्तराचा कार्यक्रम झाला. मुलामुलीने एकमेकांशी बोलावे असे मध्यस्थाने सुचवले. दोघेही गच्चीत गेले. दोघांनाही काही सुचत नव्हते. बराच वेळ शांततेत गेला. शेवटी बघायला आलेला मुलगा, राम म्हणाला, "तुमची जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे?"
वैदेही या प्रश्नाने चमकलीच. इतक्या वेळा ती अशा कार्यक्रमांना सामोरी गेली, पण तिला हा प्रश्न कुणी विचारलाच नाही. कॉलेजच्या दिवसात तिने मनात काही कल्पना केल्या होत्या... स्वप्नं पाहिली होती...पण काळाच्या ओघात, आणि नकारांच्या फुल्यांमध्ये तिच्या स्वप्नांना आणि अपेक्षांना काही अस्तित्वच उरले नव्हते. जगाच्या दृष्टीने सुंदर नसणार्या अनाकर्षक मुलींना जणू होणार्या पतीबद्दल काही अपेक्षा ठेवण्याचा अधिकारच नसतो... पदरी जे पडेल त्यात सुख मानावे लागते. त्यामुळे आज या प्रश्नाने ती थोडी आश्चर्यचकित झाली. उत्तर तर द्यायला पाहिजे, म्हणून म्हणाली,
" माणसाच्या अपेक्षांना अंत नसतो. एका अपेक्षेमधून अनेक अपेक्षा जन्म घेतात आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर, अपेक्षाभंगाचे दुःख वाट्याला येते. जगातल्या कोणत्याही दुःखापेक्षा ते सर्वात मोठे असते. त्यामुळे मी काहीच अपेक्षा ठेवली नाही.. पण एक इच्छा मात्र आहे, मला असा जीवनसाथी मिळावा ज्याने मला मनापासून आणि मी आहे तशी स्विकारून माझ्यावर भरभरून प्रेम करावं. "
राम वैदेहीकडे पहातच राहिला. तिच्याशी झालेल्या एवढ्याशा संभाषणातूनही त्याला तिच्या मनाचे दर्शन झाले. तिच्या आयुष्याने तिला किती प्रगल्भ बनवले आहे! जी दुःखाची हलकी किनार तिच्या बोलण्याला होती तशीच अपेक्षाभंगाच्या दुःखाची झालर त्याच्याही आयुष्याला होतीच. तोच पुढे म्हणाला, " तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सगळी माहिती मिळालीच असेल. तरीही अजून काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता."
" ज्या अर्थी तुम्ही इथे मला बघायला आलात, त्या अर्थी तुम्ही भूतकाळ मागे सोडायला तयार आहात हे कळले मला. मग कशाला जुन्या जखमा कुरवाळत बसायच्या? ...तुम्ही निराशेतून उठून आयुष्याला नवीन संधी द्यायला तयार आहात म्हणून मला तुमच्याबद्दल आदरच वाटतो आहे. फार थोडी माणसे असे करू शकतात.. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. पण तुम्ही विचारतच आहात म्हणून मीही तोच प्रश्न तुम्हाला विचारते , तुमच्या काही अपेक्षा? "
" मीही आता कोणत्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत. फक्त एक इच्छा आहे... ती मुलगी आत आणि बाहेर एकच असावी.. अगदी खरी.. "
वैदेहीला त्याच्या मनातील दुःख जाणवले. एक आघात याने पचवला आहे. आता परत कोणताही आघात सहन करण्याची त्याची इच्छा नाहिये.
चेहरा आणि सौंदर्याच्या पलिकडेही काहीतरी असते, ज्याचे आकर्षण माणसाला वाटते. दोघांनाही एकमेकांमध्ये तेच जाणवले... परिस्थितीने शिकवलेले शहाणपण त्या दोघांकडेही आपोआप आले होते.. दुसर्याच्या मनाचा विचार करण्याची वृत्ती दोघांच्यातही त्यामुळे निर्माण झाली होती.
वैदेही नेहमीप्रमाणे हाही बघण्याचा कार्यक्रम विसरून आपल्या कामात गुंतून गेली. तिला कोणाकडुनही कसलीच अपेक्षा नव्हती. एके संध्याकाळी घरी आल्यावर आईने तिच्या हातात पेढा ठेवला.
" अगं मुलाकडच्यांची संमती आली आहे."
वैदेहीसाठी हे नवीनच होते. नेहमी नकार ऐकण्याची सवय असल्याने, तिने पुढच्या गोष्टींचा विचारही केला नव्हता. आईच म्हणाली,
" वैदेही त्यांचा होकार आला , पण तुझे काय? आमच्यासाठी बळेच मुलाला होकार देऊ नकोस. मला माहित आहे, प्रत्येक मुलीला वाटते, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा... जो फक्त तिच्यावर प्रेम करेल. पण रामबद्दल आम्ही आधीच तुला सर्व सांगितलं आहे. त्याचे एका मुलीवर खूप प्रेम होते. खूप सुंदर होती म्हणे ती! त्यांचे लग्नही ठरले होते... पण ती , लग्न चार दिवसावर होते तेव्हा दुसर्याच कुणाबरोबर पळून गेली.....तो पूर्ण कोलमडून गेला होता, त्याची स्वप्ने एका क्षणात उध्वस्त झाली. चार-पाच वर्ष तो त्याच दुःखात झुरत बसला. लग्नाला तयारच होत नव्हता. . पण जीवन असंच असतं... पुढे चालावच लागतं. शेवटी लग्नाला तयार झाला. तुला अजूनही त्याच्याबद्दल काही शंका असेल तर तू त्याला नकार देऊ शकते. निर्णय सर्वस्वी तुझा आहे. "
वैदेही तिच्या खोलीत गेली. तिला राम बरोबरची भेट आठवली. दिसायला तिच्यापेक्षा खुपच सुंदर.... उंचपुरा! .. मला याने होकार का कळवला ? माझ्याकडे असे काय आहे? ना सौंदर्य ना रंग....ना उंची! परिस्थितीला शरण जाऊन घेतलेला निर्णय तर नसेल? की माझी कीव करून घेतला हा निर्णय? की मनाविरुद्ध? की आईवडिलांसाठी? "
तिला काही समजेना. तिने संसाराची स्वप्ने पहायचे सोडूनच दिले होते. डोळे मिटून ती बसली.
तेव्हड्यात मेसेजची बीप वाजली. तिने पाहिलं. एक अनोळखी नंबर होता. मेसेज वाचला.
" हॅलो , मी राम. तुम्हाला आमचा निरोप मिळालाच असेल. तुमच्या मनात काय आहे, हे समजले तर बरे होईल. सॉरी हं, तुमचा नंबर मध्यस्थाकडून परस्पर मिळवला. तुम्हाला प्रत्यक्ष विचारावे असं वाटलं म्हणुन. "
" तुम्ही पूर्ण विचारांती निर्णय घेतला आहे ना? म्हणजे माझे रंग-रूप...... शिवाय आता वाढलेले वय....."
" बाह्य सौंदर्यापेक्षा दुसर्या कितीतरी गोष्टी महत्त्वाच्या असतात. मला तुमचे विचार आवडले...दुसर्याला समजून घेण्याची वृत्ती आवडली. आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्याला सामोरे जात आहात तेही आवडले. आणि चेहर्याच्या सौंदर्याने मला एकदा फसवले आहे, मनाचे सौंदर्य फसवणार नाही याची खात्री पटली... म्हणुन मी हा निर्णय घेतला. तुम्ही मला समजून घेऊ शकाल याचा मला विश्वास वाटला.. तुम्ही लगेच निर्णय घ्यावा असे नाही. पूर्ण विचारांती निर्णय घ्या. "
वैदेहीला हायसे वाटले. तिला खरंच वेळ हवा होता. तिने 🙏🙏(धन्यवाद) या अर्थीचा चित्रवजा मेसेज पाठवला. आई बाबांनाही थोडं थांबायला सांगितलं.
रामचा नंबर सेव करावा की नाही? हेच तिला समजत नव्हते. पण तिने नकळत नंबर सेव केला.
दुसर्या दिवशी रामने मेसेज केला
" खूप छान लिहिता तुम्ही. "
"ओह्ह! माझा स्टेटस त्याला दिसू लागला आहे.".
वैदेही चारोळ्या, कविता आणि कथा लिहायची. त्याची लिंक स्टेटसला टाकायची. त्याने तिचे लिखाण वाचले. मग नेहमीच तो तिच्या लिखाणाला कधी 👌👌 तर कधी 👏👏असे चित्र मेसेज टाकून प्रोत्साहन देऊ लागला. तीही मग त्याचे स्टेटस बघू लागली. त्याची अप्रतिम फोटोग्राफी बघून तर ती खूपच प्रभावित झाली. खरंच काय सौंदर्यदृष्टी आहे याच्याकडे! साध्या घटनांनाही एका वेगळ्याच अँगलने बघून कॅमेराबद्ध करताना त्याची कलात्मक नजर दिसून येत होती. मग तीही 👌👌असे मेसेज टाकून त्याचे कौतुक करू लागली. कधी फोटो तर कधी कविता यांच्यावर चॅटिंग होऊ लागली. दोघांचे सूर जुळू लागले... विचार पटू लागले. चेहरा गौण ठरून त्या चेहर्याच्या आत असणार्या सच्च्या माणसाचे दर्शन त्यांना होऊ लागले....दोघांचा एकमेकांकडे ओढा वाढू लागला.. दोघांचे फोनवरील चॅटिंग आता कितीतरी वेळ होऊ लागले.
वैदेहीला काय होतंय कळेना. कायम गंभीर राहणारी ती, आता एकदम हसरी आणि दिलखुलास होऊन गेली. रामच्या मेसेजेसची वाट पाहणे सुरू झाले. अनेक अंधाऱ्या रात्रींनंतर आयुष्यात प्रेमाची पहाट फुलत होती..... आणि एक चारोळी आपोआप तिच्याकडून लिहिली गेली...स्टेटसलाही टाकली गेली.
जीवनात माझ्या एक हळुवार झुळूक आली
तू आलास जणू , सप्तरंगाची बरसात झाली,
वर्षाव तुझ्या प्रेमाचा झेलून धुंद झाले
कळलेच नाही आयुष्यात कधी इंद्रधनू फुलले!©
काही क्षणातच मेसेजची बिप वाजली. तिने लगेच पाहिले
" अप्रतिम! प्रेमाचा सुंदर आविष्कार व्यक्त झालाय तुमच्या शब्दातून! प्रेमात नव्यानेच पडलेल्या युवतीच्या भावना एकदम सुरेख. खूप आवडले 😍😍. "
" 🙏🙏❤️"
.
अरे हे काय? गडबडीत तिने त्याला हार्ट पाठवले. तिने पटकन मेसेज डिलीट केला.
" आता काही उपयोग नाही डिलीट करून. मी आधीच पहिला आहे तू मला पाठवलेला हार्ट! फक्त हे सांग की, ते खरं आहे की खोटं?"
अशा प्रकारे पहिल्यांदाच तिला कुणीतरी विचारत होतं....तिच्या आयुष्यात आलेला प्रेम व्यक्त करण्याचा हा पहिलाच प्रसंग! जणू आयुष्यात खरंच इंद्रधनू फुलले. तिचा निर्णय झाला होता. तिने परत त्याला तेच हार्ट पाठवले.
" ❤️😍"
उत्तरंही लगेच आले.
"❤️😍"
तिने दुसर्याच दिवशी आपला होकार आईबाबांना सांगितला. लग्नाची तयारी सुरू झाली.
कधीकधी काही व्यक्ति अनपेक्षितरित्या आपल्या आयुष्यात येतात....व्यक्तिमत्त्वात काहीही साम्य नसताना एकमेकांना हृदय देऊन बसतात.... दुनियेचे प्रस्थापित नियम त्यांना लागू होत नाहीत. कोणत्याच नियमात बसत नसताही ते एकमेकांचे होऊन जातात. असंच झालं वैदेही आणि रामचं. निराशेच्या अंधारातून आशेच्या उज्ज्वल प्रकाशाकडे त्यांनी मार्गक्रमण सुरू केले . आणि दोघांच्याही आयुष्यात प्रेमाचे इंद्रधनू फुलले.

