देव माणसात असतो
देव माणसात असतो
रामू तसा नवसाचाच. नवसाचा म्हणून लाडाचाहीं. त्याच्या अगोदर कितीतरी जन्मले आणि मेले ही,जे जन्मले ते मरायचं म्हणून लेकरू जगाव यासाठी माय बापाने कितीतरी नवस केले. रामूच्या जगण्याचे नवस पूर्ण करण्यातच आई बापाचं संपूर्ण आयुष्य गेलं.. मरिमाय, पोचेमाय,भवानी पासून मसोबा पर्यंत सगळे देव झाले.... कोणताच देव सोडला नाही,किती कोंबडे बकरे कापले त्याचा हिशोबच नाही. शेवटी ऋण काढून सण म्हणून नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य घरात....मात्र देव्हाऱ्यात साऱ्या दुनियेचे तेहेतीस कोटी देव. देवाला उदबत्ती लावणं,नारळ फोडणे, पाणी घालणं नैवेद्य चारणे रोजचच. या देवासाठी उपवास नवस रोजच चालायचे. रामूला कांजण्या, खोकला, ताप कोणतं दुखणं जरी आलं तरी कमी व्हायचं ते देवाच्या नवसानच...
रामू मोठा झाला आणि सोबतच्या लेकरासंग शाळेत जाऊ लागला. आईबाप अडाणी म्हणून रामून शिकावं असं कुणाला वाटत नव्हतं. पण गावाची साऱ्या लेकरं जातात तर जाऊ द्या शाळेत. एवढेच आई बापाला वाटायचं. तसा तो उशिराच शाळेत जाऊ लागला म्हणून त्याला जरा लवकरच सार येऊ लागलं. त्याची ती हुशारी पाहून शाळेतील शिक्षकही जरा चकितच झाले. पोरग हुशार, मायबाप अडाणी. त्यांची ती गरिबी पाहून शिक्षकांनीच वही, पाटी, पेन, पुस्तकं पुरवायला सुरुवात केली. गुरुजींचा लाड पाहून रामूला शाळेची गोडी लागली. अभ्यासाची गोडी लागली आणि तो गुरुजींचा लाडका झाला. खेळात, स्पर्धेत,अभ्यासात नंबर मिळू लागला. चांगले गुण घेऊन पास होऊ लागला. शाळेतून पहिला नंबर आला.
गावातील शिक्षण संपलं आई-वडिलांना वाटू लागलं आता पोरानं गाई म्हशी सांभाळावं. नाहीतर पाटलाच्या घरी सालाने राहावं. आई बाप रामू ला म्हणाले," बापू शाळा बस कर आणि शेळ्या ढोर राख.... नाहीतर गावाच्या पाटलाकडे सालान राहा, बरं होईल... "
रामू हुशार होता, त्याला शिकायचं होतं. रामूने शाळेत शिक्षकांना सांगितले आई बाबा पुढे शिकवायला तयार नाहीत. शाळेतील सगळे शिक्षक रामूच्या घरी आले. रामूच्या आई-वडिलांना म्हणाले, "रामू अभ्यासात हुशार आहे, त्याला शिकू द्या. त्याचं शिक्षण थांबवू नका. कुठेतरी बाहेरगावी बोर्डिंग मध्ये राहून तो शिकेल. वाटल्यास आम्ही लागल ती मदत करू..." गुरुजीच्या मदतीने रामू बाहेर गावच्या शाळेत नी बोर्डिंग दाखल झाला. त्याच्या हुशारीमुळे तिथेही रामूचे नाव झाले. रामू दरवर्षी विविध स्पर्धात, खेळात आणि परीक्षेतहीं नंबर मिळवू लागला.अशा पद्धतीने कष्ट, हुशारीने अभ्यास करून रामू दहावी-बारावीत पहिल्या नंबर ने पास झाला. गावात आणि शाळेत त्याचा सत्कार झाला.
पुढील शिक्षणासाठी गावकरी, नातेवाईक,शिक्षक सर्वांनी रामूला मदत करायचं ठरवलं. रामूला शिक्षणाचे महत्व कळलं.या मदतीच चीज झालं पाहिजे म्हणून त्याने जिद्द केली.आहॊ रात्र अभ्यास करून तो मोठ येश मिळवीत गेला. जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनें स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आहो रात्र अभ्यास करून मोठ्या जिद्दीने पहिल्याच बारीतं आय. ए. एस.म्हणजे रामू कलेक्टर झाला. पेपर, रेडिओ, टीव्हीवर रामूची बातमी आली. कितीतरी पत्रकार रामूच्या मुलाखतीसाठी धावून आले. गावोगावी सर्वत्र रामूचा मोठा सत्कार व भाषणे झाली. रामूचं नाव झालं आणि त्यांच्या आई-वडिलांच्या कष्टाचं सर्वांच्या मदतीचे चीज झाले. रामूच्या आई-वडिलांना आणि गावालाही आनंद झाला. गावभर वाजत गाजत रामूची मिरवणूक काढली गेली. सत्कारानंतर भाषण करताना रामू म्हणाला, " शिक्षणाने माणसाचा, समाजाचा आणि देशाचा उद्धार होतो, माणसाचा उद्धार कोणताच देव करू शकत नाही. तुमच्या यशासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत, जिद्द हवी. अशक्य ते शक्य करून दावण्यासाठी माणसाला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज असते. व्यक्ती,समाज आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी संत, महापुरुषांचे विचार आवश्यक आहेतं.मानवता हाच खरा धर्म असून हीच खरी शिकवण आहे. ही शिकवण आपणास महापुरुषांनी साधुसंताने दिली म्हणून या महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या डोक्यात असायला हवेत. समाजोधारक, राष्ट्रोधारक म्हणून या महापुरुषांचे फोटो आपण देव्हाऱ्यात मांडूया,त्यांचा विचार आणि कार्याची आपण पूजा करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज,शाहू,फुले,आंबेडकर, अण्णाभाऊ यासारखे महापुरुष, संत बसवेश्वर,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास, संत एकनाथ.... सर्व संत महापुरुषांचे फोटो आपण देव्हाऱ्यात मांडून त्यांची पूजा केली पाहिजे. समता, बंधुता, एकात्मतेची, मानवतेची, प्रगती, परिवर्तनाची शिकवण आपल्याला आवश्यक आहे. देव दगडात नसून तो माणसात आहे ही शिकवण आपल्याला हवी आहे. " रामूचं हे बोलणं सर्वांना पटलं आणि सर्वांना आनंद झाला. टाळ्यांचा कडकडाट झाला....
रामूने आई-वडिलांचे दर्शन घेतलं. रामूची आई देव्हाऱ्यातील देवांना पेढे ठेवून दर्शन घेण्यासाठी गेली तर देव्हाऱ्यातील देवांच्या जागी महापुरुष, संतांचे फोटो दिसत होते. देव्हाऱ्यातून बाहेर आलेले तेहतीस कोटी देव बोलत होते," मानवता हाच खरा धर्म आहे आणि मानवतेची शिकवण देणारे महापुरुष,साधुसंत हेच खरे देव आहेत.खरी पूजा दगडांच्या देवाची नाही तर जिवंत माणसाची नी संत महापुरुषांची झाली पाहिजे. देव दगडात नाही माणसातच असतो... "
