Pandit Warade

Drama Classics Inspirational

3  

Pandit Warade

Drama Classics Inspirational

एक होती कांचन-८

एक होती कांचन-८

8 mins
135


एक होती कांचन-८


    पंकजचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं. शेवटचं वर्ष होतं ते. चार पाच वर्षात तो नोकरी आणि शिक्षण यामुळे मामाच्या गावाला जाऊ शकला नव्हता. त्यामुळे मामा मंडळी कडील कुणाची भेट बऱ्याच दिवसात झालेली नव्हती. एका लग्नसमारंभात त्याची मामाशी- बाजीराव पाटलाशी- भेट झाली. या भेटीचा दोघांनाही अत्यानंद झाला.


    पंकज आता स्वतः मिळवता झालेला होता. त्यामुळे त्याच्यात बराच बदल झालेला पाहून मामा दंग झाले. त्याची वर्तणूक सभ्यतेची वाटली. दोन दिवसाच्या त्याच्या सहवासात त्यांचं अंतर्मन हेलावून गेलं. शिक्षणासाठी आपल्याकडे फाटक्या तुटक्या कपड्यात राहणारा पंकज आज परिपूर्ण माणसाच्या रूपात समोर दिसत होता. त्यांनी मनोमन त्याला भावी जावई निश्चित करून टाकलं. सुनंदा साठी तो अनुरूप वर वाटला त्यांना.


   बाजीराव पाटलांनी परत घरी गेल्यानंतर लगेच पंकजच्या आई कडे जाऊन सरळ सुनंदाला सून म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. मुलगी पाहण्यातीलच असल्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.


   लग्न झालं आनंदाचा रूपानं लक्ष्मी घरात आली आणि सुसंस्कृत सून घरात आली घरात आनंद उत्साह भरभरून वाहत होता सुनंदाने आपल्या मितभाषी स्वभावाचा सर्वांना आपलंसं केलं.


   पंकज च्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचा निकाल लागून तो प्रथम श्रेणीत पास झाला. योगायोगानं दोन-तीन महिन्यातच त्याला एक छोटीशी नोकरी देखील मिळाली. त्यानंतर मात्र सुनंदा सर्वांचा जीव की प्राण बनली. तिच्या पायानंच भाग्य दाराशी चालून आलं. घरातील अठरा विश्वे दारिद्र्य आता नाहीसं होणार होतं.


   पंकजची परिस्थिती मात्र 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली होती. नोकरी मिळाल्याचा आनंद तर झाला होताच. परंतु तो आनंद घरातील इतर मंडळीच्या आनंदा इतका निखळ आनंद नव्हता. त्याला विरहाची झालर होती. कारण नोकरी छोटीशी आणि कमी पगाराची होती. एवढ्या कमी पगारात बाहेरगावी त्याला वर्षभर तरी एकट्यालाच राहावे लागणार होते. पत्नी विरहाच्या कल्पनेमुळं तो नोकरीचा आनंद उपभोगू शकला नाही.


    पंकज नोकरीच्या गावी जाऊन कामावर हजर झाला. नोकरी होती छोटीच. परंतु तो कर्तव्य निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडत होता. आपल्या स्वभावाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती. विशेषत: कंपनी मालक त्याच्या कामावर फिदा होता. बघता बघता वर्ष निघून गेलं. वर्षातला एकही दिवस सुनंदाच्या आठवणी शिवाय गेला नव्हता. परंतु घरच्या परिस्थितीनं त्याला बांधून ठेवलं होतं. तो या परिस्थितीला संयमानं, सहनशीलतेनं तोंड देत होता. आणि एक दिवस मालकाचं बोलावणं आलं. तो मालकाच्या केबीन मध्ये गेला.


   "या! मिस्टर पंकज, आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो. व्यवस्थापक मंडळाने आपल्या कार्यावर खुश होऊन आपणास अधिकारी पदावर बढती देण्याचं ठरविलं आहे. तसेच मागील दोन महिन्यां पासून आपल्या पगारात पण वाढ करीत आहोत. त्या दोन महिन्याच्या वाढीव पगाराची रक्कम सुद्धा आजच अदा केली जाईल. अकाउंटस् मध्ये जाऊन रक्कम घेऊन जा. काँग्रॅच्युलेशन मिस्टर पंकज! बी सिलिब्रेट युअर प्रमोशन." असं म्हणत प्रमोशन लेटर मालकांनी त्याच्या हाती सोपवलं.


   "थँक्यू व्हेरी मच सर!" अत्यानंदानं तो केबिनच्या बाहेर पडला. लगेच जाऊन त्यांनं लेखा विभागातून वाढीव रकमेचं पाकीट घेतलं. तो घरी आला. त्याचा ऊर आनंदाने भरून आला होता. प्रमोशन आणि पगारवाढ मिळाली होती. पहिल्या प्रथम त्याने भगवंताचे मनःपूर्वक आभार मानले.


    मनोमन पंकजनं पगाराचा हिशोब लावला. आता या पगारात तो आईला आणि सुनंदाला येथे घेऊन येऊ शकत होता. सुनंदा त्याच्या नजरेसमोर फिरत होती. सायंकाळचे पावणेसहा वाजले होते. आकाशवाणी जळगाव केंद्र कुठल्यातरी चित्रपटातील विरहगीताची धून वाजत होती. 'धून' कसली? त्याच्या हृदयाची तार छेडणारी शक्तीच वाटली ती त्याला.


   सुनंदाच्या आठवणीनं तो रात्रभर तळमळत होता. सुनंदाला घेऊन येण्या साठी दुसऱ्या दिवशी त्याचा जाण्याचा निर्णय पक्का झाला. 


   सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम त्यांना एक रजेचा अर्ज खरडला. त्याच्या शेजारी त्याच्या कंपनीतील सहकारी राहत होता. दिनकर. त्याच्या हाती रजेचा अर्ज सोपवून त्यानं तडक गावी जाणारी गाडी पकडली.


   गाडी रस्त्याला लागली. तो शरीरानं गाडीत होता. परंतु मनानं तो अगोदरच गावी जाऊन पोहोचला होता. त्याची नजर त्याला शोधत होती. 


   एकदाची गाडी पोहोचली. तो धावत पळत घरी गेला. आई आणि सुनंदा दारातच बसलेली होती. त्याची नजर सुनंदाकडे गेली. नजरेला नजर भिडली. युगायुगातील विरहाचं अंतर मिटलं होतं. तिचं सौंदर्य तो नजरेनच पिऊ इच्छित होता. तिची देखील तीच अवस्था झाली होती. कितीतरी वेळ ती दोघंही त्याच अवस्थेत उभी होती. बोलत कोणीच नव्हतं. मात्र दोघांचेही डोळे एकमेकाशी बोलत होते. बाह्य जगाचा अस्तित्वच जणू हरवलं होतं.


   "पंकज, आलास बाळ?" आईने त्याला हाक मारली तेव्हा ती दोघंही भानावर आली.


  "हो आई" 


   पंकज पटकन आईजवळ गेला अन चरणस्पर्श करून तिथेच बसला. आईचा खरखरीत मायेचा हात त्याच्या पाठीवरुन फिरत होता. खरंच किती उबदार स्पर्श होता तो! त्या स्पर्शानं त्याचा सर्व थकवा नाहीसा झाला. आईनं त्याला प्रकृती विषयी, नोकरी विषयी विचारलं. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या.


   "अगं बाई! विसरलेच की. बाळा, अरे भूक नाही का लागली तुला? सुनबाई, याला जेवायला कर गं बाई लवकर काहीतरी. मी जरा तोपर्यंत देवाला जाऊन येते." 

  

   आई उठली. या दोघांना मोकळा वेळ मिळावा या उद्देशाने ती देवळाकडे जायला निघाली. पंकजलाही तेच हवं होतं. केव्हा एकदा राणीला मिठीत घेतो? असं झालं होतं त्याला.


   "अगं, ऐकलंस ना आईनं काय सांगितलं ते?" तो स्वयंपाक घरात शिरला अन् तिला कवेत घेणार तेवढ्यात....


  "अहो, दूर व्हा. मला शिवू नका. मी ---- " तिला थट्टा सुचली. ती एकदम एकदम बाजूला सरकली अन् तो पडता पडता सावरला.


   "कसं फसवलं एका माणसाला?" ती मोठ्याने हसू लागली. त्याची झालेली फजिती पाहून तिचे हसून हसून गाल लाल झाले. मासिक धर्माची वेळ सांगून मुद्दाम त्याला दूर ठेवून गंमत बघायची होती तिला. 'पण? हे काय? अरे देवा म्हणजे मासिक धर्माच्या खोट्या बातमीने त्याला फसवता फसवता मीच फसले की! एवढ्या दिवसांच्या विरहानंतर दोन जीव एकत्र व्हायचे होते तर हा अडथळा?' ती स्वतःवरच चिडली. 'पाच मिनिटे तरी संधी मिळाली होती आपल्याला. पण मी ती स्वतःच्या हाताने घालवली. आता पश्चाताप करून काय उपयोग?' असा विचार करत तिने ताबडतोब बाथरूम गाठलं. तो हिरमुसला झाला अन् मनातल्या मनात चरफडत बाहेर निघून गेला.


    देवळातून परत आल्यानंतर आईनं बघितलं, तर तो घरी नव्हता. सुनबाई स्वयंपाक घरातील कामं अर्धवट सोडून बाथरूम मध्ये जाऊन बसलेली. आईने सुनबाईची समस्या ओळखली. आणि स्वतः स्वयंपाकाला लागली. तेवढ्यात पंकजचे मामा, बाजीराव पाटील येऊन टेकले.


   "काय आक्का! खुशाल आहेत ना सर्व मंडळी?"


    "होय दादा, ईश्वर कृपेने सर्व जण अगदी मजेत आहेत. तिकडची मंडळी काय म्हणतात? आनंदात आहेत ना?" आईनं विचारलं.


  "तिकडे सर्वजण मजेत आहेत. काय म्हणतात जावईबापू? बरेच दिवसात पत्र वगैरे काहीच नाही त्यांचं."


   "आजच आलाय घरी. आत्ताच कुठेतरी बाहेर गेलाय. येईलच आता. दादा, तू अगोदर हात-पाय धुऊन घे. तोवर मी चहा ठेवते." असं म्हणत गिरीजबाईंनी बादली भरून गरम पाणी आणून दिले. 


  "ठीक आहे." म्हणत गिरीजा अक्कांनी दिलेली पाण्याची बादली घेऊन मामा न्हाणी घरात गेले. हात पाय तोंड धूऊन बाहेर आले. तेवढ्यात पंकज बाहेरून आला.


   "नमस्कार मामा, केव्हा आलात?"


  "राम राम! आत्ताच आलोय." मामा सतरंजीवर टेकले. अन् पंकजला म्हणाले,


   "बरेच दिवस झाले. काही खुशालीचं पत्र वगैरे काहीच नाही."


   "त्याचं काय आहे मामा. या वेळेस जरा कामं जोरात असल्या मुळे वेळच नाही मिळाला बघा."


  "काय म्हणतेय नोकरी? पगार काही वाढतो की नाही?"


   "मामा, आपला आणि आईचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर कुणाला यश मिळणार नाही? आनंदाची बातमी आहे मामा. मला प्रमोशन मिळाले. आणि पगार सुद्धा वाढला आहे दिडपटीनं." त्यानं खिशातील प्रमोशन लेटर आणि पगाराचं पाकीट आईच्या हाती दिलं.


   "मला रे काय करायचं बाबा? ठेव तुझ्या जवळ आणि हे बघ पगार वाढलाय तर आता जरा सूनबाईला घेऊन जा सोबत."


   "होय आई, तुम्हा दोघींना सोबत न्यायलाच आलोय मी."


   "नको रे बाबा. मी तिकडे येऊन काय करू? मला नाही करमायचं शहरात. तिलाच घेऊन जा. मी राहीन इथेच." आईने सोबत जायला नकार दिला. 


   "ठीक आहे. तुला यायचं नसेल तर नको येऊस. तिलासुद्धा तुझ्या जवळच राहू दे. तिला सोबत घेऊन गेलो तर तुझं काय? तुझी काळजी कोण घेणार? तुझ्या साठी तिला ठेवणे आवश्यक आहे."


   "अरे पण तुझ्या जेवणाचे खूप हाल होत आहेत, हे तुझ्या प्रकृती वरूनच दिसतंय की. तुझे हे खायचे-प्यायचे दिवस आहेत. माझं काय एकटा जीव. खाईल स्वतः पुरतं करून. काही काळजी करू नकोस माझी. सून बाईला घेऊन जा. काय दादा, बरोबर म्हणत्येय ना मी?" आईनं मामाकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.


  होय अक्का तुझं म्हणणं बरोबर आहे. पण...." मामाला पुढे कसं बोलावं समजेना.


  "पण? पण काय?" दोघांच्या तोंडून एकाच वेळी प्रश्न निघाला.


  "चार आठ दिवस सुनंदाला घेऊन जावं म्हणतोय, पाठवत असशील तर."


   मामाच्या या बोलण्यावर पंकज एकदम दचकला.


   'म्हणजे? मामा हिला न्यायला आले तर? वर्षभर वेळ मिळाला नाही का मुलीला घेऊन जायला? आता कुठे आम्ही दोघे एकत्र यायचं म्हणतोय तर हे मध्येच कशाला आले?' तो मनातल्या मनात वैतागला. वरवरचं हसून आई कडे बघितलं.


  "अरे दादा, असं मध्येच काय काढलं पोरीला न्यायचं? आता कुठला सण नाही की काही नाही?"


   "त्याचं काय त्याचं काय आहे अक्का, तुझ्या वहिनीची तब्येत बरोबर नाही जरा. म्हणून म्हटलं राहिली असती आठ चार दिवस."


   "का हो मामा, काय झालं मामीला? तब्येत जास्त तर नाही ना?" पंकज काळजीच्या स्वरात विचारलं.


   "नाही, तसं काही काळजी करण्यासारखं नाहीय. एक दोन दिवस जरा ताप आला होता. त्यामुळे थोडं मरगळ आल्या सारखं झालंय. डॉक्टरनं आठ-पंधरा दिवस आराम घ्यायला सांगितलंय. घरात काम करायला कोणी तरी हवंच. म्हणून म्हटलं सुनंदाला घेऊन गेल्या शिवाय तिला आराम मिळायचा नाही."


   आईच्या आजाराबद्दल ऐकून सुनंदा खूप दुःखी झाली. नकळत डोळ्यात आलेले अश्रू तिने कुणाच्याही लक्षात येऊन न देता पुसून टाकले. पंकजची आणि तिची नजरानजर झाली. नजरेनंच एकमेकांचं व्हायचं ते बोलणं झालं. आईचे लक्ष तिकडेच होतं तेव्हा आईनंही परिस्थितीचा अंदाज घेऊन होकार देऊन टाकला.


    दुसऱ्या दिवशी सकाळीच बाजीराव पाटील सुनंदा ला घेऊन गेले. आणि पंकज पुन्हा एकाकी झाला. तीन चार दिवसाची रजा काढलेली असूनही त्याला तिथे रहावंसं वाटेना. दोन दिवस रजा शिल्लक असतांनाच तो नोकरीच्या शहरी परतला.


  नियतीचा खेळही कसा असतो बघा! मनुष्य ठरवितो एक अन् घडतं वेगळंच. 


   पंकज गावाहून परत आला. परंतु नियतीनं त्याच्यापुढे वेगळंच ताट वाढून ठेवलं होतं. दुर्दैवाने त्याची वाट कायमची बंद केली होती. त्याची नोकरी कायमची गेली होती. त्यांना रजेचा अर्ज ज्या 'दिन्या'जवळ दिलेला होता, तो दिनकर त्याच्या अगोदर एक वर्षापासून त्या कंपनीत कामाला होता परंतु त्याच्या कामचुकार वृत्तीमुळे कंपनी व्यवस्थापक तसेच मालक त्याच्यावर नाराज होते. त्यामुळे त्याच्या पगारात अद्याप कवडीचीही वाढ झालेली नव्हती. आणि पंकजला तर एक वर्षानंतर येऊन बढती सुद्धा मिळाली होती. पंकजचा मित्र म्हणवून घेणारा दिनकर मना पासून त्याच्यावर जळत होता. किती दिवसा पासून मालकाच्या नजरेतून उतरविण्याचा प्रयत्न करीत होता. एकीकडे पंकजशी गोड बोलून मालका विरुद्ध भडकवायचा, व्यवस्थापनाबद्दल काहीबाही सांगायचा. दुसरीकडे मालकांना पंकज च्या विरुद्ध काहीतरी वेगळेच सांगायचा. अशा या दिनकरला आयती संधी मिळाली होती. त्यांनं, 'आलेली संधी सोडायची नाही' असे ठरविले. उलट स्वतःचा फायदा करून घेण्याविषयी विचार करू लागला.


   पंकजनं दिलेला अर्ज दिनकरने साहेबाकडे न देता स्वतःजवळ ठेवून घेतला. मालकाकडे जाऊन त्याच्याविरुद्ध बरच काही तिखट-मीठ लावून सांगितलं.


   "सर, आपण दिलेली पगार वाढ आणि बढती पंकजला आवडली नाही. तो नाराज आहे आणि माझ्या माहिती प्रमाणे तो दुसर्‍या कंपनीत नोकरीच्या प्रयत्नात आहे. त्याची वर्तणूकही आतापर्यंत व्यवस्थापना विरुद्धच राहिलेली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये तो नेहमी आपल्या विरुद्ध बोलत असतो. आपल्याशी गोड गोड बोलून त्याने बढती पदरात पाडून घेतली. परंतु आपण केलेल्या पगार वाढी बद्दल तो नाराज आहे. त्याची अपेक्षा खूप जास्त होती. त्याच्या अपेक्षा एवढी पगार वाढ न मिळाल्यामुळे तो सोडून जाण्याच्या विचारात आहे. 'येथे काही खरं नाही. बैलासारखं राबवून घेतलं जातं. पैशाच्या नावाने मात्र बोंबाबोंब आहे.' असं तो काल माझ्याजवळ म्हणत होता. सर, त्याच्याकडे जर असेच दुर्लक्ष होत राहिलं तर एक दिवस तो आपल्याला डोईजड झाल्या शिवाय राहणार नाही." असं बरंच काही सांगून दिनकरनं मालकाचे कान भरले. मालकालाही राग आला त्यांनी लगेच त्याला नोकरीत नोकरीतून कमी केल्याचा आदेश काढला. आदेशाची एक प्रत नोटीस बोर्डवर लावली. दुसरी प्रत पंकजला देण्यासाठी दिनकर जवळ दिली.


    नोकरीवरून कमी केल्याचा आदेश हाती पडताच पंकज थंडगार झाला. नोकरी मिळाली तेव्हा त्याला सुनंदा 'सगुणा' वाटली होती. तिच्याच पायगुणानं नोकरी मिळाली असे त्यास वाटत होतं. आणि आता तर ती त्याला पांढऱ्या पायाची वाटत होती. तिच्यासाठीच तर तो धावत पळत गावी गेला होता. रजा मिळाली किंवा नाही याचा सुद्धा विचार केला नव्हता. म्हणून नोकरी गेली होती. त्यामुळे तो तिच्यावर नाराज झाला. त्या निराशेतच तो दुसरीकडे नोकरी शोधत फिरू लागला. परंतु एकदा ग्रहदशा सुरू झाली की एवढ्या लवकर बदलत नाही. तो प्रत्येक ठिकाणी निराशेमुळं मुलाखत नीट देऊ शकत नव्हता. परिणामी तो अयशस्वी होऊन माघारी यायचा.


****


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama