Neelima Deshpande

Abstract

3.4  

Neelima Deshpande

Abstract

गर्वाचे घर खाली !©®

गर्वाचे घर खाली !©®

4 mins
622


"मी रोज असे लाखो रुपयांचे पेमेंट करते, दिवसभर अनेकांचे चेक फाडते. मला काय एक छोटा चेक देता आला नसता का? त्यामुळे याकरता छोट्या रकमेचा चेक माझ्याकडून घ्यायला माझ्या दारात माणूस पाठवू का? असे मला विचारणारा फोन मला आलेला यापुढे अजिबात चालणार नाही. मग तो दुकानदार कोणताही असो. तुझ्या ओळखीच्या दुकानदाराला सुद्धा सांगून ठेव. मुळात तुला सामान आणायचे होते तर तू जितके पैसे नेले होतेस तितकेच वापरून सामान घेऊन निमूट घरी यायचे ना! तुझ्यामुळे उगाच मला ऐकून घ्यावे लागले..... 'महिना झाला तरी अजून पैसे मिळाले नाहीत म्हणून तुम्ही लगेच जो चेक आम्हाला मागच्या महिन्यात पाठवणार होतात तो घ्यायला मी स्वत:च आलो आहे!"


मिताली फोनवर तिच्या धाकट्या जावेला हे सारे ऐकवत होती, तिचे एका शब्दानेही ऐकून न घेता! तिने ऐकले असते तर तिलाही समजले असते की हे पैसे मितलीनेच, तिच्या माहेरी भरलेल्या सामानाचे आहेत म्हणून चेक घ्यायला तो माणूस आला आहे. मितालीचा गैरसमज झाला की जावेने आणलेल्या सामानाचे पैसे न्यायला तो आलाय. जावेजवळ घरात थोडेफार पैसे असते तर तिने ते बिल परस्पर लगेच दिलेही असते. पण स्वत:च्या माहेरी वर्षभराचे सगळे धान्य भरल्याने, आठ - दहा हजार रुपये बिल झाले होते. इतके पैसे तर घरात कधीच ठेवलेले नसायचे. सासूला, सासऱ्यांनी त्यांचे ATM कार्ड जपून ठेवायले दिले त्यावरही ती कब्ब्जा करुन बसली होती. त्यामुळे थकलेले पैसे घेण्यासाठी शेवटी नाईलाजाने दुकानदार तिच्याकडे गेला होता. हा तोच दुकानदार होता ज्याला मोठ्या दिमाखात या थोरल्या जाऊबाई बोलून विसरल्या होत्या की,


"मी अदितीची थोरली जाऊ. आम्ही कारखानदार आहोत. मला दुकानात येऊन घासाघीस करायला आणि माल निवडायला वेळ नसतो. तुम्ही एक पत्ता लिहून घ्या आणि वर्षभराचे गहू, तांदूळ, डाळी, तेल हे सगळे मी सांगते तितके किलो मी दिलेल्या पत्त्यावर घरपोच पाठवा. मी उद्याच तुम्हांला तुमचा चेक पाठवते."

हे बोलून त्या त्यांच्या कामात असे काही आपण बोललो आहोत याची नोंद करायची सपशेल विसरल्या. फोनवर हे बोलताना त्यांना फॅक्ट्रीतल्या स्टाफ समोर शान मारत आपली ऐपत दाखवायची होती. आपल्या गर्वाला आळा घालण्याची तिला जशी त्या दिवशी गरज भासली नाही तशी दुर्दैवाने आजही पुरता एकटेपणा आल्यावरही भासत नाही किंवा ती दाखवू इच्छीत नाही.

मिताली ही तिच्या माहेरी मोठी लेक होती म्हणून सगळी भावंड तिला मान देत. तोच तोरा तिने मग सासरीही मिरवला. मोठेपणा फक्त वयाने किंवा मानाने नव्हे तर आपलेपणाने, प्रेमाने, इतरांना जीव लावून मिळवायचा असतो हे तिने कधी आजवर लक्षातच घेतलं नाही.

तिला तशी गरजही पडली नाही म्हणा, कारण जी कोणी चार-पाच मित्रमंडळी किंवा नातेवाईक त्यांच्याजवळ नाईलाजाने सुरुवातीच्या काळात टिकली होती, तीही नंतर तिचा आणि तिच्या नवऱ्याचा स्वार्थीपणा पाहून दूर चालले होते. महागडे गिफ्ट देऊन ते त्यांची अनुपस्थिती भरून काढण्याचा प्रयत्न करत होते. पण दुर्दैवाने तो फोल ठरला. आर्थिक परिस्थितीनुसार भेटवस्तू कमी अधिक किमतीची असू शकते पण ती देताना, उपकाराची भावना, दाखवलेला आणि मिरवलला मोठेपणा किती दिखाऊ होता आणि किती कोरड्या मनाने केलेला होता हे जसे समजत गेले तशी ती थोडीफार जवळ असलेली माणसे सुद्धा पांगली, परत त्यांच्या जगात कधीच न येण्यासाठी. आडातून पोहऱ्यात येत तसं सासूचे काही गुण आलेले होते. खरेतर थोड्याफार प्रमाणात त्या दोघींच्या सवयी आणि स्वभाव सारखेच होते. त्यामूळे मग कोण कोणाला झाकणार आणि कोण, कुणाला जगात उघडे पाडणार? सगळा सावळा गोंधळ! दिवस हळूहळू पुढे सरकत होते. माहेरी आलेली नणंद त्यावेळी मितालीच्या टारगेटवर होती.

" साक्षी अग, अजून सव्वा महिना झाला नाही तुला. त्यामुळे वॉशिंग मशीन मधे छोट्या बाळाचे आणि तुझेही कपडे धुवायला टाकू नकोस. ती मशीन तुझ्या दादाने खास माझ्यासाठी घेतली आहे. तू तुमचे कपडे हाताने धूत जा नाहीतर चार महिने बाई लावून घे. तुझे कपडे तू वेगळे धुण्यासाठी लावले तरी मशीन तर खराब होतेच ना बाळाच्या शू केलेल्या दुपट्यांनी आणि बिल पण जास्त येते!"

मिताली तिच्या नणंदेला, थंडीत कपडे मशीनमधे धूतले तरी दटावत होती. नणंद असो वा मितालीच्या पाठोपाठ घरात आलेल्या सक्ख्या व चुलत धाकट्या जावा असोत, मितालीच्या आणि मोठ्या दिराच्या विचित्र स्वभावापुढे सर्वांना झुकणे भाग होते. कारण त्यावेळी सत्ता म्हणा वा मान दोन्ही गोष्टी ओढून ताणून त्यांनी मिळवल्या होत्या त्यांच्या आर्थिक सुबत्तेमुळे !


सगळे दिवस सारखे नसतात आणि सगळी माणसेही! हे मोठ्यामनाने समजून घेणारे नातेवाईक आणि मित्र आजही त्यांच्याशी नाते ठेवण्याचा प्रयत्न स्वत:च करत आहेत कारण त्या सगळ्यांना माणुसकी आणि नाते टिकवणे महत्वाचे वाटते. जसजसा काळ बदलला, तसे सगळ्यांची आयुष्य प्रत्येक क्षणागणिक बदलली. त्यांचे विचार अधिक प्रगल्भ झाले. त्यांच्या माणसांच्या श्रीमंतीने, आयुष्यातल्या समाधानाच्या व्याख्या बदलल्या.

नात्यांच्या समृद्धीने ते सारे जीवनात बहरले. त्यामुळे त्यांच्यामते मिताली आणि तिच्या सोबतचेही बदलले असतील असे त्यांना वाटते. जुन्या मतभेदांना जे खरे तर त्यांच्यामुळेच झाले होते आणि वाढले देखील, सारे विसरले तरी मिताली मात्र कवटाळून बसली आहे. आज सगळे नातेवाईक एकमेकांकडे सुखदुखांत एकत्र येतात आणि नाते जपतात. नात्यांचा जल्लोष साजरा करतात आणि एकमेकांचा आधार बनून राहतात. सगळ्या नंणदा, जावा, दीर अन जावई जेंव्हा त्यांचा मुला - बाळासह एखाद्या कार्यासाठी कुणा एकाकडे जमतात तेंव्हा दूरदूर पर्यंत कोणी मितालीचा आणि तिच्यासोबत तिला साथ देणाऱ्यांचा विषयही काढत नाही.

पंधरावीस कार्य झाली की, एखाद्या ठिकाणी ते धावती भेट दिली तर देतात. माणूस आपल्या गर्वाने किती एकटा पडू शकतो याचे हे जिवंत उदाहरण पाहिले की 'गर्वाचे घर खाली या म्हणीचा अर्थ तंतोतंत पटतो. सणासुदीला अन् काहीवेळा हॉस्पिटलमधे एकटेपणा सहन केलेला असूनही, पैशाच्या जोरावर आयुष्य जगलेल्या त्यांना समजलेला नाही हे जाणवते. त्यांच्याकडे पाहून कीव करत अनेकांच्या नजरा दुसरीकडे वळतात तेव्हा तरी ते भानावर येतील अशी प्रार्थना त्यांच्या जवळच्यांना करावी वाटते कारण त्या म्हणीचा अर्थ त्यांना मात्र चांगलाच समजतो आणि उमजतोही !




* सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत.

*आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह जरूर करावी.

*आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract