SAMPADA DESHPANDE

Thriller

3  

SAMPADA DESHPANDE

Thriller

एक आठवण

एक आठवण

10 mins
364


दिव्या आश्रमाच्या खिडकीत बसली होती. तिची नजर बाहेर होती. ऊन मी म्हणत होते. तिचे बाहेरच्या दृश्याकडे लक्षच नव्हते. आज ती ग्रॅज्युएट झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आली होती. त्याबद्दल मुख्य मंत्र्यांकडून तिचा सत्कारही झाला होता. त्याचबरोबर तिने MPSC परीक्षेत उत्तम मार्क मिळवून नोकरी मिळवली होती. ती आता अलिबागला नोकरीसाठी जाणार होती. तिला आश्रम सोडावा लागणार होता. आज १६ वर्ष झाली तिला या अनाथ आश्रमात येऊन. ती कोण होती तिचे आई-वडील कोण होते तिला आठवतही नव्हते. ती चार वर्षाची असताना कोणीतरी झोपलेल्या अवस्थेत तिला आश्रमाच्या दारात आणून ठेवले. तेंव्हापासून "आधार अनाथाश्रम" हेच तिचे घर झाला. समजायला लागल्यावर तिने आश्रमाच्या संचालिका त्यांना सगळेजण "आऊ" म्हणत असत त्यांना विचारायचा प्रयत्न केला कि त्यांना तिच्या जन्मदात्यांविषयी काही माहिती आहे का ? परंतु त्या काहीच सांगू शकल्या नाहीत. नाही म्हटलं तरी काही पुसटशा आठवणी होत्या. समुद्राच्या काठी एक मोठा वाडा . एक घाऱ्या डोळ्यांची सुंदर स्त्री , एक मोठ्या पिळदार मिशांचे गृहस्थ. अंगणात एक मोठा झोपाळा. पहिले पहिले या आठवणी स्पष्ट होत्या , मग धूसर होत गेल्या. ती तिच्या आयुष्यात रमली. रमली म्हणण्यापेक्षा तिनी तडजोड केली. आज इतक्या वर्षांनंतर तिला सहारा देणारं हे घरही तिच्यापासून तुटणार होतं. या घराच्या आठवणी मात्र कधीच पुसट होणार नव्हत्या, ती होऊन देणार नव्हती. आज तिचा निरोप समारंभ होता. तिच्याबद्दल बोलताना आऊ हळव्या झाल्या होत्या.  अशा किती अनाथ मुलींना आऊंनी आसरा दिला होता. त्याची आयुष्य मार्गी लावली होती. आज त्या सगळ्याजणी आपापल्या संसारात रमल्या होत्या. तरीही त्या आउंना विसरल्या नव्हत्या. आऊ म्हणजे सर्वांची आई होती. दिव्यालाही बोलताना भरून आलं होतं. सर्वांचा निरोप घेऊन ती निघाली. निघताना आऊंनी तिच्या हातात एक पेटी दिली." तू जेंव्हा आश्रमात आलीस ना ! तेंव्हा तुझ्या सोबत हि होती. तुझ्या पूर्वायुष्याची आठवण. मी ती कधीच उघडून पहिली नाही आणि तुलाही दिली नाही कारण तू सगळं सोडून तुझं पूर्वायुष्य शोधायला लागली असतीस. ज्यांनी तुझंच नुकसान झालं असतं. आता तू मोठी झालीस. चांगल्या-वाईटाचा विचार करू शकतेस, म्हणून हि पेटी तुझ्या हातात देत आहे. बाळा ! इथे कितीतरी मुली आल्या, काहींना अनौरस म्हणून टाकले गेले, तर काही आई-वडिलांना नकोशा म्हणून इथे सोडल्या गेल्या, यांपैकी कोणाचेही आई-वडील परतून चौकशी करायला आले नाहीत. परंतु तुझ्यासाठी मात्र एक चौकशीचा फोन सारखा यायचा. तुझं दिव्या नावही त्या व्यक्तीनेच सांगितले. माझ्या या अनाथ आश्रमाच्या निमित्ताने अनेक लोकांशी ओळखी आहेत. त्यात पोलिसही आहेत. मी या फोनचा मग काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मला यश आले नाही. गेल्या पाच वर्षात तर ते फोनही बंद झाले. तुझं देखणं रूप घारे डोळे पाहून तू नक्की एखाद्या मोठ्या घराण्यातली असावीस असे वाटते. आता आपल्या घराचा, माणसांचा शोध घ्यायचा कि आपलं आयुष्य आहे त्या मार्गानी पुढे जाऊन द्यायचं हे तुझ्या हातात आहे. मी तर तुला सांगीन भूतकाळाच्या मागे लागून भविष्यकाळ खराब करून घेऊ नकोस. तशी तू सुज्ञ आहेसच. " 

दिव्या अलिबागला आली. आऊंच्या ओळखीच्या गृहस्थांची एक सुंदर वाडी होती. दोघे नवरा-बायकोच तिथे होते, त्यांना एकच मुलगी होती ती लग्न होऊन सासरी होती. ते त्यांच्या घरातील काही खोल्या भाड्यानी देत असत. तिकडेच दिव्या राहणार होती. अलिबागमध्ये पाय ठेवताचक्षणी दिव्याला त्या गावाबद्दल आपुलकी वाटू लागली. आपले या गावाशी काहीतरी नाते आहे असे तिला वाटू लागले. वाडीवर आल्यावर तर ती खूषच झाली. ते जोडपे माई आणि अण्णा तिच्याशी खूप प्रेमानी वागत होते. त्यांनाही दिव्या खूप आवडली. ऑफिस ला हजार व्हायला अजून १५ दिवस होते गावाची ओळख व्हावी म्हणून ती लवकर आली होती. रात्रची जेवणे झाल्यावर ती खोलीत आली. खोली सुंदर हवेशीर आणि स्वयंपूर्ण होती. त्याची एक खिडकी समुद्रच्या बाजूला उघडत होती. दिव्यांनी उत्सुकतेने ती पेटी घेतली. पेटी सुंदर शिसवाच्या लाकडाची होती. त्यावर सुंदर कोरीवकाम केले होते. "ती खूप महागडी असणार !" दिव्याच्या मनात आले. मग तिने अलगद ती पेटी उघडली. तिच्यात सिंहाचे तोंड असलेले एक पदक होते . ते पदक हिरेजडित होते. पदक असलेली चेनसुद्धा सोन्याची होती. हे पदक कुठेतरी पाहिलंय असे तिला वाटत होते. मग आत एका जोडप्याचा फोटो होता. एक सुंदर घाऱ्या डोळ्यांची स्त्री आणि दिव्याच्या आठवणीतला तो पुरुष. त्या स्त्रीकडे बघताना दिव्याला आपण आपलीच छबी आरशात बघतोय असे वाटले. ते नक्कीच आपले माता-पिता असणार असे तिला समजले. फोटोमध्ये जो थोडा भाग दिसत होता त्यावरून ते सधन कुटुंबातले वाटत होते. मग त्यांनी आपला त्याग का केला हा प्रश्न तिला सतावत होता. काही करून आपण त्यांना गाठायचेच हा निर्णय तिनी घेतला. मग तिने खाली पहिले तर अनेक फोटो होते. समुद्राचे, समुद्रावरून दिसणाऱ्या शिवमंदिराचे, दिव्याला आठवणीत दिसणाऱ्या घराचे, झोपाळ्याचे. त्याखाली एक कागद होता खूप जुना त्यावर पुढील ओळी होत्या

शपथ तुला सुमद्रेश्वर शिवशंभूंची

तू कन्या या देवकुळाची

गाथा तंव जन्माची ऐक जरा

शोध घे तू तंव कुळाचा

शाप न तुज लागायचा

जर राहिलीस तू दुरी १६ वर्षे

तुझा जन्म हीच खूण

नको घेऊस तू दूषण

परी होईल धूळधाण तंव कुळाची

केल्या पापांची शिक्षा

भोगूनि उतरेल नक्षा, देवकुळीचा

समुद्रात श्रीबागच्या

छोटेसे बेट , जावे तेथे थेट

समुद्रेश्वर शिवशंभू हीच ती खूण

शोध घे तू त्याचा

आशीर्वाद तुज या शिवभक्त शंभूचा ||

हा श्लोक तिने परत परत वाचून काढला. हा लिहिणारा कवी नसावा. कारण कविता अगदी साधीच होती. तरीही तिच्यासाठी ती महत्वाची होती. उद्या या स्थळाबद्दल अण्णा-माईंना विचारावे असे तिने ठरवले. " दिव्या ! दिव्या ! वाचवं आम्हाला." एका मोठ्या लाटेबरोबर ते दोघे वाहून जात होते. दिव्या जीव खाऊन पोहत होती. तरीही ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती आणि अचानक ते दिसेनासे झाले. दिव्या घाबरून जागी झाली. सकाळ झाली होती. सकाळीच तिने तिच्या आई-वडिलांचा फोटो वगळून इतर फोटो माई आणि अण्णांना दाखवले. ते पाहताच ते घाबरून एकमेकांकडे बघायला लागले. " अगं हे फोटो तुझ्याकडे कसे आले? " माई ओरडून म्हणाल्या. अगं तुला फोटोत दिसतंय ते बेट चांगलं नाही. तिथे कोणीच जात नाही." माई म्हणाल्या. मग त्यांनी त्या विषयावर मौन पत्करलं. माईंकडे एक कामवाली होती. वय ८० च्या वर असेल. खूप वर्षे कामाला होती म्हणून तिला काढून टाकली नव्हती. ती हे सर्व ऐकत होती. दुपारच्या माई जरा पडत असत. त्याचवेळी दिव्याच्या खोलीचं दार वाजलं. यावेळी कोण आलं म्हणून तिनी दार उघडलं. म्हातारी दुर्गा आत आली. ती म्हणाली ," ताई तुम्हला त्या बेटाविषयी माहिती हवी आहे ना? तुम्हला पाहिलं तेंव्हाच ओळखलं कि तुम्ही त्याच आहात." दिव्याच्या चेहऱ्याकडे बघत त्या म्हणाल्या, " तुम्हाला समोर टेकडीवर घर दिसतंय ना तिथे शंभू राहतो, त्या बेटावरच्या मंदिराचा पुजारी तो सगळी माहिती देईल. त्याला जाऊन भेटा." इतकं बोलून ती पटकन निघून गेली. फिरायच्या बहाण्याने दिव्या ४ वाजता बाहेर पडली ती थेट टेकडीवर गेली. तशी छोटीशीच होती. त्यावर एक छोट्याशा घराव्यतिरिक्त काहीही नव्हतं. तिने त्या घराचा दरवाजा वाजवला. एक वृद्ध माणूस त्यातून बाहेर आला आणि तिला पाहताच तिचे पाय धरले. " मालकीणबाई आलात ? अहो किती वाट पाहायची तुमची?" गोंधळलेल्या दिव्याला पाहताच तो म्हणाला," माफ करा मालकीणबाई बसा इकडे. घर छोटे आहे अंगणातच बसुया. आज ना उद्या तुम्ही याल याची खात्री होती. मला माहित आहे तुम्हला काय ऐकायचे आहे ते. ऐका तुमच्या घराण्याची कथा. 

दिव्या या सगळ्या प्रकाराने गांगरून गेली होती. अनाथाश्रमात वाढलेल्या तिला समोरचा वृद्ध माणूस मालकीणबाई म्हणतो. तीच एक घराणं आहे , आणि त्याची कथा आहे तिला हे सगळं रहस्यकथेप्रमाणे वाटू लागलं. ती लक्ष देऊन ऐकत होती.

" हे कथा २०० वर्षांपूर्वीची आहे. तुमचे पूर्वज तेंव्हा या भूमीत आले. राजकिशोर देव यांनी युद्धात राजाची मदत केल्याबद्दल राजाने समुद्रातील ते बेट त्यांना इनाम म्हणून दिले. बेटावर गोड पाण्याचे झरे होते समुद्रेश्वर शंकराचे मंदिर होते. देवांचा परिवार मोठा होता. तिथे एक महालासारखा वाडा बांधून ते राहू लागले. त्या बेटावरचे रहिवासी त्यांना राजासारखा मान देऊ लागले. दर शिवरात्रीला शंभू महादेवाचा उत्सव तिथे दणक्यात होऊ लागला. राजकिशोरांनंतर त्यांचा लहान भाऊ त्यांची गादी सांभाळू लागला. तोही तितकाच प्रेमळ आणि शूरवीर होता. फक्त दुःख इतकंच होतं कि त्याला आपत्य नव्हतं. त्याच्या २ पत्नी होत्या. त्या दोघीही शंभू महादेवाची मनापासून प्रार्थना करत असत. परंतु खूप वर्ष होऊनही त्यांना मूल झालं नाही. अशातच महाशिवरात्री उत्सव आला. महाशिवरात्रीच्या उस्तवाला लांबून लांबून  लोक समुद्रेश्वराच्या मंदिरात येत असत. यावेळीही खूप गर्दी झाली होती. स्वतः नंदकिशोर देव लोकांची काही गैरसोय होत नाही याची जातीने काळजी घेत होते. त्यांनी तिथे एक धर्मशाळा बांधली होती. ते त्यांच्या धाकट्या राणीसोबत तिकडे व्यवस्था पाहायला गेले असताना. एक साधूबाबा त्यांना दिसले. त्यांचा वर्ण काळा होता. परंतु चेहऱ्यावर तेज होते. या उभयतांनी त्यांना नमस्कार केला व काही गैरसोय नाही ना ! अशी विचारणा केली. तेंव्हा त्यांनी हसून सगळे ठीक आहे अशी खूण केली. "पुत्र ! आम्ही स्मशानातही आनंदाने राहतो. आमची चिंता करू नको. परंतु आम्ही तुमची चिंता जाणली आहे. तुम्हाला आपत्य हवे आहे ना? त्यासाठी खूप प्रयत्न केलेत. तरी काही उपयोग झाला नाही होय ना? मी सांगीन तो उपाय केलात तर नक्की तुम्हला आपत्य होईल." ते दोघेही स्वामींच्या पाया पडले आपली इच्छा शंभू महादेव नक्कीच पुरी करेल ही त्यांना आशा वाटली. "तुम्हला आपत्य होण्यासाठी पौर्णिमेला जन्मलेल्या ५ कुमारिकांचा बळी देऊन त्यांच्या रक्ताचा समुद्रेश्वरला आभिषेक करावा लागेल. हे मंदिर फार पुरातन आहे. तिथे नरबळी दिला जात असे. परंतु काही वर्षांपासून हि प्रथा बंद पडली. म्हणून तुम्हाला हा त्रास झाला" साधूबाबा शांतपणे म्हणाले. परंतु हे ऐकणाऱ्या नंदकिशोर महाराजांचा चेहरा मात्र रगानी लाल झाला," महाराज ! काय सुचवताय आपण हे ? कोणताच देव नरबळी मागत नाही. हि विकृत मानवी बुद्धीची उपज आहे. मी आपत्य मिळण्यासाठी दुसऱ्यांच्या मुलींचा बळी घेणार नाही. आपण पाहुणे आहात म्हणून आपले हे असे बोलणे ऐकून घेत आहे. नाहीतर इतरवेळी असे बोलायची कोणी हिम्मत केली असती तर त्याचे मुंडकेच छाटून टाकले असते. " असे बोलून नंदकिशोर तिथून बाहेर पडले. इकडे राणीची चलबिचल झाली. तिने साधूबाबाना नमस्कार केला. साधूबाबांनी तिला तिची इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. राणीने पौर्णिमेला जन्मलेल्या कुमारिका शोधण्यासाठी एका दाईला बोलावले. ती गावात सर्वांची बाळंतपणे करत असे. या कामासाठी तिला भरपूर पैसे देऊ केले. मग झाले एक दोन असे करत चार मुली नाहीशा झाल्या. त्यांचे आई-वडील टाहो फोडून रडू लागले. महाराज नंदकिशोर राजाच्या कामासाठी बाहेर गेले होते. चार मुली झाल्या परंतु पाचवी कुमारिका मिळेना. राणी दाईवर चिडली.  मग दाईने घाबरत सांगितले कि पाचवी मुलगी त्यांच्या घरातलीच आहे तिच्या चुलत जावेची. तिला कसे मारणार ? पण राणी आपत्य मिळवण्यासाठी इतकी आंधळी झाली होती कि कि ती त्या मुलीला घेऊन मंदिरात गेली. तो दिवस अमावास्येचा होता. महाराज नंदकिशोर नुकतेच मोहिमेवरून आले होते. त्यांना घरात झालेला गोंधळ लक्षात आला. तसेच त्यांना गावातील चार कुमारिका नाहीशा झाल्याचेही समजले. आपल्या राणीने साधूचे ऐकून हि चूक केली हे त्यांच्या लक्षात आले. निदान या मुलीला काहीच होऊन द्यायचे नाही हे त्यांनी ठरवले. ते तिच्या आईला घेऊन समुद्रेश्वराच्या मंदिरात गेले. पाहतात तर काय राणीनी त्या मुलीचा बळी देऊन तिच्या रक्ताचा अभिषेक केला होता. हे पाहून त्या मुलीच्या आईने टाहो फोडला. ती अतिशय चिडली होती. तिनी चिडून देव घराण्याला शाप दिला कि , यापुढे जेंव्हा जेंव्हा देव घराण्यात मुलगी जन्माला येईल ती ५ वर्षांपेक्षा अधिक जगणार नाही. महाराज नंदकिशोर व्यथित झाले. त्यांनी पाय पकडून तिची क्षमा मागितली व शाप मागे घेण्यास सांगितला. मग दया येऊन तिने जर ती मुलगी पाच वर्षांची व्हायच्या आत तिला घरापासून लांब ठेवले, जर तिने घराण्याचे नाव नाही लावले तरच ती जगेल. वयाच्या विसाव्या वर्षानंतर हा शाप बाधणार नाही असे सांगितले व समुद्रात उडी मारून जीव दिला. महाराज नंदकिशोर व्यथित होऊन घरी आले. तेंव्हा त्यांना समजले कि थोरल्या राणी ४ महिन्यांच्या गरोदर आहेत. नऊ महिन्यांनी त्यांनी एका पुत्ररत्नाला जन्म दिला. परंतु त्या घराण्यात ज्या मुली पाच वर्षांपेक्षा जास्त राहिल्या त्या मुलींचा मृत्यू झाला. म्हणून दिव्या ताई तुमच्या आई-वडिलांनी मला तुम्हला अनाथ आश्रमांत ठेवायला सांगितले. पण आता तुम्ही त्या बेटावर जाऊन तुमच्या आई-वडिलांना भेटू शकता. आता शाप बाधणार नाही. उद्या सकाळी मी तुम्हाला घेऊन जाईन"

दुसऱ्या दिवशी बेटावर जाताना दिव्यानी विचारले कि आजही त्या बेटावर महाशिवरात्री उत्सव होतो का? तेंव्हा शंभूनी सांगितले कि तो बळीचा प्रकार झाल्यापासून समुद्रेश्वरला कोणी पूजत नाही. बेटावर उतरल्यावर प्रथम दिव्यानी तिथली माती कपाळाला लावली. मग ती आई-वडिलांना भेटायला वाड्याकडे निघाली. एकेकाळचा मोठा वाडा आता ढासळला होता. त्याचा काही भाग सुरक्षित होता. त्यात तिचे आई-वडील राहत होते. ते त्या बेटावरून बाहेर निघत नसत. त्यांना बाहेरून सर्व शंभूच आणून देत असे. दिव्याला आपल्या धूसर आठवणीचं चित्र स्पष्ट झाल्याचं जाणवलं. तो वाडा झोपाळा आणि समोरून येणारे तिचे आई-वडील. ती त्यांना पाया पडली. " बाळा !" बाबा इतकंच बोलू शकले. "तुझी प्रगती आऊंकडून काळात होती. कधी एकदा तुला भेटतो असं झालं होतं. आऊ माझी लहानपणीची मैत्रीण म्हणून तिच्या ताब्यात तुला देताना काळजी वाटली नाही. "आई डोळे पुसत बोलली. दिव्या घरात गेली. आईनी तिला तिच्या हातानी भरवलं. दोघेही डोळे भरून आपल्या लेकीकडे पाहत होते. " आई- बाबा एक कोणतीतरी जुनी कथा ऐकून तुम्ही मला लांब ठेवलंत माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. तुम्हाला सांगू माझ्या आठवणीत तुम्ही किती धूसर होतात? तुम्ही मला का सोडलेत असं सारखं वाटायचं . "ती खूप बोलत होती काय सांगू नि काय नको असं तिला झालं होतं. मग ती म्हणाली," चला ! आपण देवाच्या दर्शनाला जाऊ." दोघेही चमकले आई, बाबा देव कधीही वाईट नसतो. आपण माणसे त्याला चांगलं किंवा वाईट रूप देतो. चला जाऊया. मग ते देवळात गेले. दिव्यानी देऊळ साफ केले. शंभूनी पिंडीला अभिषेक केला. यावर्षीची शिवरात्र पाहिल्याप्रमाणेच साजरी होईल. " हो मालकीणबाई ." बाबा हात जोडून म्हणाले. आई आणि दिव्या जोरात हसू लागल्या. इकडे समुद्रेश्वरच्या मंदिरात शिरवरात्र होणार हे सगळीकडे पसरले.शंभूने हे काम चोख केले. बेटावरचा शाप संपला हे सर्व लोकांत पसरले. शिवरात्र दणक्यात साजरी झाली. अगदी पहिली व्हायची तशी. आई-बाबानी बेटावरची जमीन विकून टाकली आता ते अलिबागमध्ये दिव्याबरोबर एका छोट्याशा घरात राहतात. दिव्या नोकरी करते. ते आपल्या आयुष्यात सुखात आहेत. या आयुष्याच्या नवीन आठवणी मनात जपून देवाचे आभार मनात आहेत.


टीप- हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवली जात नाही.                                                          

   

 

                            


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller