नासा येवतीकर

Thriller

2.5  

नासा येवतीकर

Thriller

जादूची पिशवी

जादूची पिशवी

4 mins
2.9K


मनात आत्महत्येचा विचार करत करत विजय डोंगरावर चढत होता. उंचच्याउंच डोंगरावर चढून तेथून खाली उडी मारण्याचा त्याच्या मनात विचार चालू होते. अर्धे डोंगर चढून झाले होते. तसे ते डोंगर खूपच उंच होते, एका दमात कोणी सहजासहजी तिथे चढूच शकत नव्हते. विजय थकून गेला होता. थोडा वेळ एका छोट्या झाडाखाली थांबला आणि पुन्हा चढायला सुरुवात केली. चढताना तो घामाघूम झाला होता. काही वेळानंतर तो डोंगराच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचला. तिथून खाली पाहिले तर माणसं, गाड्या अगदी लहान दिसत होते. आत्महत्या करण्याचा त्याचा विचार पक्का झाला होता. लोकांच्या रोजच्या बोलण्याने तो पुरता कंटाळला होता. घरचे व्यक्ती देखील त्याला समजून घ्यायला तयार नव्हते. त्याची पंचविशी उलटली होती आणि हातात काहीच काम नव्हते, कोठे नोकरी लागली नव्हती, पदवी पर्यंत शिक्षण झाल्यामुळे शेतात काम करायला जावेसे वाटत नव्हते, तेथील काम करण्यास त्याला लाज वाटत होती. त्याला त्याच्या दर्जानुसार नोकरी पाहिजे होती मात्र ते काही त्याला मिळत नव्हते. तो शिक्षणात हुशार होता मात्र त्याला शिक्षणाच्या आधारावर देखील नोकरी मिळत नव्हती. घरातील सर्वच जण त्याला काम करण्याबाबत रोजच बोलायचे. खायचं आणि हिंडायचं एवढंच काम कर असे त्याचे बाबा त्याला म्हणायचे. विजयच्या मनात काम करण्याची खूप हौस होती मात्र त्याच्या मनासारखे काम न मिळाल्यामुळे तो गावात रिकामटेकडा नुसता फिरत राहायचा. या सर्व बाबीचा त्याला ही कंटाळा आला होता म्हणून आज आपलं जीवन संपविण्याचा तो विचार केला. त्याचे मन आत्महत्या करण्यास तयार झाले. तो त्या उंच डोंगरावरून उडी मारणार इतक्यात त्याला एक आवाज ऐकू आला, " विजय, हे काय करतोस ?"

त्या आवाजाच्या दिशेने तोंड करून विजय म्हणाला, " आत्महत्या, मी कंटाळलो या जीवनाला, म्हणून संपवित आहे स्वतः ला"

" पण तुला स्वतः ला संपविण्याचा अधिकार तरी आहे का ?"

" का नाही, माझा जीव आहे, मी संपवितो, कोण रोखतय मला"

" जीव जरी आपला असला तरी त्याला संपविण्याचा अधिकार आपला नाही, ज्याने जन्म दिला तोच मृत्यू देखील देईल "

" नाही, मला आता जीवन जगावेसे वाटत नाही, मी मरणार म्हणजे मरणार "

" थोडा वेळ थांब, मी काय सांगतो ते ऐक ....."

असे म्हणत एक सुंदर परी त्याच्या समोर प्रकट झाली. विजयला स्वप्नात असल्याचा भास झाला म्हणून स्वतः ला एक चिमटी देऊन पाहिला तर त्याला जाणवले की तो जागा आहे. परीने विजयकडे एक कटाक्ष टाकून म्हणाली, " ही घे छोटी पिशवी, तुझ्या मनात जी इच्छा असेल ती ईच्छा या पिशवीत हात घातल्या बरोबर पूर्ण होईल. पण कोणाच्या समोर या पिशवीचा वापर करता येणार नाही". परिकडील पिशवी घेतली आणि खरे आहे का हे तपासून पहावं म्हणून मनात एक इच्छा ठेवली आणि पिशवीत हात घातला तर त्याला तीच वस्तू मिळाली. तो खूप आनंदी झाला. या जादूच्या पिशवीने तुझे जीवन सुखी होईल तेंव्हा आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नको. विजयने आत्महत्या करण्याचा विचार मोडीत काढला आणि लगबगीने डोंगर उतरून घरी जाऊ लागला. 

सायंकाळ होत आली होती. घरी पोहोचला, हात पाय धुतले आणि ती जादूची पिशवी खिशात ठेवून झोपी गेला. त्या जादूच्या पिशवी विषयी अनेक विचार आल्यामुळे त्याला रात्रभर झोप लागली नाही. याचा काही तरी चांगला उपयोग करण्याचा विचार मनात आणून पहाटे पहाटे तो झोपी गेला. सकाळ झाली. तसा तो जादूची पिशवी घेतली आणि आपल्या शेताकडे एकटाच निघाला. शेतात पोहोचल्यावर जादूची पिशवी काढली आणि मनात इच्छा व्यक्त केली की, संपूर्ण शेत नागरण्याची. काही क्षणात त्याचे पूर्ण शेत नांगरून तयार झाले. त्याच्या वडिलांना हे पाहून खूप आश्चर्य वाटले. याच जादूच्या पिशवीचा वापर करून विजयने शेतीची सर्वच कामे पूर्ण करून घेतली. त्यावर्षी त्याला एवढा फायदा झाला की, त्याच्या घरचे संपूर्ण दारिद्र्य निघून गेले. गावात सर्वत्र विजयच्या कामाची चर्चा होऊ लागली. हे कसे शक्य आहे ? असे प्रश्नार्थक चेहऱ्याने जो तो विजयला विचारत असे. मात्र विजय काही ही न बोलता थातूर माथूर बोलून टाळत असे. असेच काही वर्षे गेली आता विजय खूप श्रीमंत व्यक्ती झाला होता. त्याची शेती ही चांगल्यापैकी साथ देत होती. हळू हळू त्याला शेतातल्या कामाचे आणि उत्पन्नाचे महत्व कळू लागले. त्यामुळे जादूच्या पिशवीचे वापर न करता गावातील तरुणांना शेतीचे महत्व पटवून सांगू लागला. अडीअडचणीच्या वेळी तो सर्वाना मदत करू लागला. यामुळे गावातील सर्वच लोकं त्याला मान देऊ लागले. परीने दिलेली जादूची पिशवी आज ही त्याच्याजवळ आहे. त्या जादूच्या पिशवीत दुसरे तिसरे काही नव्हते तर श्रम करण्याची ताकद आणि स्वतःमधला आत्मविश्वास होता. जे की विजय विसरला होता, ते या जादूच्या पिशवीने त्याला परत मिळवून दिले. आज ही विजय जेंव्हा उदास होतो त्यावेळी त्या जादूच्या पिशवीत हात टाकतो आणि आपली इच्छा पूर्ण करवून घेतो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller