नैराश्य आणि त्यावर केलेली मात
नैराश्य आणि त्यावर केलेली मात
"जीवन जंगल का रास्ता हैं
बाधाये आये भिन्न भिन्न
कही खुशबू खुली हवाओ मे
कही जली हवाये भिन्न भिन्न
काटो मे कभी उलझना हैं
उलझे तो खुद ही सुलझना हैं
जीवन का मंत्र यही है
बस चलना हैं
बस चलना है।...."
कवि "लोकेश मृदुल" यांचं गाणं सुरू झालं.....
आणि सुरेखा काकू ओरडल्या..
काय रे रिदान,"किती हा आवाज... आणि हे कसलं गाणं लावलं रे...अरे सकाळची वेळ मस्त भजन-बीजन लाव की... गेली कित्येक दिवस बघतेय मी, तू रोज हेच गाणं लावून दिवसाची सुरुवात करतो. दिवसातून आठ-दहा वेळा तू हे गाणं वाजवतो....आणि तेही जोरजोरात... अरे भिंतीलासुद्धा कान असतात बाबा!”
“नैराश्यावर गाजलेलं गाणं आहे मृदुल सरांचं..”
“ऐक बाबा ऐक, पण कानात तुझे ते बोळे??? काय म्हणतात त्याला..ह...,ह...हेडफोन ...ते लावून ऐक रे बाबा..”
सुरेखाबाईंची आरतीची वेळ आणि रिदान ची गाण्याची वेळ एकच...
सुरेखाबाईं-काय करावं या पोरांचं...
एक हा रिदान गाणं वाजवून डोकं फ़िरवतोय आणि ती रिद्धी किती चुपचाप बसलेली असते...बिचारी पोर .अजून काय नशिबात वाढून ठेवलंय तिच्या काय माहीत...
"देवा तिला लवकर बरं कर रे बाबा..."म्हणतच सुरेखाबाईंनी देवापुढे साखर ठेवली.
आणि त्या भूतकाळात गेल्या....
----------------------------------
- सुरेखाताई, त्यांचा मुलगा सुजित, सून समीरा नातू रिदान आणि नात रिद्धी.
एकंदरीत खूप सुखी आणि समाधानी कुटुंब. सर्व कसं सुरळीत चालू होतं. याचवर्षी रिद्धीचं BSC फायनल झालं. दिसायला देखणी तर होतीच ती, त्याचबरोबर सर्वगुणसंपन्न, शालिनतेची मूर्तीच जणू. अशा वयात आलेल्या मुलींवर तशा वरमंडळीच्या नजरा असतातच, आणि तसंही नात्यातल्या नात्यात जुळत असेल तर फारच छान.
झालंही तसंच... नात्यातलंच एक स्थळ सांगून आलं. मुलगा सुशांत चांगला educated. सायंटिस्ट म्हणून उच्च पदावर अमेरिकेत कार्यरत होता. घरचेसुद्धा सधन. म्हणून नकार देण्यासारखं काही कारण नव्हतंच. सुशांत एका महिन्याच्या सुटीवर आला होता, त्यातच हे स्थळ बघितलं, दोघांची पसंती झाली...आणि "झट मंगणी पट शादी" या तत्वावर लवकर लग्नही झालं.
रिद्धी लग्न होऊन सासरी सुशांतच्या घरी गेली. नातेवाईक, पाहुणे, यात पंधरा दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. रत्नागिरीला तिच्या मामे बहिणीकडे लग्न होतं, म्हणून दोघेही निघाले. तसेही लग्नानंतर कुठे फिरायला गेलो नाही म्हणून दोन दिवस आधीच जाऊन कोकण फिरण्याची त्यांची इच्छा होती. पावसाळ्याची नुकतीच चाहूल लागली होती. वेळ वाचावा म्हणून दोघेही स्वतःच्या गाडीने निघाले. रत्नागिरीला ते पोहोचणारच एवढ्यात पावसाचा जोर वाढला...घाटाचा रस्ता ...समोर काळाकुट्ट अंधार....कोसळणारा पाऊस...विजांचा चमचमाट... एका वळणावर गाडीला वळण देतांना सुशांतचा गाडीवरील ताबा सुटला ....आणि गाडी सरळ खाईत कोसळली.
एका क्षणात काय झालं...
मदतीला कुणी नाही..अंधारी रात्र , रहदारी पण नव्हती. त्यामुळे मदतीची अपेक्षा तरी कशी?
पहाट झाली...रहदारी सुरू झाली...मदत मिळाली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सुशांतचा जागीच मृत्यू झाला होता...पण रिद्धी बेशुद्धावस्थेत होती. तिला उपचारासाठी नेण्यात आलं. फोन करून घरी कळवण्यात आलं. हाताची मेहंदी सुद्धा निघाली नव्हती आणि रिद्धीचं आयुष्यच पार बदलून गेलं.
सोनपावलांनी आलेली सून म्हणून केलेलं कौतुक लगेच द्वेषभरल्या नजरेत बदललं.
पांढऱ्या पायाची म्हणून घरातल्या म्हाताऱ्या कजबुजू लागल्या. आधीच रिद्धीवर इतकं मोठं आभाळ कोसळलेलं...आणि त्यात हे असं बोलणं ऐकून ती पूर्ण दोष स्वतःलाच देऊ लागली.
"खरंच मीच
दोषी आहे, सुशांतच्या मृत्यूला..... फिरायला गेलोच नसतो तर कदाचित अशी वेळ आली नसती.” खूप रडायची, ना जेवण ना झोप... तासनतास एकांतात बसून राहायची.हाडांचा तर नुसता सापळा झाला होता, चेहरा पांढराफट्ट पडला होता. तिची ही अवस्था बघून तीचे आईबाबा तिला माहेरी घेऊन आले. कदाचित माहेरच्या वातावरणात तिला बर वाटेल.
आज सहा महिने झाले, सायक्याट्रिक्सकडे दाखवून झालं, औषध सुरुच आहेत, पण आता तर रिद्धीच मानसिक संतुलन अजूनच वाढत चाललं होतं. वेदना, संवेदना जणू सर्व गोष्टींचा तिला विसरच पडला होता. तिच्या ठिकाणी कुणीही असतं तर अस घडू शकलं असतं...हे एक वास्तव आहे.
लग्नानंतरच्या भावी आयुष्याची स्वप्न न रंगताच क्षणात बेरंग झाली होती.तीचं एकांतात रडणं, झोपेतून उठून किंचाळणं हे वाढतच चाललंय. कुनी बोललं तरी फक्त चेहऱ्याकडे बघायची. फक्त सुशांतबद्दल बोलायची...माझा सुशांत कुठंय, तो बरा आहे ना...तो कधी येणार....
आई, बाबा रिदान आजी खूप प्रयत्न करायच्या, तिला समजवायच्या.
रिदान तिच्यापेक्षा वयाने बराच लहान पण ताईच हे असे हाल बघून तो खूपच घाबरला होता.
त्याला आपल्या बहिणीचे हाल बघवत नव्हते.
त्याला आठवलं...मी मागच्या वर्षी दहावीत असताना किती घाबरलो होतो. बोर्डाची परीक्षा आणि त्यात हार्मोन्स चेंजसचा झालेला बदल...किती नर्वसपणा आला होता.पण त्यावेळेस ताईने त्याला
"हम होंगे कामयाब....
हम होंगे कामयाब...एक दिन
मन मे हो विश्वास....
पुरा हो विश्वास...
हम होंगे कामयाब एक दिन.."
हे गाणं रोज ऐकवायची.
त्याचाच इतका सकारात्मक परिणाम झाला की तो चक्क जिल्ह्यातून पहिला आला.
त्यावेळेस त्याने ताईच्या मिठीत शिरून म्हटले, "खरंच गं ताई अशक्य असं काहीच नसतं.प्रयत्न केला की सगळं जमतं बघ....”
ताईने त्यावेळी त्याला सावरलं...पण आता खरी वेळ होती रिदानची...आपल्या ताईला नैराश्यातून बाहेर काढण्याची. त्याच्यासाठी हे खूप कठीण होतं.पण प्रयत्न करणं गरजेचंही होतंच, कारण डॉक्टरी उपाय सगळे संपले होते. तिला यातून बाहेर काढण्यासाठी सावरणं गरजेचं होतं..
रिदान रोज नैराश्यातून बाहेर पडण्याचे विविध व्हीडिओ लावायचा.गाणी लावायचा. गेल्या एक महिन्यापासून त्याचा हा प्रयोग सुरू होता.जेणेकरून चार वाक्य तरी रिद्धीच्या कानावर पडतील. आणि तिच्यात काही बदल घडेल....
कधी कधी नैराश्यावर औषध काम नाही करत पण मनातल्या दबलेल्या भावना जर कुणाजवळ व्यक्त केल्या तर मन हलकं होत. म्हणूनच मनाचा कोंडमारा केल्यापेक्षा बोला, रडा, व्यक्त व्हा...
आजसुद्धा त्याने
"जीवन जंगल का रास्ता हैं
बाधाये आये भिन्न भिन्न ..."
हे गाणं लावलं....
रिद्धी अचानक आपल्या रूममधून उठून आली ती सुद्धा गाणं म्हणू लागली.
आई, बाबा, आजी रिदान सगळे धावत आले रिद्धीला असं गाणं म्हणताना बघून.
रिदानने पटकन आपल्या ताईचे हात हातात घेतले, आई-बाबा, आजीसुद्धा त्या गाण्यात रममाण झाली...आणि सारी फेर धरून गोल गोल फिरून गाणं म्हणू लागली...
सगळ्यांच्या डोळ्यात आज आनंदाश्रू होते. का नाही येणार अश्रू... त्यांची लाडकी लेक कितीतरी दिवसानंतर अशी हसत होती, गुणगुणत होती...
(मित्र-मैत्रिणींनो जीवनात बरेचदा असे नैराश्याचे प्रसंग येतात ...पण एक शिकायचं जीवन हे अनमोल आहे.त्याला आत्महत्येसारखा पर्याय निवडून संपवू नका. प्रत्येक गोष्टीला औषध असत...बोला व्यक्त व्हा...जवळच्या व्यक्तीला, मित्र-मैत्रिणीला सगळ सांगा....घडलेल्या गोष्टींचा बाऊ करत, त्यात स्वतःला दोषी न मानता ती एक नैसर्गिक घटना होती.असा समज करून पुढच्या आव्हानाला सामोरं जा.
स्वतः स्वतःशी हितगुज करून मनाला निर्भय बनवा..नक्कीच नैराश्यातून बाहेर पडाल.)