STORYMIRROR

Pandit Warade

Romance Action Thriller

3  

Pandit Warade

Romance Action Thriller

एक होती कांचन-५

एक होती कांचन-५

7 mins
152

दुष्काळी परिस्थितीमुळं पंकजचे दोन्ही भाऊ परगावी निघून गेले. आता पुढील शिक्षणा साठी आधार घेण्याला तो आईला घेऊन मामाच्या गावी आला होता. मामाचं कुटुंब फार काही श्रीमंत नव्हतं. परंतु खाऊन पिऊन सुखी होतं. त्याला दोन मामा होते. थोरले भीमराव पाटील अन् धाकटे बाजीराव पाटील. भीमराव पाटलांना तीन अपत्ये होती. सर्वात मोठी कांचन आणि दोन मुलं प्रकाश आणि राजन. बाजीरावांनाही एक मुलगा आणि एक मुलगी. पैकी सुनंदा सर्वात मोठी होती. तर मुलगा श्याम तीन वर्षांनी लहान होता. सुनंदा अन् कांचन या दोघीही जवळपास समवयस्कच. दोघींमध्ये जास्तीत जास्त आठ - नऊ महिन्यांचा फरक. कांचन मोठी होती.

   साधारण समवयस्क असल्या मुळं पंकजची त्या दोघीं सोबत चांगलीच गट्टी जमली होती. शाळेत जातांना, येतांना, अभ्यास करतांना, शेतावर जातांना तिघंही सोबतच असायची.

   कांचन! एक सुस्वभावी, मनमोकळी मुलगी. रंग काळा सावळा. सुडौल बांधा, दिसायला काही म्हणावी अशी नव्हती. परंतु तिच्या मन मोकळ्या स्वभावामुळं सर्वांना करता येईल तेवढी मदत करण्याच्या वृत्तीनं ती सर्वांची आवडती होती. सुनंदा गौर वर्णीय असल्यामुळं कांचन पेक्षा दिसायला उजवी होती. परंतु तिच्या अबोल स्वभावामुळं ती कुणाशी मैत्री करू शकत नव्हती. तिची अबोल वृत्ती, लाजरेपणा, पंकज आणि कांचनच्या सहवासात मात्र कुठल्या कुठं गडप व्हायचा.

    असेच एक दिवस तिघंही शाळेतून सुटल्या नंतर शेतात गेले. शेतात कापणीचं काम सुरू होतं. प्रत्येक शेतात माणसं राबत होती. बाया - बापडे, लहान मुलं सुद्धा उन्हाची तमा न बाळगता खपत होती. या तिघांनीही कामाला मदतीच्या उद्देशानं सुरुवात केली. तिघंही जोरात कापणी करत होते. घामाघूम झाले होते. पंकजचा शर्ट घामानं पूर्ण भिजून चिंब होऊन पाठीला चिकटला होता. कांचन आणि सुनंदाची तर त्याहून वाईट अवस्था झालेली होती. ब्लाउज भिजून अंगाला चिकटले. डोई वरील अंबाडा सुटून केस सैल होऊन इतस्ततः विखुरलेले. रंगानं गोरी असलेल्या सुनंदाचे गाल टोमॅटो सारखे लाल झाले होते. परंतु एकमेकांच्या इर्षेनं, चढाओढीनं तिघंही काम थांबविण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

    शेवटी भीमराव पाटलांचं लक्ष त्यांच्या कामाच्या झपाट्याकडे गेलं. त्यांना मुलांची ती अवस्था बघवली गेली नाही. म्हणून त्यांनी काम बंद करायला सांगितलं.

    "कांचन, बस करा आता. तुम्ही तिघंही जाऊन आपल्या शेळ्यांना हिंडून आणा जरा. त्यांचे पाय मोकळे व्हायला पाहिजेत."

   "ठीक आहे आबा. चल रे पंकू. चल गं सुने. आपण बकऱ्या चारायला जाऊ या." अस म्हणत कांचननं हातातील विळा खाली टाकला. केसांची बट व्यवस्थित केली. घमेजलेलं अंग कोरडं केलं. अन् शेळ्यांच्या गोठ्याकडे निघाली.

  शेळ्या घेवून तिघंही डोंगराकडे निघाली. हिरवा पाला दिसताच शेळ्या पाल्यावर तुटून पडल्यात. जंगल चांगलंच दाट होतं. झाडं झुडूपं भरपूर होती. झाड पाल्यांमुळं शेळ्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नव्हती.

   "ए, कांचन आपण गाण्याच्या भेंड्या खेळू या का गं?" मोकळा वेळ बघून सुनंदाला खेळण्याचा मूड आला.

    "ठीक आहे. तू म्हणतीस तर आपण भेंड्याच खेळू या. काय रे पंकज, खेळू या ना?" कांचननं पंकजला विचारलं.

    "अगं, मला काय विचारतेस? तुम्ही दोघी ठरवा काय ते. मी केव्हांही तयार आहे. पण हे बघा, कुणी ही हरलं तर रडायचं नाही. खेल हा फक्त खेळण्या साठीच असतो. त्यात हार जीत होणारच. या सुनंदाला हरल्या नंतर रडायला फार लवकर येतं अन् ती रडायला लागली की, खेळण्यातली सर्व मजा निघून जाते. होय की नाही गं सुने?" पंकजनं सुनंदाची फिरकी घेत विचारलं.

   "हे रे काय? मी कधी रडते? असं सांगना, मी खेळात नकोय म्हणून. माझ्या मुळं खेळाची मजा जाते काय? ठीक आहे तुम्ही दोघंच खेळा. म्हणजे खेळाला रंगत येईल तुमच्या. मी बाजूला थांबते." सुनंदा टोमॅटो सारखे गाल फुगवून बाजूला सरकली.

   "ऐ, रागावलीस का गं? ये हे रे येडा बाई. हे नाही चालायचं बाई. तुझं आपलं नेहमीच रडगाणं असतं. भेंड्या खेळतांना सर्वांच्या अगोदर तूच हरतेस. तूच रडायला लागून खेळ बंद करतेस. म्हणून तो तसं बोलला. त्यात एवढं रागवायचं कशाला? आता आपण दोघी एका बाजूला राहू अन् मग बघ त्याची कशी फजिती होते." कांचननं सुनंदाच्या समजूत काढली.

   "मी तरी काय करू? मला गाणं जमतच नाही. गाण्याची तुमच्या एवढी आवड नसल्या मुळं गीताचे बोल मला लवकर आठवत नाहीत. त्यामुळं मी हारते." सुनंदानं स्पष्टीकरण दिलं. 

   "ऐ, कांचन जाऊ दे गं. भेंड्या नको तर नको. आपण लपंडाव खेळू." पंकज नं तोडगा काढला.

   "ठीक आहे." असं म्हणत पंकजच्या डोळ्यावर पट्टी बांधून दोघीही झाडाच्या आड लपल्या. पंकजनं एक, दोन, तीनचा इशारा झाल्या नंतर डोळ्यां वरची पट्टी काढली. आणि शोध घ्यायला सुरुवात केली.

   लपंडावाचा हा खेळ बराच वेळ सूर होता. तिकडे निशा अन् भास्कर यांचाही लपंडाव सुरू होण्याच्या बेतात होता. सूर्य मावळतीला निघाला होता. अंधारानं आपलं जाळं फेकायला सुरुवात केली होती. पण वेळेचं भान होतं कुणाला? खेळ अगदी रंगात आला होता. शेळ्या चरत चरत दूरवर डोंगरावर गेल्या होत्या. त्यांच्या कडे एकाचंही लक्ष नव्हतं. तेवढ्यात....

   .... एक शेळी जोरात ओरडली. अन् पंकजचं लक्ष तिकडं गेलं. एक कुत्र्या सारखा प्राणी एका शेळीला तोंडात धरून पळत होता....

   "कांचन, कांचन तिकडे बघ. कुत्र्याने शेळी पळवलीय." पंकजनं असं म्हणताच कांचनचं लक्ष तिकडं वेधलं गेलं.

    "अगं बाई! हा तर लांडगा आहे. अरे पळा पळा. शेळीला वाचवायला हवं." म्हणत कांचन पळायला सुद्धा लागली. तिघंही पळत तिकडे गेले. कांचन सर्वात अगोदर पोहोचली होती. तिनं त्या लांडग्याला दगड मारायला सुरुवात केली.

   तिघंही दगड मारत होते. कुणाचा दगड लागत होता तर कुणाचा चुकत होता. लांडगा त्या शेळीला तोंडात धरून जीव घेऊन पळत होता. शेवटी कांचननं नेम धरून एक दगड त्या लांडग्याच्या डोक्यात मारला. दगड लागताच त्यानं शेळीला खाली टाकून दिलं अन् रागानं एकदा कांचन कडे बघितलं. क्षणभर तो थांबलेला पाहून या सर्वांना आणखी जोर चढला त्यांनी पुन्हा दगड मारायला सुरुवात केली.

   लांडग्यानं क्षणभर थांबून आळीपाळीनं सर्वांकडे नजर टाकली. तिघंही एक साथ दगड घेण्यासाठी खाली वाकलेले होते. कुणाला काही कळायच्या आत लांडग्यानं कांचनवर झेप घेतली. त्यानं तिला आडवं पाडलं. शिकाऱ्याच्या थाटात तिच्या छातीवर दिन पाय ठेवून तो उभा राहिला.

   पंकज आणि सुनंदा दोघंही भीतीनं थरथरत होते. सुनंदानं तर डोळेच बंद करून घेतले.आणि ती मटकन खाली बसली पंकजही थिजल्यासारखा झाला. काय करावं सुचेना त्यानं एकावर लांडग्याकडे बघितलं. लांडगा विजयी मुद्रेनं त्याच्या कडे बघत होता. जणू त्याला वाकुल्या दाखवीत होता. म्हणत होता, 'खबरदार! पुढे आलास तर तुझे पण याच प्रकारे हाल होतील.' त्यानं कांचन कडे वळून बघितलं. तिच्या डोळ्यात भीतीचा लवलेशही नव्हता. तिच्या दिल्यात वेगळंच तेज चमकत होतं. ती काही तरी विचार करीत होती. पंकजची अन् तिची नजरा नजर डोळ्यांची भाषा डोळ्यांना कळली अन् ...

    लांडग्याला काही कळायच्या आत पंकज त्याच्या पाठीवर मंद ठोकून बसलेला होता. काही क्षण लांडगा बावरला. पण काही क्षणच. दुसऱ्याच क्षणी पंकजच्या मगर मिठीतून सुटण्यासाठी त्यानं कांचनला मोकळं सोडलं. कांचन मोकळी झाली. तिनं एक दीर्घ श्वास घेतला अन् पंकजच्या सहाय्या साठी सिद्ध झाली.

   लांडग्यानं आक्रमक पवित्रा घेतलेला होता. पंकजची अन् लांडग्याची झटापट रंगात आली होती. लांडग्यानं एक जोरदार झटका देऊन त्याला पाठीवरून खाली पाडलं होतं. तो चवताळलेला लांडगा एकट्या पंकजला भारी पडत होता. कुणाचं तरी सहाय्य घेतल्या शिवाय तो त्या जनावराच्या तावडीतून सुटणं अशक्य होतं. लगेच कांचन चण्डिकेचा अवतार धारण करून त्याच्या मदतीला धावली.

   त्या श्वापदानं आपला मोर्चा तिच्याकडे वळविला. जबडा वासून ते जनावर जणू एक घासात तिला गिळून टाकू इच्छित होतं. तिनं मागचा पुढचा विचार न करता त्या वासलेल्या जबड्यात हात घातला पंकज अन् तिनं मिळून त्याचा खालचा जबडा खाली अन् वरचा वर अशा अवस्थेत त्याला जखडून ठेवलं होतं.

   सुनंदा शुद्धीवर आली तेव्हा तिनं बघितलं, पंकज पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. कांचनलाही जखम झालेल्या दिसत होत्या. अंगावरील कपडे फाटले होते. दोघांनी मिळून लांडग्याला मात्र जेरीस आणलं होतं. 'हे दोघंही रक्तबंबाळ होई पर्यंत झटले अन् आता गुंतून पडलेले दिसताहेत. आपण काहीतरी केल्या शिवाय यांची सुटका होण्याचं चिन्ह दिसत नाही.' तिथं जवळच पडलेलं लाकूड तिनं उचललं. आणि जोर लावून, सर्व ताकदीनिशी त्या लांडग्याच्या डोक्यात घातलं. घाव वर्मी लागला. त्या सरशी त्याचा जीव कळवळला. तसे या दोघांनी हात न सोडता त्याला झटका देऊन खाली पाडलं. तो पर्यंत आणखी एक जबरदस्त फटका डोक्यात बसला. अन् त्यानं हात पाय झटकून प्राण सोडला.

    पंकज आणि कांचन दोघंही भयानक प्रमाणात घायाळ झाली होती. त्यातल्या त्यात पंकजच्या अंगावर तर जागोजागी रक्त वहात होतं. जास्त रक्तस्रावामुळं त्याला ग्लानी आली. ती मटकन खाली बसला. सुनंदानं त्याला सावरलं. कांचननं तशाही अवस्थेत पडत झडत, धावत पळत, जाऊन भीमराव पाटलांना सर्व घटना सांगितली. कांचनचा तो अवतार बघून आबा तर हबकूनच गेले. ते धावत पळत घटना स्थळी जाऊन पोहोचले. पाहतात तो पंकज रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला.

   आबांनी खळ्यावर जाऊन बैलगाडी आणली. सर्वांना गाडीत घातलं अन् गाडी दवाखान्याच्या रस्त्याला लागली.

     कांचनला थोड्या फार मालमपट्टीची आवश्यकता होती तेवढी केली. तिला लगेच घरी जाण्यास परवानगी मिळाली. थोडंसं औषध देऊन सुनंदालाही मोकळं केलं. मात्र पंकज खूपच जखमी झालेला असल्यामुळं त्याला किमान महिनाभर तरी दवाखान्यात रहावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं.

    कांचनला घरी जाण्याची परवानगी मिळाली असूनही तिनं दवाखान्यातच पंकज जवळ राहण्याचा हट्ट धरला. तिनं स्पष्ट शब्दात सांगितलं,.....

    "मी दवाखान्यातून जाणार नाही. कुणी काहीही म्हटलं तरी मी येथेच राहणार आहे. माझ्या साठी त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घातला. माझ्यामुळंच तो आज या अवस्थेत आहे. अशा स्थितीत त्याला सोडून मी घरी जाणं मला बिलकुल जमणार नाही. त्याला धडधाकट बरा करून दवाखान्यातून बाहेर कधीं त्या वेळेसच मी घरी येईन."

    तिचा दृढनिश्चय बघून सर्वांचा नाईलाज झाला अन् ती पंकजच्या सेवेसाठी दवाखान्यात थांबली.

   महिनाभर ती दवाखान्यात होती. रात्र रात्र ती पंकजच्या पायथ्याशी बसून रहायची. तिचं खाण्या पिण्या वरील लक्ष उडालं होतं. तिचं लक्ष एकच होतं, पंकजला लवकरात लवकर बरं करून घरी घेऊन जाणं. ती वारंवार एकच विचार करीत होती,

   'किती माया आहे याची माझ्यावर? केवळ माझ्यासाठी यानं स्वतःचा जीव डोक्यात घातला. पुरुष असावा तर असा. काही झालं तरी मी याच्या सेवेत कदापिही खंड पडू देणार नाही.'

   ती त्याच्या जखमांवर मृदू हातानं अंतःकरणातील मायेनं मलमपट्टी करायची.

   जखमा धुतांना त्याला कळवळतांना बघितलं की त्याच्या पेक्षा तिचाच जीव कासावीस व्हायचा. तीळ तीळ तुटायचा. के करू न काय नको असं व्हायचं तिला.

    या सहवासामुळं की काय कोण जाणे तिच्या मनात प्रीतीचं फूल तिच्या नकळत फुलत होतं. प्रत्येक वेळेस त्याच्या कडे बघतांना ती त्याला जोडीदाराच्या रुपात बघायची. त्याला घरी आणल्या नंतरही तिला त्याच्या जवळून दूर जावंसं वाटत नव्हतं. ती जास्तीत जास्त त्याच्या नजरे समोर रहायची. त्याला नजरे समोर ठेवायचा प्रयत्न करायची.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance