Sonam Rathore

Others

2  

Sonam Rathore

Others

मोकळा श्वास

मोकळा श्वास

2 mins
1.9K


पाचवीचा वर्ग आणि वर्गात शांतता होती. इंग्रजीचा तास सुरु होता आणि मास्तराने विद्यार्थ्यांना काही प्रश्न सोडवायला दिली होती. रेवा आरामात प्रश्न सोडवत होती, की तेवढ्यात तिला जाणवलं की तिच्या गालावर स्पर्श झाला आहे. ती दचकली आणि वर बघते तर काय! तो मास्तर तिच्या गालावरून बोट फिरवत होता. त्याच्या ओठांवर एक वेगळच हास्य होतं. तिला कळेनासं झालं काय सुरु आहे ते. तेवढ्यात तास संपल्याची घंटी वाजली आणि तिने मोकळा श्वास घेतला. तिच्या मनात कुठेतरी ही गोष्ट घर करून गेली. हा प्रकार पहिल्यांदाच घडल्यामुळे तिला कळलं नाही काय करावं.

दुसरा दिवस उगवला आणि रेवा आनंदात शाळेत पोहोचली. आज मास्तर सगळ्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ तपासणार होते. ते एक एक करून सगळ्यांना वह्या घेऊन समोर बोलवत होते. रेवाची वेळ आली आणि ती मास्तराच्या हातात वही देणार इतक्यातच, त्याने तिचा हात धरला. ती घाबरली आणि जोरात हिसका देऊन तिने तिचा हात सोडवला. हा प्रकार सगळ्यांसमोर घडल्यामुळे तिला स्वतःचाच खूप राग आला आणि ती शांततेत तिच्या जागेवर जाऊन बसली. तिच्या मैत्रिणीसुद्धा काही बोलू शकले नाही. खरंतर, मास्तर वर्गातल्या सगळ्याच मुलींबरोबर असे चाळे करत होता. कधी तो पाठीवरून हात फिरवायचा तर कधी मांड्यांवर हात ठेवायचा. एकदा तर त्याने रेवाच्या एका मैत्रिणीच्या छातीजवळ देखील स्पर्श केला होता, पण ती घाबरून काहीच बोलू शकली नव्हती. कोणीही कधी त्याच्या विरोधात बोललं नाही.

रेवा मात्र खूप तिरस्कार करायला लागली. तिने तिच्या मैत्रिणींना सुद्धा समजवायचा प्रयत्न केला पण, कोणीही तिची साथ देत नव्हतं. शेवटी तास संपल्यानंतर ती उठून प्राचार्यांकडे गेली आणि जे काही घडत होतं ते तिने सांगितले. प्राचार्यांसाठीसुद्धा ही गोष्ट नवीन होती आणि त्यांनी तिची समजूत काढली. रेवाला समाधान नाही वाटलं. तिने आज ही गोष्ट घरी सांगायचं ठरवलं. ती घरी गेल्यानंतर तिने आईला एका खोलीत बोलावलं आणि शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगितला. आई पण थोडी आश्चर्यचकित झाली. आईने तिची समजूत काढायचा प्रयत्न केला की "तुम्ही लहान आहात आणि ते तुमच्या मास्तरच प्रेम आहे". पण रेवा मात्र ह्या गोष्टींना नकार देत होती. शेवटी तिने तिच्या आईला प्रत्यक्षात जे घडत होतं ते करून दाखवलं. आता मात्र आईच्या अंगावर काटे आले. मग तिने ठरवले की ती उद्याच शाळेत येऊन प्राचार्यांना भेटेल. रेवाच्या मनातलं वादळ आज थोडा शांत झाला.

नवीन दिवस उगवला आणि आज रेवा पूर्ण आत्मविश्वासाने शाळेत पोहोचली. तिचे आई बाबा पण होते आज सोबत. इंग्रजीचा तास संपला आणि त्या मास्तराला बोलावणं आलं प्राचार्यांकडून. रेवा खूप खुश होती. रेवा आणि तिच्या मैत्रिणी वर्गाच्या बाहेर येऊन थांबल्या होत्या. त्यांना तो मास्तर येताना दिसला आणि त्याचा घामाघूम झालेला चेहरा बघून त्यांना खूप आनंद झाला. मास्तरांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. रेवाच्या ह्या एका खंबीर निर्णयामुळे, ते देखील एवढ्या लहान वयात, तिला सगळ्यांकडून खूप शाबासकी मिळाली. रेवा आणि तिच्या मैत्रिणींनी पुन्हा एकदा मोकळा श्वास घेत आनंद साजरा केला.


Rate this content
Log in