Lata Rathi

Drama Inspirational

3  

Lata Rathi

Drama Inspirational

अनमोल भेट

अनमोल भेट

10 mins
368


संसार म्हटला की आठवतात ते, पती-पत्नी. त्या दोघांपैकी एकाने हातावर पेललेला संसार. 

पण...

कधी कधी असंसुद्धा होऊ शकतं... म्हटल्यापेक्षा होतंच... जसं एखाद्या कुटुंबातील कमावते आई, बाबा दुर्दैवाने निवर्तले किंवा आजारपणामुळे ते काम नाही करू शकत, अशावेळी घरातला ज्येष्ठ मुलगा किंवा मुलगी यांच्यावर ती जबाबदारी येते आणि त्यांनासुद्धा पेलावा लागतो "संसार..."

माझ्या कथेची नायिका "कुंदा" अशीच एक मुलगी आहे, जिने स्वतः लग्न न करता आपल्या लहान भावाचं पूर्वेशचं शिक्षण, लग्न, अंथरुणाला खिळलेल्या बाबांचं आजारपण सारं एकटीनं सांभाळलं....

   

पहिल्यांदा तिला बघितलं ते चाळीतल्या घरात. ती (कुंदा), तिची आई रजनी, बाबा रमेश, आणि लहान भाऊ पुर्वेश असं हे छोटसं कुटुंब. कुंदा नावाप्रमाणेच गोड, लाघवी, सावळीशी पण खूप खूप हुशार आणि लाघवी पोर. 


आई रजनी एका छोट्याशा लघुउद्योग केंद्रात जिथे मेणबत्त्या, अगरबत्या आणि अजून काही घरगुती वस्तू बनविल्या जायच्या तिथे जायची. तर बाबा मजुरी करायचे कधी रेल्वे स्टेशन, कधी बस स्टँड, तर कधी ट्रान्सपोर्टमध्ये पोती उचलायची कामंसुद्धा करायचे. कुठला छंद, व्यसन म्हटलं तर ते नव्हतंच. खाऊन-पिऊन खूप सुखी असं हे कुटुंब.


दोघेही बहीण-भाऊ जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचे. कधी कधी आईला यायला उशीर झाला तर छोटीशी कुंदा घरातली सर्व कामं उरकून घ्यायची आणि अभ्यासाला बसायची. बाबा घरी दमून आले की कुंदा नि पुर्वेश बाबांच्या पाठीला, हातापायाला तेल चोळून द्यायचे. हे बघून आई-बाबाच्या डोळ्यात पाणी यायचं. तेव्हा लहानगी कुंदा त्यांना समजवायची, "मी एकदा नोकरीला लागले ना, की बघा दोघांचे पण काम बंद करविते की नाही. बघा पाठीला किती फोड आलेत... नका हो बाबा इतकं काम करू, आणि हो रडायचं तर बिलकुल नाही," असं म्हणून दोघही त्यांच्या गळ्यात पडायचे.


रमेश - "पोरांनो, मी रडत नाहीये रे, पण हेवा वाटतोय मला माझा, स्वतःचा देवानं इतकी छान मुलं आमच्या पदरात टाकली. पण दुःख याचं वाटतं, मी तुमच्या इच्छा पूर्ण नाही करू शकत."


कुंदा, पुर्वेश - "बाबा आम्हाला काही नकोय, खूप खुश आहोत आम्ही." 


पण विधात्याच्या मनात मात्र दुसरंच काही चाललं होतं. निसर्गाचं कालचक्र - सुख-दुःख, ऊन-सावली यांचा अविरत चालणारा खेळ, कोण सुटलंय त्याच्या तावडीतून.

   

याचवर्षी कुंदाने दहावीची परीक्षा दिली, पुर्वेश पाचवीला होता, अचानकपणे रजनीची तब्येत खालावली, जेवण जाईना, त्यामुळे अशक्तपणा वाढला, तिचं कामाला जाणं बंद झालं. डॉक्टरांनी अन्ननलिकेचा कॅन्सर सांगितला. घरच्यांचे सर्वतोपरी शर्थीने प्रयत्न चालूच होते, दोन वर्ष कशीतरी निघाली... आता तर डॉक्टरांनीसुद्धा हात जोडले. औषधं बंद करून तिला घरी आणलं. तिची शेवटची इच्छा तिने रमेशजवळ बोलून दाखविली, "अहो, मला ना आपल्या कुंदाचं लग्न पहायचंय..." पण रमेशने स्पष्ट नकार दिला, अगं किती लहान आहे आपलं लेकरू, आतापासून तिला संसाराच्या रहाटगाडग्यात नाही फसवायचं. गुदमरून जाईल बिचारी.


रमेशने तिचा हात हातात घेतला, "हे बघ रजनी, मला माहिती आहे, तुला खूप काळजी वाटतेय तिची, पण आपली कुंदा खूप हुशार आहे गं, शिकू देऊया तिला... तू काळजी नको करुस, मी आहे ना... विश्वास ठेव माझ्यावर, मी घेईन तिची काळजी..." मनावर दगड ठेवून रमेश म्हणाला तर खरं... पण???


रजनीच्या डोळ्यात पाणी आलं, "चुकले मी , माझ्या स्वार्थासाठी मी पोरीचं लग्न करावं म्हणत होते... काळजी घ्या पोरांची..." म्हणतच तिने डोळे मिटले. 


आता घरात फक्त तिघेच. कुंदाने सर्व सांभाळून घेतलं. आता तिला अभ्यासाला हवा तसा वेळ मिळत नव्हता. छोटा पुर्वेश आता आठवीला गेला, तिचं पूर्ण लक्ष आता छोट्या भावाकडे, आणि बाबांकडे होतं, पूर्वेशच्या अभ्यासाची पूर्ण जबाबदारी आता तिने स्वीकारली.


रमेश मजुरीवर जायचा, पण आतून खूप खचून गेला होता, पाहून त्याला रजनीची आठवण यायची, समोर तरणीताठी पोर कुंदा दिसायची, आपण रजनीचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं, लग्न झालं असतं तर पोर घरी सुखी तरी राहिली असती. कुंदाने आता नर्सिंगला ऍडमिशन घेतली....पण बघा ना... दुसरं एक मोठं दुर्दैव तिच्यासमोर दैत्य म्हणून उभं होतंच....


मजुरीची काम करून, ओझे वाहून रमेशच्या मानेला गॅप आली, आता त्याच्याने काहीसुद्धा काम होत नव्हतं. उभं राहिलं की गरगररायचं त्याला. एक-दोनदा तर तो चक्कर येऊनसुद्धा पडला. कुंदाने आता मात्र बाबांचं काम करणं बंद केलं. तिने हार मानली नाही, तिला बाबांना गमवायचं नव्हतं. ती रमेशला घेऊन दवाखान्यात गेली, MRI केला, मानेतली गॅप खूप वाढली होती, पण नियमित औषधोपचार, व्यायाम, फिजिओथेरपी यांच्या साहाय्याने तो बरा होऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.


कुंदा- "बाबा, आता काम करणं एकदम बंद, घरी बसायचं आणि आराम करायचां..." जणू ती रमेशची आईच बनली होती.

पोरांना आपण सहारा द्यावं, तर पोरंच आता आपली माय-बाप बनली.


कुंदाने आता नर्सिंग कोर्स करता करता, रात्री शिकवणी वर्ग घेणं सुरू केलं. खूप थकून जायची ती. बापाचा जीव कासावीस व्हायचा, पोरीचं वय झालंय, आता तिचं लग्न करावं, मी आणि पुर्वेश बघू मग काय करायचं ते... असं ठरवून रमेश(बाबा)ने कुंदासमोर लग्नाचा विषय काढला...


कुंदा - "बाबा, जोपर्यंत पुर्वेश आपल्या पायावर उभा होत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हा माझा शेवटचा निर्णय."

   

पूर्वेशने आता बारावीची परीक्षा दिली, उत्तम मार्काने उत्तीर्णही झाला. इकडे त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली, आणि इकडे कुंदाला "असिस्टंट नर्स"ची सरकारी दवाखान्यात नोकरी मिळाली. आता ती समर्थपणे पूर्वेशचं शिक्षण पूर्ण करू शकत होती.


कुंदा ज्या दवाखान्यात काम करत होती, तिथेच डॉक्टर 'विवेक' काम करत होता. कुंदाचं कामाप्रती प्रेम, रुग्णाविषयीची आपुलकी, तिचा प्रेमळ स्वभाव, आदरयुक्त वागणूक बघून विवेक तिच्या प्रेमातच पडला. त्याने तिला सरळ लग्नासाठी विचारलं, पण तिने स्पष्ट नकार दिला. सुखाशी जणू तिने नातंच तोडून दिलं होतं. तिचं खरं सुख म्हणजे बाबा आणि पुर्वेश... यापलीकडे विचारच नाही करायचा, असा निर्धारच तिचा. 


आज पूर्वेशने आपलं graduation पूर्ण केलं, त्याला चांगल्या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली, त्याच्याच सोबत काम करणारी "मुग्धा" दिसायला सुंदर, उच्चप्रतिष्ठित श्रीमंत घराण्यातली मुलगी.... दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे. मुग्धा आता आपण लग्न करावं म्हणून मागे लागली. पण पुर्वेश आधी ताईचं लग्न करू , मगच आपण लग्न करू.... मी आज जे काही आहे ते ताईमुळेच, त्यामुळे थोडं थांबावं लागेल म्हणून मुग्धाला समजावू पाहात होता. पण श्रीमंत घरातली लाडावलेली पोर ती...

तिच्या हट्टापुढे तिच्या घरच्यांनी पुर्वेशला सांगितले, आम्ही तुमचं लग्न लावून देऊ पण??? तुला घरजावई म्हणून राहावं लागेल. एकुलती एक मुलगी... आणि खूप मोठा व्यवसाय... ही अट जर मान्य असेल तरच तुमचं लग्न होईल.... अन्यथा नाही.


पुर्वेशने नकार दिला लग्नाला.... मला घरजावई म्हणून येणं बिलकुल मान्य नाही, मी माझी ताई आणि बाबांना सोडून नाही राहू शकत.


आता मुग्धाने कट रचला, "तू जर माझ्याशी लग्न करणार नसशील तर... तर... मी आत्महत्या करेन."


पुर्वेशने हे सर्व आपल्या ताईला सांगितलं... "काय करू गं ताई मी आता... मला तर असं वाटतंय, मीच आत्महत्या करावी..."


कुंदा - "नाही रे पुर्वेश, असं नको म्हणूस बाळा... तूच तर आमचा आधार आता. हे बघ माझं ऐक, तू कर रे मुग्धाशी लग्न, माझी आणि बाबांची काळजी नको करुस." 


पुर्वेश - "अगं... पण ताई... तू...बाबा...नाही ताई नाही, हे शक्य नाही."


पण मुग्धाच्या बोलण्याने घबरलेली कुंदा पुर्वेशला लग्नास तयार करते.

किती द्विधा अवस्थेत सापडला पुर्वेश एकीकडे आपलं संपूर्ण जीवन घरच्यांसाठी बलिदान केलेली बहीण, तर दुसरीकडे प्रेयसी...


पुर्वेश आता लग्न करून मुग्धाकडे घर जावई म्हणून गेला.... आणि कुंदा मात्र आजही आपल्या म्हाताऱ्या वडिलांसोबत, आपली नोकरी सांभाळून राहते. तिच्या एकटीच्या कष्टावर मोडलेला संसार तिनं सावरला, भावाला शिकवलं, तिचं कर्तव्य पार पाडलं... पण तिच्या नशिबात काय? शेवटी ती एकटीच आपल्या बाबासोबत संसाराचा रथ ओढतेय.... हा तिचा निर्धारच म्हणावा, कर्तव्य म्हणावं, की तिचं नशीब म्हणावं...


कुंदा आपली नोकरी सांभाळून बाबांची काळजी घ्यायची. पुर्वेश जरी घर-जावई बनून गेला, श्रीमंती, नोकरचाकर जरी त्याच्या पायाशी लोळण घेत असेल, तरी त्याचं मन तिथं रमत नव्हतं. त्याला हे श्रीमंत-गरीब भेदभाव बिलकुल आवडत नव्हतं, गरिबांशी असलेली त्यांची वागणूक त्याला खूप सलत असे. 


मुग्धाचं वागणं जरी पूर्वेशप्रति एक नवरा म्हणून बरं असलं, तरी तिला तो आपल्या बाबांना, ताईला भेटलेला, त्यांच्याशी बोललेलं तिला बिलकुल खपत नसे. बरेचदा पुर्वेश लपून बाबांना, ताईला भेटायचा...


मुग्धाला भांडणासाठी एवढं निमित्त पुरेसं होतं. खूप भांडायची ती. राखीपोर्णिमा जवळ आली. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. 


पुर्वेश - "मुग्धा, राखीचा सण येतोय गं, आपण ताईला बोलवूया का आपल्या घरी."


मुग्धा - "नको... नको... मला नाही आवडत त्यांचं असं इथं येणं... तुम्हाला जायचं असेल तर जा... पण तुम्ही गेलात तर परत इथं यायचं नाही? आता तुला एकच पर्याय निवडायचं आहे...तुझे ताई, बाबा की मी...निर्णय तुझा!!!" म्हणत निघून गेली.

   

पुर्वेशला खूप वाईट वाटलं... किती बंधनात बांधलो गेलोय आपण. धडधाकट पुत्र असून बाबांना आधार नाही...भाऊ असून बहीण काम करतेय.... अजून ताईने लग्न केले नाही. कित्ती कित्ती त्याग हा ताईचा. आणि मी मस्त ऐशोआरामात लोळतोय...  नाही... नाही..


आता मात्र खूप झालंय, मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. पुर्वेश घरातून निघाला.. ते मनावरचं ओझं कमी करण्यासाठीच, योग्य तो निर्णय घेऊनच. खूप हलकं हलकं वाटतं होतं त्याला.  पुर्वेश राखीसाठी घरी पोहोचला. 

रेडिओवर गाणं सुरू होतं.


"सण वर्षाचा बाई भाऊबीजेचा

येणार बंधू माझा मोठ्या मनाचा

चंदनाचा पाट त्याला देईन बसाया...

आणि करंज्या, लाडू वाढीन जेवाया....

मिरवीण डोईवरती हात ममतेचा...

येणार बंधू माझा मोठ्या मनाचा..."


खूप आनंद झाला कुंदाला, जणू ती वाटच बघत होती भावाची. अंगणातली रांगोळी, स्वयंपाक घरातला त्याच्या आवडीचा बासुंदीचा घमघमाट त्याच्या हे लक्षात आणून देत होतच.


कुंदाने त्याला राखी बांधली.


पुर्वेश - "ताई, काय देऊ गं तुला ओवाळणीचं."


कुंदा - "मला काही नकोय रे... खूप सुखात आहे मी. तू फक्त तुझी काळजी घे."


पुर्वेश - "ताई, मला माहिती आहे, तू काहीच मागणार नाहीस. आतापर्यंत तू फक्त देत आलीस, आणि मी घेत आलोय. पण आता...आता मात्र तुला माझं ऐकायचं आहे. आतापर्यंत मी खूप सहन केलंय ते यासाठीच की, मुग्धा कदाचित मला समजून घेईल. लग्नानंतर तरी ती तुला आणि बाबांना आपलंसं करेल. खूप स्वार्थी लोकं आहेत ताई ते. तिच्याशी लग्न करून मी तुम्हा दोघावर अन्याय केला. बाबा, मला क्षमा करा, मी अपराधी आहे तुमचा."


कुंदा - "अरे, असं का बोलतोय तू, आता ती पत्नी आहे तुझी. तुझीही काही कर्तव्य आहेत."

पुर्वेश - "ताई श्रीमंतीचं भूत बसलंय त्यांच्या मानगुटीवर..... ताई, मला नकोय गं ती श्रीमंती, खूप जीव गुदमरतो माझा तिथं. मोकळा श्वाससुद्धा घेता येत नाही, इथे आल्यावर खूप बरं वाटतं गं. ताई, मी ठरवून आलोय.... आता मी इथेच राहणार, मुग्धाला जर माझी खरंच गरज असेल, तर तीच येईल इकडे... मी मात्र ठरवून आलोय, तिकडे परत न जाण्याचा निर्णय घेऊनच."


कुंदा - "अरे पण...."


पुर्वेश - "ताई, आता माझी ओवाळणी स्वीकारण्याची तुझी वेळ आहे....ताई माझ्या या भेटीचा स्वीकार कर."


कुंदा - "अरे पुर्वेश, खरंच रे मला काहीच नकोय..."


पुर्वेश - "ताई! आता मात्र मी तुझं काही एक ऐकणार नाहीये, तुझा लहान भाऊ आता खूप मोठा झालाय, त्याची ही ओवाळणी तुला स्वीकारावीच लागेल. Please, नाही म्हणू नकोस गं! ताई, मी ठरवून आलोय, आता तुझं लग्न मी लावून देणार. किती कष्ट घेतलंस गं सर्वांसाठी... लहानपणापासून बघतोय, आई गेली...पण आईच्या मायेनं तू मला जोपासलं, मोठं केलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं... माझा प्रेमविवाह तरी माझ्या सुखासाठी सहर्ष तयार झालीस. पण आता मात्र माझी वेळ आलीय, माझं कर्तव्य करण्याची. तुझं लग्न आणि बाबांची जबाबदारी आता माझी."


कुंदा - "अरे, काहीही काय हे?? आता , या वयात कोण करणार माझ्याशी लग्न.."


पुर्वेश - "डॉक्टर विवेक..."


कुंदा - "काय? वेडबीड लागलंय की काय तुला?"


पुर्वेश - "हो ताई, डाॅ. विवेक.. ज्याने तुला मागणी घातली होती लग्नासाठी. त्याच्याशी माझी भेट झालीय. त्याचंसुद्धा अजून लग्न झालेले नाही, तो आपल्या आईसोबत एकटाच राहतोय. आपल्या आईला सांभाळून घेणारी मुलगी बायको म्हणून हवी आहे त्याला, म्हणूनच त्याने तुला तुझ्यातलं वात्सल्य, प्रेम, सहानुभूती, आदर हे सर्व गुण बघूनच तुला लग्नासाठी विचारलं होतं. पण तू आम्हा सर्वांचा विचार करून लग्नाला नकार दिलास. ताई विवेक आजही तुझ्या होकाराची वाट बघतोय.. तू फक्त हो म्हण..."


बाबा - "कुंदा बेटा, पुर्वेश खरं तेच बोलतोय. किती करशील गं आम्हा सर्वांसाठी. आई गेल्यापासनं तारेवरची कसरत करून तूच एकटी संसार चालवतेयस. आता थोडं स्वतःसाठी जग.... या सुंदर जगाचा थोडा तरी आस्वाद घे. मी काय पिकलं पान, आज आहे उद्या नाही. रजनी तुझी आई रोज माझ्या स्वप्नात येऊन विचारते, कधी करणार हो माझ्या कुंदाचं लग्न... मी निरुत्तर असतो पोरांनो... खूप मोठं ओझं घेऊन फिरतोय मी मनावर, आतातरी किमान माझ्या डोळ्यादेखत आईची इच्छा पूर्ण कर...तेव्हाच तिचा आत्मा शांत होईल." 


कुंदा - "पण बाबा...?"


बाबा - "पणबीन काही नाही पोरी... नाहीतर माझा आत्मासुद्धा असाच भरकटत राहील बेटा...."


कुंदा - "बाबा, असं नका हो म्हणू... आई गेल्यानंतर तुम्हीच तर आम्हाला आई-बाबा दोघांचं प्रेम दिलंय."


पुर्वेश - "तर ताई, तू तयार आहेस ना लग्नासाठी..."


पुर्वेशने लगेच विवेकला फोन केला.... विवेक त्याच्या आईसोबत कुंदाकडे आला. विवेकच्या आईने कुंदला मागणी घातली. अत्यंत साध्या पद्धतीनं विवेक आणि कुंदाचं लग्न झालं. हीच ती ओवाळणी होती भावाची बहिणीला.. शब्दात व्यक्त न होणारी...


कुंदा आता विवेकच्या घरी गेली, आणि इकडे पुर्वेशने आपल्या बाबांची संपूर्ण जबाबदारी एक पुत्र म्हणून सहर्ष स्वीकारली.

  

पुर्वेश आता आपली नोकरी सांभाळून आपल्या बाबांचा योग्य तो सांभाळ करायचा. त्यांचं औषध-पाणी, जेवण सर्व अगदी वेळेनुसार. त्याला मुग्धा ची खूप आठवण यायची, पण तिने त्याला दिलेला शब्द आठवायचा. "तुला तुझी ताई-बाबा किंवा मी यापैकी एकाला निवडायचं आहे....निर्णय तुझा..." म्हणून तो शांत असायचा.


मुग्धाने मात्र त्याला खूपदा फोन करून बोलवायचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याने मात्र स्पष्ट सांगितले, "तुला माझी गरज असेल तर तू माझ्या घरी येऊ शकतेस, पण मी मात्र आता "घरजावई" म्हणून तुझ्याकडे येणार नाही."


पण लाडात वाढलेली ती, सर्व सोयींनी गजबजलेलं घर, नोकरचाकर एवढं ऐश्वर्य सोडून जाणं तिला योग्य वाटतं नव्हतं.


एवढ्यात मुग्धाला दिवस गेले, तिने ही बातमी पुर्वेशला सांगितली. खूप आनंद झाला पुर्वेशला.... आता मी बाबा बनणार म्हणून. किती आनंदाचा हा क्षण..


बहुतेक बाळाच्या आगमनाची वार्ता आणि परत पुर्वेश आणि मुग्धाचं मिलन हे लिखित असेल. 


इकडे मुग्धाच्या बाबांचा खूप मोठा विस्तारलेला असा व्यापार अचानक मंदीच्या लाटेत आला. हळू-हळू त्यांचं वैभवशाली जीवन ढासळू लागलं. असं म्हणतात ना सुख-दुःख सांगून येत नसतात, ऊन-सावलीच्या खेळाप्रमाणे जीवनात बरेच असे प्रसंग येतात. असंच काहीसं मुग्धाच्या घरी झालं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

  

मुग्धाला नववा महीना लागला, आणि मात्र तिला प्रकर्षाने जाणीव झाली ती पूर्वेशची. तिने निर्णय घेतला पूर्वेशकडे जाण्याचा. 

पुर्वेश, बाबा यांना खूप आनंद झाला. सून पहिल्यांदा घरी येणार म्हणून कुंदाने तिच्या स्वागताची जोरदार तयारी केली. आणि तो दिवस होता भाऊबीजेचा.


आपल्या घरात तिने पहिल्यांदाच पोटात वाढणाऱ्या पूर्वेशच्या बाळासह माप ओलांडून गृह-प्रवेश केला.

बाबांना तर खूप आनंद झाला. 

कसा हा योगायोग बघा...


"एका गृहलक्ष्मीचं घरातून दुसऱ्या घरात जाणं, आणि लगेच दुसऱ्या गृहलक्ष्मीचं घरात पुनरागमन होणं..." 


यापेक्षा दुसरं वैभव कुठलं. 


काही दिवसातच घरात एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. जणू घरात "कृष्ण"च अवतरला. आता घराचं "गोकुळ" झालं. आजोबा झालेल्या बाबांना तर नवसंजीवनीच मिळाली. त्याच्या बाललीला पाहून त्यांचा मात्र मस्त मजेत वेळ जायचा. 


"आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन..."


समजलंय ना काय म्हणायचं ते..

अहो... विवेक आणि कुंदाच्या संसारवेलीवरसुद्धा एक कळी उमललीय... "राधा..."

किती कष्ट घेऊन कुंदाने सावरलेलं तिचं माहेरचं घर.

आणि उशिरा का होईना राखीपौर्णिमेला आपल्या बहिणीला दिलेली अनमोल भेट.

कुंदाने जर हिम्मत हारून मरण पत्कर असतं किंवा स्वतःच्या स्वार्थपोटी लग्न करून मोकळी झाली असती, तर घराचं नंदनवन झालंच नसतं. अशी वेळ बऱ्याच जणांवर येते, पण हिम्मत न हारता परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्धार करा. उशिरा का होईना, पण यश नक्कीच मिळतं. विश्वास हवा फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama