झपाटलेले घर (भाग-१)
झपाटलेले घर (भाग-१)


सेवानिवृत्ती नंतर सुरेश त्याच्या मावशीच्या भेटी साठी तिच्या गावाला निघाला होता. नोकरीच्या ४० वर्षाच्या काळात त्याला नातेवाईकांकडे जायलाच मिळाले नव्हते. कधी तरी लग्न, शुभकार्य या निमित्तानं मामा आणि दुसऱ्या मावशी कडे जाणे व्हायचे अधून मधून, पण या मावशीचे गाव खूप दूर आणि दुर्गम भागात असल्यामुळे तो कळायला लागल्या पासून गेलाच नव्हता. मावशी आता थकली होती. वय झालं होतं. वृद्धापकाळाचे आजारही बिलगले होते. आता केव्हाही पिकले पान गळून पडले असते. __' _*आता सेवामुक्त झालोय तर पहिल्यांदा मावशीलाच भेटून आलेले बरे'*__ असा विचार करून तो एकटाच निघाला होता. गावचा रस्ता माहीत नव्हता. *दगडवाडी* गावाचे नाव तरी बरे लक्षात होते. विचारपूस करत तो चालला होता. थोडे अंतर गेले की थांबायचे, तिथे कुणाला तरी विचारायचे आणि चालायला लागायचे. त्यामुळे त्याला उशीर होत होता. दिवस असेपर्यंत त्या गावात पोहचावे असा विचार करून तो शक्य तितक्या वेगात गाडी चालवत होता. तरीही अंधार झालाच.
सुरेश गाडी चालवत होता. गाडीच्या प्रकाशात रस्ता स्पष्ट दिसत होता. __अजून किती अंतर राहिले?__हे विचारण्या साठी दूर दूर पर्यंत तरी कुणीही दिसत नव्हते. आपण कुणाला सोबत तरी आणायला हवे होते, त्याच्या मनात आले. प्रवासात एकाला दोघे बरे असतात. पण आता मनात येऊन उपयोग काय होणार होता? अंधार गडद होण्या आधी गाव गाठायलाच हवे होते. _अनोळखी प्रदेशात असं एकट्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे योग्य नाही._ ही वडिलांनी लहानपणी सांगितलेली गोष्ट आता त्याच्या मनाला पटायला लागली होती. वडीलधारी माणसं सांगतात ते काही खोटे नाटे नसते, ते त्यांचे अनुभव असतात. ते ऐकून स्वतःच्या जीवनात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. मात्र युवा पिढीची इथेच चूक होत असते. अचानक वेगात असलेल्या गाडीला कर्रर्रर्रर्र कच्च ब्रेक लावावा लागला. गाडी झटका आल्यागत थांबली. गाडी समोर एक जख्ख म्हातारा हातात कंदील घेऊन चालत असलेला दिसला. तो त्याच्याच नादात चालत होता. गाडी थांबल्याचा आवाज त्याच्या कानी गेल्याचे दिसत नव्हते. त्याने वळून सुद्धा बघितले नव्हते. _थोड्याच वेळापूर्वी तर रस्त्यावर कुणीही दिसत नव्हतं, अचानक भुतासारखा कुठून आला हा म्हातारा?_ सुरेश विचार करू लागला.
'भुतासारखा? हा भूत तर नसेल ना?' हा विचार मनात येताच सुरेश केवढ्या मोठ्याने दचकला. तरीही हिंमत धरून त्याने गाडीचा हॉर्न वाजवलाच. एकदा दोनदा तीनदा हॉर्न वाजवला तरी म्हातारा मागे वळून बघत नव्हता, किंवा रस्त्याच्या मध्यभागातून चालणे सोडत नव्हता. त्याच्या चालीने, त्याच्या मागून जाण्या शिवाय पर्याय नव्हता. सुरेश तसाच चालत होता. त्या म्हाताऱ्याला बहुतेक हे माहित असावे, निमूटपणे रस्ता दाखवत असल्या सारखा चालत होता. थोडे अंतर गेल्या वर तो थोडासा रस्त्याच्या कडेला होऊन थांबला. त्याने मागे वळून बघितले. सुरेश क्षणभर त्याच्या जवळ थांबला.
"एवढ्या रात्री एकटाच कुठं निंघालास बेटा?" म्हाताऱ्याने विचारले.
"दगडवाडीला जायचंय बाबा. रस्ता बरोबर आहे ना?" सुरेशने उत्तर दिले आणि रस्ताही विचारला.
"व्हय बेटा! हा रस्ता दगडवाडीलाच जातोय. आस्सं या अंगानं जावा. थोडं अंतर चालून गेल्यावर उताराचा रस्ता लागंल, खडकाळ रस्ता हाय. लई गाड्या तिथून पुढं गेल्या न्हाइत, कुठं गायब झाल्या म्हाइत न्हाई." म्हाताऱ्याने माहिती दिली. अन् थोडे अंतर चालला अन् गायब झाला. सुरेश स्तब्धपणे बघतच राहिला.
थोड्या वेळाने सुरेश भानावर येऊन गाडी घेऊन निघाला. 'हा म्हातारा कोण असावा? जसा अचानक रस्त्यावर आला तसाच अचानक गायब सुद्धा झाला. अशा अंधाऱ्या रात्री एकटाच इथे काय करत असेल? कशासाठी रस्त्याने एकटा फिरत असेल?' सुरेश विचार करत गाडी चालवत होता. गाडी चालवत चालवत बराच वेळ झाला, पण दगडवाडी गाव काही सापडले नाही. रस्त्याने जात असतांना दूरवर त्याला एका घरात दिवा जळत असलेला दिसला. त्याला जरा हायसे वाटले. ' _चला! कुणी माणूस तरी भेटेल बोलायला, विचारायला.'_ तो मनाशी विचार करत होता. तो उत्साहात गाडी चालवत त्या घराजवळ पोहोचला. त्याला काय झाले कळलेच नाही, तो जणू तेथेच जायचा होता अशा थाटात त्याने गाडी उभी केली आणि खाली उतरला. गाडीचा दरवाजा लावला. आणि गेटकडे वळला. एक सुंदर तरुणी गेटवर स्वागता साठी उभीच होती. भारावल्या सारखा तो तिच्या कडे चालत गेला.
गेट अर्धवट उघडून उभी असलेली ती सुंदरा कोण होती? माहीत नसतांनाही सुरेश पाहता क्षणीच घायाळ झाला होता. अधाशीपणे ते निखळ सौंदर्य जणू तो नजरेने प्राशन करत होता.
"यावं सरकार, दगडी महालात आपलं स्वागत आहे. मी राधिका आपल्या चरण कमला वर नतमस्तक होऊन आपले स्वागत करत आहे. यावं." असं म्हणत ती आत जाण्यासाठी वळली. तोही तिच्यामागे मंतरल्यासारखा जाऊ लागला. ते दोघे थोडे आत गेल्यावर गेट आपोआप बंद झाले.