Pandit Warade

Drama Tragedy Classics

3  

Pandit Warade

Drama Tragedy Classics

घुसमट-१ (बकुळा)

घुसमट-१ (बकुळा)

8 mins
218


  रसिक वाचक मायबाप हो, नमस्कार!

माझ्या या अगोदरच्या कथामालिका, ती वाट बघत्येय, झपाटलेले घर, मला काही सांगायचंय, या कथामलीक आणि इतर कथा तुम्ही अक्षरशः डोक्यावर घेतल्यात. त्या बद्दल सर्वांचे आभार. आता अगदी आगळ्या वेगळ्या विषयावरची कथामालिका आपल्या समोर सादर करत आहे, जिचं नाव आहे घुसमट. जीवन जगत असतांना, नोकरी करतांना, संसार करतांना अनेक वेळा माणसाला आपले मन मारून जगावे लागते. वेगवेगळ्या क्षेत्रातील मानवी मनाची घुसमट आपल्या समोर ठेवत आहे. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. ही नम्र विनंती.


१)बकुळा


   बकुळा! ऐन पंचविशीतली तरुणी. लग्नानंतर दोनच वर्षात पतीचं निधन झालं. चार महिन्याच्या बबन्याला तिच्या भरवशावर ठेवून तिचा धनी देवा घरी निघून गेला होता. तेव्हा पासून ऐन तारुण्यात विधवा झालेली बकुळा, गावा मधल्या लोकांच्या वासनांध पापी नजरा चुकवत स्वतःच्या पावित्र्याला सांभाळत जगत होती.

   एक दीड एकर शेती होती. कुणाचा बैल बारदाना घेऊन ती शेती करून घ्यायची. पोटा पुरतं सहजच मिळायचं. 'बबन्या आणि ती', दोनच पोटं. खायला तरी किती लागणार? त्यातल्या त्यात बबन्या शाळेत जायला लागल्या पासून त्याचं काही धान्य, डाळी, तांदूळही मिळायचं. त्यात दोघांचं बऱ्यापैकी भागायचं. परिस्थिती माणसाला खंबीर बनवते म्हणतात , ते तिच्या बाबतीत खरं ठरलं होतं. ती मागच्या आठ वर्षां पूर्वीचा भूतकाळ आठवू लागली.

   आई वडिलांची एकुलती एक मुलगी बकुळा. लग्न करून सासरला आली. संस्कारी मुलगी, चार भावांच्या भरल्या घरातली, चुलत्या काकूंच्या हाता खाली राबलेली, लक्ष्मीवाणी सुंदर, नाकी डोळी नीटनेटकी. सासरी बऱ्यापैकी रमली. बाबुराव, आईवडिलांचा एकुलता एक, लाडका मुलगा. पाच एकर जमिनीचा मालक. निर्व्यसनी, सद्वर्तनी, चारित्र्य संपन्न असलेला बाबुराव, बकुळाला प्राणापेक्षाही जपत होता. दोघांच्या सुखात चाललेल्या संसाराला कुणाची दुष्ट दृष्ट लागली कुणास ठाऊक? एका वर्षात तिच्या सासऱ्याला एक दुर्धर आजार जडला अन् चार महिने अंथरून धरून शेवटी मरण पावला. सासऱ्यांच्या पाठोपाठ सासुनेही परलोकाचा मार्ग धरला. आई वडिलांची जागा घेतलेले सासू सासरे गेले आणि बकुळाच्या संसाराची परवड व्हायला सुरुवात झाली.

   आई वडिलांच्या मृत्यूची बाबुरावने चांगलीच हाय खाल्ली. वडिलांच्या आजारावर झालेल्या खर्चा पायी कर्ज काढावे लागले होते. त्यातच बाबुरावला आई वडिलांच्या मृत्यूचे दुःख सतावत होते. ते विसरण्या साठी तो मित्रांच्या संगतीने दारूचे व्यसन करायला लागला. घरातील सुख शांती हळूहळू निघून गेली. कर्जाची रक्कम वाढत गेली. सावकाराने कर्जफेडी साठी तगादा लावला. त्यासाठी दोन एकर जमीन विकावी लागली.

   जमीन विकून सावकाराचे कर्ज फेडून उरलेली रक्कम घरात खर्चायला उपयोगी पडेल असे वाटून तिच्या जवळ ठेवली होती. मात्र बाबुराव आणखीच दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. रोज रोज दारू पिण्यासाठी बकुळा कडून पैसे घ्यायचे, मित्रांसोबत दारू प्यायची. तिच्या जवळचे पैसे संपले तसे त्याने आणखी दीड एकर शेती विकून टाकली. त्या पैशातून कुठे तरी रात्र रात्र पिऊन पडायचं. कधी तरी, कुणीतरी उचलून आणून टाकायचं. खायची प्यायची बिलकुल शुद्ध नसायची. आणणारे काही चांगले असतील असं नाही. तरुण बकुळा कडे वासनांध नजरेने बघायचे. कुणी तर काही तरी निमित्त काढून तिच्या शरीराला स्पर्श करायला बघायचा. कधी तरी दारूच्या नशेत झिंगलेला कुणी तिच्याशी अश्लील भाषेत बोलायचा. बकुळाला हे सारं सहन होत नव्हतं. पण सांगणार कुणाला? ऐकणारा धड असायला हवा ना? त्याला सांगायला गेलं तर उलट तो हिलाच नावं ठेवायचा. हिलाच पापी ठरवायचा. नाही नाही ते आरोप करायचा. तिच्या पवित्र चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा. म्हणतात ना, 'पावसानं झोडपलं अन् नवऱ्यानं मारलं तर तक्रार करायची कुणाकडं?' दिवस गेलेल्या बकुळाला रोजच अशा अनेक पापी नजरांचा बलात्कार सहन करावा लागत होता.

   एक दिवस तिने मोठ्या हिमतीने नवऱ्याला आपल्या पोटातल्या बाळा विषयी सांगितले. वाटलं होतं, बाळ येणार म्हणून त्याला आनंद होईल. त्याचे डोळे उघडतील. तो ताळ्यावर येईल. पण झाले ते उलटेच.

    "कलंकिनी, कुठं तोंड काळं केलंस? मी शुद्धीत नसतांना कुठं पालथी झालीस? हे पोर माझं न्हायी. ज्याचं आसल त्याच्या कडं जा. जा चालती हो माझ्या घरातून." असं म्हणत त्याने तिला खूप मारलं. हाताला धरून घराबाहेर काढलं. आधारा साठी बकुळा माहेरी आली. चार पाच दिवस राहून पुन्हा सासरला आली. लग्न झालेल्या स्त्री साठी माहेर केवळ पाहुणपणानं येण्या साठीच असतं. तिथं कायमचं थोडंच राहता येतं? तिची ही अवस्था तिच्या आई वडिलांना सहन झाली नाही. हृदयविकार असलेले वडील लाडक्या कन्येचे दुःख पाहून जोराच्या झटक्याने गेले. त्याच काळात कोरोना सारखा भयानक आजार जगात धुमाकूळ घालत होता. वडिलांच्या अंत्यसंस्कारा साठी आलेल्या कुण्या नातेवाईकां कडून कोरोनाचे लोण त्यांच्या घरापर्यंत आले. आई आणि भाऊ आजारी पडले, त्यांना तपासण्या साठी आलेल्या डॉक्टरांनी तपासले असता ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांना दवाखान्यात भरती केले गेले. घरातल्या इतर सदस्यांना आणि बकुळाला घरातच पंधरा दिवस क्वारंटाईन करण्यात आले. तिथे येण्यास कुणालाही परवानगी नव्हती. दवाखान्यात असलेली आई आणि भाऊ यांना चार दिवसाच्या अंतराने मृत्यूने गाठले. त्यांचे शवसुद्धा अंतिम संस्कारा साठी परत मिळाले नाही. दुःखाने खचलेल्या बकुळाला डॉक्टरच्या परवानगीनेच सासरला यावे लागले.

   बकुळा सासरला आली. ती आता पूर्णपणे कोलमडली होती. तिकडे माहेरची परिस्थिती तशी, इकडे अशी. 'तिकडे आड, इकडे विहीर'. दारुड्या नवऱ्याचा संसार करणं केवढं अवघड असतं? हे त्या संसार करणाऱ्या स्त्रीलाच कळतं. 

   बकुळाला मन मोकळं करायला कुठेच जागा नव्हती. नवऱ्याच्या व्यसनामुळे तिच्याकडे कुणी बायकाही येत नसत. तिलाही कुठे जाता येत नव्हतं. त्यामुळे तिची फारसी कुणाशी मैत्रीच झाली नव्हती. नवरा ऐकण्याच्या पलीकडे गेलेला होता. सांगून उपयोग नव्हता. पालथ्या घड्यावर पाणी. आणि अशाच परिस्थितीत तिचे दिवस भरत आले. एक दिवस तिच्या पोटात खूप दुखायला लागलं. बाबुराव त्या दिवशी, कुणास ठाऊक कसा पण व्यसन केलेला नव्हता. वरच्या आळीतील हौसाला बोलावलं, तिला मदतीला घेऊन त्याने बकुळाला दवाखान्यात नेलं. तिथं तिने एका पुरुष बाळाला जन्म दिला. बाबुरावच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

    "भाऊजी, पेढे आणा लवकर. सर्वांना पेढे वाटा. आन् बाळा साठी एक छोटीशी लंगोटी पण आणा. जा लवकर." हौसा अति उत्साहात होती.

     बाबुराव पळतच बाजारात गेला. पेढ्याचा एक बॉक्स घेतला. कपड्याच्या दुकानावर जाऊन दोन तीन लंगोट्या विकत घेतल्या. आणि परत आला. दोन दिवस बकुळा दवाखान्यात होती. या दोन दिवसात बाबुरावने दारूचा घोट नाही घेतला. तिला वाटलं, देव पावला, दारू सुटली. तिला माहेरी जाऊन उपयोग नव्हता, म्हणून तिनं दवाखान्यातून सुटी झाल्यावर आपल्या स्वतःच्या घरी जाणेच पसंत केले. सोबतीला आपल्या विधवा वहिनीलाच इकडे बोलावून घेतले. घरातले काम करून ती बाळ बाळंतिणीचेही सर्वकाही करत होती. जवळपास एक महिनाभर बाबुरावची दारू बंद होती. बकुळा खुश होती. तिला वाटले होते, 'बरे झाले नवऱ्याला गुण आला. व्यसन कायमचे सुटले तर तो चांगल्या मार्गाने कमवायला तरी लागेल.' आणि खरोखर बाबुरावने कधी काळी व्यसन केले होते की नाही याची शंका यावी एवढा तो सरळ वागत होता. मात्र एक दिवस अचानक नको ती गोष्ट तिच्या नजरेस पडली. आणि तिच्या डोळ्या समोर अंधारीच आली.

    कोरोनामुळे बकुळाची आई आणि भाऊ हिरावून घेतले. घरात एकटी वहिनी मंजुळा तिच्या लहान मुला सोबत रहात होती. साधारण बकुळा पेक्षा एक वर्षाने मोठी असलेली तिची वहिनी दोन वर्षाच्या मुलाला घेऊन राहू लागली होती. बकुळाच्या दवाखान्या मुळे ती मुलाला घेऊन इकडे आलेली होती. घरातले, बाळंतीणीचे काम करत होती. खायला प्यायला व्यवस्थित करत होती. सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. अचानक तिचे शरीर तिच्या मनाविरुद्ध बंड करू लागले. रात्र रात्र झोप यायची नाही. रात्र रात्र जागून काढायची. जीवाची तगमग व्हायची. परंतु मनाची घुसमट सांगणार कुणाला?

   इकडे बाबुराव दारूपासून दूर राहू लागला होता. मंजुळा आल्या मुळे खाणे पिणे वेळेवर आणि व्यवस्थित होऊ लागले होते. व्यसनाधीन असतांना पत्नीच्या शरीराचा भोग घेणे फारसे व्हायचे नाही. व्यसनाच्या धुंदीत शरीर ढिले पडून जायचे. मात्र आता कधीतरी त्याला काम सतावू लागला. त्यात मंजुळा सारखी तरुण आणि सुंदर स्त्री घरात वावरत होती. रात्री बेरात्री झोपेतून उठल्यावर नकळत तिच्या तरुण शरीराकडे त्याची नजर जायची. आणि त्याची त्यालाच लाज वाटायची. कधी तरी त्याची आणि मंजुळाची नजरा नजर व्हायची. आपापल्या ठिकाणी दोघेही चपापायचे, स्वतःला अपराधी समजायला लागायचे. परंतु हळूहळू दोघांनाही जास्तीत जास्त एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटायला लागला. कधीतरी काही देण्या घेण्याच्या निमित्ताने स्पर्श व्हायचा तोही गोड वाटायला लागला. आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. दोघांमधले पवित्र नाते संबंध विसरून केवळ नर आणि मादी एवढाच संबंध लक्षात ठेवून त्या दोघांमध्ये शरीर संबंध स्थापित झाले. बकुळाच्या नकळत अधून मधून त्यांची प्रणयाराधना सुरू झाली. दोघेही खुश राहू लागले. त्यांच्या राहणीमानातला हा बदल बकुळाच्या लक्षात आला. पण बरे झाले, व्यसन सुटले, खाणे पिणे वेळेवर होतेय म्हणून असेल असे वाटून तीही खुश झाली. पण एक दिवस तिच्या डोळ्याने बघितले. अन् तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जीवाचा तिळपापड झाला. पण काही बोलता येत नव्हते. मनाची नुसती घुसमट होत होती.

    एक महिन्याच्या विश्रांतीनंतर बकुळाने मंजुळाला परत नेऊन घालायला लावले. तिची साडी चोळीची बोळवण करून तिने मंजुळाला नेऊन सोडायला लावले. मंजुळा गेल्या पासून बाबुरावला करमेनासे झाले. तो पुन्हा व्यसन करायला लागला. दोघांमध्ये खटके उडू लागले. तो आता तिच्याजवळ सुद्धा यायचा नाही. शेजारी पाजारी कारण विचारायचे परंतु ते सांगणे शक्य नव्हते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्या पलीकडे ती काही करू शकत नव्हती.

     मंजुळा इथे असतांना बाबुराव दारू पीत नव्हता. हे तिच्या शेजाऱ्यांच्याही लक्षात आलं होतं. तसं एक दोन शेजारणींनी तिला सांगूनही बघितलं होतं,...

   "अगं, तुही भावजय इथं व्हती तवर हा दारूला शिवत नव्हता. तिचा धाक धरत व्हता. तिलाच आण ना काही दिवस इथं ऱ्हायला." शेजारची रखमा म्हणाली होती.

    "अक्का, तुमचं म्हणणं खरं हाय. पर पाव्हण्या माणसाला कायम ठिवता येतं व्हय? अन् आपल्या नशिबाचे भोग तिला कशाला भोगाया लावायचे म्हणते मी." खरं कारण लपवून तत्वज्ञान सांगणं किती अवघड गेलं होतं तिचं तिलाच माहीत. खरं कारण तिला कधीच सांगता आलं नाही.

   तिच्या मनाची घुसमट सहन करत ती तशीच जीवन जगत राहिली. आतल्या आत जळत राहिली. कधी कधी तिचे शरीरही बंड करू पहायचे पण मंजुळाचा अनुभव लक्षात घेता, तिने आपल्या मनाला खूप प्रयत्न पूर्वक शांत ठेवले होते. मुलगा लहानाचा मोठा होत होता.

    बाबुरावचे व्यसन वाढतच गेले. त्याला घराचे, मुलाचे, पत्नीचे भान राहिनासे झाले. दिवसरात्र दारूच्या नशेत राहणारा बाबुराव एक दिवस गावातल्याच आडात तोल जाऊन पडला. लोक जमा झाले. त्याला वर काढलं, परंतु तोवर त्याचा जीव गेला होता. खूप रडली होती बकुळा. दारुड्या का होईना जीवाचा आधार होता तो. तिच्या डोईचं झाकण होतं ते. त्या दिवशी दिवसभर शून्यात नजर लावून बसली होती. खाण्या पिण्याचं भान सुटलं होतं. साऱ्या आयाबायांनी समजावून सांगितलं. पण बकुळा ऐकायला तयार नव्हती. एक जाणकार म्हातारी आली, तिनं तिला कुणी काहीही सांगू नये असं सांगितलं. एका तासाभरानं तिच्या चार महिन्याच्या बाळाला, बबन्याला हळूच चिमटा घेतला. तो रडायला लागला तसं त्या म्हातारीनं त्या रडणाऱ्या बाळाला तिच्या समोर आणून ठेवलं. रडणाऱ्या बाळाला पाहून आईच हृदय द्रवलं. बकुळानं त्याला छातीशी कवटाळलं आणि निश्चय केला,

   "मला जगायचंय. या लेकरासाठी जगायचंय. बाळा, बबन्या, नाही तुला सोडून नाहीं जाणार म्या. तुव्हा बाप जरी तुला असा अर्ध्यावर सोडून गेला आसल, पर म्या तुला लै मोठ्ठा माणूस बनवणार हाय." असं म्हणत तिनं डोळ्यातील आसवं पुसली. अन् मोठ्या निर्धारानं पुढील सर्व कार्यक्रम रितिरिवाजा प्रमाणे पूर्ण केले.

    बाबुराव गेल्यावर बकुळा अगदी उघडी पडली होती. बबन्या शिवाय तिच्या जीवनात जगण्या साठी काहीच शिल्लक नव्हतं. आजूबाजूच्या लोकांचे टोणपे खात खात ती जीवन जगत होती. काही लोक तर, 'बकुळानेच दारुड्या नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून त्याचा काटा काढला' असेही म्हणत होते. तरी बरं बाबुरावला तोल जाऊन आडात पडतांना चारपाच लोकांनी पाहिलं होतं.

    बकुळानं मोठ्या हिमतीनं, मनाच्या घुसमटीला दाबून आतापर्यंत जीवनाचा प्रवास केला होता. आता कुठं चार घास ती सुखाचे खाऊ लागली होती.

*******



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama