Jyoti gosavi

Classics Others

4  

Jyoti gosavi

Classics Others

गौरी गणपती

गौरी गणपती

6 mins
263


92 साली माझं लग्न झालं, त्यावर्षी घरात गौरी गणपती नव्हते. 

कारण माझे सासरे ऋषिपंचमीला गेले होते, त्यानंतर सासूबाईंनी सगळं बंद करून टाकलं, तेव्हा मुलं लहान होती .

त्यानंतर जवळजवळ 12 /14 वर्षांनी पुन्हा आम्ही सुरू केले. 

सासूबाईंनी विचारले 

ज्योती आपल्याकडे गौरी गणपती आणूया का? 

मला आधी हौस भारी, त्यात मी गावाकडून आलेली, आमच्या गावाकडे प्रत्येकाच्या घरात गौरी गणपती असतातच त्यामुळे मी पण मोठ्या आनंदाने होकार दिला. 

अशा रीतीने 1993 साली पुन्हा आम्ही गौरी गणपती बसवले. सुरुवातीला अगदी गावाकडे असतात तशा निळ्या पिवळ्या रंगाच्या गौरी आणल्या, तत्पूर्वी सासूबाई तांब्यावर नाकडोळे रेखून तशा गौरी बसवत होत्या. हळूहळू त्यात मी बदल करत गेले. 

मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे सुरू केले ,शरीराचा मधला भाग आणि हात आणले, शेवटी हौसेला मोल नाही आणि आपण आपल्या हौसेसाठी करतो, मग खड्याच्या गौरी असल्या तरी त्यातही देवत्व येते आणि सोन्याच्या गौरीचे मुखवटे असले तरी त्यातही देवत्व येते. मग आमची परंपरा, मग आमच्याकडे असंच नसतं, आमच्याकडे असंच असतं, हे काही मी ठेवलं नाही. 

मला जसे वाटेल तसे मी त्यामध्ये मॉडिफिकेशन करत गेले, आणि सासूबाई देखील माझ्यासोबत असायच्या. 


आईकडे घरात मी शेंडेफळ दोन मोठ्या बहिणी, त्यामुळे मला कधीही कोणत्या सणावाराला तिच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली नाही. 

पण लग्न झाल्यावर गौरींना साड्या नेसवण्यापासून सारं काही शिकले, अगदी स्वतःच स्वतः शिकले तेव्हा काही गुगल वगैरे नव्हतं. 

त्यानंतर पाच वर्षांनी धाकट्या जाऊ बाई आल्या, मला वाटले कोकणस्थ आहेत किमान उकडीचे मोदक तरी करतील, पण सगळा उजेड.!

गौरीला साड्या नेसवण्यास होता येत नव्हतं, स्वयंपाकात काही येत नव्हतं, आणि शिकण्याची हौस पण नव्हती. त्यामुळे गेले 31 वर्षे झाले माझा वन मॅन शो सुरू आहे. 

भांडुपला चाळीत राहायचो तेव्हा आमच्याजवळ विहीर होती ,त्या विहिरीपाशी सात खडे गोळा करून ,पाण्याने धुवून, टाळ घंटा वाजवत दिर, भाचा ,मी ,चाळीतली दोन-चार मुलं आम्ही वाजवत गाजवत गौराई घरी घेऊन यायचो. 

सासुबाई पायावर दूध पाणी घालून ओवाळून घरात घ्यायच्या, त्यासाठी कोणती सवाष्णा वगैरे बोलावण्याच्या भानगडीत आम्ही दोघीही पडलो नाही, त्याही अर्थोडक्स नव्हत्या, मीही नाही. 

नंतर वेगळे झाल्यावर मग गौरी गणपती माझ्याकडे आले, मी जाईल त्या ठिकाणी मी जागा बदलेन तिथे माझ्यासोबत ते येत होते. 

पहिल्या दिवशी उकडीचे मोदक हा नैवेद्य ठरलेला आमच्या घाटावर काही हा प्रकारच नाही, 

शेवटी मी आता त्याची ऑर्डर देते. कारण एकाच माणसाला सर्वकाही जमत नाही. 

एक दिवशी खिरपुरी, एक दिवशी पुरणपोळी, कधी गोडाचा शिरा ,कधी गोडाचा भात ,एखादा दिवस फ्रुट सॅलड ,आणि दररोज एक दिवस चटणी एक दिवस कोशिंबीर, एक दिवस मोकळी डाळ म्हणजेच वाटली डाळ, मिरच्यांचे पंचामृत ,अळूवडी, असा साग्र संगीत चालू असतं. 


गौराई बरोबर जात असल्याने गणपती कधी पाच दिवस, कधी सहा दिवस, तर कधी सात दिवस राहतो. पण ते दिवस एवढ्या भरकन उडून जातात की कधी बाप्पा आले आणि कधी गेले कळत सुद्धा नाही. 

गौराईला पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो, मेथी शापूची मिश्रित भाजी, आणि ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी. 

दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, तिसऱ्या दिवशी दहीभात आणि मुरडीचा कानवला ,

हे ठरलेले नैवेद्य. या मुरडीच्या करंजी मागे देखील एक शास्त्र आहे तिसऱ्या दिवशी गौर सासरी जाते म्हणजे मुलींनी आपल्या मनाला मुरड घालून सासरी जायचे सगळ्याच इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत, पण तरीही मनाला मुरड घालून आनंदाने नांदायचे. 

म्हणून ती दहिभाताची शिदोरी आणि मुरडीचा कानोला सोबत द्यायचा. 

काही ठिकाणी असे म्हटले आहे की मुलगी पुन्हा मुरडून मायबापाकडे बघते आणि माहेरच्या ओढीने मुरडून घराकडे येते म्हणजेच आताच्या भाषेतला यु टर्न म्हणून देखील मुरडीचा कानोला सोबत द्यायचा


आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो, आणि तोही दहा दिवस. 

त्यामुळे कोणी कोणाकडे गणपतीला दर्शनाला जाणे, काहीतरी फळ मिठाई घेऊन जाणे हे आम्हाला माहीतच नव्हते. 

प्रत्येकाच्याच घरात गणपती! सगळ्यांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला, शिवाय कोकणा एवढा मुंबई एवढा डाम डौल , सजावट, आमच्याकडे नसते. 

एका कोनाड्याला गेरू द्यायचा त्याच्यावर चुन्याने डिझाईन काढायची त्यात आपला बाप्पा बसवायचा, सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा ,आरती करायची संपले .24 तासाचा नंदादीप वगैरे देखील इकडे आल्यावर शिकले. 


 हा! गौरी मात्र जोशात असतात, तुळशी वृंदावन पासून किंवा गावचा पाणवठा ,विहीर, नदी, या ठिकाणहून सात खडे आणायचे त्या गंगा गौरी आणताना एक पथ्य पाळायचे म्हणजे पानवट्यावरती जी चूळ तोंडात घ्यायची, ती घरापाशी आल्यावरच थुंकायची

याला पूर्वजांची दूरदृष्टी म्हणा नाहीतर मुस्कुट दाबी म्हणा कारण एका वयाच्या मुली एकत्र येणार एकमेकांच्या घरादाराबद्दल दोन शब्द उणे, दुणे तोंडातून निघणार ,नंतर त्याने भांडणे पेटणार, चुगल्या केल्या जाणार ,

असे करण्यापेक्षा तोंडात चूळ घ्यायची ती घरापाशी आल्यावरच टाकायची.

मग त्या नदीवरून आणलेल्या गंगागौरी सोबत आपले मुखवटे देखील दरवाज्यातून आत आणायचे .

उंबऱ्या वरती तांदूळ आणि किंवा गव्हाने भरलेले माप ठेवायचे आणि गौराबाईला ओलांडून आत आणायचे. 

 आधी गौरीची पावले रांगोळीने काढलेली असतात, त्यावर हळदीकुंकू टाकायचे. काही ठिकाणी रंगांचे हातवे उठवले जातात. 

त्या प्रत्येक पावलावरती हातातल्या गौरी टेकवायच्या आणि म्हणायचे

 गौर आली गौर आली कशाच्या पावला आली? 

मग पाठीमागे टाळ वाजवत असणाऱ्यांनी सांगायचे पहिले


 हळदी कुंकाच्या पावला आली म्हणजे सौभाग्य


 मग मुलाबाळांच्या पावला आली सौभाग्यानंतर महत्त्वाची मुलं बाळ


 प्रत्येक वेळी विचारायचं गौर आले गौर आली कशाच्या पावला आली ?

प्रत्येक वेळी पाठीमागे असणाऱ्याने वेगवेगळ उत्तर द्यायचं .


कधीच्या धान्या धुन्याच्या पावला आली ,


कधी दूध दुभ त्याच्या पावला आली. 


मग गुराढोरांच्या पावला आली त्यावेळी गुरढोर ही मोठी संपत्ती त्यामुळे त्यांना प्राधान्य


शेवटी सोन्या चांदीच्या पावला आली


 हिऱ्या मोत्याच्या पावला आली


 असं पुन्हा पुन्हा म्हणत म्हणत संपूर्ण घरभर गौराबाई फिरवायच्या ,त्यांना कोठीचं घर ,तिजोरी असं सगळं उघडून दाखवायचं. म्हणजे प्रत्येक वस्तूवर तिची नजर पडू दे आणि बरकत येऊ दे ही त्या पाठीमागची भावना. . 

शिवाय त्या तीन दिवसांमध्ये शक्यतो कोणाला पैसा उचलून द्यायचा नाही ,किंवा खर्च देखील करायचा नाही .

काही असेल ते आधीच आणून ठेवायचं. 

आता जी पे/ फोन पे याचा जमाना आल्यामुळे काही अडचण येणार नाही. 

आपण प्रत्यक्षात कॅश देत नाही. 


प्रत्येकाच्या गौरीची वेगवेगळी सजावट, वेगवेगळे मुखवटे, आणि न बोलावता सगळ्या जणी एकमेकीच्या घरी हळदीकुंकवाला जात असतात. गौराईची खिरापत म्हणजे किसलेले खोबरे आणि साखर , 

ज्या दिवशी पुरणाचे जेवण असते, त्या दिवशी संध्याकाळी गौराई रडवायच्या .

परात पालथी घालून त्याच्या पाठीवर लाटण्याने किंवा उलथन्याने करा करा वाजवायचे. तो आवाज रडल्यासारखा येतो तेव्हा त्यांचे चेहरे उतरलेले वाटतात .

कारण त्यांना दुसऱ्या दिवशी सासरी जायचे असते. 


दुसऱ्या दिवशी गौरीला बोळवताना दहीभाताची शिदोरी बांधून द्यायची. आणि दोरे घ्यायचे .

आमच्याकडे ही पद्धत माहेरी होती. दोरे घ्यायचे म्हणजे एका धाग्यामध्ये हळद-कुंकू ,आघाडा दुर्वा, फुले, पाने, हे पुन्हा पुन्हा घेऊन 16 गाठी मारायच्या अशा 16 गाठींचे दोरे गणपतीच्या नावाने, गौरीच्या नावाने कुलदेवतेच्या नावाने, ग्रामदेवतेच्या नावाने, आणि घरात जेवढ्या व्यक्ती आहे त्या सर्वांच्या नावाने घ्यायचे .

म्हणजे तेवढे दोरे तयार करायचे आणि त्यानंतर ते एका भांड्यात गौरी समोर ठेवून द्यायचे आणि त्यांचे देखील गौरी बरोबर विसर्जन करायचे. 

काही ठिकाणी ज्याच्या त्याच्या नावाचा दोरा जो तो गळ्यात बांधतो किंवा हातातही बांधतो, असे दोरे चालू असताना जर तुमच्या घरात बाहेरून कोणी आले तर त्याला घरात येऊ द्यायचे, पण दोरे संपल्याशिवाय त्याने बाहेर जायचे नाही. यासाठी स्त्रिया पण कोणाचा खोळंबा नको म्हणून, लवकर उठून दरवाजे लावूनच दोरे घेतात. 

तरी पण लहानपणी खेळत खेळत कोणाच्यातरी घरी जाऊन मी दोन-तीन तास अशी अडकलेली आहे. सासरी मात्र असली काही पद्धत नाही कारण या गोष्टीला दोन तीन तास तरी लागतात आणि आता फास्ट लाईफ मध्ये मुलींकडे तेवढाही वेळ नसतो. 


दे ग नदी वाट हीला

 गाणे गारे पाखरा

 गौर जाते सासरा, गौर जाते सासरा 

दोन राती गौराबाई 

माहेरी ती राहिली

 भाजी भाकर जेवताना 

आम्ही बाई पाहिली

देग नदी वाट हीला

 गाणे गा रे पाखरा

गौर जाते सासरा

 गौर जाते सासरा. 

आणि खरोखर त्या दिवशी गौरीचे चेहरे उतरलेले दिसतात. त्यावेळच्या समाज मनाचं प्रतिबिंब आपल्या सणावारात पडलेलेच आहे, पण त्याची प्रचिती देखील येत राहते. 

जेव्हा आपण गौरी बाहेरून तुळशी पासून घरात आणतो तेव्हा दोन्ही मुखवटे सारखे दिसतात, पण जेव्हा गौरी बसवल्या जातात तेव्हा एक प्रौढ दिसते आणि एक तरुण दिसते .आमच्या सासुबाई त्या सासु सुना आहेत असे म्हणत असत ,त्या मागची खरी आख्यायिका काय आहे ठाऊक नाही, कोणी म्हणते बहिणी बहिणी, कोणी म्हणते सासू सुना, कोणी म्हणते रिद्धी सिद्धी, खरे काय जाणकारांनी यावर देखील प्रकाश टाकावा. 


अजून एक चालणारा प्रकार आहे जो मला मुळीच पटत नाही. कोणाच्या गौरी स्कूटर वर येतात, कोणाच्या गौरी एकमेकीच्या कानात कुजबुजणाऱ्या गौरी दाखवतात शेवटी आपण त्यां देवी म्हणून, महालक्ष्मी म्हणून ,पूजा करतो. आपल्या हौसेसाठी काही वाटेल ते करू नये. समोरच्या देखाव्यात तुम्ही काय दाखवायचे ते दाखवा. 

पण प्रत्यक्ष महालक्ष्मी बसवताना असे काही करू नये असे मला वाटते. 


इकडे मात्र गणपती दर्शनाला जायचं काहीतरी घेऊन जायचं वगैरे वगैरे पाहिलं, "आता देश तसा वेश" त्यामुळे आम्ही देखील कोकणातल्या प्रमाणेच गौरी गणपती साजरे करू लागलो. 

आमच्याकडे गणेश विसर्जनाला स्त्रियांनी जाण्याची पद्धत नाही. इकडे आहे त्यामुळे पहिलाच वर्षापासून गणपती विसर्जनाला जाण्याचा पायंडा पडलेला आहे. 

गावी खरोखर पर्यावरण पूरक गौरी गणपती असायचे, आघाडा ,दुर्वा, गुलबक्षीची फुल, यांचे हार आम्ही घरी करत असू. बाप्पाला देखील दररोज हार पाहिजे असे काही नाही, पण आता प्रत्येकाकडे पैसा वाढला, पत वाढली ,आणि डामडौल देखील वाढला. 

दररोज देवांचे हार, गौरीचे हार, डेकोरेशनचे दरवर्षी येणारे लायटिंग चे नवे नवे प्रकार, असं बरंच काही त्या उत्सवात ऍड झालं. 


पूर्वीचा घरगुती साधा उत्सव असो, नाहीतर आत्ताचा फेसबुक व्हाट्सअप यावरती अपलोड करण्यासाठी जास्तीचा केलेला डाम डौलाचा उत्सव असो, पण शेवटी बाप्पा तुमच्या घरात राहतात, आनंद देऊन जातात, हे काय कमी आहे का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics