Sonam Rathore

Tragedy Romance

4.3  

Sonam Rathore

Tragedy Romance

सोलमेट

सोलमेट

11 mins
10.4K


"काय? पण हे कसं शक्य आहे?" राधिका आणि माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. राधिका ही माझ्या अत्यंत जवळच्या मित्राची Girlfriend होती. माझा मित्र राहुल, त्याने तिला propose करायचंही ठरवलं होतं. त्या रात्री तो माझ्या रूमवर आला होता. खूप खुश होता तो. "अज्या, मी उद्या राधिकाला propose करणार आहे. उद्या तिचा वाढदिवस आहे. ती जर उद्या तुला भेटली, तर ह्याबद्दल तिला काही सांगू नकोस... surprise आहे तिच्यासाठी." हे ऐकून मी खुश होण्याचा प्रयत्न करत होतो, पण हे ही सत्य होतं, की मी राधिका वर, आणि राधिकासुद्धा माझ्यावर प्रेम करायला लागली होती. त्या रात्री माझ्या डोळ्यासमोर आमच्या जुन्या आठवणी येऊ लागल्या.


मी आणि राहुल Chuddy Buddies होतो. मला आठवतंय, लहानपणी तर मी जितका माझ्या घरी राहिलो नसेल, तितका राहुलच्या घरी राहत होतो. कधीकधी तर लोकं आम्हाला सख्खी भावंडंच म्हणायचे. हळूहळू दिवस कसे निघून गेले कळालंच नाही. योगायोग बघा, आमच्या दोघांचंही selection एकाच मेडिकल कॉलेजमध्ये झालं. तिकडे मात्र आम्हाला सोबत राहायला मिळालं नाही, पण, आमचा धिंगाणा सुरूच असायचा. बघताबघता आम्ही मेडिकलच्या शेवटच्या वर्षात आलो, आणि तिकडेच आम्हाला भेटली राधिका. राधिका आमची junior होती, नुकतीच पहिल्या वर्षात आली होती. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा माझी नजर तिच्यावर पडली होती. नेहमीप्रमाणे मी आणि राहुल lecture साठी late झालो होतो. आम्ही दोघं lecture हॉल मध्ये जाणार, इतक्यातच माझी नजर एका गोंधळलेल्या, थोड्याशा घाबरलेल्या मुलीवर पडली. दिसायला सुंदर, लांब केस, घारे डोळे, आणि लाल कलरचा तिचा पंजाबी ड्रेस, जणूकाही अप्सराच माझ्या डोळ्यांसमोर होती. राहुल आत चालला गेला, पण मी मात्र तिच्या दिशेने जायला निघालो. "हाय... May I Help You?" तिने लगेच माझ्याकडे बघितले आणि विचारलं , "first year classroom कुठे आहे? माझा आज पहिलाच दिवस आहे आणि बघ ना किती उशीर झाला." मी तिला रस्ता दाखवला आणि ती लगेच त्या दिशेने चालत गेली. मी तिच्याकडे बघतच उभा होतो. इतक्यात लक्षात आलं की मी तिचं नावदेखील विचारलं नाही. "Excuse me... Excuse me..." करत मी तिच्यामागे गेलो, पण ती class मध्ये निघून गेली.


अनेक दिवस अशीच निघून गेले. ती मुलगी मला दिसायची, पण ती सतत तिच्या मैत्रिणींसोबत असायची. तिकडे जाऊन तिच्याशी बोलायची हिम्मत कधी झाली नाही आणि हळूहळू आम्हीदेखील परीक्षेच्या तयारीला लागलो. परीक्षा संपल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. मी उत्सुक होतो की ती मुलगी मला पुन्हा दिसेल. मी सुद्धा त्या कार्यक्रमात भाग घेतला होता. मला कविता लिखाण आणि वाचनाची आवड होती. माझा performance झाला आणि मी backstage ला पोहोचलो. मी बघितलं की ती मुलगी पण तिकडेच उभी होती. तिचा dance performance होता. मी तिच्याजवळ जातच होतो की राहुलने मला हाक मारली, "अज्या, काय सॉलिड performance होता रे तुझा आणि हो, मी तुला सांगितलं होतं ना त्या मुलीबद्दल. हीच ती. Meet my girlfriend राधिका. राहुलने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता." हे बघून आणि ऐकून मला काय बोलावं हे कळतंच नव्हतं. तेवढ्यात राधिका बोलली, "अरे... आपण तर पहिल्याच दिवशी भेटलो होतो ना. सॉरी हं... त्या दिवशी मी तुला काही न बोलताच तिकडून निघून गेले. उशीर झाला होता ना. By the way thanks." एवढं बोलून ती stage वर चालली गेली. मी तिकडेच स्तब्ध होऊन उभा होतो, कारण राधिका मला आवडायला लागली होती, पण आता ती राहुलची girlfriend होती.


राहुलने त्या रात्री मला, सविस्तर सगळं सांगितलं की त्याची आणि राधिकाची भेट कशी झाली. मी आणि राधिका खूप चांगले मित्र झालो होतो. मी त्या दोघांसाठी खूप खुश होतो. अजूनही मनात राधिकाविषयी भावना होत्या, पण त्यानंतर मी, त्या कधी समोर येऊ दिल्या नाहीत. सगळं काही व्यवस्थित सुरु होतं. आम्ही तिघं मिळून खूप धमाल, मस्ती करायचो. हळूहळू राधिका आणि माझ्या गप्पा वाढत गेल्या. तिच्या आवडीनिवडी सगळं काही ती मला सांगायला लागली. तिला पण कविता लिखाण आणि वाचनाची सवय होती. खूप साधी होती ती. त्या उलट राहुल होता. म्हणतात ना opposite attracts, त्यांच्या बाबतीत तर हे फारच टोकाचं होतं. राहुलला HipHop music आणि Disco ची आवड होती, तर राधिकाला light music आणि शांत ठिकाण आवडायचं. राहुलला roadside फूड कधीच आवडलं नाही आणि राधिकाची भूक त्याशिवाय भागायची नाही. त्यांच्या ह्या विपरीत स्वभावामुळे त्यांचं अनेकदा भांडणदेखील झालं होतं. पण, मी मध्यस्थी करून ते सोडवायचो. मला आजही ती रात्र आठवते. राहुल, मी आणि राधिका new year party ला गेलो होतो. खरंतर राधिकाची इच्छा नव्हती तिकडे जायची, पण राहुलने तिला कसंबसं मनवलं पार्टीसाठी. तिकडे गेल्यानंतर राहुल Dance floor वर जाऊन नाचायला लागला. त्याने राधिकाला पण सांगितले join करायला, पण ती नाही म्हणाली. मी, राहुलसोबत जाऊन नाचायला लागलो. राधिका bar काउंटरकडे बसून होती... आम्हाला बघत होती. राहुल आणि मी नाचण्यात मग्न झालो होतो. इतक्यात माझी नजर bar काउंटरवर गेली. तिकडे एक मुलगा राधिकाचा हात ओढून तिला Dance floor जवळ घेऊन जात होता. मी लगेच तिकडे धाव घेतली आणि राधिकाला स्वतःजवळ ओढून घेतलं. मी त्या मुलाकडे रागाने बघितले, आणि तो तिकडून निघून गेला. त्या दिवशी पहिल्यांदा राधिका आणि मी इतक्या जवळ होतो एकमेकांच्या... मला जाणवत होतं की ती खूप घाबरली आहे. मी तिला माझ्यापासून लांब केलं आणि पाणी दिलं प्यायला. इतक्यात राहुलपण तिकडे आला आणि त्याने राधिकाला मिठीत घेतले. "Sorry राधिका. माझं लक्षच गेलं नाही तुझ्याकडे. चल आपण जाऊ या इथून". "Thank you अजय", राधिका माझ्याकडे बघून बोलली. आम्ही तिघं तिकडून निघून गेलो. त्या रात्री मात्र, मी जे अनुभवलं ते मी शब्दात सांगू शकत नाही. बहुतेक, मी राधिकावर प्रेम करायला लागलो होतो.


माझ्या मनाची घालमेल झाली होती खूप. "मी राधिकावर प्रेम नाही करू शकत. प्रेम आणि मैत्रीत, मी मैत्री निवडतो. मी राहुलला धोका नाही देऊ शकत...", मी विचारच करत बसलो होतो की इतक्यात राहुल तिकडे आला.


"अज्या, चल रे जरा माझ्यासोबत. उद्या Valentines Day आहे. मला राधिकासाठी काही चांगली वस्तू घ्यायची आहे."

"अरे.. तू जा ना एकटाच. तुला माहित असेल तिला काय जास्त आवडतं ते.. ", मी राहुलला बोललो.

माझी त्याच्यासोबत जायची इच्छा नव्हती.

"अरे.. अज्या काय भाव खातोस रे तू? तुला माहित आहे ना, माझं डोकं ह्याबाबतीत जास्त चालत नाही. चल रे.. उठ.." नाईलाजाने मला त्याच्यासोबत जायला लागलं. आम्ही खूप फिरलो, पण काही सापडलं नाही. तेव्हाच माझी नजर एका CD शॉपवर पडली. मी राहुलला तिकडे घेऊन गेलो.

"अरे..CD देऊ का मी तिला? वेडा आहेस का तू?" राहुल चिडला होता माझ्यावर.

"तिला आवडेल.. हेच दे तिला."

कसाबसा राहुल तयार झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राधिकाचा message आला, "Thank you for the CD..."

ते पाहून मी अवाक झालो. त्या दिवशी मी ठरवलं की मी त्या दोघांपासून लांब राहील. माझ्या मनातल्या तिच्याविषयी ज्या भावना आहेत, त्या समोर कधीच आणणार नाही. दिवस असेच निघून जात होते. आमच्या परीक्षादेखील जवळ आल्या होत्या. राहुल आणि राधिकाचं व्यवस्थित सुरु होतं. मी आता त्यांच्यासोबत जास्त राहात नव्हतो. राहुल खूप ओरडायचा माझ्यावर. मी राधिकासोबतपण बोलायचं कमी केलं होतं. ती जेव्हा माझ्याजवळ बोलायला यायची, तेव्हा, मी काहीतरी कारण सांगून तिकडून निघून जायचो. त्रास होत होता मला खूप तिला असं बघून. पण, यातच आम्हा तिघांचं सुख होतं.

एका रात्री, मी आणि राहुल बोलत बसलो होतो. "अज्या.. राधिकासारखी मुलगी मिळायला नशीब लागतं रे. मला माहित आहे काही गोष्टी मला लवकर कळत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की मला तिची काळजी नाही. ती मला खूप आवडते आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो".

इतकं बोलून राहुल माझ्याकडे बघायला लागला. आज पहिल्यांदा त्याने माझ्यासमोर कबूल केलं होतं की तो राधिकावर प्रेम करतो. त्याच्या डोळ्यात दिसत होतं ते. मी काही न बोलता, फक्त मान हलवली.


परीक्षा संपल्यानंतर आमच्या कॉलेजची tour GOA ला गेली होती. बसमध्येसुद्धा राधिकाने माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मी तिला जास्त प्रतिसाद दिला नाही. शेवटी ती तिकडून चिडून निघून गेली. GOA ला पोहोचल्यानंतर मी त्या दोघांपासून लांबच होतो. दुसऱ्या मित्रांसोबत निघून गेलो. Beach फिरून आम्ही रूमकडे जायला निघालो. माझ्यासोबत जो मुलगा राहणार होता, तो येऊ शकला नव्हता tour ला. मी रूममध्ये गेलो, आणि राहुलला बोलावून घेतलं. आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि राहुल झोपून गेला. मला मात्र खाली Beach जवळ फिरायला जायचं होतं. मस्त वातावरण होतं त्या दिवशी. मी हातात Torch घेतला आणि beach जवळ गेलो. मला Torch च्या light मध्ये एक मुलगी दिसली. ती एका दगडावर बसलेली होती. अगोदर मी खूप घाबरलो, पण हिम्मत करून पुढे गेलो.

"Excuse me... तुम्ही इकडे एवढ्या रात्री काय करत आहात?"

त्या मुलीने माझ्याकडे बघितले आणि मला आश्चर्यच झालं. राधिका होती ती.

"तू एवढ्या रात्री इथे काय करत आहेस? चल तिकडे उजेडात."

"मी नाही येणार. तुला काय करायचंय. तू तर माझ्यासोबत बोलतपण नाही, तर आता मी तुझं का ऐकू?"

राधिका खूप चिडून बोलली. मलाही तिचा खूप राग आला होता. मी लगेच तिचा हात धरला आणि तिला ओढत उजेडात घेऊन आलो.

"तुझी हिम्मत कशी झाली? आणि तू कोण आहे रे माझी काळजी करणारा?" एवढं बोलून राधिका तिकडून निघून गेली. तिचं हे असं बोलणं टोचलं होतं मला. मीदेखील तिकडून निघून आलो आणि विचार करत करत झोपून गेलो.


सकाळी उठलो तेव्हा राहुल रूममधून निघून गेला होता. माझा फोन मी हातात घेतला तेव्हा राधिकाचे १० miss call होते आणि सॉरीचे 20 message होते, आणि शेवटी एक message होता "I Love You". मी उठून ताडकन उभा राहिलो. माझ्या छातीत धडधडायला लागलं होता. मला भीती वाटत होती की राहुलने message वाचले तर नसतील ना. मी लगेच आवरून खाली गेलो. तिकडे बघितलं तर राधिका एकटीच उभी होती. मी तिच्याजवळ गेलो आणि घडलेल्या प्रकाराबद्दल विचारायला लागलो.

"हा काय मूर्खपणा आहे राधिका? आणि राहुल कुठे आहे?"

"कसला मूर्खपणा. जे खरं आहे ते मी कबूल केलं आहे. तू पण करतोस ना माझ्यावर प्रेम?"

"छे.. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. अगोदर तू मला सांग राहुल कुठे आहे?"

"तू कोणाशी खोटं बोलतोय अजय. तुझ्या डोळ्यात स्पष्टपणे दिसतंय तू माझ्यावर किती प्रेम करतो ते."

"ते सगळं जाऊ दे, अगोदर तू मला सांग राहुल कुठे आहे?", मी राधिकाला ओरडून विचारलं.

तेवढ्यात राहुलने माझ्या खांद्यावर हात ठेवला.

"काय झालं रे? एवढा का चिडलास तू तिच्यावर? मी इकडेच Beach वर गेलो होतो फिरायला. सकाळी, लवकरच झोप उघडली, विचार केला जरा फिरून यावं."

राधिका तिकडून निघून गेली होती. मी आणि राहुल गप्पा मारत बसलो होतो.


संध्याकाळी, bonfire करायचं ठरवलं. Tour चा शेवटचा दिवस होता तो. मी रूममधून बाहेर पडलो. राहुलला थोडा उशीर होणार होता म्हणून मी पुढे निघालो. Bonfire च्या ठिकाणी जाऊन उभा राहिलो. राधिका येऊन माझ्या शेजारी उभी राहिली.

"राधिका, हे तू काय चालवलं आहेस?", एवढं बोलून मी तिच्यापासून लांब जाऊन उभा राहिलो. ती पुन्हा माझ्या शेजारी येऊन उभी राहिली.

"अजय.. तुला माहित आहे का रे soulmate म्हणजे नक्की काय?"

"हा काय प्रश्न आहे? आणि अशा गोष्टींमध्ये माझा विश्वास नाही." मी राधिकापासून थोडं अंतर ठेवून बोललो.

पण मला माहित आहे ना. Soulmate म्हणजे एक अशी व्यक्ती जी आपल्याला अगदी जवळची वाटू लागते. त्या व्यक्तीचं वागणं, राहणं, आवडी-निवडी अगदी तुमच्यासारख्याच असतात, आणि माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती तू आहेस. अगोदर ह्या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही बसायचा. पण, Valentines डे ला मला जे गिफ्ट मिळालं त्यावरून माझी खात्री पटली. मला माहित आहे तू माझ्यावर प्रेम करतोस. राहुलपण खूप चांगला मुलगा आहे. पण, एक खरं सांगू त्या new year party मध्ये झालेल्या प्रकारानंतर सगळंच बदललं रे. मला माहित आहे राहुलला पण माझी काळजी असते, पण मी जेव्हा तुझ्यासोबत असते तेव्हा तो अनुभव खूपच वेगळा असतो."

"हे तू काय बोलत आहेस, मला अजिबात कळत नाहीये आणि ते गिफ्ट राहुलची पसंत होती."

"कोणाशी खोटं बोलतोय अजय? त्या CD मध्ये सगळे light music songs आहेत, आणि राहुलला तर ते songs अजिबात आवडत नाहीत आणि मला आठवल्याप्रमाणे, मी त्याला कधीच सांगितलं नव्हतं याबद्दल. तूच होतास ज्याला हे माहित होतं. राहुल आणि मी खूप वेगळे आहोत. आमच्या आवडी-निवडी पण खूप वेगळ्या आहेत."

"पण राहुल तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याने हे स्वतः कबूल केलं आहे माझ्यासमोर आणि तुला एक सांगू राधिका, या जगात कोणीच perfect नसतो म्हणून सगळं विसरून जा. हो, मी तुझ्यावर प्रेम करतो. पण मला राहुलबरोबरची मैत्री खूप महत्वाची आहे. आपण हे सगळं इथेच थांबवू." तेवढ्यात मला राहुल येताना दिसला आणि मी राधिकापासून लांब जाऊन उभा राहिलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा कॉलेजसाठी निघालो. माझ्या आणि राधिकाच्या मनात विचारांचा खूप गोंधळ उडालेला होता. मी तिच्याशी नीट बोललोसुद्धा नव्हतो.


मी जुन्या आठवणीतून बाहेर पडत जागा झालो. राहुल आज राधिकाला propose करणार होता. काल संध्यकाळी राधिका मला भेटली होती.

"आपण एकमेकांना विसरून जाऊ या. ह्यातच आपल्या तिघांचं सुख आहे."

"काय? पण हे कसं शक्य आहे? तू म्हणतोस ना प्रेम आणि मैत्रीमध्ये, तू मैत्री निवडशील, तर मग ठीक आहे. मी तुमच्या दोघांमध्ये आले आणि आता मीच दोघांच्या आयुष्यातून निघून जाते." एवढं बोलून राधिका रडायला लागली.

मी तिला जवळ घेतलं. "राधिका, आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात गं. नेहमीच आपल्याला हवं ते मिळत नाही. राहुल खरंच खूप चांगला आहे. वेळेबरोबर तो ही बदलेल. आपलं प्रेम विसरून जा. आपल्या आठवणी आहेत ना सोबत." एवढं बोलून मी तिला घट्ट मिठी मारली आणि रूमवर निघून आलो होतो. 

मी राधिकाला wish करण्यासाठी फोन उचलला, तेवढ्यात राहुलचा कॉल आला.

"अज्या.. लवकर खाली ये..." एवढं बोलून त्याने कॉल कट केला.

मला थोडं आश्चर्यच झाला, कारण आज राहुल तर राधिकाकडे जाणार होता, तिला propose करण्यासाठी. मी त्याला फोन करत होतो, पण तो फोन उचलत नव्हता. मी लगेच खाली गेलो आणि माझ्यासमोर राधिका उभी होती. राहुल कुठेच दिसत नव्हता.

"तू एकटी काय करतेस इथे? आणि राहुल कुठे आहे? तो तर तुला आज propose करणार होता."

"तू propose कर ना तिला मग. तू प्रेम करतोस ना तिच्यावर"

मी मागे वळून बघितलं तर राहुल उभा होता.

"काहीही काय रे राहुल.. मी काही प्रेम वगैरे नाही करत तिच्यावर. ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे." एवढं बोलून मी जायला निघालो.

"थांब अज्या.. तुला आपल्या मैत्रीची शपथ." मी तिकडेच थबकून गेलो.

"तुला काय वाटतं रे, हे तुमच्या दोघांमध्ये जे सुरु आहे ते मला कळत नाही का? त्या new year party मध्ये घडलेल्या प्रकारानंतर राधिकासुद्धा खूप बदलून गेली. ती माझ्यासोबत तर असायची, पण जितकं मी तिला ओळखतो, तिचं मन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असायचं . Goa टूरमध्ये पण ती माझ्यासोबत असून नसल्यासारखी होती. त्या रात्री, माझी झोप उघडली तेव्हा मी तुला शोधत Beach वर पोहोचलो. तिकडे घडलेला सगळा प्रकार बघितला. दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा मी राधिकाचे message बघितले होते. तेव्हा मला कळालं तुमच्या दोघांबद्दल. आणि काय रे.. तू नेहमी म्हणतोस, प्रेम आणि मैत्रीत मैत्री निवडशील, तर मग राधिकाला निवड. ती तुझी चांगली मैत्रीण आहे आणि शिवाय तू तिच्यावर प्रेमदेखील करतोस. मी मान्य करतो की, मी राधिकावर खूप प्रेम करतो. थोडं वाईटदेखील वाटलं मला, तुमच्या दोघांबद्दल माहित पडल्यानंतर पण, तुझ्यासारखं प्रेम कोणीच करू नाही शकत रे अज्या."

मी हे सगळं ऐकून अवाक झालो होतो.

"पण, मग ते propose...?"

"छे.. ते खोटं होतं.. मला राधिकाकडून जाणून घ्यायचं होतं सगळं. ती पण सहजासहजी मान्य करत नव्हती. पण शेवटी तिने मला सगळं सांगितलं. मग मी तिला इकडे घेऊन आलो."

"पण राहुल... "

"पणबिण काही नाही रे.. आठवतंय मी तुला बोललो होतो, राधिकासारखी मुलगी मिळायला नशीब लागतं.. तिला जाऊ देऊ नकोस. मी तुमच्यासाठी खूप खुश आहे." एवढं बोलून राहुल तिकडून निघून गेला.

मी आणि राधिका एकमेकांसमोर उभे होतो. आमच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मी लगेच तिला मिठी मारली. त्या क्षणी मला जाणवलं की राधिकाशिवाय माझ्या जगण्याला काही अर्थच नाही आणि तीच खऱ्या अर्थाने माझी soulmate आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy