Jyoti gosavi

Children

3  

Jyoti gosavi

Children

चिंगीचा लाल परीतला प्रवास

चिंगीचा लाल परीतला प्रवास

4 mins
405


चिंगी आज सकाळपासून खुश होती. कारण आज आई बरोबर मामाच्या गावाला जायचे होते. 

लाल लाल एसटी मध्ये बसायचे होते . 

रात्रीची मुक्कामाची गाडी यांच्या गावातून सकाळी साडेआठला सुटायची. 

चिंगी रोज नऊ वाजेपर्यंत झोपायची.

 चार पाच वर्षाची चिंगी, अजून काही शाळा बिळा नव्हती. पण आज मात्र तिला आईने उठवायच्या आधीच उठून बसली.


काय आई ?अगदी गोड आवाजात तिने हाक मारली. 


काय ग चिंगू! आज बरी लवकर उठलीस? 


आई आज मामाच्या गावाला जायचय ना ?मग मी कुठला फ्रॉक घालू? 

 हा गुलाबी घालू? का तो काळा घालू ?


अग हो !हो !किती घाई ?

मी स्वतः आत्ताशी उठले आहे. तू झोप बरं ,मी तुला उठवते आणि तुझा आवडता फ्रॉक मी काढून ठेवलेला आहे. 


आईकडे बघत गोड हसत चिंगी झोपी गेली. झोपताना ती लालपरी मध्ये बसायचं स्वप्न बघत होती. मग आपल्याला खिडकीची जागा मिळेल, मग झाडे कशी मागे मागे पळतील, रस्ता कसा मागे मागे पडेल, आपण मात्र पुढे पुढे जाऊ. ती स्वतःशी खुदकन हसली. स्वप्नात पण तिला एसटी दिसत होती आणि खिडकीची जागा दिसत होती. 

साधारण तासाभराने ,आईने तिला उठवले, आंघोळ घातली, वेणीफणी केली, आणि तिचा आवडता लाल रंगाचा फ्रॉक अंगात चढवला. 

केसांचे दोन्ही बाजूला दोन बो बांधले. 


आई !ही माझी शिंगे आहेत मी तुला ढुशी देऊ?

देऊ! देऊ! असे म्हणत तिने आईच्या पोटाला प्रेमाने ढुशी दिली


चिंगे ! आजकाल फार वांड झाली आहेस !आई हसत म्हणाली .चहाटाळ पणा नको ,आपली गाडी जाईल. 


चला पटापटा आपण बस स्टैंड वर जाऊ या, असे म्हणून आईने एका खांद्याला मोठा कापडी झोळा अडकवला, आणि दुसऱ्या हाताला चिंगीला धरून त्या दोघी तरातरा बस स्टॅन्ड वर आल्या. 

तिकडे बघितलं तर अजून वेळ होती .ड्रायव्हर कंडक्टर आत्ताशी उठून चुळा भरत होते .

आईने कंडक्टर कडे बघितलं, त्याने दरवाजा खोलून दिला .


अरे वा! 👩आई, अख्खी एसटी आपल्या एकट्यासाठी? फक्त आपणच जाणार ?

अरे वा मज्जाच मज्जा. 


तसं नसतं ग चिंगे ,लोकं अजून यायची आहेत. त्यामुळे एसटी खाली आहे. आता हळूहळू लोक येतील. एका जागी बसून घे बरे! नंतर जागा मिळणार नाही. 


पण चिंगी काही आईचे ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. ती आपली, या सीटवरून त्या सीट वरती उड्या मारत होती. 

आई मी इथे बसणार! खिडकीतून कशी मज्जा मज्जा येईल नाही? 

नंतर ती पुढच्या सीटवर गेली ,आई मी इथ बसू ?

 आई मी तिथं बसू? 

असं करत करत तिने एस् टी मधल्या सगळ्या सीटला हात लावला. 


शिवा पाणी खेळताना जसं भोज्जाला टच करतात ना!

सगळ्या सगळ्या सीटचा भोज्जा केला.


 चिंगे,एका जागी बस बरं! आई ओरडली , एकदा का माणसे यायला लागली की मग तुला सीट मिळणार नाही. 

मग हो आई, हो आई, म्हणत चिंगी एका जागी बसली. 

हळूहळू एसटीला प्रवाशांची वर्दळ वाढू लागली, सगळ्या फुल झाल्या. 

आई तिला आधीपासून स्वतःजवळ बोलावत होती. पण ती हट्टाने मागच्या सीटवरती बसली, आणि सगळ्या सीट फुल झाल्यानंतर, अजून चिंगी जवळ कोणी बसायला आले नव्हते ,त्यामुळे ती खुश होती. 

तिला वाटले आता या सीटवर आपण एकट्यानेच प्रवास करायचा, आपल्या जवळ कोणी कोणी येणार नाही. 

तिने आधी बसताना कंडक्टरला सांगितले होते, ""ओ कंडक्टर काका" माझ्या शेजारी कोणाला तिकीट देऊ नका बरं. पण आता मात्र तिच्या शेजारी नऊवारी नेसलेल्या, नथ घातलेल्या, मावशी आल्या, "ए पोरे! तिकडं सरक बर"एवढ्याशा पोरीला अख्खी सीट कशाला पाहिजे? असं म्हणत त्यांनी चिंगुला खिडकीकडे दाबले,आणि आपण बसून घेतले. त्यानंतर शेजारी अजून एक माणूस आला, मग तो बसला. 

आता चिंगुला खूपच अडचण वाटू लागली. मग त्या नथवाल्या मावशीने तिला मांडीवर घेतले, आणि खिडकीची जागा स्वतःसाठी पटकावली . चिंगुला काही त्या अनोळखी मावशीच्या मांडीवर  बसवेना. चिंगी रडायला लागली, 

 ए आई, मला इथे नाही बसायचं .


काय बया दोडाची पोरगी आहे. चांगले मांडीवर घेतले तर रडती, मावशी बोलली


 अहो मावशी!पण तिची सीट होती ना? ती बसली होती ना? मग तुम्ही तिला मांडीवर घेऊन स्वतः का बसलात? आईने विचारले. 


पण त्या बाईशी भांडण्यात काही अर्थ नव्हता, हे तिच्या लवकरच लक्षात आले. 

त्या बाईने जोरात जोरात बडबडायला सुरुवात केली. 


काय बया तरी माणसं! एवढ्याशा पोरीला अखी शीट कशाला पाहिजे? तिकीट काढलं होतं का?  काय तर म्हणे तिची सीट होती. 

चांगली, माझ्या मांडीवर घेतली होती, आता माझ्या मांडीला काय काट हैत का? तिला काटा टोचत होता का? 

शेवटी आईने चिंगुला स्वतःच्या मांडीवर ती घेतले.


 बघ बाळा! माझ्यापाशी बसली असतीस तर ,तुला एकटीला आता खिडकी मिळाली असती की नाही! पण तू माझा ऐकलं नाहीस, इकडे तिकडे उड्या मारत राहिलीसं ,

आता माझ्या मांडीवर बस, कारण आईच्या शेजारची सीट देखील भरून गेलेली होती. 

मग चिंगू आईच्या मांडीवर बसली आणि खिडकीतून गंमत बघू लागली. 

एकदाची एसटी सुरू झाली आणि मग चिंगू ची कॉमेंट्री सुरू झाली. 

आई आई ते आंब्याचं झाड बघ मागे पळाले, 


आई आई तो कावळा उडत होता ना? पण आता आपण त्याच्यापुढे पळतोय 


आई ती शेतामध्ये पिवळी फुले कसली आहेत? 


आई! ती बघ हम्मा! 


आई तो बघ शेतामध्ये ट्रॅक्टर, कसा छान वाटतोय नाही. 

असं छोट्या छोट्या गोष्टीवर देखील तिचं निरीक्षण आणि बडबड असं चालू होती.


 तिच्या प्रश्नांना उत्तर देऊन देऊन आई बेजार झाली होती .


चिंगे !झोप बर आता, तिकडे मामाच्या घरी गेले की नुसती उंडारत असतेस, आणि मग दमतेस . 

झोप आता. 

हळू  हळू गाडीने वेग घेतला, थंड हवा लागली आणि चिंगु आईच्या मांडीवर ती पेंगु लागली. डोलू लागली, मगाशी रडलेले अश्रू वाळून गेले होते त्याचे गालावरती निशान राहिले होते. आईने ते हलक्‍या हाताने पुसले, एक पापा घेतला .

आणि म्हणाली "माझी सोनुली ती ,उगाच ऐकत नाही आपलंच खरं करते. आणि मग रडत बसते .


आणि आता ती स्वप्नांमध्ये खिडकीच्या सीटवर बसून मागे पळणारी झाडे बघत होती. मध्येच तिला भर दुपारी चंदामामा दिसत होता, आणि ती स्वप्नातच स्वतः हसत होती. 

*********************


Rate this content
Log in

Similar marathi story from Children