चेहरा
चेहरा


दिवस पहिला
"कधी कधी आपलं मन आपल्याला जे दाखवतं त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हेच कळत नाही. खूप दिवसापासून , एक चेहरा रोज माझ्या डोळ्यासमोर येत होता . मला काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण हे कितपत खरं होतं मला तेव्हा कळालं नाही. मला तरी कुठे माहित होतं कि, हाच चेहरा एक दिवस मला माझ्या आयुष्याच्या अशा वळणावर आणून ठेवेल, जिथे माझ्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार होता. आणि मग तिकडेच सुरु होते चेतन आणि अवचेतन मनाची खरी कसौटी." मी नेहा आणि हि माझी कहाणी.
मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा अजयने मला propose केलं होतं . तेव्हा मी Human Psychology चा अभ्यास करत होते. अजय आणि माझी मुलाखात अश्याच एका केसच्या संधर्बात झाली होती. तो त्याच्या एका मित्रासोबत आला होता माझ्याकडे. त्याच्या मित्राचा प्रॉब्लेम हळू हळू दूर झाला, पण त्या निमित्ताने मी आणि अजय कधी एकमेकांच्या जवळ आलो ते कळालंच नाही. शेवटी त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. घरच्यांनी थोडा विरोध केला, कारण अजय माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा होता आणि शिवाय तो विदुर होता. पण मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होते, आणि तो देखील माझ्यावर खूप प्रेम करायचा. म्हणून मला कधीही त्याच्या वयाचा किंवा मग त्याच्या विदुर होण्याचा प्रॉब्लेम नाही झाला. घरचे हि थोड्या दिवसात मानले, आणि आमचं लग्न अगदी थाटात झालं. पण, ह्याच नंतर माझ्या आयुष्यात अनेक धक्कादायक वळणं यायला लागली.
आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. मी रूम मध्ये अजयची वाट बघत होती. तेवढ्यात मला रडण्याचा आवाज आला. मी खूप घाबरले. "कोण आहे?" असंहि विचारलं पण, तो आवाज आणखीनच मोठा होत गेला. मी घाबरून उभी राहिले आणि, माझी नजर समोरच्या एका कपाटा कडे गेली. तो आवाज तिकडून येत होता. मी घामाघूम झाले होते. मी कपाट उघडताच, मला समोर एक चेहरा दिसला आणि मला वाटलं कि कोणी तरी माझ्या अंगावर धावून आलं आहे. मी जोरात ओरडले आणि बेशुद्ध झाले. त्यानंतर काय झालं मला माहित नाही. माझे जेव्हा डोळे उघडले तेव्हा, अजय माझ्या शेजारी बसून होता. डॉक्टर मला तपासत होते. मला काय झाला आहे , हे विचारल्यावर डॉक्टरने सांगितले कि लग्नाच्या धावपळीत stress वाढला असेल. BP high झाला होता. नाश्ता करत असताना मी अजयला रात्री घडलेला प्रसंग सांगितला. पण त्याने दुर्लक्ष केले, आणि तू खूप थकली असशील असं सांगून त्याने मला शांत केले. पण, माझ्या मनात कुठेतरी मला वाटत होतं कि, मी जे काल रात्री बघितलं ते सगळं खरं होतं.
मी आणि अजय आपापल्या कामात व्यस्त झालो. त्या रात्री घडलेला प्रकार हळू हळू माझ्या मनातून निघून गेला. सगळं काही व्यवस्थित सुरु होतं. सुट्टीच्या दिवशी मी आणि अजयने असंच फिरायला जायचा प्लॅन बनवला. जवळच एक खूप सुंदर sunset पॉईंट होता. आम्ही त्या पॉइंटवर पोहोचलो आणि अजयला एक कॉल आला. तो कॉल वर बोलत बोलत दूर निघून गेला. मी इकडे तिकडे लोकांकडे बघतच होते कि , माझी नजर एका मुलीवर गेली. तिचा चेहरा मला नीट दिसत नव्हता पण, ती त्या पॉईंटवरून उडी मारणार होती. मी धावत धावत गेली, इतक्यात तिने माझ्याकडे वळून पाहिले आणि मी तिकडेच स्तब्ध झाले. तोच चेहरा होता, जो त्या दिवशी मला रात्री दिसला होता. मी घामाघूम झाले होते. इतक्यात अजयने माझ्या खांद्यावर हाथ ठेवला. मी दचकले आणि जोर जोरात रडायला लागले. घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. पण, या वेळी देखील त्याने दुर्लक्ष केले आणि आम्ही घरी परतलो. त्या रात्री मला झोपच लागली नाही. काही दिवस मी माझ्या आई बाबांना बोलावून घेतलं. जे काही माझ्यासोबत घडत होतं, ते माझ्या समजण्याच्या पलीकडचं होतं.
अजयला अचानक कामानिमित्त Singapore ला जावं लागलं. माझे आई बाबा देखील निघून गेले होते. मी एकटीच त्या घरात होती. तेवढ्यात, एका छोट्या खोलीचा दार वाजला. मला वाटलं वाऱ्याने वाजला असेल, म्हणून मी तो दार बंद करायला गेले आणि इतक्यात एक फोटो माझ्या पायापाशी उडून आला. अजय आणि त्याची पहिली पत्नी रेवती, त्या दोघांचा फोटो होता तो. मी तो दार उघडून आत गेले. तिकडे रेवतिच्या काही जुन्या आठवणी ठेवलेल्या होत्या. मला अजून एक फोटो सापडला, पण त्या फोटो मध्ये चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मी तो फोटो बाजूला ठेवला. मला, तिकडे जादू टोण्याला वापरणाऱ्या पण काही वस्तू सापडल्या. थोडी भीतीच वाटली होती मला, ते सगळं बघून. त्या रात्री, पुन्हा तो चेहरा माझ्या स्वप्नात आला होता. "वाचवा... मला वाचवा.." असं ओरडत एक मुलगी पळत होती. तिचा चेहरा दिसत नव्हता, पण ती जेव्हा खाली पडली आणि तिने वर बघितले, तेव्हा कळालं कि हा तोच चेहरा आहे. मी दचकून जागी झाली. सगळीकडे शुकशुकाट होता. मी देवाचं नाव घेतलं आणि झोपी गेले.
अजय, अजून दोन तीन दिवसा नंतर घरी येणार होता. मी माझ्या कामात व्यस्त होते. संध्याकाळी असंच फिरायला निघाले. शेजाऱ्यांशी फारशी ओळख नव्हती. त्या दिवशी बागेत मला एक आजी आजोबा भेटले. त्यांच्याशी खूप वेळा गप्पा रंगल्या. मी निघतच होते कि, त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. मी खूप वेळा नाही बोलले पण, त्यांनी खूप आग्रह केला आणि मला त्यांच्यासोबत जावं लागलं . खूप सुंदर घर होतं त्यांचं. घरासमोर एक बाग होती. झोपाळा टांगला होता. घरात पाऊल ठेवताच मला काही तरी वेगळं जाणवलं. " येत जा ग अधून मधून. तेवढंच बरं वाटेल आम्हाला. तुझ्यासारखीच आमची नात होती ग.. पण... " एवढं बोलून त्या आजी रडायला लागल्या. मी त्यांना विचारलं देखील, पण त्यांनी मला काही सांगितलं नाही. त्या रात्री मला शांतपणे झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मी माझी कामं आटपून निवांत बसले होते. अजयला फोन केला पण, त्याने फोन उचलला नाही. थोड्या वेळाने त्याचाच फोन आला आणि त्याने सांगितलं कि, तो उदया संध्याकाळी घरी परतणार आहे. मी त्याला त्या आजी आजोबां बद्दल सांगितलं. तो खुश होता कि, मी हळू हळू त्या विचित्र प्रकरणातून बाहेर पडत होती . मी आमची रूम नीट करायला घेतली. माझी नजर त्या कपाटावर गेली. अगोदर मी खूप घाबरले, पण हळूच तो कपाट उघडला. त्या कपाटात जुनी कागदपत्र ठेवली होती. मी, एक एक करून ती सगळी बाहेर काढली आणि साफ सफाई सुरु केली. अचानक मला, त्या कागदपत्रांमध्ये काही कागदाचे तुकडे सापडले. मी त्यांना जोडायचा प्रयत्न केला, पण अर्धेच जोडू शकले. खूप कागदं गायब होती. मला त्या दिवशी फक्त इतकंच कळालं कि ते एक मृत्यूपत्र होतं . मिथिला नावाच्या मुलीचं . माझं मन खूप चलबिचल झालं होतं. मी, घरात जेवढी कागदपत्र होती, तेवढी सगळी पुन्हा एकदा तपासून बघत होते. त्यात मला हॉस्पिटलचं बिल सापडलं. अजयच्या नावावर होतं ते. मी जेव्हा ते वाचायला घेतलं, तेव्हा जणू काही माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते Singapore च्या एका हॉस्पिटलच बिल होतं आणि patient च नाव होतं रेवती. रेवती जिवंत होती…..
दिवस दुसरा
"विश्वास.. ह्या शब्दाची व्याख्या आज दुर्मिळ होत चालली आहे. आणि हाच विश्वास, जर तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीने तोडला तर तुम्ही काय कराल? असाच प्रश्न माझ्या समोर देखील उद्भवला होता.."
रेवती जिवंत आहे या गोष्टीवर माझा विश्वास बसत नव्हता. एवढी मोठी गोष्ट अजयने माझ्यापासून का लपवली होती? आम्ही तर एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. का त्याने मला इतका मोठा धोका दिला असेल? या सगळ्या प्रश्नांनी माझं मन अगदी बधिर झालं होतं. त्या रात्री मला झोपच लागली नाही. पहाटे पहाटे जरा झोप लागली, आणि मला तो चेहरा परत दिसला. ती मुलगी एका माणसासोबत होती. त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अचानक, त्या माणसाने त्या मुलीवर कुऱ्हाडीने वार केला. मी दचकून जागी झाले. हृदयाचे ठोके वाढले होते. सकाळ झाली होती. सूर्याची किरणे माझ्या अंगावर पडत होती. मी लगेच अजयला फोन केला, पण त्याचा फोन काही लागला नाही. सतत येणाऱ्या विचारांमुळे माझं मन अस्वस्थ झालं होतं. मी लगेच घराबाहेर पडले. काही दूर गेल्यानंतर, मला त्या आजी आजोबांचं घर दिसलं. परत, काहीतरी भास झाल्यासारखं जाणवलं आणि माझे पाय आपोआप त्या घराकडे वळले.
"आज इकडे कशी काय?" त्या आजोबांनी मला विचारले. गाढ झोपेतून कोणीतरी जागं केल्यासारखं वाटलं मला, आणि मी एकटक त्या आजोबांकडे बघत होते. "पोरी, तू ठीक आहेस ना?" आजोबांनी परत विचारले. हो मी ठीक आहे, असं मी त्या आजोबांना सांगितले. आजीने आतून हाक मारली. मी त्या घरात गेले आणि सोफ्यावर बसले. मनात विचार सुरूच होते. तेवढ्यात त्या आजी बोलल्या,"त्यादिवशी जास्त वेळ बोलता नाही आलं तुझ्यासोबत. तुला बघितलं ना, तर मला माझ्या नातीची आठवण येते बघ. तिचं हि नवीनच लग्न झालं होतं. सगळं काही व्यवस्थित सुरु होतं आणि एक दिवस अचानक गेली आमची मिथिला... " हे नाव कानावर पडताच मला जणू झटका लागल्यासारखं झालं.. काय? काय नाव म्हंटलं तुम्ही? "मिथिला.."त्या आजी बोलल्या. थोड्या वेळासाठी मी तिकडेच स्तब्ध झाले. स्वतःला सावरलं आणि तेवढ्यात, आजोबांनी माझ्यासमोर एक फोटो आणून ठेवला. "ही आमची मिथिला आणि तिचा नवरा अजय .." आजोबा बोलले. तो फोटो बघताच मी ताडकन उभी राहिले. मी जे बघत होते त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मिथिला म्हणजे तोच चेहरा जो मला रोज स्वप्नात दिसत होता. पण, अजय हिचा नवरा कसा? माझ्या डोळ्यासमोर काळोख व्हायला लागला, आणि मी बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा आजी माझ्या शेजारी बसून होत्या. त्यांनी माझा हाथ त्यांच्या हातात घेतला होता. "आजी, मिथिला सोबत नक्की काय झालं होतं?" मी एकदम गोंधळलेल्या आवाजात विचारलं. "मिथिला पुण्यातच राहायची तिच्या आई वडिलांसोबत. ती तिकडे एका मोठ्या कंपनीत कामाला होती. तिकडेच तिची आणि अजयची ओळख झाली होती. त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलं, पण तिचे आई वडील तयार नव्हते. अजय तिच्यापेक्षा वयाने मोठा होता आणि शिवाय विदुर होता. पण तिने हट्टच धरला होता. आम्ही तिच्या आई वडिलांना समझावलं, आणि मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात तिचं लग्न झालं होतं." "काय? मागच्या वर्षी?" मी जोरात ओरडले. "काय झालं?" आजीने मला विचारलं. माझ्या मनात हा प्रश्न येणं साहजिकच होतं, कारण आमचं लग्नहि मागच्याच वर्षी नोव्हेंबर मध्ये झालं होतं. अजयने मला तेव्हा ह्याबद्दल काही सांगितले नव्हते. "नंतर काय झालं आजी?" मी आजीला विचारलं. "सुखी संसार सुरु होता त्यांचा. पुण्यातच राहत होते. अधून मधून, इकडे मुंबईला अजयच्या दुसऱ्या घरी यायचे. इकडे आले तर आम्हाला हि भेटायचे. पण, कोणाची तरी दृष्ट लागली त्यांच्या सुखी संसाराला. तो दिवस अजूनही आठवतो मला. एप्रिलचा महिना होता तो आणि, एक दिवस आम्हाला तिच्या आई वडिलांचा फोन आला कि, मिथिलाचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतर अजयचा हि आमच्यासोबत काही संपर्क नाही." इतकं बोलून त्या आजी रडायला लागल्या. माझ्यावर जणू आभाळच कोसळलं होतं. मी त्यांना कसं सांगू शकले असते कि, मी पण अजयचीच बायको होते, आणि मला मिथिलाचा चेहरा स्वप्नात दिसतो. मी त्यांना कसं बस सावरलं आणि तिकडून निघाले.
अनेक शंकांनी माझं मन घेरलं होतं . हा खरंच तोच अजय होता का, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं ? आणि मिथिलाचं काय झालं ? तिचा नक्की अपघात झाला होता कि अजून काही वाईट घडलं होतं तिच्या सोबत.?त्या आजी आजोबांच्या घरात झालेला भास, ते सगळं काय होतं ? अजय सोडून माझ्यात आणि मिथिला मध्ये अजून काही संबंध होता का ? तेवढ्यात त्या छोट्या खोलीचं दार पुन्हा वाजायला लागला . मी तो दार बंद करायला गेले, आणि तेवढ्यात तिकडेच वर ठेवलेली एक पिशवी जोरात खाली पडली. मी आत जाऊन ती पिशवी उघडली आणि बघते तर काय? त्या पिशवीत तीच कुऱ्हाड होती जी मला स्वप्नात दिसली होती. ह्याचा अर्थ एकच निघत होता कि, मिथिलाचा अपघात झाला नव्हता. तिला ठार मारलं होतं. आणि बहुतेक अजयनेच हा दुष्कृत्य केला होता. माझं मन मला खूप काही सांगत होतं, दाखवत होतं पण, मला विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात माझ्या डोक्यावर कुठल्यातरी भारी वस्तूने प्रहार झाला आणि मी बेशुद्ध झाले…..
दिवस तिसरा
"Life after death, पुनर्जन्म, आत्मा, या सगळ्या गोष्टी खूप विचित्र वाटतं ना ऐकायला. Psychology च्या भाषेत म्हणायचं तर या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या उत्पत्ती आहेत. पण, माझ्या बाबतीत जे घडलं होतं, त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे मला कळत नव्हतं. मी खरंच कोण होते? नेहा कि मिथिला....?"
मला जेव्हा शुद्ध आली, तेव्हा मी माझ्या रूम मध्ये होते. माझे हात पाय बांधलेले होते, आणि मी जोर जोरात ओरडत होते,रडत होते. पण, कोणीच मदतीला आलं नाही. तेवढ्यात माझ्या जवळ एक कागदाचा तुकडा उडून पडला . त्यावर लिहिलं होतं मृत्यू दिनांक २० एप्रिल २०१६. ते पाहून मला धक्काच बसला, कारण, त्याच दिवशी मी मृत्यूच्या तावडीतून बाहेर पडले होते. झालं असं होतं कि , त्या दिवशी माझा वाढदिवस होता. मी माझ्या मित्रांबरोबर पार्टी ला गेले होते. थोडी नशा चढली होती मला. परत येताना, माझ्या कारचा accident झाला. माझं खूप रक्त वाहून गेलं होतं आणि खूप इजा पण झाल्या होत्या. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला होता मला वाचवायचा, पण त्यांना काही यश आलं नाही आणि माझा मृत्यू झाला होता. पण, चमत्कारच म्हणा,एक अर्ध्या तासाने मला शुद्ध आली आणि मी हॉस्पिटलच्या बेडवर उठून बसले. सगळे चकितच होते. ह्या घटनेच्या बरोबर तीन महिन्या नंतर माझी आणि अजयची भेट झाली आणि, त्याच्या चार महिन्यानंतर आमचं लग्न झालं होतं. खरंतर आमच्या भेटीपासून ते आमच्या लग्नापर्यंत, अश्या खूप काही गोष्टी घडल्या होत्या जे माझ्या समजण्याच्या पलीकडे होत्या. खूप वेळा असं झालं होतं कि, मी जेव्हा जेव्हा अजय सोबत असायचे , तेव्हा तेव्हा मला असे भास व्हायचे कि, माझ्या सोबत ह्या गोष्टी अगोदरच घडल्या होत्या. काही गोष्टी तर माझ्या नकळतच घडत होत्या, आणि मला त्या जाणवत देखील होत्या. एकदा मी अजयला मारायचाहि प्रयत्न केला होता, पण कोणीतरी मला हाक मारली आणि मी शुद्धीवर आले. लग्नाच्या दिवशीपण जेव्हा आम्ही सप्तपदी घेत होतो, तेव्हा मला जाणवत होतं कि मी अजयसोबत अगोदरही सप्तपदी घेतली होती, आणि त्याच क्षणी मनात एक भीती निर्माण झाली होती. ह्या सगळ्या गोष्टींचा आणि माझा मिथिलाच्या मृत्यूशी काही संबंध होता का? अचानक माझ्या रूमचा दार उघडला आणि अजय माझ्या समोर उभा होता. त्याने एक काळा कुर्ता घातला होता, कपाळावर खूप मोठा तिलक होता आणि हातात माळा होत्या. त्याचं हे असलं रूप मी पहिल्यांदाच बघत होते. मी घाबरले होते. तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या कपाळावर कुंकू लावला. माझ्या नाकावर एक रुमाल ठेवला आणि मी पुन्हा बेशुद्ध झाले.
हळू हळू मी डोळे उघडले तेव्हा मी बघितलं कि, मी त्याच छोट्या खोलीत होते जिथे मला ती कुऱ्हाड आणि जादू टोण्याच्या वस्तू सापडल्या होत्या. अजूनही मी पूर्णपणे शुद्धीत नव्हते. सगळं अंधुक दिसत होतं मला . माझे हात पाय अजून बांधलेच होते, आणि माझ्या गळ्यात फुलांची माळा देखील होती. एक तांत्रिक बसला होता समोर ,काहीतरी मंत्रजाप सुरु होता. तेवढ्यात अजय आत आला पण तो एकटा नव्हता. मी जरा डोळ्यांवर जोर देत बघितलं तर, मला रेवती दिसली . अजय आणि रेवती माझ्यासमोर येऊन बसले. मंत्रजाप सुरूच होता. तेवढ्यात मला दिसलं कि, मिथिला सोबत पण असाच काही प्रकार घडला होता. तिचा बळी दिला गेला होता. मी भानावर आले तेव्हा, अजय कुऱ्हाड घेऊन माझ्याजवळ येत होता. तो जसा जसा माझ्या जवळ येत होता, तसं तसं माझ्या छातीत धड धड वाढायला लागली होती. "वाचवा.. वाचवा" असं मी ओरडत होते. तो माझ्या मानेवर वार करणारच होता कि, गोळी चालवण्याचा आवाज आला. अजयच्या हातावर गोळी लागली होती आणि त्याच्या हातातली कुऱ्हाड खाली पडली. पोलीस आले होते आणि त्यांच्या सोबत ते आजी आजोबा पण होते. "पोरी तू ठीक आहेस ना.. उठ" त्या आजी मला बोलल्या. मी जाऊन सोफ्यावर बसले . माझे हाथ पाय गार पडले होते. . पोलिसांना हवी असलेली माहिती मी दिली. अजय, रेवती आणि त्या तांत्रिकाला अटक करण्यात आली होती. त्या रात्री , ते आजी आजोबा माझ्या सोबत होते. माझ्या मनात अनेक प्रश्न यायला लागले होते. आजी आजोबाना कसं माहित पडलं होतं कि माझा जीव धोक्यात आहे? अजय आणि रेवतीने असं दुष्कृत्य का केलं असावं? हळू हळू सगळ्या प्रश्नांची उत्तरं उलगढत गेली.
"त्यादिवशी तू आमच्या घरून एवढी चिंतेत निघाली, हे बघून मला राहवलं नाही. तू सुखरूप घरी पोहोचते कि नाही, या करता मी तुझा पाठलाग करत होतो. पण, मला हे बघून धक्काच बसला कि तू मिथिला आणि अजयच्याच घरात जात होतीस. मी खूप वेळ तिकडेच थांबलो. चौकशी केली तेव्हा कळालं कि, तुझं आणि अजयचं लग्न झालं आहे. मी घरी आलो आणि हिला सांगतच होतो कि अचानक, मिथिला आणि अजय ची फोटो फ्रेम खाली पडली आणि त्यातून एक चिट्ठी बाहेर आली ." एवढं बोलून आजोबानी ती चिट्ठी मला दिली. ती चिट्ठी वाचून झाल्यावर मी स्तब्ध झाले होते. आजही आपल्या समाजात अंधश्रद्धा, जादूटोना या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोकं आहेत हे वाचून मला आश्चर्यच वाटत होतं. मी तर म्हणेल हि लोकं विक्षिप्त असतात. रेवती ब्लड कॅन्सरने ग्रस्त होती. खूप औषधं, उपचार केली पण त्याचा काही फायदा झाला नाही. उलट तिची परिस्थिती खूपच वाईट होत गेली. अजयचं रेवती वर खूप प्रेम होतं. तिला बरं करण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकत होता. ह्याचा एकच अर्थ निघत होतं कि , माझ्यासाठी आणि मिथिलासाठी असलेलं त्याचं प्रेम , काळजी हे सगळं खोटं होतं. त्याने एका तांत्रिकाला विचारले , तेव्हा त्याला सल्ला दिला गेला होता कि एका वर्षाच्या आत, दोन विवाहित कुमारिकेचं बळी देऊन, त्यांचं रक्त रेवतीच्या शरीरावर लावावा लागेल आणि ते हि, चैत्र महिन्यातील अमावस्येला. म्हणूनच कि काय, आमचं लग्न होऊन सुद्धा अजय माझ्यापासून लांब राहायचा. आमच्या दोघांमध्ये कधीच शारीरिक संबंध झाला नाही. . मिथिलाला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळाल्या , तेव्हा तिने विरोध केला होता. पण, दुर्दैवाने तिचा बळी दिला गेला होता. "आम्ही हि चिट्ठी वाचली, आणि लक्षात आलं कि आज पण चैत्र महिन्यातली अमावस्या आहे.मिथिलाला तर वाचवू शकलो नाही आम्ही, पण तुला वाचवायचं होतं आम्हाला. लगेच पोलिसांना फोन केला आणि तुझ्या घराकडे धाव घेतली. " एवढं बोलून त्या आजी माझ्या गळ्यात पडून रडायला लागल्या. "Grandma, रडू नकोस... सगळं ठीक झालं आहे " हे वाक्य ऐकताच आजी आणि आजोबा माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले. Grandma ह्या नावाने मिथीलाच बोलवायची. मी हे काय बोलून गेले, मला माझंच कळलं नाही. त्यांच्याशी बोलता बोलता कळालं कि माझ्यात आणि मिथिला मध्ये अजून एक साम्य होतं, ते म्हणजे आमची जन्म तारीख २० एप्रिल १९८७. खूप विचार केला तेव्हा कळालं कि, मी आज जिवंत आहे ते फक्त मिथिला मुळे. ग्रह, नक्षत्र हे योगायोगाने जुळून आले असतील आणि, त्या दिवशी मी त्या मृत्यूच्या साखळ्यातून बाहेर आले. एका अर्थाने माझा पुनर्जन्मच झाला होता, आणि मिथिलाचाही सूड पूर्ण झाला.
आज तीन वर्ष झाली हा सगळा प्रकार घडून. अजय आणि तो तांत्रिक अजूनही तुरुंगातच आहे. अटकेनंतर दोन महिन्यातच रेवतीची तब्येत अजूनच बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. आजी आजोबा पण खुश आहेत. अधून मधून मी त्यांना भेटायला जाते. जगासाठी मी नेहा आहे, पण त्या दोघांसाठी मी मिथिला आहे. मी आजही नेहा म्हणूनच वावरते, पण अजूनही मिथिलाच्या काही गोड आठवणी, माझ्या मनातल्या कोपऱ्यात साठलेल्या आहेत, आणि अधून मधून मला जाणीव होत राहते. माझं हे जीवन मिथिलाचं देणं आहे, आणि मी तिची आयुष्यभर ऋणी आहे.