Charumati Ramdas

Drama

3  

Charumati Ramdas

Drama

इण्डियन फ़िल्म्स 3.3

इण्डियन फ़िल्म्स 3.3

5 mins
663


लेखक: सिर्गेइ पिरिल्यायेव

भाषांतर : आ. चारुमति रामदास


आणि आमच्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर कुत्र्यांवाली अक्साना राहते. कुत्र्यांवाली- अशासाठी, की असं कधीही नाही झालं की, सकाळ असो वा संध्याकाळ, उन्हाळा असो किंवा हिवाळा, मी घरांतून निघालो आणि कुत्र्याबरोबर हिंडत असलेली अक्साना मला भेटली नाही. आणि दरवेळेस ती वेगवेगळ्या कुत्र्यांबरोबर हिंडते. तिची सगळी कुत्री लहान-लहान आहेत, घराच्या आतच राहणारी आहेत, पण खूप रागीट आहेत आणि सदा भुंकतच असतात. ती कुत्रे का बदलते? अशासाठी, की अक्सानाजवळ एकच कुत्रा जास्त दिवस नाही टिकत. सुरुवातीला, जवळ-जवळ दोन वर्षांपूर्वी, तिच्याकडे विकी होता, लाल केस असलेला. त्याने भुंकून-भुंकून सम्पूर्ण बिल्डिंगला वेड लावलं आणि मरून गेला.


“आजारी होता,” अक्सानाने सांगितलं.


मग आला एक काळा कुत्रा, विकी सारखाच, पण याचं नाव होतं जस्सी. अक्सानाच्या हातातून सुटून बिल्डिंगच्या मागे पळाला, आमची बिल्डिंग रस्त्याच्या बाजूलाच आहे, आणि कारच्या खाली आला. आता अक्सानाकडे आहे ब्येली. पांढरा आहे, काळे चट्टे असलेला, हा सुद्धा असा भुंकतो जसं त्याला कुणी मारलं आहे. 


हिवाळ्यात अक्साना आपल्या कुत्र्यांना विशेष प्रकारचे कोट घालते, ज्याने त्यांना थंडी नाही वाजणार. पण कुत्र्यांशिवाय अक्साना यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे, की तिला आमच्या बिल्डिंगच्या प्रत्येक माणसाबद्दल सगळं माहितीये.


“नवव्या मजल्यावरच्या दीनाला मुलगी झालीय.”

“फेद्या पलेतायेव मेला.”

“वेरा तरासोवावर कोर्ट केस होणारेय.”


मला बरेचदा कळतच नाही, की ती कुणाबद्दल बोलतेय, पण काहीतरी प्रतिक्रियातर द्यावीच लागते न. काही तरी सांगून टाकतो, नेहमीच नाही, कदाचित, अधून मधून.


पण अक्सानाशी वार्तालाप याच मुद्द्यावर येऊन थांबतो की माझं लग्न झालंय किंवा नाही, आणि मी केव्हा लग्न करणारेय. सुरुवातीला हा प्रश्न अक्सानाची मम्मी ताइस्या ग्रिगोरेव्ना बरेचदा विचारायची, पण मग ताइस्या ग्रिगोरेव्नाचे पाय दुखू लागले, आणि तिने घराबाहेर पडणं बंदच केलंय. म्हणून तिची जागा आता अक्सानाने घेतलीय. 


स्टोअरमधे जातो, काही सामान विकत घेतो आणि परत येतो. आन्या आण्टी फोन करते.


“सिर्योझ, चहा प्यायला ये! चीज़-पैनकेक केलंय!”


आनंदाने जात, कारण मी इथे काहीही म्हटलं तरी, आन्या आण्टीशी मी खूपच चांगलं वागतो.

आन्या आण्टीला आपल्या चारीकडच्या जगात खूपच इंटरेस्ट आहे, जे टी.वी.स्क्रीनवर सगळ्यात चांगल्या प्रकारे दाखवले जाते, आणि साप्ताहिक पेपर “आर्ग्युमेंट्स एण्ड फॅक्ट्सच्या” पानांवरसुद्धा.


मी चहा पितो, तेव्हा आन्या आण्टीचे चारही टी.वी. चालू असतात, प्रत्येक खोलीत एक-एक आणि किचनमधे पण. त्यांच्यावर वेगवेगळे चॅनल्स दाखवण्यात येत आहेत, आवाज खूप मोठा आहे कारण शेपिलोवाला कमी ऐकू येतं. पण स्वत: आन्या आण्टी यावेळेस अरुंद कॉरीडोरमधे कुणाशी तरी फोनवर बोलतेय:


“हो, वालेच्का, फक्त कडक गादीवरच झोपलं पाहिजे! काय?!”

“उच्कुदू-ऊक, तीन विहिरी!” किचनचा टी.वी. गातोय.

“शिवाय, वर्षाच्या सुरूवातीपासून रूसमधे निर्वासितांचं येणं कमी नाही होणार, या गोष्टीकडेसुद्धा, निःसंदेह, लक्ष द्यायची गरज आहे,” हॉलमधला टी.वी. सूचना देतोय.

“हो, हो!” आन्या ओरडते. “आणि उशी न घेता!”

“इसाउल, इसाउल, घोडा का सोडला!” कॉरीडोरलगतच्या लहान्या खोलीतला टी.वी. आपल्या मोट्ठ्या आवाजात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे.

“वालेच्का, काय?! नाही, गरज नाहीये! आणि जास्त हिंडलं पाहिजे! गति म्हणजे - जीवन आहे! वालेच्का तुझा आवाज़ बिल्कुल ऐकूं येत नाहीये!”


मग, जेव्हा गोष्टी संपलेल्या असतात, चहा पिऊन झालेला असतो, तेव्हा कळतं, की मला चिकन-बटाटा नक्कीच खावा लागेल (माझ्या अनुभवावरून सांगतो की जोपर्यंत आन्याने दिलेला प्रत्येक पदार्थ खात नाही, तोपर्यन्त तिच्या घरातून बाहेर पडूच शकत नाही). मी खातो, आणि शेपिलोवा हॉलमधे ठेवलेल्या गोल टेबलाशी बसते, हातात रंगबिरंगे पेन घेऊन साप्ताहिक पेपर “आर्ग्युमेन्ट्स एण्ड फॅक्ट्स”वर मान वाकवते.


आन्या फक्त हाच पेपर वाचते, जणू दुसरं काही वाचणं तिच्या सिद्धांतात बसतच नाही. मी तिला आमच्या प्रसिद्ध व्यक्तींची जीवन चरित्रे, प्रकृतितील मनोरंजक तथ्यांबद्दल, वैज्ञानिक आविष्कारांबद्दल वेगवेगळ्या प्रकाराची पुस्तकं भेट दिली, पण माझ्या लक्षात आलं, की किचनच्या बेसिनजवळ त्यांचा ढीग पडला आहे, कदाचित फेकून देण्यासाठी, किंवा असंच काहीतरी करण्यासाठी. “आर्ग्युमेन्ट्स एण्ड फॅक्ट्स” कुठली-कुठली, पण आन्याला हवी असलेली जीवनोपयोगी माहिती पुरवायचा.


विसोत्स्कीबद्दल लेख, जो त्याच्याबद्दलची फिल्म “विसोत्स्की. थॅंक्यू फॉर बीइंग अलाइव” रिलीज़ झाल्यावर न वाचणं अशक्य होतं. एक छोटासा पॅरेग्राफ़ की मित्रांच्या, चाहत्यांच्या गराड्यात सतत असूनसुद्धा तो आतून अगदी एकटा होता, लाल रंगाच्या तिहेरी रेषांनी रेखांकित केलेला आहे. ‘मणक्याच्या हाडाला आधार देण्यासाठी कडक गादीवर, आणि शक्य तोवर, उशी न घेता झोपायला पाहिजे’, या माहितीवर संपूर्ण हिरवा रंग फिरवलेला होता. गाल्किनच्या फोटोच्या चारीकडे, माहीत नाही का, काळं वर्तुळ बनवलेलं होतं. जर याला रचनात्मक कार्य म्हणायचं टाळलं तर, थोडक्यात म्हणजे खरोखरचं संपादन चालू होतं! नंतर हे सगळे भाग कापले जातात आणि सर्वांत छोट्या खोलीत एका लहानशा टेबलवर गड्डी करून ठेवले जातात.                  


पेपरमधली महत्वपूर्ण माहिती वेगवेगळ्या रंगांनी रेखाटून झाल्यावर आन्या आण्टी थकून जाते, आणि हट्ट करते, की मी उद्या तिच्याबरोबर थियेटरला जावं. थियेटर मला फारसं आवडत नाही, काही तरी सबब सांगून मी नाही म्हणून टाकतो, पण आन्या आण्टीच्या या प्रस्तावाबद्दल आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते.


माझ्या आवडत्या, अतिथिप्रिय या शेजारणीला थियेटर्स आणि कॉन्सर्ट्सला जायला फार आवडतं. तिथे, जेव्हा ‘शो’ चालू असतो, तेव्हा ती नक्की झोपून जाते, कारण आपल्या वादळी हालचालींनी ती आधीच थकलेली असते, वरून झोप न येण्याची कम्प्लेन्ट सुद्धा आहे. पण याने ‘शो’बद्दल सांगायला तिला काहीच अडचण येत नाही, ती मजेत सांगते, की ‘शो’ कित्ती छान होता, आणि तिला सगळंच कसं आवडलं, म्युझिक, ड्रेसेज़... आन्या आण्टीला तिने बघितलेला प्रत्येक‘शो’ आवडतो. फक्त एकदा, जेव्हा तिला ‘बल्शोय’ थियेटरमधे होत असलेला ‘कार्मेन’ तिला आवडला नव्हता. तिला या गोष्टीचा फार राग आला, की जुन्या ढंगाच्या ड्रेसेस ऐवजी कलाकारांनी काही दृश्यांमधे स्विमिंग सूट्स घातले होते. असं वाटतं, की ‘बल्शोय’मधे काही कारणास्तव ती झोपू नव्हती शकली...


आन्या आण्टीच्या घरून निघतो. पोट गच्च भरलं आहे, डोक्यात विचार पण भरले आहेत, आणि खिडकी जवळच्या गार्बेज-पाइपच्या जवळून यारोस्लाव माझं अभिवादन करत जोराने म्हणतो “ग्रेट!” तिथे बरेच लोक जमा होते.

“नमस्कार,” मी उत्तर देतो.

मला आश्चर्य वाटतं, की खालून कुत्रेवाली अक्साना आपला नेहमीचा प्रश्न ओठांवर चिटकवून, की मी लग्न केव्हा करणारेय, दिसत नाहीये...


काही दिवसांपूर्वी मला बरेच दिवसांसाठी बाहेर जावं लागलं होतं. परत आल्यावर माझ्या मनात विचार आला, की ओरडणारे टी.वी., संध्याकाळच्या उत्तेजित टेलिफोनचं “तर!” म्हणणं, यारोस्लाव आणि अक्सानाच्या कुत्र्यांविना मी ‘बोर’ झालो होतो. मला कळून चुकलं की हे सगळे लोक माझ्या कल्पनेपेक्षाही मला जास्त प्रिय आहेत, आणि मी त्यांच्याबद्दल लिहायचं ठरवलं.

स्टेशनवरून घरी आल्यावर, जोपर्यंत आन्याने घण्टी वाजवून हे नाही सांगितलं की उद्या मश्रूम्सचं लोणचं घ्यायला बाजारात जायचं आहे, मला चुकल्या-चुकल्यासारखं वाटत होतं. कचरा ठेवायला बाहेर निघालो, आणि यारोस्लावने प्रॉमिस केलं की उद्याच तो आणि च्योर्नी मिळून तुटलेली काच बसवून देतील, जी आत्ताच च्योर्नीच्या डोक्याचा मार लागून फुटलीय, या फुटलेल्या काचेतून मी अक्सानाला बघितलं, जी आपल्या ब्येलीला बोलवत होती, आणि ल्येना विदूलोवालापण बघितलं, ती स्टोअरमधून सामानाने भरलेली हिरवी बॅग आणत होती.


“सगळं ठीक आहे,” मी आपल्या अंतरात्म्याचा आवाज़ ऐकला, तू घरी पोहोचलाय”. 


आणि एप्रिल-मेमधे, जेव्हा ऊन वाढू लागेल, अक्साना आणि ल्येना संध्याकाळी आमच्या बिल्डिंगच्या जवळ छोट्याशा बेंचवर बसतील आणि, मला बघताच गिटार आणून वाजवायचा हट्ट धरतील. मी वाजवेन, आणि तेव्हा अक्साना विचारमग्न होऊन म्हणेल:


“काय गातो! – आणि अजूनपर्यंत लग्न नाहीं झालं!”

माझ्या मनात विचार आला, की असला विचार करणं, खरोखरंच अन्याय आहे, पण मे महिन्याचं वारं, या विचाराला हिरव्या-हिरव्या कम्पाउण्डमधे खोलवर घेऊन जातंय, आणि तो तिथेच कुठेतरी हरवतोय, पुन्हा कधीच परत न येण्यासाठी, जणू काही तो मनात कधी आलाच नव्हता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama