Surendra Labhade

Horror

4.3  

Surendra Labhade

Horror

हरंगुळ (एक रहस्यमय प्रवास)

हरंगुळ (एक रहस्यमय प्रवास)

30 mins
1.1K


 सहसा मला टिव्ही बघण्यास आवडत नाही. परंतु दुपारची वेळ होती आणि झोपही येत नव्हती म्हणून थोडा वेळ बातम्या बघण्याच्या हेतुने टिव्ही चालु केला. एका न्युज चॅलनवर रहस्य ह्या शिष्रकाखाली एक चित्रफित चालु होती. लातूर तालुक्यातील हरंगुळ ह्या छोट्याश्या रहस्यमयी गावाचा इतिहास त्यावर दाखवत होते. ते सांगत होते की,आशिया खंडामध्ये सर्वप्रथम डायन तयार झाली ती ह्याच गावामध्ये. फार वर्षापूर्वी त्या गावामध्ये एक महिला होती. तंत्र, मंत्र, जादूटोणा अश्याप्रकारच्या काळ्या जादु ती शिकायची. काळ्याजादू शिकण्याची तिची पद्धत मात्र फार विचित्र होती. जसे मासोळी टाकून अलगद एखादा मासा जाळ्यात अडकावा त्याचप्रमाणे ती दिसायला सुंदर असल्यामुळे अनेक पुरुषांना आपल्या नयनकटाक्षाच्या जाळ्यात अलगद फरवत असे. काही पुरुष मंडळी पण इतक्या लबाड आणि स्वार्थी असतात ना की, एखाद्या मित्राने पौर्णिमिच्या रात्री मदतीसाठी दहा आवाज दिले तरी झोपण्याचे नाटक करून बाहेर जाणार नाहीत, परंतु एखाद्या महिलेने आवाज दिला ना की, मग अमावास्याच्या काळोख्या रात्री पण धावत जातील. जरासाही विचार करणार नाहित की ती अबला आहे की बला. अश्याच काही उतावीळ शुरविरांना ती अमावास्याच्या मध्यरात्री बोलावून घेत असत. आणि त्याला मारून टाकत असत व त्या पुरुषाचे रक्त तिथे तयार असलेल्या कुंडात टाकुन ती नवीन तंत्र, मंत्र प्राप्त करत असे.हळू हळू तिने त्या गावातील काही महिलांनसोबत मैत्री केली. आणि त्या महिलांना पण तंत्र,मंत्र,जादूटोणा या सारख्या काळ्या जादू शिकवू लागली. काही दिवसानंतर त्यांची एक टोळी तयार झाली. हळू हळू हरंगुळ गावातील पुरूषांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागले. तेव्हा गावातील काही मंडळीनी वाढत्या मृत्यूचे कारण शोधण्यास सुरवात केली.काही दिवसांच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांना मुळ गोष्टींचा उलगडा झाला. गावाच्या लगतच असलेल्या घनदाट झाडीमध्ये अमावास्याच्या एका काळोख्या रात्री त्या सर्व महिलांची होम हवन करुन तंत्र,मंत्र शिकण्याचे चालु असताना पाळत ठेऊन असणाऱ्या गावकऱ्यांनी त्या सर्व महिलांना पकडले. सर्वच गावकरी अगदी रागात आणि त्वेषात होते. कुणी बोलायचे यांना मार देऊन गावाच्या बाहेर हकलवून द्या. कुणी बोलायचे यांना हद्दपार केल्यापेक्षा इथेच मारून टाका. कुणी दगड फेकून मारत. तर कुणी हातात येईल त्या वस्तूने मारायला लागले. त्या महिलांच्या सुटकेच्या केविलवाण्या विनंती कडे आता कुणाचेच लक्ष नव्हते. शेवटी गावकऱ्यांनी मिळून एक अंतिम निर्णय घेतला. त्याप्रमाणे काळीजादू शिकणाऱ्या त्या सर्व महिलांना गावकऱ्यांनी ओढत,फरफटत नेऊन त्याच ठिकाणी असलेल्या झाडांना बांधले. त्यांच्या सर्वांच्या अंगावरती केरोसिन टाकले. मृत्यूच्या दारात असताना कर्णासारख्या मोठमोठ्या विद्याप्राप्त केलेल्या व्यक्तीच्यांही विद्या विफल होतात त्याचप्रमाणे अगदी मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या त्या महिलांच्या विद्या,तंत्र,मंत्र आणि सुटकेच्या विनविन्याही निष्फळ ठरल्या होत्या. अंतिमता त्या सर्व महिलांना जिवंत जाळण्यात आले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या त्यांच्या आर्त हाका आणि विनवण्या त्या धगधगत्या अग्नित विरून गेल्या.परंतू त्या शांत आणि भयान रात्रीत त्यांचा अखेरचा कर्कश आवाज गावकऱ्यांच्या काणात कितीतरी वेळ तसाच घोंघत राहिला..."आम्ही सगळ्या पून्हा येऊ,जिवंत सोडनार नाही..बदला घेणार बदला.." 

     बरेच दिवस झाल्यानंतर त्या महिलांचे अतृप्त आत्मे डायन बनून गावकऱ्यांना त्रास देऊन संपवू लागले. गावातील तरुण मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून हवे ते कामे करून घेत असत. नंतर त्यांचे रक्त पिवून मारून टाकत आणि त्यांचा मृतदेह झाडाला टांगून ठेवत असत. गावामध्ये हळूहळू भितीचे वातावरण पसरायला लागले. डायन च्या भितीने काही लोक गाव सोडून जायला लागले. डायन ची भिती त्या गावामध्ये अजूनही तग धरून आहे.त्या गावातील लोक अजूनही काही प्रथा पाळतात. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार अमावास्येच्या रात्री बाहेर फिरणे, तेथील झाडांवरती थुंकणे, आणि रात्री झाडाखाली झोपणे हे सर्व तिथे चालत नाही. असे केल्यास त्या व्यक्तिचा डायन सर्वनाश करते. 

       हरंगुळ गावचा हा रहस्यमय इतिहास बघून डायन बद्दल माहिती तर मिळाली, परंतु डोक्यात अनेक विचार येऊ लागले. बघितलेली माहिती खरी आहे की नाही? याची पृष्टी करण्यासाठी मी गुगलवरती 'History of Harngul Village Related with Dayana' आणि 'Dayan wikipidia' सर्च करून बघितले. बघितलेली सर्व माहिती मला इंटरनेटवर पण मिळाली. आता तर डोक्यात विचाराचा कल्लोळ उठला. ही सर्व माहिती खरोखर खरी असेल का? खरोखर डायनची उत्पती महाराष्टातील हरंगुळ ह्या ठिकाणी झाली असेल का? तिथे अजूनही डायन असु शकतात का? तिथे झाडांना खिळे,चूका ठोकत नाहीत हे खरे असेल का? लोकांना अजुनपण तिथे डायन असल्याचा आभास होत असेल का? इत्यादी इत्यादी अनेक प्रश्नानी डोक्यात गोंधळ घातला.ह्या सर्व प्रश्नांचे निरसन आणि डोक्यातील विचारांचा कल्लोळ तिथे जाऊन बघितल्या शिवाय थांबणार नव्हता. शेवटी हरंगुळला जाण्याचा निर्धार पक्का केला. वाट बघायची होती ती फक्त योग्य दिवसाची...

       मेडिकल कॉलेजचे हे माझे शेवटचे वर्ष चालू होते. संगमनेर मधील नवले इमारती मधील एका रूम मध्ये आम्ही तिन मित्र रहायचो. संकेत, अमोल आणि मी. एक दिवस गप्पा मारता मारता भूंताचा विषय चालू झाला. विषय खूपच रंगला. भूताबद्दलचे प्रत्येकाचे मत आणि त्याबद्दल ऐकलेले प्रसंग यांची चर्चा सुरु झाली. खरे सांगायचे म्हणजे आमचा भुंतावरती अजिबात विश्वास नाही. जी गोष्ट आजपर्यंत केव्हा बघितली नाही किंवा अनुभवली नाही अश्या गोष्टिंवरती विश्वास ठेवणे तरी कितपत योग्य आहे? परंतु भुताबद्दल अतापर्यंत जितके काही ऐकले होते त्यानुसार भूत हे असु शकते का? ह्या प्रश्नाची मनाच्या एका कोपऱ्यात अनामिक हूरहूर असायची. विषय निघालेलाच होता तर काही दिवसांपूर्वी मी डायन बद्दल बघितलेली बातमी आणि वाचलेली माहिती दोन्ही मित्रांना सांगितली. हरंगुळचा डायन बद्दलचा इतिहास ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटले. डायन वेगवेगळ्या सुंदर मुलींचे रूप धारण करते आणि तरुण मुलांना फसविते वैगेरे ह्या गोष्टींवरून आमच्यात काही हस्यास्पद विनोद रंगले. त्यानंतर बराच वेळ चर्चा केल्यानंतर हरंगुळ गावचा रहस्यमय इतिहास खरा आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही दुसऱ्याच दिवशी हरंगुळला जाण्याचे ठरविले. अश्याच भुंताच्या आणि डायनच्या काही गप्पा आणि विनोद करत आम्ही झोपी गेलो.

        प्रत्येक मिंत्राच्या ग्रुप मध्ये हौसे,गौसे आणि नवसे ह्या तिन्हीही प्रकारांतील मित्र असतात. तसे आमच्याही ग्रुप मध्ये होते. हौसे,गौसे तर सर्वच होते परंतु आमच्यात एकच नवसे होता नवसाचा अमोल. तसा तो होताही नवसाचाच एकुलता एक. बाकी आम्ही सर्व एकावर एक फ्रि मिळालेलो होतो. आता ह्या नवसे बद्दल का सांगतोय याचेही एक कारण आहे. इतरांसाठी " परस्त्री मानावी मातेसमान " हे वाक्य जरी सारखे असले तरी ह्याच्यासाठी मात्र ते वाक्य " परस्त्री मानावी पित्यासमान " असे होते. बापाच्या आज्ञेप्रमाणेच गर्लफेंडची प्रत्येक आज्ञा इथे काटेकोरपणे पाळली जात असे. आणि नेहमीप्रमाणे त्याने आजही काटेकोरपणे आज्ञेचे पालन केले होते. आमच्यासोबत हरंगुळला येण्यास नकार दिला होता. सोबत तर आला नाही परंतू मित्र ह्या नात्याने प्रेमाचे काही आशिर्वाद दिले. म्हणाला की, " मी नवसाचा आणि एकूलता एक आहे, माझे काही झाले तर घरच्यांचे कसे होईल? तसे तुम्ही दोघे दोघे अहात तुमच्या घरच्यांना काही फरक पडणार नाही " इतके प्रेमळ शब्द ऐकुन संकेत व मी त्याचे आभार व्यक्त करून जाण्यासाठी निघालो....

      नवसेचे येणे रद्द झाल्यामुळे आम्ही अजुन एका हौसेला म्हणजेच विदर्भकर अनिलला घेऊन जाण्याचे ठरविले.आम्ही गाडी घेऊन अनिलच्या रूमवरती गेलो. त्याची एक महिन्यानंतर परिक्षा होती. आणि तो अभ्यास करत होता. आम्ही कुठे जाणार आहोत? आणि कश्यासाठी हे सांगत बसलो असतो तर एकतर उशीर झाला असता आणि दुसरी गोष्ट अभ्यास असल्यामुळे तो येईल की नाही ही पण शंका होती. म्हणून आम्ही त्याला घेऊन दूर जाण्यापर्यंत कुठलेही सत्य सांगनार नव्हतो. रूम मध्ये गेलो तेव्हा बघितले की, भाऊंचा अभ्यास तर जोरदार चालू होता. आम्ही त्याला म्हणालो की, अभ्यास करून थकला असशील त्यामुळे चल जरा फिरुन येऊ. तसा तो फार अभ्यासू होता असे काही नव्हते. फक्त परिक्षा असली की मगच खूर्चित बसुन टेबलवरती पुस्तके घेऊन बसायचा. तसा इतर वेळेस पण खूर्चितच बसलेला असायचा फक्त टेबलावरती मात्र पुस्तके नसायची. त्यामुळे जास्त वेळ न घालवता तो आमच्यासोबत येण्यास तयार झाला. आता तिघांचाही प्रवास एकाच दुचाकी वरून सुरु झाला तो थेट हरंगुळ च्या दिशेने. आपण कुठे चाललोय? का चाललोय? आणि कश्यासाठी ? ह्या सर्व गोष्टी मागे बसलेल्या अनिल ला माहिती नसल्यामुळे अनाभिध्न्य प्रवासाबद्दल त्याच्या डोक्यात अंधार होता, आणि त्याच अंधारात आम्हाला सफेद साडीमधील सुंदर रूप घेतलेली डायन स्पष्ट दिसू लागली होती.. 

       रविवारी दुपारच्या तीन वाजता आम्ही संगमनेरमधून निघालो होतो. प्रवास आणि ते पण दूचाकीवर असल्यास आम्ही केव्हाच शांत बसत नव्हतो. गाणि, गप्पा, गोष्टी, आणि हस्यविनोद हे न थांबता चालु असायचे. त्यामुळे केव्हा केव्हा आपण किती दुर आलोय याचे पण भान नसायचे. असेच गप्पा, गोष्टी करत करत साडेपाच वाजणाच्या दरम्यान आम्ही अहमदनगर मध्ये पोहचलो. हेल्मेट व लायसन्स नसल्यामुळे आणि ट्रिपल सिट असल्यामुळे आम्ही पोलिसांची नजर चुकवत कसेतरी एकदाचे अहमदनगर पार केले. येव्हाना साडेसहा वाजले होते. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मावळत्या सूर्यासोबत थंडीचा जोम हळू हळू वाढायला लागला होता. आता आम्ही जामखेडला जाणाऱ्या रस्त्याने प्रस्थान केले होते. एकेरी रस्ता असल्या कारणामुळे गाडीचा वेगही जरा अवरता घ्यावा लागला. सूर्यानेही अता ढंगाची चादर ओढून स्वतःला पूर्णपणे झाकून घेतले होते. सूर्यास्त झाला होता. त्यामुळे थंडी जरा जास्तच जाणवू लागली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाची टपरी बघून मी गाडी थांबवली. बोचऱ्या थंडीमध्ये गरमागरम कडक चहा आणि तो पण एका टपरीवर,मित्रांसोबत पिण्याची मज्जाच वेगळी असते. चहा वाल्या काकांना मस्त गरमागरम तीन चहांची ऑर्डर दिली. जगात सगळ्यात सुपरफास्ट ऑर्डर मिळत असेल तर ती फक्त टपरीवरतीच. टपरीवाले काका, मावशी पण खूप हुशार असतात. आपल्याला जितके चहा हवे तितके हाताची बोटे वरती करायची, की बस्स ऑर्डर डन. तो हात खाली घेण्याच्या आत काकांचा चहा घेऊन आलेला हात आपल्यापुढे सरसावतो .इतक्या वेळ प्रवासामधील गप्पा, गोष्टी आणि विनोदांच्या नादात अनिलच्या मनातील आपण नेमके कुठे चाललो आहोत? हा शमुन बसलेला प्रश्न आता हळूवारपणे बाहेर डोक काढू लागला. न राहवून त्याने पुन्हा प्रश्न केला की, भावांनो आपण नेमके कुठे चाललो आहोत ? संकेत आणि मी फक्त एकमेकाकडे बघून हसलो. पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यावरती उमटलेले प्रश्नार्थक भाव तसेच ठेऊन आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. 

       थंडी सोबत काळोख पण वाढायला लागला होता. गप्पा ,मस्ती गाण्यांच्या भेंड्या, थोडाफार कल्ला करता आम्ही धानोरा, कडा, आष्टि ही गावे ओलांडून जामखेड मध्ये केव्हा पोहचलो कळालेच नाही. रात्रीचे नऊ वाजले होते. भूख पण लागली होती. आणि प्रवास पण बराच झाला होता. त्यामुळे आम्ही जामखेड मध्येच मुक्काम करण्याचे ठरविले. थोडा फार शोधाशोध केल्यानंतर एका हॉटेल वर आम्हाला योग्य दरात रूम मिळाली. रूम मध्ये गेल्यानंतर जरा रिलेक्स वाटले. लवकर फ्रेश होऊन आम्ही शेजारील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो. हॉटेलमध्ये भयान शांतता होती. तसा वेळ पण बराच झाला असल्या कारणाने कदाचित कस्टमरर्स पण कमी झाले असावेत. त्यात तिथे वेटर दोन आणि कांऊटवर एक व्यक्ति असे फक्त तिघे जण. इतक्या मोठ्या हॉटेल मध्ये फक्त तिन व्यक्ती भयानक शांतता वाटत होती. इतकी शांतता बघून थोडावेळ संकेतला व मला हे जामखेड नसून हरंगुळच असावे असा भास झाला. जेवण टेबलवरती आल्यानंतर मी दोघांनाही हसून म्हणालो की "पोटभर जेवण करून घ्या कदाचित हे शेवटचे जेवण असेल". माझ्या बोलण्याचा उद्देश फक्त संकेतलाच कळालेला होता. आम्ही एकमेकांसोबत टाळी घेऊन हसलो आणि जेवणास सुरुवात केली. अनिलच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह तसेच होते. 

      जेवण आटोपल्यानंतर आम्ही रूममध्ये आलो. आणि गप्पा मारत बेड वरती बसलो होतो. तितक्यात अनिलच्या घरून त्याला कॉल आला. आम्ही दोघेही एकाच वेळेस हसून त्याला म्हणालो " बोलुन घे आज सर्व काही, कदाचित हा शेवटचा कॉल असेल, पुन्हा बोलण्यास भेटेल किंवा नाही सांगता येत नाही". आमच्या अश्या संशयास्पद बोलन्यामुळे अनिलच्या मनात अनेक विचार येऊ लागले. आणि पुन्हा त्याचा नेहमीचाच प्रश्न आमच्यासमोर मांडला की " भावांनो, आता तरी सांगा की कुठे चाललो आहोत आपण? त्याने अनेक वेळेस विचारलेल्या ह्या प्रश्नास आता तरी उत्तर देणे भागच होते. तसेही आता त्याचे माघारी जाण्याची संभावना नव्हती आणि खरी माहिती त्याला कळाली तरीही तो घाबरणारा किंवा माघारी जाणारा नव्हता. त्यामुळे त्याला खरी हकिकत सांगण्यास आता काहीही अडचण नव्हती.

       "भावा आता आपण चाललोय डायन बघण्यासाठी" संकेत ने हसुन सुरुवात केली. नकळत हसरा चेहरा करून अनिल ने खात्री करण्यासाठी मला विचारले ' भावा खरं आहे का हे'? मी पण हसून सम्मती दर्शक मान हलवली. त्याला पूर्णपणे काही माहिती नव्हती त्यामुळे मी त्याला घाबरविण्याच्या उद्देशाने जरासा गंभीर चेहरा करून सांगु लागलो " आपण जिथे चाललोय ते संपूर्ण गाव डायनचे आहे, आणि कुठल्याही बाहेरील लोकांनी त्या गावामध्ये प्रवेश केल्यास बाहेर येण्याचे चांसेस जवळपास कमीच. दैवयोगाने कुणी जर चुकून बाहेर आलाच तरी ते त्याचे सुदैव नसून दुर्देवच आहे. कारण ती डायन त्या व्यक्तीसोबतच त्याचा पाठलाग करत येते. आणि त्याचा शेवट केल्याशिवाय परत जात नाही". आता त्याचाही चेहरा बघण्यासारखा झालेला होता. आम्हाला हसु येत होते परंतु ते न दाखवता आम्ही तसाच गंभीर चेहरा करन बसलो होतो. " अरे काय भैताळांनो तुम्हाले इकडेच येण्यास सुचले होते का? जगण्याचे जीवावर आले वाटते लेकाहो तुम्हाले" हा विदर्भी टोमना त्याने जरा हसतच मारला. त्यानंतर त्याला थोडक्यात सर्व माहिती सांगितली. गप्पा करता करता रात्रीचे जवळपास बारा वाजले होते. प्रवास करून थकलो होतो आणि आता झोप पण येत होती. बोलता बोलता आम्ही केव्हा झोपी गेलो आम्हालाही कळाले नाही. 

      शेजारी झालेल्या कसल्यातरी हालचाली मुळे आणि बारीकश्या पुटपुणाऱ्या आवाजाने मला जाग आली. आवाज आता हळू हळू वाढू लागला होता. तसेच अंधारातत्या त्या आकृतीची हालचाल पण वाढू लागली होती. रात्रीच्या त्या भयान शांततेमध्ये तो येणारा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. ' जसे आले तसे इथूनच मागे जा, नाहीतर तुमच्यातील एकही जिंवत माघारी जाणार नाही' तो भितीदायक आवाज थांबला आणि मध्येच घाबरलेल्या आवाज सुरू झाला 'जय हनुमान ग्यान गुण सागर, जय कपिस तिहू लोक उजागर'. मी आता पुरता घाबरून गेलेलो होतो. माझ्या डाव्या बाजूला संकेत झोपला होता आणि उजव्या बाजूला अनिल. होणारी हालचाल आणि येणारा आवाज हा डाव्या बाजूने येत होता आणि तो आवाज संकेतचा होता हे मी ओळखले होते. परंतु त्याला हात लावून उठविण्याची हिम्मत होत नव्हती. त्यामुळे माझा थरकापणारा हात मी अनिलच्या दिशेने वळवला. त्याला हलवून बघितले, आवाज दिला, चिमटेही घेतले परंतू आमचे विदर्भकर उठण्यास तयार नव्हते. इतक्या प्रयत्नांनी एक वेळ कुंभकर्ण उठला असता परंतू अनिल काही उठला नाही. इतक्या वेळ शांत झालेला आवाज पुन्हा मोठ्याने येऊ लागला . '' भावांनो थांबा मला पण येऊद्या. मला इथे सोडून जाऊ नका. ये सोड सोड जाऊदे मला. नाही येणार पुन्हा केव्हाच इकडे" आणि मध्येच हसण्याचा आवाज. मला काय करावे कळेना. शेवटी असेल नसेल तेवढी हिम्मत एकजुट करून संकेतला दोन्ही हातांनी पकडले आणि जोरजोरात हलवून उठविण्याचा प्रयत्न करू लागलो. पाच दहा मिनिटांच्या प्रयत्नांनंतर संकेतच्या स्वप्नातील डायन निघून गेली. आणि आता कुठे शांत होऊन त्याने डोळे उघडले होते. मी रूम मधील लाईट चालू केला. तेव्हा आता कुठे जरा बरे वाटले होते. संकेत घामाने पूर्ण ओलाचिंब झालेला होता.संकेत पूर्णपणे उठून बसल्यानंतर मी त्याला थोडेसे शांत आणि रिलॅक्स होण्यास सांगितले. त्याला हसूनच विचारले "भावा काय झाले होते"? त्यानेही जरासे हास्य करून उत्तर दिले की "भावा डायन आली होती स्वप्नात, बोलत होती की इथूनच माघारी जा". मला खूप हसू येत होते. त्याला म्हणालो की "बघ किती नशिबवान आहेस तू. तुला भेटाण्यासाठी डायन स्वता इतक्या दूर दिडशे किमी आलि"

      माझे हसण्याचे काम अजूनही चालूच होते. परंतू संकेतच्या चेहऱ्यावरील गंभीरपणा तसाच होता. त्याच्याकडे बघून त्याच्या डोक्यात सध्या कुठल्या विचारांचे काहूर चालले होते हे माझ्या लक्षात आले. त्याला विश्वासात घेऊन म्हणालो " भावा तू डोक्यामध्ये कसलीही शंका न बाळगता बिनधास्त बोल, तुला जे बोलायचे आहे ते.मला माहिती होते स्वप्न डायनचे पडलेले आहे म्हटल्यास डोक्यात विचारही डायन व भूतांबद्दलच येत असतील. त्याने पहिला प्रश्न केला "भावा तुझ्या मते भूत हे खरोखर असू शकते का ? त्याच्या ह्या प्रश्नाला मी प्रत्युतर देत म्हणालो "हे बघ भावा, मी आजपर्यंत ही गोष्ट अनुभवली नाही. माझ्या आयुष्यात असा एकही प्रसंग घडलेला नाही की जो भूत ही संकल्पना खरोखर असल्याची ग्वाही देऊ शकतो. त्यामुळे भूत हे आहे किंवा नाही या प्रश्नाबद्दल माझ्याही मनात गोंधळ आहे. परंतू एक मत सांगायचेच झाले तर, जसे देव आणि दानव आहेत, जसे उजेड आणि अंधार आहे, त्याचप्रमाणे जशी सकारात्मक ऊर्जा [पॉझिटिव पॉवर] ब्रम्हांडात उपलब्ध आहे तशीच नकारात्मक ऊर्जा [ निगेटिव पॉवर] पण असू शकते". त्यावर त्याने दूसरा प्रश्न केला " तुझ्या मताप्रमाणे भूत आहे किंवा नाही याची शाश्वती नाही. परंतू आपण अत्तापर्यंत अनेक लोकांनी अनुभवलेल्या भूताबद्द्लच्या ऐकलेल्या काहण्यांवरून, बाधितलेल्या मुव्हीस आणि हॉरर सिरेयलवरून, आणि भूताबद्दल वाचलेल्या माहितीवरून, थोडा वेळ भूत आहे असे गृहित धरले तर आता तुझ्यामते भूत कसे तयार होत असेल? त्याच्या ह्या प्रश्नावर मि माझे मत व्यक्त करू लागलो " जे लोक ज्ञानी व पुण्यवान असतात, जे लोक लोंकाचे चांगले करण्याच्या सकारात्मक दृषिकोनातून आयूष्य जगलेले असतात अश्या लोकांचा आत्मा मृत्यूनंतर स्वर्गात जातो. जे लोक पापी आणि अधर्मी असतात, लोकांचे नेहमी वाईट करण्याचा ज्याचा दृष्टिकोन असतो, अश्या लोकांचा आत्मा मृत्यूनंतर नरकात जातो. जे लोक पापी आणि नकारात्मक ऊर्जेचे असतात. ते अपूर्ण इच्छा, अकांक्षा आणि प्रतिशोध ह्या भावनेने स्वतःचे आयूष्य संपवून टाकतात ते लोकांचा आत्मा मृत्यूनंतर ना स्वर्गात जातो ना नरकात. तो आत्मा प्रतिशोध घेण्याच्या हेतूने ह्या ब्रम्हांडातच भटकत असतो. माझ्यामतानुसार आपण त्यालाच भूत म्हणतो". मि सांगितलेली प्रत्येक माहिती तो व्यवस्थितपणे ऐकत होता. जसे जसे आमचे संभाषण पुढे जाऊ लागले तसे तसे त्याच्या डोक्यातील भूताबद्दलचे प्रश्न बाहेर येऊ लागले. मि पुढे काही बोलण्याच्या अधिच त्याने पुढचा प्रश्न विचारला " भूत ब्रम्हांडात दिवसरात्र उपस्थित असते. परंतू लोकांना त्याचा अनुभव फक्त रात्रीच्या वेळेसच का येतो? त्याचा प्रश्नही तसा योग्यच होता. मि त्याच्या प्रश्नास समर्पक उतर देऊ लागलो " मी याआधी सांगितल्या प्रमाणे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती उपस्थित आहेत. नकारात्मक ऊर्जची शक्ती सकारात्मक ऊर्जेपेक्षा खूप कमी असते. दिवसा ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, गतीज ऊर्जा यांसारख्या अनेक सकारात्मक ऊर्जा कार्यरत असतात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्याला दिसून येत नाही. एक समान असणाऱ्या किंवा विभिन्न असणाऱ्या दोन उर्जांचे जर आपण आकलन किंवा परिक्षण केले तर असे दिसून येते की, ज्या उर्जचे प्रमाण जास्त असते तीच ऊर्जा आपल्याला दिसते, जाणवते, किंवा ऐकू येते. उदाहरण द्यायचे झाले तर बघ आपण ध्वनी ऊर्जेचे उदा. बघू. आपण एका रूम मध्ये बसून मोबाइल वरती गाणे ऐकतो आहे. ते गाणे आपल्याला स्पष्टपणे ऐकू येत आहे. एवढ्यात कुणीतरी टिव्ही चालू केला आणि टिव्ही वरील गाणी होमथिएटर मध्ये चालू केले. आता आपल्याला मोबाइल वरील गाण्याचा आवाज ऐकू येईनासा होतो. कारण होमथिएटरवर चालू असलेल्या गाण्याच्या तीव्रतेचे प्रमाण हे मोबाईल चालू असलेल्या गाण्याच्या तिव्रतेपेक्षा जास्त होते. त्याचप्रमाणे प्रकाश ऊर्जेचे उदा बघू. रात्री लुकलुकणारे तारे दिवसा सुद्धा अवकाशात उपस्थित असतात. परंतू सूर्याच्या ऊर्जेचे प्रमाण हे ताऱ्याच्या ऊर्जेच्या प्रमाणापेक्षा अधिक असते त्यामुळे सूर्य उगवल्यानंतर आपल्याला तारे दिसणे बंद होते. त्याचप्रमाणे नकारात्मक उर्जेच्या शक्तीचे प्रमाण हे वातावरणातील सकारात्मक उर्जेच्या शक्तीच्या प्रमाणापेक्षा खूप कमी असल्यामुळे आपल्याला ती ऊर्जा दिवसा दिसत नाही किंवा जाणवतही नाही. आता जसजशी रात्र होत जाते तसतसे गाड्यांची वर्दळ, हॉर्न चा आवाज, लोकांचा बोलण्याचा आवाज हळूहळू कमी होत जातो तसतसे वातावरणातील ध्वनी उर्जेचे प्रमाण कमी होते. घरातील लाईट पण बंद होतात. त्यामुळे प्रकाश ऊर्जाही कमी होते. रात्री बारा ते एक वाजेपर्यंत वातावरणातील सर्व सकारात्मक ऊर्जोंचे प्रमाण हे नकारात्मक ऊर्जेच्या प्रमाणापेक्षा कमी होते आणि त्यामुळे ह्याच काळामध्ये लोकांना त्या नकारात्मक ऊर्जेची आकृती म्हणजेच भूत दिसू लागते. परंतू ही ऊर्जा अश्याच लोकांना दिसू शकते ज्यांची सकारात्मकता खूप कमी आणि नकारात्मक दृष्टिकोन जास्त असतो. संकेतला आता त्याच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली होती. भूताबद्दल असलेला दृषिकोन बदलला होता. त्यामुळे त्याचा गंभीर झालेला चेहरा आता हसरा दिसत होता. रात्रीचे दोन वाजले होते. प्रवास आणि जागरण पण जास्त झाल्यामुळे आम्ही दोघेपण बोलता बोलता केव्हा निद्राधिन झालो कळालेच नाही. 

      "भावांनो उठा रे, सात वाजलेत. किती वेळ झोपता अजून? डायन वाट बघत असेल आपली. उठा लवकर निघूयात" विदर्भकरांच्या कडक आवाजाने सकाळी जाग आली. तसे आम्ही कुठे फिरायला गेल्यानंतर कोंबड्याची बांग देण्याचे काम अनिलचे असायचे. सगळ्यात आधी उठून सगळ्यांच्या झोपेची हाच वाट लावायचा, परंतू हे फक्त फिरायला गेल्यावरच. इतर वेळेस हा शेजारचा कोंबडा ओरडून ओरडून मेला तरी नऊ दहा वाजेपर्यंत उठायचा नाही. उठल्यानंतर पटपट सर्व आटोपले. कारण डायनच्या शोधामध्ये अजून बराचसा प्रवास करायचा होता. नाश्ता करून गरमागरम चहा प्यायलो. आणि नऊ वाजेच्या दरम्यान हरंगुळ च्या दिशेने आमचा प्रवास पुन्हा चालू झाला. वळणा वळणाचे रस्ते घेत, छोटे- मोठे घाट पार करून खर्डा- पाथरूड मार्गे भूम ला पोहचलो. इथून हरंगुळ जवळपास एकशे विस किमी अंतरावरती होते. सूर्य जसजसा माथ्यावर येऊ लागला, तसे उन्हाचे चटके अधिकच बसू लागले. भूम पासून पुढे निघाल्यानंतर डोंगर उताराचा भाग लागतो. तेथील लोकांनी डोंगरांना कडा वैगेरे बांधून पाण्याची साठवण अतिशय उत्तम प्रकारे केलेली होती. जेणेकरून त्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड देणे सोपे जात असेल. ऊर्जा निर्मितीसाठी उंच डोंगरावरती पवनचक्क्या देखिल होत्या. तसे तर घाटातील प्रवास म्हंटले की, जरा भितीच. एकतर डोंगर तोडून दुहेरी रस्ता बनवणे म्हणजे खर्चिक आणि कठिण काम असते. त्यामुळे घाटांचे रस्ते सहसा एकेरीच असतात. घनदाट झाडींमधून वळणावरती समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन चालणे हि पण मोठी कसरतच असते. परंतू पक्ष्यांच्या किलबिलाटामधे, उंच उंच झाडांच्या थंडगार सावलीमधून, आणि मित्रांच्या गप्पा,गोष्टी, आणि विनोदांचा आनंद घेत, घनदाट झाडीतील रस्त्यावरील वाकडी-तिकडी वळणे घेत केव्हा घाट संपवून सपाट रस्त्याला लागलो समजलेच नाही.

      दुपारचे बारा वाजले होते. तेरखेड, येरमाळा, तोडवले, मुरुड ही गावे ओलांडून आम्ही बोरगाव मध्ये पोहचलो होतो. तेथील रस्त्यालगतच्या एका हॉटेलमध्ये आम्ही नाष्टा करण्यासाठी थांबलो. तसे तर जेवणच करणार होतो. परंतु प्रवासात चहा, कॉफी, उसाचा रस, आणि शितपेय, प्यायल्यामुळे कुणालाच जास्त भूख नव्हती. गरमागरम तिन प्लेट भजी आणि पावांची ऑर्डर दिली. आम्ही हास्य विनोदांचा आधार घेत पुन्हा डायन विषयीच्या गोष्टी करू लागलो. " भावा, समजा डायन दिसलीस तर वाचण्यासाठी काय करण्यास हवे"? अनिलने विचारले. " जास्त काही नाही रे भावा. हनुमान चालीसा म्हणायची आणि तिच्या डोक्याचे काही केस उपटून घ्यायचे. जोपर्यंत ते केस आपल्याजवळ असतात ना, तो पर्यंत काही करू शकत नाही ती". संकेत ने हसून उतर दिले. त्यावर मी पण हसूनच म्हणालो " केस वैगेरे उपटण्याच्या किंवा तोडण्याच्या नादाला लागु नकारे बाबांनो. डायन दिसल्यास गुपचूप पटकन पाय पकडा आणि म्हणा ताई एवढ्यांदा माफ कर, पुन्हा नाद नाही करणार तुझा. खरे तर आम्ही लातूरला चाललेलो होतो परंतू चुकून तुझ्या गावात शिरलो. आम्हाला हानुमान चालिसा येत नाही त्यामुळे आम्ही तुला त्रास पण देणार नाही. इतके ऐकल्यानंतर आलीच बिचारीला दया तर किमान वाचण्याचे चांसेस आहेत. परंतू केस वैगेरे तोडण्याच्या नादाला लागू नका. आपल्या अंगावर एकही केस ठेवायची नाही ती. मिशी सकट उपटून टाकेल." आम्ही तिघेही खूप खळखळून हसलो.थोड्यावेळाने केस विस्कटलेली, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेली, डोळे खोपणीत जाऊन बसलेले, काळ्याभोर रंगाची आणि कडक आवाजाची एक महिला भज्यांची प्लेट घेऊन आमच्या टेबलच्या बाजूने उभी राहिली. आम्ही तिघांनीही थोडेस गंभीरपणे तिच्याकडे बघितले. नंतर आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो. मी हसुनच त्याना धिर देत म्हणालो "घाबरु नका रे भावांनो. डायन सुंदर स्त्रीचे रूप घेऊन येते. असे डायन खऱ्या रुपात डायन बनून नाही येत". " ये कारट्यांनो, तुम्हाला मी काय चेटकिन दिसते व्हय रं" असे बोलून भज्यांची प्लेट धाडकन टेबल वरती आपटून ती बाई निघून गेली. आम्ही तिघेही पोट दूखेपर्यंत हसलो. " भावा,चेटकिन म्हणजे काय रे"? संकेत ने प्रश्न केला. मी उत्तर दिले " चेटकिन म्हणजेच डायन. डाकिनी, चेटकिन, काली,डायन ही सर्व नावे डायनची आहेत. हिंदू धर्मातील ब्रम्ह पुरान, मार्केंडेय पुरान, भागवत पुराण ह्या संस्कृत ग्रंथामध्ये डाकिनी ह्या नावाचा उल्लेख आहे. डाकिनी ह्या संस्कृत शब्दापासूनच डायन ह्या इंग्रजी शब्दाची निर्मिती झाली".

       नाष्टा झाल्यानंतर हॉटेलच्या मालकाला आम्ही हरंगुळला जाण्याचा मार्ग विचारला. त्याने थोडा वेळ आमच्याकडे गंभीरतेने बघून रस्त्याकडे हात करून हातानेच आम्हाला हरंगुळला जाणारा रस्ता दाखवला.बोरगाव पासून हरंगूळ पंचविस किमी अंतरावरती होते. आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. इथून पुढील प्रत्येक किमी आमच्यामधील डायनबद्दल जाणून घेण्याची इच्छा,हूरहूर आणि भिती वाढवत होता. आम्ही बार्शी-लातूर हायवे वरून प्रवास करत होतो. रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे गाडीचा खडखड आवाज वाढला होता. परंतू तरीही गाडीच्या खडखड आवाजापेक्षा हृदयाचा धडधड आवाज स्पष्ट ऐकू येत होता. रस्त्यावरचा 'हरंगुळ तीन किमी'नावाचा बोर्ड वाचून मी गाडी थांबवली. हायवे वरून डावीकडे वळण घेऊन एक सूनसान खडखडी रस्ता हरंगूळ च्या दिशेने जात होता. हरंगुळला जाणाऱ्या त्या कच्या खडखडी रस्त्याने मी गाडी वळवली. आणि आम्ही हरंगूळच्या दिशेने निघालो. का कुणास ठाऊक परंतू आतापर्यंत मोठ्या उत्साहाने चालू असलेल्या गप्पांची जागा वातावरणातील भयानकतेने आणि गाडीच्या खडखडीने घेतली होती. जसजसे हरंगूळ जवळ येत होते तसतसा गाडीचा वेग कमी आणि विचारांचा आणि हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढला होता. ओसाड, सुनसान आणि खडखडी रस्त्याने काही काळ प्रवास केल्यानंतर आम्हाला थोडेसे दूर काही कौलारू घरे आणि झोपड्या दिसू लागल्या. इतक्या अंतरात आम्हाला रस्त्यावर आणि शेतात एकही माणूस किंवा कुठली जनावरे दिसली नाही. गावाच्या अगदी जवळ आल्यानंतर एक महिला डोक्यावर पाण्याचा भरलेला हंडा घेऊन गावाच्या दिशेने जातांना दिसली. गावाबद्दल थोडीफार माहिती विचारण्यासाठी आम्ही तिच्याजवळ जाऊन गाडी थांबवली. " मावशी, समोर दिसतेय तेच हरंगूळ गाव आहे का? मी तिला विचारले. क्षणभर थांबून तीने मानेनेच होकार दिला आणि पुन्हा पुढे चालू लागली. " ओ ताई, ह्या गावाचा काही वेगळा इतिहास आहे का"? अनिलने तिला थांबवत विचारले. "म्हणजे"? तीने थांबून विचारले. " म्हणजे भूतांबद्दल ह्या गावचा काही इतिहास आहे का? संकेतने विचारले. " असले काही ऐकलेले नाही मी, आणि असेल काही इतिहास तर तो मला माहित नाही". इतके बोलून ती जोरात पावले टाकत जाऊ लागली.ह्या महिलेकडून आम्हाला काहीही माहिती मिळणार नाही याची मला पूर्ण खात्री झाली होती. अनिल पून्हा तिला काही प्रश्न विचारणारच तितक्यात मी मुद्दाम चेहरा गंभीर करून त्याला गप्प बसण्याचा इशार केला. आणि तिथून एकदम जोराने गाडी पळवली. मागे बसलेल्या दोघांनाही समजेना की ह्याने इतक्या जोराने गाडी का पळवली असेल? न राहून त्यांनी सोबतच मला प्रश्न केला की, " तिथे तु नेमके काय बघून गाडी पळवली?" मी मनातल्या मनात हसलो. त्यांना तसे कळू न देता म्हणालो " तिचे पाय बघून". आता मात्र दोघांचाही चेहरा बघण्यासारखा झाला होता. भिती चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती. "भावा, खरं सांग खरोखर तिचे पाय उलटे होते का?" मी त्यांना जास्त घाबरून न देता म्हणालो " रिलेक्स भावांनो, मजाक केली मी. तुम्ही समजता तसे काही नव्हते". हे ऐकून त्यांच्या भितीदायक चेहऱ्यावरती पून्हा स्मित हसू फुलले. 

      येताना दूरवरून जे काही कौलारू घरे आणि झोपड्या दिसत होत्या, अगदी त्याच ठिकाणी आम्ही येऊन पोहचलो होतो. 'हरंगुळ शुन्य किमी' हा बोर्ड वाचल्यानंतर हेच रहस्यमय हरंगुळ गाव आहे याची आम्हाला पूर्णपणे खात्री झाली. परंतू ह्या गावाबद्दलचे खरे रहस्य नेमके कुणाला विचारावे हा आमच्या पुढिल प्रश्न होता. कारण गावात एकही जण फिरताना दिसत नव्हता. सर्व दरवाजे बंद. कुणीतर आपल्याला माहिती देईल ह्या उद्देशाने गावात गाडीवरून आम्ही फिरु लागलो. थोडेसे पुढे गेल्यानंतर आम्हाला हरंगुळ ग्रामपंचायत दिसली. आत मध्ये तलाठी वैगेरे अधिकारी खूर्चित बसलेले होते. त्यांनाच काहीतरी विचारावे हा विचार आला परंतू " नवी नवरी आणि सरकारी माणुस यांसोबत कितीही प्रेमाने बोलले तरी हे कुठलेच रहस्य सांगणार नाहीत' हे मला माहिती होते. म्हणून मी गाडी न थांबवता तसेच पुढे निघून गेलो. एका घराजवळील रस्त्याच्या बाजूला एक आजोबा उभे दिसले. यांच्याकडून आपल्याला नक्कीच काहीना काही माहिती मिळेल या उद्देशाने मी आजोबांजवळ गाडी थांबवली. "नमस्कार बाबा, तब्बेत कशी आहे तुमची?" मी विचारले. गुरुजीला मुलाची प्रगती,तरूणाला त्याच्या बायकोचा स्वभाव, नोकरी करणाऱ्याला त्याचा पगार, आणि म्हताऱ्याला तब्बेतीबद्दल विचारले असता "बरे आहे" हेच उत्तर मिळणार हे मला माहिती होते. परंतू बोलायला सुरवात तर तब्येतीबद्दल विचारूनच करण्यास हवी. या उद्देशाने मी आजोबांना प्रथम तब्बेतीबद्दल विचारपूस केली. त्यावर आजोबा म्हणाले " बरी आहे भाऊ तब्बेत. ह्या वयात अशीच असते तब्बेत ". त्यावर संकेत ने दुसरा प्रश्न विचारला "पाऊस पाणी कसे आहे१" आजोबा म्हणाले" बऱ्याच दिवसांपासून पाउस कमी झालाय. पिण्यापुरते पाणी आहे फक्त". जास्त वेळ न घालवता मी आजोबांना विचारले " बाबा, आम्ही ऐकून आहोत की, ह्या गावामध्ये पूर्वी भूत, चेटकिन वैगेरे होते. खर आहे का हे? आजोबांनी इकडे तिकडे बघून कुणी नाही याची खात्री करून घेतली. आणि आधीच्यापेक्षा जरा खालच्या आवाजात सांगू लागले. " हो खरे आहे हे. फार वर्षांपूवी ह्या गावामध्ये जादूटोणा,तंत्रमंत्र आणि भूताटकी चालायची. परंतू मला आठवते तसे ह्या गावात मला तरी कधी भूत दिसले नाही. पंधरा विस वर्षापूर्वी इथे त्या कोपऱ्यावर एक घर दिसते ना. त्या घरामंध्ये एक बाई मंत्र शिकायची आणि भूताटकी करायची. एके दिवशी तिने गावातील एक मुलगा तिथे नेऊन मारला. त्याच्या अवतीभोवती लिंबू मिरच्या ठेऊन मंत्र शिकत होती. ही गोष्ट काही गावकऱ्यांनी बघितली आणि फोन करून पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांनी त्या बाईला पकडून निले. आणि अजून पण ती तुरुंगात आहे, असे मी ऐकून आहे". आजोबा सांगत होते आणि आम्ही एकदम लक्ष देऊन सर्व ऐकत होतो. " तुम्हाला सांगतो मुलांनो.." आजोबांचे बोलणे थांबवत मध्येच कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला " कोण आहे तिकडे, कुणासोबत बोलताय तुम्ही? आणि काय नको नको ती बडबड करताय? घरातून एक व्यक्ती रागारागात बाहेर आला आणि आजोबांना घेऊन घरात गेला. कदाचित तो आजोबांचा मुलगा असेल. आजोबा नेमके काय सांगणार होते? याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती. परंतू मध्येच उपस्थित झालेल्या त्या माणसाने आमची उस्तुकता नाराजीमध्ये परावर्तित केली होती.

     अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे आम्ही नाराज होऊन पूढे निघालो दुसऱ्या माहिती सांगणाऱ्या व्यक्तीच्या शोधात. अनेक व्यक्तींना आम्ही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. परंतू आमचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले होते. आम्ही पूर्ण गाव बघायचे ठरविले. तिथे कौलारू घरे आणि पाचटाच्या छत असलेल्या बऱ्याच झोपड्या होत्या. अर्धवट पडलेली बरीच बोचरी घरे होती. गावाच्या बाजूने काही ठिकाणी घनदाट काही ठिकाणी विरळ झाडी होती. गावाच्या पश्चिमेला शिवशंकराचे पुरातन मंदिर होते.मंदिराच्या चोहोबाजूंनी मोठमोठी घनदाट वडाची झाडे होती. त्यांच्या लोबंकळलेल्या मोठ्मोठ्या पारंब्यांकडे बघून डायनच्या वेण्या असल्याच भास होत होता. गावाच्या पूर्वेला रेल्वेची पटरी होती. आणि बराचसा भाग ओसाड. दक्षिणेकडून तर आम्ही आलेलोच होतो. पूर्व पश्चिम बाजू पण बघून झाली होती. त्यामुळे आम्ही उत्तरेला निघालो. गावामधून अशीच एक ओबडधोबड, सुनसान, वाट गावामधून निधून वेडीवाकडी वळणे घेत दूर कुठेतरी डोंगरामध्ये लुप्त झालेली दिसत होती. त्याच वाटेने आम्ही पुढे निघालेलो होतो. थोडेसे पुढे गेल्यानंतर आम्हाला दूरवर काही शेळ्या आणि मेंढ्या चरताना दिसल्या. निश्चितच तिकडे शेळ्या चारणारा कुणीतरी असेल आणि ह्या गावाबद्दल तो काहीतरी माहिती देईल ह्या उद्देशाने शेळ्या चरत असलेला ठिकाणी येऊन आम्ही शांबलो. रस्त्याच्या कडेलाच उभा असलेल्या त्या व्यक्तीला आम्ही हातांचा इशारा करून आणि आवाज देऊन बोलून घेतले. तो पण जरासे हासतच आमच्या दिशेने चालत येत होता. त्याच्या हस्यामध्ये आम्हाला आशेचे शेवटचे किरण दिसत होते. तो जवळ आल्यानंतर आम्ही नमस्कार करून, त्याला त्याच्या आरोग्याबद्दल, शेळ्यामेंढ्या बद्दल आणि घरच्याबद्दल थोडीफार चौकशी केली. त्याचा हसरा चेहरा आणि मनमिळाऊ स्वभाव बघून आम्ही त्याला प्रश्न विचारला " ह्या गावाचा डायन आणि भूताबद्दल काय रहस्य आणि इतिहास आहे?" ह्या प्रश्नानि त्याच्या चेहऱ्यावरील हसू काही क्षणात मावळून गेले होते. आणि आता तो एकदम रागात येऊन आला होता त्या वाटेने मागे चालला होता आणि चालता चालता आमच्याकडे बघून म्हणत होता " काही इतिहास बितिहास नाही इथे. काहीही विचारू नका पुन्हा, आले तसे जा निघून माघारी". तो रागात जात होता हे बघून आम्हाला हसू पण आले होते. आणि तो शेवटी जे बोलला त्याने आमचे हसू मावळले होते. एकंदरित आजोबांकडून मिळालेली माहिती पुरेशी मानून आम्ही माघारी परतण्याचे ठरविले. आम्ही आता माघारी निघालो होतो. गाव पण संपत आले होते. तितक्यात कसला तरी मोठा बॅनर बघून अनिलने गाडी थांबविण्यास सांगितले. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे बघू लागलो. तो शहाना गाडी थांबवून रस्त्याच्या कडेला असलेला दशक्रिया विधीचा बोर्ड वाचू लागला. मी त्याच्याकडे बघून हसून म्हणालो " अनिल, उद्या आहे तो दशक्रिया विधी. आणि जेवणासाठी आपल्याला इथे एक दिवस थांबून परवडणार नाही". त्यावर तो म्हणाला "तो दशक्रिया विधिचा बॅनर आहे. इतकेच बघितले तूम्ही. परंतू दशक्रिया विधी कुणाचा आहे,त्या व्यक्तिचा फोटो बघितला का"? फोटोकडे बघून तर आमचे हातपाय पूर्णपणे गळाले. डोळे विस्फारले, भुवया उंचावल्या, आणि आवाक् होऊन आम्ही बराच वेळ त्या फोटोकडेच बघत राहिलो. कारण हरंगुळ गावाबद्दल ज्या आजोबांनी आम्हाला माहिती दिली होती. हुबेहूब त्या आजोबांसारखाच फोटो त्या बॅनर वर होता. आम्ही जास्त त्या बॅनर बद्दल चर्चाही केली नाही, आणि विषयाचे जाळे पण पसरवले नाही. कारण जे आजोबा आमच्या सोबत बोलले ते आजोबा जिवंत आहेत हे सत्यच होते. ह्या बॅनरवरील आजोबा एकतर त्या आजोबांचे जुळे भाऊ असतील किंवा त्यांच्या सारखाच दिसणारा दूसरा व्यक्ती. गावाच्या बाहेर आल्यानंतर गाडी थांबवून पुन्हा एकदा हरंगूळ गाव बघितले. आणि परतीचा प्रवास सुरु केला. आता सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. सूर्याच्या ओझरत्या किरणांसोबतच हरंगुळ गाव आमच्या नजरेतून ओझरू लागले होते. 

      आलो त्याच मार्गाने परत जाण्यापेक्षा आम्ही मार्ग बदलून जाण्याचे ठरविले. लातूर इथून जवळ होते त्यामुळे ते पण बघून जाण्याचे ठरविले. बार्शी लातूर हायवे ने आम्ही लातूरला जाण्यासाठी निघालो. रस्त्यावरील खड्डे बघून वाटले की,लातूरचा विकास पण खड्यांतच बुडालेला असेल. परंतू जसे आम्ही लातूर मध्ये पोहचलो, तेव्हा आम्हाला कळाले की लातूरचा विकास खड्ड्यांत बुडलेला नसून, खड्डे बुजवून बनलेला आहे. स्वच्छ शहर होते. खड्ड्यांरहित चांगले रस्ते होते. इथेही आम्ही पोलिसांच्या नजरा चुकवून लातूर शहर सोडले.

     सूर्य आता मावळतीकडे झुकला होता. आणि प्रवास अजून खूप दूरचा होता. त्यामूळे मी गाडीचा वेग जरा वाढवला. शिवछत्रपतींचे कुळदैवत असलेल्या भवानी मातेचे देवस्थान तुळजापूर इथून ऐंशी किमी अंतरावरती होते. जवळ आलेलोच आहोत तर भवानी मातेचे दर्शन घेऊन जाऊ ह्या उद्देशाने आम्ही तुळजापूरला जाण्याचे ठरविले. सायंकाळ च्या वातावरणात मित्रांच्या गप्पा गोष्टींमध्ये सूर्याचे सोनेरी किरणे अंगावरती घेउन, अधूनमधून येणाऱ्या हवेच्या थंडगार झुळकीचा आनंद घेत तुळजापूरच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला होता. मजल-दरमजल करत, सांयकाळच्या थंडीत गरमागरम चहा पित आणि हास्यविनोद करत आम्ही सूर्य मावळण्याच्या काही मिनिटे आधीच तुळजापूर गाठले होते. गाडी पार्किंगला लावून आम्ही भवानी मातेच्या मंदिर परिसरात प्रवेश केला. मंदिराच्या दारापासून भावीकांची दर्शनासाठी बरिच मोठी रांग लागलेली होती. मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या नळाच्या पाण्याखाली हातपाय आणि तोंड धुवून आम्ही फ्रेश झालो. आणि दर्शनासाठी रांगेत जाऊन उभे राहिलो. प्रवास करून पाय पण बरेच दुखायला लागले होते. भाविकांच्या रांगेत नुसते उभे जरी राहिलो ना की देवापर्यंत पोहचविण्याचे काम आपोआप तेच करतात. पोहचविण्याची पद्धत मात्र थोडी वेगळी आहे. बिचारे प्रेमाने धक्का बुक्की करत लोटत बरोबर मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत घेवून जातात. गाभाऱ्यात थोडीशी मोकळी जागा असल्या कारणाने आणि भाविकांची गर्दी थोडीफार कमी असल्या कारणाने गाभाऱ्यात थोडावेळ उभे राहून दर्शन घेता आले. जर केव्हा गर्दी जास्त असली तर हे भाविक आपल्याला प्रेमाने ढकलत ढकलत सरळ मंदिराच्या बाहेर घेऊन येतात. ते काहीही असो परंतू आम्ही शांतपणे दर्शन घेऊन बाहेर आलो होतो. मंदिराच्या बाहेरील परिसरात आम्ही काही फोटो काढले.सायंकाळचे सात वाजले होते. भूख पण लागली होती. परंतू आमच्या तिघांच्याही पॉकेट मधील पैसे संपले होते. पैसे तिघांच्याही एटिएम कार्डमध्ये होते. परंतू मोदी साहेबांच्या नोटाबंदिमुळे प्रकरणामुळे आमच्या नोटापण बॅकेंच्या एटीएम मशीनमध्ये बंदी झालेल्या होत्या. पैसे काढण्यासाठी एका एटीएम मशीन जवळ गेलो. मंदिराच्या बाहेर जेवढी मोठी रांग होती त्याच्या दूप्पट मोठी रांग इथे लागलेली होती. त्यामुळे आम्ही दुसऱ्या एटीएम च्या शोधात निघालो. सर्व एटीएम समोर एवढी मोठी रांग बघून वाटायचे की इथे एटिएम मशीन नसून मंदिरच आहे. रस्त्यात लागणाऱ्या पूढिल गावामध्ये असलेल्या एटीएम मधून पैसे काढता येतील हा विचार करून आम्ही तुळजापूर सोडले. 

       सैराट हा मराठी चित्रपट नुकताच रिलिज होऊन लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाचे चित्रिकरण 'करमाळा' ह्या गावी झाले होते. आम्ही जाताने करमाळ्याला पण जाण्याचे ठरविले.तुळजापूर पासून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर आम्ही रस्त्याने चाललेल्या एका व्यक्तीला करमाळ्याला जाण्याचा मार्ग विचारला. त्याने आम्हाला सांगितले कि, "आता बराच उशीर झालेला आहे. ह्या रस्त्याने सातच्या नंतर कुणीही दुचाकीवर प्रवास करत नाही. इथून पुढे बार्शी पर्यंत जवळपास पन्नास ते साठ किमी अंतरामध्ये एकही गाव नाही. बराच रस्ता जंगलातून गेलेला आहे काही रास्ता ओसाड आहे. ह्या रस्त्याने रात्रीच्या वेळेस बरेचसे खून आणि लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सकाळपर्यंत तुळजापूरमध्ये मुक्काम करा आणि सकाळी जा करमाळ्याला". आम्हाला तर करमाळ्याला जायचेच होते. त्या व्यक्तीने माहिती दिल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करून आम्ही पुन्हा बार्शीच्या दिशेने प्रवास सुरु केला. आता ह्या व्यक्तीने दिलेली माहिती खरी आहे की खोटे बघण्यासाठी आम्ही रस्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या टपरीवाल्याला बार्शिला जाण्याचा मार्ग विचारला. आधीच्या व्यक्तीने सांगीतलेले होते तीच माहिती आणि तुळजापूरमध्ये मुक्कामाचा सल्ला ह्या व्यक्तीने दिला. त्याचेही आभार व्यक्त करून आम्ही पुढे आगेकूच केली. त्या दोघांनी सांगितलेल्या भयानक रस्त्याने आम्ही प्रवास चालू केला होता. " भावा, जर समजा आपल्याला कुणी आडवलेच तर काय करायचे?" संकेत ने प्रश्न विचारला. मी म्हणालो " भावांनो, कसलीही काळजी करू नका. असे काहीही होणार नाही. रस्त्याला खड्डे खूप मोठे असल्या कारणाने गाडी तीस पस्तीच च्या वेगापेक्षा जास्त वेगाने पळवू शकत नाही. कदाचित चुकून तसे काही घडण्याचा अंदाज आलाच तर, आपण गाडी रस्त्यातच सोडून आडमार्गाने जंगलात घुसू. इतक्या अंधारात आपण कुणाला सापडणे शक्यच नाही. राहिला विषय गाडीचा तर ती दुसरी घेता येईल. सर सलामत तो पगडी पचास". मी सांगीतलेल्या प्लॅनला दोघांनीही समर्थन दर्शविले. त्या रस्त्याने गाडी चालवणे म्हणजे जरा कठीणच काम होते. गुडघ्या पर्यंत पाय जातील इतके मोठ मोठ खड्डे होते रस्त्यात. पंधरा विस मिनिटानंतर एखादे चारचाकी वाहन त्या रस्त्याने जाताना दिसायचे. दुचाकी तर विषयच नव्हता. दुतर्फा वाढलेली झाडे त्या अंधारात अजूनच काळोख पसरवण्याचे काम करत होते. आमच्या गाडीच्या लाईटचा प्रकाश पण कमी होता. मध्येच काही माकडे रस्त्यातून पळायची. दूर कूठेतरी कोल्यांचा विव्हारणारा आवाज वातावरणातील शांततेचा भंग करून मनावर भितीचे शहारे उठवत होता. आम्हाला हेच खरेखुरे हरंगूळ असल्याचा भास होत होता. अश्या परिस्थितीमध्ये पन्नास साठ किमी अंतर पार करून आम्ही बार्शी मध्ये पोहचलो होतो.

      बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. रात्रीच्या दहा वाजता आम्ही बार्शीत पोहचलो होतो. ह्या ठीकाणी आम्हाला ऐटिएम मधून पैसे मिळतील याची थोडीफार खात्री होती. पण इथेही सर्व ऐटिएम मशीन हे मंदिरच वाटत होते. आणि एवढी मोठी रांग लावून सुद्धा ह्या मंदिरातील देव पावेल की नाही याची खात्री नव्हती. म्हणून एका मंदिराच्या रांगेत संकेतला उभे करून आम्ही दोघे छोटी रांग असलेले मंदिर शोधू लागलो. ह्या तालुक्यामध्ये ॲक्सिस, एसबिआय, बिओआय, सेंन्ट्रल, एमओआय इत्यादी सर्व देवतांची मंदिरे होती. परंतू काही मंदिरे बंद होती, काही चालू होती तर तिथली देवता पैसेच देत नव्हती, काही मंदिरातील देवता तर खूप वेळ वाट बघायला लावायची आणि नंबर आला की मंदिरच बंद व्हायचे. शेवटी एसबीआय च्या एटीएम मध्ये बराच वेळ वाट बघितल्या नंतर आम्हाला तिथून पैसे मिळाले. रात्रीचे जवळपास साडेदहा वाजले होते आणि हॉटेल पण बंद झालेले होते. भूख तर खूप लागलेली होती. पूर्ण बार्शी फिरुन पण आम्हाला चालू असलेले हॉटेल दिसले नाही. शेवटी आम्ही तसेच निघणार तेवढ्यात रस्त्यात एक स्विटचे दुकान उघडे दिसले. जिलेबी, पाववडा, वडापाव, बर्फी इ. नाष्ट्याचे पदार्थ पोटभरे पर्यंत खाल्ले. तेथील मालकाला आम्ही करमाळ्याला जाणारा रस्ता विचारला. आणि पून्हा बार्शी ते करमाळा रस्त्याने आमचा प्रवास सुरु झाला. 

      रात्रीचे अकरा वाजले होते.आमचा प्रवास चालू झालेला होता. तसे बार्शी आता हळूहळू मागे पडत चालले होते. बार्शी ते करमळा हे किमान सत्तर किमी चे अंतर होते. पुन्हा मोठमोठे खड्डे आणि वेड्यावाकड्या वळणांनी मी गाडी पळवत होतो. परांडा, साल्से ही गावे ओलांडून एक वाजेच्या दरम्यान आम्ही करमाळा मध्ये पोहचलो. गावामध्ये संपूर्ण शांतता होती. अधूनमधून कुत्र्यांचा भूंकण्याचा आवाज रात्रीची शांतता भंग करत होता. आम्ही ते मंदिर शोधत होतो. जिथे 'सैराट झाल जी' ह्या गाण्याची रेकॉर्डींग झालेली होती. रात्री आम्हाला तीथे काही दोन तीन माणसे फिरताना दिसली. त्यांना आम्ही मंदिराचा पत्ता विचारला. आम्ही जिथे उभे होतो तिथून अगदी थोड्या अंतरावरतीच ते सुप्रसिद्ध कमलादेवीचे पुरातन मंदिर होते. मंदिराच्या बाहेरील परिसरात आम्ही गाडी पार्क केली. मंदिराचे अवलोकन करू लागलो. खरोखरच भव्य आणि उत्कृष्ट असे हे कमलदेवीचे मंदिर होते. उत्तरेकडील बाजूने मोठे प्रवेशद्वार होते. रात्री बराच उशीर झालेला होता त्यामुळे ते प्रवेशद्वार बंद होते. मंदिराचा पुजारी बाहेरच झोपलेला होता. आमचा आवाज ऐकून तो उठला. त्याचा स्वभाव चांगला होता. त्याने आमच्यासाठी मंदिराचे ते भले मोठे लाकडाचे दार उघडले. आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतले आणि त्या पुरातन मंदिराचे निरीक्षण करू लागलो. पुजाऱ्याला त्या मंदिराबद्दलची माहिती विचारल्यावर आम्हाला माहिती झाले की, हे प्राचीन मंदिर तुळजापुरच्या देवीचे दुसरे निवासस्थान मानले जाते. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराला छहान्नव पायऱ्या, छहान्नव खांब, आणि छहान्नव चित्रे आहेत. नवरात्रीत इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. मंदिर बघून झाल्यानंतर करमाळा एसटी स्टँड वर गेलो. तिथून परश्या आणि आर्ची पळून गेले होते. ते एसटी स्टँड आम्ही पळत पळतच बघितले. आणि आता अहमदनगरच्या दिशेने निघालो होतो. 

    आर्ची आणि परश्याने ज्या बस स्टँड वरून करमाळा सोडला. ते स्टँड बघून झाल्यावर आम्ही पण करमाळा सोडला आणि जळगाव मार्गे अहमदनगरला निघालो. रस्त्यांची तर पूरेपूर वाट लागलेली होती. हा रस्ता डांबराने कमी आणि खडुयांनीच जास्त बनलेला होता. एकेरी रस्ता, मोठमोठे खड्डे, गाड्यांनी उडालेलेली धूळ, आणि ट्रकांचा डोळ्यांवर पडणारा हॅलोजन सारखा लख्ख प्रकाश यांमुळे गाडी चालवण्यास खूप व्यत्यय येत होता. थंडी सुद्धा एवढी वाढली होती की, त्यामुळे हळूहळू शारिराच्या संवेदना कमी होऊ लागल्या होत्या. कधीकधी ब्रेक दाबण्यासाठी सुद्धा पायांची हालचाल करणे अवघड झाले होते. एकेरी रस्ता असल्या कारणाने समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मोठ्या वाहनांना जाऊ देण्यासाठी आम्ही कितीतरी वेळेस गाडी रस्याच्या खाली उतरवली. वाढलेल्या ह्या थंडीने आम्हाला धगधगत्या शेकोटीची आणि गरमागरम चहाची जाणीव करून दिली. तशी आता शेकोटीची नितांत गरज भासू लागली होती. जळगावच्या पुढे निघाल्यानंतर रस्त्यालगत असलेल्या एका छोटाश्या हॉटेल समोर आम्हाला एक शेकोटी पेटलेली दिसली. शेकोटी बघून खूपच बरे वाटले. आम्ही शेकण्यासाठी बराच वेळ तिथे थांबलो. हॉटेलचा मालक हॉटेलच्या समोर असलेल्या खाटावरती आम्हाला झोपलेला दिसला. बराच वेळ उठविण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमच्या प्रयत्नांना यश मिळाले. काकांनी आमच्यासाठी मस्त गरमागरम तीन चहा बनवले. चहा पित पित, काकांसोबत गप्पा मारत आम्ही थोडावेळ तीथे शेकत बसलो. काकांना विचारल्यानंतर आम्हाला समजले की नगर इ्थून अजून पन्नास किमी दूर आहे.त्यांनी आम्हाला तीन चार वाजेच्या दरम्यान झोपेतून उठून गरमागरम चहा बनवून दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले आणि पुन्हा नगरच्या दिशेने निघालो. 

     पहाटे साडेपाच वाजता आम्ही नगरमध्ये पोहचलो. रात्रभर त्या काळोखी अंधारात आम्हाला रस्त्याने आमची गाडी सोडली तर, एकही गाडी दिसली नव्हती. आता थोडेफार उजडायला लागले होते, त्यामुळे हळूहळू गाड्यांची वर्दळ वाढायला लागली होती. आता आम्ही नगर ओलांडून संगमनेर कडे निघालो होतो. पहाटेच्या जोरदार थंडीमुळे आमचे गप्प झालेले तोंड उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसोबत उघडले होते. पुन्हा आमच्या गप्पा, गोष्टी चालू झाल्या. आमची गाडी आता पूर्ण थकली होती. कितीही रेस केली तरी तिला वाटेल तेव्हढीच ती पळायला लागली होती. गिएर कुठला ही असो गती मात्र एकच होती. गाडी पळेल त्या गतीने पळवत आम्ही सकाळी आठ वाजता लोणी मध्ये पोहचलो. निमगाव जाळी मध्ये पाटलांच्या घराण्यात जन्माला आलेला आणि डेंगळ्यांच्या परिवारात वाढलेला आमचा मित्र गणेश पाटिल राहत होता. रस्त्यालतच त्याचे घर आहे. जाताना त्याला भेटून जावे म्हणजे आपल्या चहा नाष्ट्याचे पण काम होईल ह्या विचारांनी आम्ही त्याच्या घरी गेलो. तिथे आम्ही नाष्टा केला चहा सोबत गणेशचा निरोप पण घेतला आणि प्रवासातील आमच्या अंतिम ठिकाणी संगमनेरला जाण्यास वाटचाल केली. 

     अखेर मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आम्ही संगमनेरला पोहचलो. रविवारी दुपारी दोन वाजता चालू झालेला आमचा प्रवास मंगळवारी सकाळी अकरा वाजता संपला होता. ह्या दोन दिवसामध्ये आम्ही जवळपास नऊशे किमी प्रवास केला होता. संगमनेर मध्ये रूमवर पोहचल्यानंतर मस्त गरम पाण्याने अंघोळ करून फ्रेश झालो. एवढ्या दुरच्या प्रवासामुळे शरीराचा एक ना एक अवयव दुखू लागला होता. रात्री झोप न झाल्यामुळे आता डोळ्यांवर झोपेची तंद्री येत होती. त्यामुळे आता मी निवांत बिछान्यावर पडलो होतो. शरीराने मी बिछान्यावरती होतो, आता शरीराचा जरी प्रवास थांबला होता, तरी मनाचा प्रवास मात्र चालूच होता. आम्ही डायनच्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी आणि हरंगुळ गाव बघण्यासाठी गेलेलो होतो. डायन आणि भूत तिथे असल्याचा कुठलाही ठोस पुरावा आम्हाला मिळाला नाही. आम्ही जिथे गेलो ते ठिकाण जरी रहस्यमय नसेल तरी आमचा प्रवास मात्र रहस्यमय झाला होता. 

𝕯𝕾


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror