हरायचे का हरवायचे?
हरायचे का हरवायचे?
वीणा दहावी होईपर्यंत सगळं सुरळीत चालू होत, गजबजलेली चाळ, घाणेरडे जिने, वाळवण्याचा वास, वाळत घातलेले कपडे, पण सगळेच शेजारी माहितीचे असल्यामुळे काळजीचे काहीच कारण नव्हतं. माधुरी, वीणा, आणि अनिता दहावी एकदमच पास झाल्या.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शॉर्टहँड टायपिंग कोर्स करून कुठे नोकरी मिळते का याचा शोध सुरू झाला. चाळकरी बाप, प्रत्येक घरी चार किंवा पाच मुलं, राहायला दोन खोल्या, कॉमन संडास. शिक्षणाची कुठली चैन?
दहावी केली हेच पुष्कळ. त्यातून मुलींना शिक्षण फुकट होतं त्यामुळे फक्त युनिफॉर्म चा खर्च होई. फालतू लाड काही नाही.
कॉलेजची फी, बस साठी लागणारे पैसे, कपडे पुस्तक, ही चैन गरिबांना परवडणारी नव्हती. त्यातून शैलजा बारावीपर्यंत शिकली, तिला जर बरी नोकरी मिळाली. त्यावेळेला मुंबईच्या कापड गिरण्या चालू होत्या. कुठे ना कुठे तरी लिखाण काम करण्यासाठी मुली लागतच, कधीकधी पॅकिंगसाठी, किंवा अजून काही उद्योगासाठी मुली लागत. शिक्षणाची अटच नसे.
माधुरी वीणा आणि अनिता यांचे भविष्य ठरलेलं होतं, परळच्या एका औषधी कारखान्यांमध्ये पॅकिंगची नोकरी त्या तिघींना मिळाली, शैलजा त्याच कारखान्यामध्ये लेखनिक म्हणून कामाला होती.
आता बापाच्या जोडीला मुलींचे पण हजार दीड हजार रुपये घरात यायला लागले, स्वतःच्या लग्नाचा खर्च स्वतः करायचा असा मुंबईच्या मुलीं पुढे नेहमीच नियम असायचा. त्यातून नोकरी करणाऱ्या मुलींना स्थळ पण बरी यायची.
शेवटी मुलींचे नशीब काय, एका चाळीतून दुसऱ्या चाळीमध्ये.
पण माधुरी आणि अनिताने पुढे शिकायचे ठरवले, त्यांचे बघून वीणाने देखील कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. सकाळचे दोन पिरेड कसेतरी अटेंड करून मुली धावत पळत कारखाना गाठत. त्या तिघींची धडपड बघून त्यांच्या आई-वडिलांनी मदत करायचे ठरवले,
" अगं डिग्रीसाठी चार वर्षे लागतील, कसं होणार सगळं. आणि पास नाही झाल्या तर?" वीणाच्या वडिलांनी आपल्या पोटातले मळमळ ओकली.
" काका हळू हळू या मुली 1,1 विषय काढतील, तुम्ही काळजी करू नका, एखाद्या वर्षी जास्त लागेल, पण जर डिग्री हातात आली तर नोकरी पण चांगली मिळेल आणि स्थळ पण चांगले येईल." शैलजा म्हणाली.
चाळीतल्या सगळ्या काकू आणि मावशी यांना मात्र मुलींचे कौतुक होते, शिकत आहेत ना, धडपड करता येत ना, करू देत.
त्यापेक्षा म्हाताऱ्या मात्र टीव्हीवरच्या बलात्काराच्या बातम्या जोरजोरात ऐकत. आपल्या नातींना आणि मुलींना सतत घरी बसण्याचे सल्ले देत.
पहिले दोन वर्ष पार पडली. पण आता जरा गडबड होऊ लागले, मुली वयात आलेल्या, अतिशय सुंदर दिसत होत्या, जाताना-येताना टारगट मुले, शिट्या वाजवत, कधी कधी त्यांचे फोटो काढत, आता मात्र त्यांचे घरात शेर असणारे बाप काळजीत पडले.
सकाळी जाताना काही गडबड नसे पण संध्याकाळी येताना अंधार पडे, यायच्या रस्त्यावरती पूर्वी किराणा मालाची दुकानं होती, सगळी परिचित होती,
पण मध्यंतरी काय झाले काय माहिती, अचानक किराणा मालाची दुकानं जाऊन तिथे काही लोकांनी गॅरेज सुरू केले, गॅरेज म्हणजे ड्रायव्हर आले, मेकॅनिक , त्यांच्या हाताखालचे, वाटेल ती माणसं यायला लागली.
तिथे एक बेकरी देखील निघाली. लोकांच्या विरोधाला न जुमानता बेकरी वाल्यांनी बेकरीच्या बाजूलाच मटणाचे दुकान काढले.
बेकरी मधला पाव विकणाऱ्या देखील देखील मुली यायच्या सुमारास दरवाजाशी येऊन उभा राही. मुद्दामच त्यांच्याभोवती फिरे, कधी धक्के मारी.
चाळकरी बाप आता कमजोर पडू लागले. मुलींना घरी बसण्याचे सल्ले देऊ लागले.
शैलजा चा भाऊ संध्याकाळच्या वेळेस एका व्यायामशाळेत नोकरी करे, बऱ्याच वेळेला मुलींना तो सोबत करत असे. शेवटी त्याने मुलींना काही डावपेच शिकवले. बरेच सल्ले पण दिले.
मुली नाजूक होत्या, वयाने पण लहान होत्या, बाळबोध वळणाच्या होत्या , त्यांच्या शरीरावरून केलेली कॉमेंट त्यांना सहन होत नसे.
" तुमचं वय किंवा तुमची ताकद ही तुमची शक्ती नाही, तुम्ही मनाने ठरवायचं, त्या घाणेरड्या लोकांबरोबर हरायचे आहे का हरवायचे आहे. ताकद मनाची असते. रस्ता कोणाच्या बापाचं नाही, रस्त्यावरती त्यांचे गॅरेज आहे म्हणून घाबरून जाऊ नका." शैलजा चा भाऊ समजावत असे.
पावसाळी दिवसांमध्ये एक तर गॅरेज पाशी तेल पाणी चिखल यामुळे फार घसरडे होत, एक दिवशी वीणा त्याच्यावरून घसरून पडली, आणि तिला उचलण्यासाठी म्हणून गॅरेज मधल्या बऱ्याच मुलांनी तिला हात लावून घेतला. रडवेली वीणा तशीच कारखान्यात गेली.
येताना मात्र मुली हाताला हात धरून आल्या.
अचानक गल्ली मधले दिवे गेले, गॅरेज मधल्या लोकांना तेच पाहिजे होतं, त्यांनी मुलींची लगट करायला सुरुवात केली.
गॅरेज मधले लोक आणि मटनाच्या दुकानातले मुलींचा रस्ता अडवून उभे राहिले. काही केल्या त्यांना जाऊ देईना.
पहिला वार शैलजाने केला, ठरवल्याप्रमाणे तिने तिखटाची भुकटी मुलांच्या डोळ्यात फेकली.
दुसरा वार वीणाने केला, आपल्या पर्स मधल्या भरून आणलेल्या दगडांनी , पर्स जड झाली होती, गोफणी सारखी फिरवत तिने खटकन एकाच्या थोबडा वरती वार केला. तो कोलमडला.
झालेल्या अपमानामुळे तिसरा पुढे आला, त्याच्या नाजुक भागावर एक लाथ मारून अनिताने त्याला खाली पाडले.
मारामारी करणं सोपं नव्हतं , भावंडांबरोबर मारामारी मध्ये जीवाला धोका नसतो, पण इथे जेव्हा स्वत्वाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा अंगातली पूर्ण ताकद एकवटून सज्ज व्हावे लागते.
त्यातल्या त्यात माधुरी नाजूक होती, तिला खाली पाडून तो घाणेरडा माणूस तिच्याशी लटक लटक लटकत होता,
आपल्या हातातली बांगडी काढून मुठीत धरून माधुरी नेम धरून त्याच्या नाकावर मारली, डाव्या हाताने केसाला मुद्दाम लावलेली पिन काढून माधुरीने त्याच्या कानात खुपसली.
अचानक झालेल्या परत हल्ल्यामुळे तो मुलगा गांगरून गेला, कानात घुसलेली पिन त्याचा पडदा फाडून गेली. माधुरी जागेवरून उठली,
डोळ्यात तिखट टाकत, शैलजाने कमरेचा बेल्ट काढला, तिच्या भावाने सांगितल्याप्रमाणे, बेल्ट स्पेशल बनवला होता, गोल गोल गोल बेल्ट फिरवत, अंधाराचा फायदा घेत, चारी मुलींनी त्या सगळ्यांना तुडवून काढले.
त्यांच्यापैकी कोणीतरी जाऊन गॅरेज चे दिवे लावले, मुलींचे ओरडणे, किंचाळण्याचा आवाज आणि मुलांचे विव्हळण्याचा आवाज ऐकून चाळीतली माणसं जमा झाली होती. गोष्टीची कल्पना येऊन सगळ्या काकू, मावशी, घरातली लाटणे आणि झाडू घेऊन आल्या होत्या,
सगळ्यांनी मिळून त्या घाणेरड्या लोकांना धोपटले.
पोलीस च्या सायरन चा आवाज झाला, माधुरीने नेम धरून दिव्यावर दगड मारला, अंधारामध्ये मुली आपल्या घरी निघून आल्या.
गरम पाण्याने अंघोळ करुन गरम खिचडी खाऊन मुली झोपल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी चाळीतले माणसे मुलींना सोडण्यासाठी म्हणून बस स्टॉप पर्यंत आली, बघतात तो काय, गॅरेजला भलं मोठं कुलूप लागलेलं होतं. पोलिसांनी त्या मुलांना उचलून नेलं होतं.
दुर्गा, अंबामाता, महिषासुरमर्दिनी यांची पूजा आपण करतो, कारण त्यांनी असुरांना हरवले. असुर अजून संपले नाहीत, प्रत्येक मुलीने जेव्हा वेळ येईल तेव्हा महिषासूर्मर्दिनी चे रूप धारण केलं पाहिजे. देवीची नुसती आरती गाण्यापेक्षा त्या आरतीची चिंगारी प्रत्येक मुलींनी स्वतःमध्ये जागवली पाहिजे .
