Pratibha Tarabadkar

Drama Crime

4.5  

Pratibha Tarabadkar

Drama Crime

डायरी

डायरी

5 mins
346


 'गौरे, काय गं हा पसारा!' तोंडावर हात ठेवून डोळे विस्फारत आजी म्हणाली.पण कानात इयरप्लग घालून एकाग्रतेने कॉलेजचे सॅक भरणाऱ्या गौरीच्या ते गावीही नव्हतं.

बेडवरील चादरीचा बोळा झाला होता तर पांघरूण अर्धे खाली लोंबत होते. उशीच्या अभ्र्याचा तर पत्ताच नव्हता. जमिनीवर ळ आकारात पडलेली जीन्स, कंप्युटर वर साचलेली धूळ, इतस्ततः विखुरलेली पुस्तकं, रजिस्टर्स आणि फुलस्केपच्या चळती.आजीचे डोके गरगरू लागले.तीन मुलं होती मला,पण काय बिशाद होती त्यांची असा पसारा करण्याची! आजींच्या मनात आले.

 गौरीनं सॅक पाठीला अडकवलं आणि ती जाण्यासाठी वळली तोच आजीला पाहून दचकली.आजी आता नीटनेटकेपणावर नेहमीप्रमाणे लेक्चर झोडणार हे लक्षात येऊन तिने आजीची पप्पी घेतली अन दार उघडून 'बाय आजी'असे ओरडून धाडधाड पायऱ्या उतरून गेलीसुद्धा.आजी हतबुद्ध होऊन बघत राहिली.'दृष्टिआड सृष्टी'असे पुटपुटत आजीने गौरीच्या खोलीचे दार ओढून घेतले.

'हात मेल्या, तुला काही लाजलज्जा?मला विचारतोस आती क्या खंडाला म्हणून?'आजी आपल्या बाईल वरुन कोणाला तरी झापत होती. तिच्याजवळच सोफ्यावर बसून टी.व्ही.म्यूट करुन अभ्यास करणाऱ्या गौरीला हसू आवरेना.

'आजी तुला कोण ग खंडाळ्याला बोलावतंय?'

'बघ ना केव्हापासून सतावतोय मेला.काही जनाची नाही तर मनाची लाज असावी की नाही?'आजी सात्त्विक संतापाने म्हणाली,'आणि तू का टी.व्ही.समोर बसून अभ्यास करते आहेस? जा पाहू तुझ्या खोलीत.'आजीने गौरीला ही झापले.

'काय म्हणताय दीपाताई तुम्ही?'मोबाईलवर बोलत गौरीची आई तिच्या खोलीत शिरली आणि आणि मोबाईल वर गाणी ऐकण्यात मश्गुल असलेल्या गौरीने प्रसंगावधान राखून मोबाईल बंद केला आणि घाईघाईने अभ्यासाचे पुस्तक डोळ्यासमोर धरले. पण आईचे लक्ष तिच्याकडे नव्हते.

'अहो दीपाताई, मला पण काही दिवसांपासून कोणीतरी अश्लील व्हिडिओ क्लिप्स आणि मेसेजेस पाठवतोय.'आई जरी कुजबुजत्या स्वरात बोलत होती तरी गौरीला स्पष्ट ऐकू येत होते.काही वेळाने आईने मोबाईल बंद केला तेव्हा गौरीने हाक मारली,'आई ग', आणि आईने एकदम दचकून तिच्याकडे पाहिले.आतापर्यंत गौरी खोलीत असून आपले बोलणे ऐकत होती हे लक्षात येऊन आई अस्वस्थ झाली.'आई,'गौरी चुळबुळत म्हणाली,'अगं चंदनाला सुद्धा व्हल्गर मेसेजेस आणि व्हिडीओ क्लिप्स येताहेत.इतकी टरकलीय ना ती, की कॉलेजला पण येत नाहीये ! आणि आजीला पण एकदा असाच विचित्र फोन आला होता.'

'काय?'गौरीची आई ओरडली अन् काहीच न बोलता वेगाने खोलीबाहेर पडली.

'गौरी, अगं कॉलेजला नाही जायचं का आज?'अॉफिसला जाण्याआधी डबे भरत गौरीची आई हाका मारत होती.पण गौरीचा काहीच प्रतिसाद मिळत नाही हे बघून ती गौरीच्या खोलीत डोकावली अन् गौरीचा अवतार बघून हबकलीच.

रात्रभर रडून सुजलेले डोळे, विस्कटलेले केस, अन् शुन्यात नजर लावून बेडवर पडलेल्या गौरीला पाहून तिने थरथरत्या आवाजात गौरीच्या बाबांना हाक मारली.

अॉफिसला जाण्याच्या तयारीत गुंतलेल्या गौरीच्या बाबांना हाकेमधील गांभीर्य जाणवले अन् ते धावतच गौरीच्या खोलीत आले आणि समोरील दृश्य पाहून हादरले.

गौरी आईच्या मांडीवर डोके ठेवून हमसून हमसून रडत होती आणि गौरीची आई हातात मोबाईल घेऊन सुन्नपणे बसली होती तर आजी गौरीच्या डोक्यावरून हात फिरवत होती.

'आधी का नाही सांगितलं मला?'गौरीच्या बाबांचा भडका उडाला होता.'आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे तक्रार नोंदवायला जाऊ'.त्यांनी जाहीर केले आणि तिघीजणी घाबरल्या.

'अरे कशाला पोलिसांकडे जायचं उगाच!आपलीच बदनामी',आजी चाचरत म्हणाली.

'काही बदनामी वगैरे होत नाही.उलट गप्प बसलो तर त्या माथेफिरूचे चांगलेच फावेल.पोलिसांकडे जायचं म्हणजे जायचं.'गौरीचे बाबा गरजले आणि तिघींनी निमूटपणे मान डोलावली.

'कधीपासून अशा घटना घडायला लागल्या?'इन्स्पेक्टर कदमांनी विचारले


'साधारण दोन आठवड्यापासून.'गौरीची आई म्हणाली.'मला,दीपाताईंना, गौरीला आणि अगदी आजींना ही फोन आला होता.'

'सर, माझ्या चंदना नावाच्या फ्रेंडला पण असेच सेम मेसेजेस आणि व्हिडीओ क्लिप्स आल्या आहेत.'

गौरीच्या या बोलण्यावर इ.कदम चमकले.त्यांनी पुढ्यात कागद ओढला आणि गौरीला म्हणाले,'तू क्रमाक्रमाने सांग पाहू कोणाकोणाला फोन आले ते'!गौरी आठवून सांगू लागली,'सगळ्यात आधी आई,मग आजी त्यानंतर चंदना मग दीपाआत्या आणि आज मला आला.'

इ.कदम कागदावर भरभर सारा तपशील उतरवून घेत होते.'ठीक आहे.बरं तुम्ही ज्या नंबरवरुन हे मेसेजेस आले तो सेव्ह केला आहे का?'

'नाही हो' , गौरीची आई ओशाळून म्हणाली,'मी इतकी घाबरले ना की सगळंच डिलीट करून टाकलं'.

'सर , आमच्या आईच्या फोनमध्ये कदाचित असेल नंबर.गौरी तुझं काय?'

'बाबा, माझ्याकडे पण तो नंबर असेल कारण मी नंतर फोनला हातच लावला नाहीय.'

'ठीक आहे.'इ.कदम म्हणाले,'उद्या तुम्ही दोघेच तो नंबर घेऊन पोलिस स्टेशनला या. गौरीचे कॉलेज बुडायला नको.'

'आणि तुमच्या माहितीतल्या आणखी कोणाला असे मेसेजेस आले असतील तर पाठविणाऱ्याचा नंबर डिलीट न करण्याची सूचना द्या.'

'सर,हे घ्या नंबर्स.आई,गौरी आणि गौरीची मैत्रीण हर्षाला आजच आलेल्या फोनचा नंबर.'इ.कदमांच्या हातात गौरीच्या बाबांनी कागद ठेवला.

'माझा अंदाज बरोबर ठरला तर!'इ.कदम हात टेबलावर आपटून आनंदाने म्हणाले आणि हाक मारली.'चव्हाण,या नंबर्सचे लोकेशन शोधून काढा.'गौरीच्या आईबाबांच्या प्रश्नार्थक मुद्रा पाहून इ.कदम म्हणाले,'तुमच्या गौरीचं बॉयफ्रेंड,ब्रेक अप वगैरे झालंय का?'

इ.कदमांच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने गौरीचे आई-बाबा हबकलेच.

'नाही तसं काही झालेलं नाहीये.'गौरीची आई चाचरत म्हणाली.

'काय आहे,इ.कदम समजावून सांगू लागले,'हे जे फोन्स येत आहेत ते गौरीच्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेल्या इंग्रजी आद्याक्षरांप्रमाणे क्रमाने येत आहेत.जसे आई,आजी म्हणजे ए तर चंदना म्हणजे सी तर दीपा म्हणजे डी.म्हणून गौरीच्या बॉयफ्रेंड,ब्रेक अप बद्दल विचारले. कारण सूड उगवण्यासाठी सुद्धा मुलं असा उद्योग करु शकतात.तुम्हाला माहितच आहे हल्लीची पिढी तंत्रज्ञानात किती प्रगत आहे.हॅकिंग करणं त्यांना फार कठीण नसतं.'

'सर,या फोन नंबर्स चं लोकेशन राजस्थानचं आहे.'चव्हाणांनी इ.कदमांना माहिती दिली.

'राजस्थान?'गौरीचे आई-बाबा एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले.'आम्ही कधी राजस्थानला गेलो नाही ना आमचे कोणी नातेवाईक राजस्थानला आहेत.'

इ.कदम क्षणभर विचारमग्न झाले.मग अचानक त्यांनी विचारले,'गौरीने कधी कुरीयरवाला किंवा कुणा अनोळखी माणसाला ‌आपला नंबर दिलाय?'

'कधीच नाही.'गौरीचे बाबा ठामपणे म्हणाले.'आम्ही दोघं नोकरीनिमित्त घराबाहेर असतो त्यामुळे आई आणि गौरीला सक्त सूचना केली आहे की फोन नंबर द्यावयाचा झाला तर फक्त माझाच द्यावयाचा.'

'राजस्थानहून आलेले हे सर्व फोन नंबर्स वेगवेगळे आहेत. ठीक आहे',इ.कदम समारोप करीत म्हणाले,'तुम्हाला कोणाचा संशय आला तर ताबडतोब आम्हाला कळवा.आम्ही आमच्या पद्धतीने तपास चालूच ठेवतो.'घरातील वातावरण पार बिघडून गेले होते.प्रत्येकजण तणावाखाली वावरत होता.एव्हाना गौरीची जिज्ञासा नावाची मैत्रीण आणि कांचन मावशीला अश्लील फोन आल्याची बातमी येऊन धडकली होती.पोलिसांचा शोधही चालू होताच.पण गुन्हेगार दरवेळी वेगवेगळ्या नंबर वरुन फोन करीत असल्याने पोलिसांना यश येत नव्हते.

गौरीच्या घरी रोजचे व्यवहार यांत्रिकपणे चालू होते.आज कसलीतरी सुट्टी होती.गौरीची आई स्वयंपाक करीत होती तर बाबांनी साचलेली रद्दी आवरायला घेतली.

 'अरे प्रकाश,आपला रद्दीवाला राजस्थानचा आहे ना?'आजींनी अचानक विचारले आणि गौरीच्या बाबांचा हात थबकला. 'मागच्या वेळी नेहमीचा रद्दीवाला आला नव्हता कुठे लग्नाला जाणार होता म्हणे.राजस्थानहून आलेल्या पुतण्याला पाठवले होते रद्दी न्यायला. कानात लाल खड्यांच्या कुड्या घातल्या होत्या त्यानं बायकांसारख्या. मला मुळीच आवडला नाही तो.भिरभिरणाऱ्या नजरेने गौरी कडे अधाशासारखा बघत होता मेला.'

 रद्दी तशीच टाकून गौरीच्या बाबांनी पोलिस स्टेशन गाठले.

काही दिवस गेले अन् एके दिवशी गौरीचे आई-बाबा घाईघाईने अॉफिसमधून आले आणि आपल्याला पोलिस स्टेशनला बोलाविले आहे आताच्या आता तेव्हा लवकर तयारी करा असे गौरीला आणि आजींना बजावले.

 'मी कशाला पोलिसांकडे येऊ?'गौरीची आजी कुरकुरली पण तिचे कोणीच ऐकले नाही.'या,'इ.कदमांनी चौघांचे स्वागत केले.'आपला अंदाज खरा ठरला.तुमच्या रद्दीवाल्याचा पुतण्याच हे उद्योग करीत होता.'

गौरी हे ओळखलंस का काय आहे ते?' इ.कदमांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून एक डायरी काढून टेबलावर ठेवली.

 'ही तर माझी डायरी आहे.'गौरी आश्चर्याने डायरी चाळत म्हणाली.'पण ही तुमच्याकडे कशी?'

'हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा.'इ.कदम हसत म्हणाले.'आणि काय गं गौरी, मोबाईल असताना ही टेलीफोन डायरी कशाला?''आईबाबांनी टेन्थ पास झाल्यावर मोबाईल घेऊन दिला पण तो नवीन असतांना काही नंबर्स डिलीट झाले तर? म्हणून सगळे नंबर्स या डायरीत लिहून ठेवले.'

 'हो आणि नंतर वेंधळेपणाने ती डायरी नंतर गेली रद्दीत.व्यवस्थितपणा मुळी नाहीच! एक नंबरची धांदरट.....आजी आणखी काही बोलणार होत्या पण गौरीच्या बाबांनी डोळ्यांनी दाबल्याने त्या मध्येच थांबल्या.

'बरोबर बोलताहेत आजी.'इ.कदम म्हणाले

 'ही डायरी त्या मुलाला रद्दीतच मिळाली. इतकी महत्त्वाची गोष्ट कोणा अयोग्य माणसाच्या हातात गेली तर काय अनर्थ होऊ शकतो याची जाणीव तिला व्हायलाच हवी.तेव्हा गौरी,आता जबाबदारीने वागणार ना?''प्रॉमिस,'गौरी हात पुढे करून म्हणाली,'या क्षणापासून मी व्यवस्थितपणे आणि जबाबदारीने वागेन.'

 सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama