हरवलेलं बालपण
हरवलेलं बालपण
नुकतीच शालांत परीक्षा संपली होती. खूप मोकळं मोकळं वाटतं होत.
शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या. पाच-सहा दिवस खूप मस्त वाटलं, मस्त एन्जॉय केलं. खाण-पिणं, खेळणं, झोपणं...
No अभ्यास, no होमवर्क.
सकाळी लवकर उठायचं नाही, रात्री छानपैकी टीव्ही बघणं....पण....काही दिवस बरं वाटलं.... आणि वेध लागलें ते मामाच्या गावाला जायचे.
पण जाणार कसं?
मामाच गावं खूप दूर...तो घ्यायला येऊ शकणार नव्हता, शेतीची काम सुरू झाली होती.
बाबांना सुट्टी लागायची होती.
मग??मी ठरवलं मी एकटीच जाणार....अमरावतीला.घरून आईचा खूप कडाडून विरोध झाला. बाबा मात्र तयार झाले. कारण त्यांना कळलं होतं,पुढल्या वर्षापासुन मला एकटीलाच हे करावं लागणार, कारण आमच्या गावात फक्त दहावी पर्यंत शाळा....पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जावच लागणार...म्हणून आत्तापासून सवय केलेली बरी. स्वतःच काम स्वतः करणं ही बाबांनी लावलेली चांगली सवय.
बाबांचा होकार आला, आणि मी लागले अमरावतीला जायच्या तयारीला. बाबांनी रेल्वे स्टेशन ला सोडलं, आणि निघून गेले. मी स्वतः तिकीट काढलं...आणि वाट बघत बसले, ट्रेन ची...
एवढयात अनाऊन्समेंट झाली, आणि लगेच गाडी आली, मी गाडीत चढले...छान खिडकीजवळची जागा मिळाली. स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतली मी. गाडीने शिटी दिली आणि मी खिडकीतून निसर्गसौंदर्य निरखु लागले. एवढ्यात "चिक्की लो चिक्की, आवला सुपारी" म्हणत फेरीवाला आला...पर्समधून ऐटीत दहा रुपये काढून चिक्की घेतली. त्यानंतर बरेच समोसावाला , वडा, आलूबोडा...खूप काही विकायला आलं...मी मनसोक्त घेतलं, रागावणार कुणी नव्हतंच ना. समोरच्या बिर्थवरील काका-काकू माझ्याकडे कौतुकाने पाहत होते.... खूप भारी वाटलं, उगाच मूठभर मास वाढल्यासा
रखं वाटलं.
एवढ्यात तिकीट चेकर आला...सगळ्यांची तिकीट पहात होता...मी मस्त बिनधास्त बसले होते...तिकीट काढले होते मी.
माझ्याजवळ येऊन टीसीवाल्याने मला तिकीट मागितलं.. मी पर्समधून तिकीट काढून त्यांच्या हातात दिल.
टीसी- मॅडम, हे general चं तिकीट आहे....,
मी-मग???काय झालं.
टीसी- आपण रिसर्वेशन च्या डब्यात बसल्या आहात .
100 रु दंड भरा, नाहीतर पुढल्या स्टॉप वर ऊतरुन general डब्यात जाऊन बसा.
आता मात्र मी खूप घाबरले.
मे महिना कमालीचा उकाडा, पण हात-पाय थंड पडले, दरदरून घामही आलं....काय होतंय मला काही कळेना... आजूबाजूचे लोकही आशाळभूत नजरेने माझ्याकडे बघत होते....
बाबांची आठवण झाली, बाबांना सार सांगावं तर माझ्याकडे फोनही नव्हता .त्यावेळेस घरी landline असायचा. एखाद्या जवळच मोबाईल असायचा...
माझं नशीब बलवत्तर म्हणून समोर बसलेल्या काकांकडे मोबाइल होता. त्यांनी मला घरचा नंबर वीचारला, आणि फोन लावून दिला...मी बाबांशी बोलले.बाबांनी समजावून सांगितलं, दंड भरून टाक, आणि पावती घे...घाबरू नको...
काही हरकत नाही, चुकीने मनुष्य सुधारतो. होतात अश्या चुका, तू तर अजून लहान आहेस, मोठी माणसं पण अश्या चुका करतात.
मी आश्वस्त झाले, मोठ्या दिमाखाने,ऐटीत
पर्समधून 100 रुपये काढून टीसी ला दिले. पावती घेतली,आणि परत खिडकीतून निसर्गाचा आस्वाद घेत , आईने दिलेले शंकरपाळे, चिवडयाचा आस्वाद घेत होते.
संध्याकाळचे चार वाजले.... आणि मी बडनेराला पोहोचले... मामा आलाच होता घ्यायला......
तर असा हा माझा रेल्वेचा पहिला प्रवास....general चं तिकीट काढून रिजर्वेशन मध्ये बसले होते मी....आठवण आली की अजूनही हसायला येत.