Rupali Tapkire

Classics

3  

Rupali Tapkire

Classics

हुर हूर संध्येची

हुर हूर संध्येची

2 mins
190


   सांज उतरली निळ्या सागरी

   केशर ल्याली सृष्टी सारी

   रविराजासी निरोप द्याया

   अधीर झाली निशा बावरी

   सांज! म्हणजेच कातरवेळ. दिवस आणि रात्र यांना जोडणारी वेळ. रविराज आपल्या तेजाचा पसारा आवरत निघाला आहे घराकडे. संध्येला निरोप देण्याची वेळ. तिच्या कपोलांवर रविराजाच्या प्रीतीची लाली पसरली, त्याची आभा पश्चिमेवर उमटली. पश्चिमा केशरिया लेऊन निश्चलपणे संध्येच्या मनाची वाढती हुरहूर अनुभवते. चराचरात संधिप्रकाश दाटून आला आहे. अशा कातरवेळी काळ पण थबकतो क्षणभर. भराभर पुढे सरकत नाही. उदासलेपण भरून आहे सारा आसमंत. त्याचे प्रतिबिंब धरेवर पडले. कणाकणास हुरहूर लागून राहिली आहे. 

   विहंग पिलाच्या काळजीने घरट्याकडे निघाली तेव्हा त्यांचा चिवचिवाट गूढ भासत होता. धुराळ्याच्या धुक्याचे ढग गोळा झालेले पाहून गोठ्यातला वासरांचा हंबर व्याकुळतेने साद घालत आहे असे जाणवत होते. गवाक्षात उभ्या असलेल्या ललना साजणाची वाटुली पहात अधिकच अधीर झाल्या होत्या. त्या अधीरतेला बांध घालता यावा म्हणून की काय सांजवेळ ही दिवेलागण वेळ असावी. देव्हाऱ्यात देवाजवळ दिवा लावून घरातला अंधाराला बाहेर पिटाळून लावायचे. दिवा लावला की ज्योतीच्या प्रकाशात मनाची हुरहूर कमी होते. बाहेर जरी अंधार असला तरी मनात, हृदयात, घरात लख्ख उजेड असल्यामुळे भीती थोडीफार तरी कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आपसूकच परमेश्वराची प्रार्थना करावीशी वाटते. दिव्याची तेजारती शुभं करोति कल्याणं ओठावर येऊ लागतं, घराघरांतून स्वर येऊ लागतात, नाद उमटतो, ताल धरल्या जातो. हात आपोआप जोडले जाऊन नतमस्तक होतो आपण त्या जगन्नाथा समोर. हिच शक्ती मनाची घालमेल घालवते, हुरहूर शांतवते, अन् संध्या पण खुदकन हसते. निशा चंद्र चांदणे घेऊन वेशीवर थांबलेली आहे, संध्या मावळते पण निशा सोबतीस आहे



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics