इण्डियन फ़िल्म्स 2.12
इण्डियन फ़िल्म्स 2.12


लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
उपसंहार
...मी आणि तोन्या आजी संध्याकाळी उशीरा, जवळ-जवळ रात्रीच, समर कॉटेजमधून परत येत आहोत. जूनचा महिना आहे. अंधार होऊ लागला आहे, जरी या काळात सर्वांत मोठे दिवस असले तरी. दुर्गंध सोडणारी नदी पार करून टेकडीवरून खाली उतरतो आणि बघतो काय, की आम्हाला भेटायला आजोबा येत आहेत, ते घरी नाही थांबू शकले, कारण की त्यांना काळजी वाटत होती:
न्यूज़ प्रोग्राम ‘व्रेम्या’मधे घोषणा केली होती, की सर्वांत भयंकर वादळ येणार आहे. आजोबा कितीदातरी म्हणाले, की आम्हाला वेड लागलं आहे, नाहीतर अकरा वाजेपर्यंत बगिचात नसतो बसलो आणि आजी त्यांना उत्तर देणारच होती, की तेवढ्यात ते वादळ आलंच. विजांचा कडकडाट, घोंघावणारे वारे, सगळ्या वस्तु थरथरत होत्या आणि मला भीती वाटत होती आणि आनंदही होत होता आणि एका सेकंदातच आमच्या अंगावरचे सगळे कपडे चिंब झालेले होते.
मिलिट्री एरियाच्या अरुंद पायवाटांवरून आम्ही एका झुण्डांत धावतो; तोन्या आजी आणि आजोबा खो खो हसताहेत, हे बघून की मी कसा आपले सॅण्डल्स आणि मोजे काढून पाण्याच्या डबक्यात छपछप करतोय. मला पण त्यांना हसवणं आवडतं:
मी डान्स करू लागतो आणि जोरजोरांत “डिस्को डान्सर”मधलं माझं आवडतं गाणं म्हणूं लागतो:
“गोरों की ना कालों की-ई-ई! दुनिया है दिलवालों की. ना सोना-आ! ना चांदी-ई! गीतोंसे-ए, हम को प्या-आ-आ-र!!!”
(गाण्याचा अर्थ असा आहे – खायला प्यायला आमच्याकडे पुरेसे पैसे नसू देत, पण स्वातंत्र्य आणि गाणं – हीच माझी दौलत आहे).
जेव्हा आम्ही आपल्या कम्पाऊण्डमधे पोहोचतो, तरीही मी गातच असतो, पण इतक्या जोरदार आवाजात की शेजारी-पाजारी खिडक्यांमधून पाहूं लागतात; पण मला काही फरक पडंत नाही – उलट आणखी जास्त गाण्याची आणि डान्स करण्याची इच्छा होऊ लागते.
घरी गेल्यावर आम्ही यूडीकलोनने आंघोळ करू, म्हणजे नंतर आजारी नाही पडणार, मग आम्ही पॅनकेक्स खाऊ, पणजीआजी नताशाने सकाळीच पॅनकेक्स बनवण्याचं प्रॉमिस केलं होतं आणि उद्या आहे सण्डे, व्लादिक येईल आणि आम्ही अभ्यासाव्यतिरिक्त आणखी एखाद्या आयडियाबद्दल विचार करू, जसं बुटक्यांचा बिज़नेस करणं किंवा एखादी कादंबरी लिहिणं...
काही महिन्यांनी मी नेहमीसाठी स्मोलेन्स्क सोडून निघून जाई, जिथे हे सगळं, तुम्हांला सांगितलेलं, झालं होतं. एका नवीन जीवनाचा आरंभ होईल, नवीन हीरोज़सोबत, नवीन ॲडवेन्चर्स बरोबर, ज्यांच्याबद्दल मी इथे काहीच सांगणार नाही, कारण त्याच्यासाठी वेगळ्या पुस्तकाची गरज आहे. कदाचित्, ते जास्त गंभीर, जास्त दु:खी असेल... आणि हे पुस्तक, जर तुम्हाला हसवणारं, आनंद देणारं जमलं असेल, तर याला इथेच संपवणं जास्त चांगलं आहे. मला विश्वास आहे, की पुन्हा असा काळ येईल जेव्हा आम्ही आनंदाने बागडत सिनेमा थियेटर्समधे जाऊ आणि इण्डियन फिल्म्स बघू. तेव्हा मी नवीन ॲक्टर्सवर पण तेवढंच प्रेम करू शकेन, जसं मी मिथुन चक्रवर्तीवर आणि अमिताभ बच्चनवर केलंय आणि पुन्हा पावसात अनवाणी पायाने डान्स करताना इण्डियन गाणी म्हणेन, शेजारी आपाआपल्या खिडक्यांमधून आश्चर्याने बघताहेत, बघू देत आणि आश्चर्य करू देत – अगदी तसंच, जसं कित्येक वर्षांपूर्वी झालं होतं...