मला आई व्हायचय-भाग ४
मला आई व्हायचय-भाग ४
"तुम्हाला कसं माहित कि मला सगळे इंदू बोलावतात?", इंदूने खूप आश्चर्याने विचारले. नचिकेतला पण कळत नव्हतं काय सुरु आहे ते. "अग..मी रिया ताई.. आठवतंय का तुला? मी जेव्हा गावी यायचे, तेव्हा तू आणि तुझ्या काही मैत्रिणी आमच्या वाड्यावर यायचे, आणि मी तुमचा अभ्यास घ्यायचे." रियाने इंदूला विचारले. "रिया ताई..?? तू तीच का जिच्या वाड्याच्या मागे खूप मोठं कैरांचं झाड होतं, आणि अभ्यास झाला कि तू आम्हाला बक्षीस म्हणून कैऱ्या द्यायची ?" "हो ग इंदू .. मी तीच.." . हे ऐकून इंदू खूप जोर जोरात रडू लागली. "मला आणि माझ्या बाळाला वाचव ग ताई, नाहीतर ते लोक मारून टाकतील माझ्या मुलीला . " हे ऐकून रिया, नचिकेत आणि तिकडे उपस्थित डॉक्टर आणि नर्स सगळे गोंधळून गेले. "तुला कसं माहित कि तुला मुलगीच होणार आहे ?" डॉक्टरने इंदूला विचारले . "आमच्या ओळखीच्या डॉक्टरने सांगितले आहे. म्हणूनच ते माझ्या बाळाचं जीव घेण्याच्या मागे आहे. मी कशी बशी तिकडून पळून आले. " इंदूने डॉक्टरांना सांगितले.
इंदूच्या आई बाबांचं अकस्मात निधन झाल्यामुळे, तिची जबाबदारी तिच्या काका काकूवर आली होती. काका तसे चांगल्या स्वभावाचे होते, पण काकू मात्र तिचा खूप द्वेष करायची. इंदू वयात आल्यानंतर तिच्या काकूने तिचं लग्न , एका दुप्पट वयाच्या माणसाबरोबर जुळवले होते. काकांना मात्र हे मान्य नव्हते. इंदूने हि खूप प्रयत्न केला तिच्या काकूंना समझवायचा, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तिचं लग्न त्याच माणसासोबत झालं. त्याचं नाव गणपत होतं. गणपत आणि त्याच्या घरचे इंदूचा खूप छळ करू लागले. तो रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि इंदूला मारहाण करायचा. एके दिवशी तर, त्याने तिच्या सोबत जबरदस्ती केली आणि कोणाला सांगितलं तर जिवंत सोडणार नाही अशीही धमकी दिली. काका काकू या संदर्भात काहीच ऐकून घेणार नाही, हे तिला चांगलच माहित होतं. म्हणून ती पण चुपचाप सगळं काही सहन करत होती. तो रोज दारू पिऊन तिच्या सोबत जबरदस्ती करू लागला. सहा महिन्यानंतर कळालं कि इंदू गरोदर आहे. हे ऐकल्यावर इंदूच्या सासरी सगळ्यांना खूप आनंद झाला. पण पोटात मुलगा आहे कि मुलगी हे जाणून घेण्यासाठी , इंदूला डॉक्टरकडे घेऊन गेले. तिकडे त्यांना कळले कि मुलगी होणार आहे. त्यांनी डॉक्टरला तिचं बाळ पाडायला सांगितले. इंदू मात्र खूप दुखी होती. त्यानंतर असं अजून दोन वेळा झालं होतं कि इंदू गरोदर होती आणि तिच्या
पोटात मुलगीच होती. तेव्हा देखील तिचं बाळ पाडण्यात आलं होतं. ह्या सगळ्या प्रकारामुळे आणि सासरच्या लोकांच्या छळामुळे इंदू खूपच खचून गेली होती. तिच्या मनात खूपवेळा आत्महत्या करण्याचाही विचार आला, पण ती असं करू शकली नाही. आणि आज परत एकदा कळालं कि, इंदूच्या पोटात मुलगी आहे. इंदूने युक्ती करून तिकडून पळ काढली. हे कळाल्यावर तिच्या सासरच्या लोकांना खूप राग आला आणि ते तिचा पाठलाग करू लागले, तिला आणि तिच्या बाळाला मारण्यासाठी.
इंदूची हि व्यथा ऐकून रिया आणि नचिकेत एकदम धास्तावून गेले. आजदेखील स्रीबृहण हत्या केली जाते, हे ऐकून त्या दोघांना खूप वाईट वाटत होतं. "अग.. पण तू इकडे कशी पोहोचली ? आणि तुला एवढा मार कसा लागला?" डॉक्टरने इंदूला विचारले. "मी माझ्या नवर्याच्या आणि सासरच्यांचा तावडीतून सुटले , पण काही नराधमांनी मला घेरलं. माझ्यासोबत जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. त्यांच्यापासूनच लांब पळता पळता मला ते मंदिर दिसले. मी मंदिरच्या दिशेने धाव घेत होतेच कि इतक्यात, त्यांच्यामधल्या एकाने माझ्या डोक्यावर काहीतरी फेकून मारलं. माझं तोल जाऊ लागला, पण मला माझ्या बाळाला वाचवायचा होतं. त्या मंदिराच्या पायथ्याशी आल्यानंतर मी बेशुद्ध झाले. पुढे काय झालं मला माहित नाही." "आपण पोलिसांना बोलवायला पाहिजे. गणपत आणि त्याच्या घरच्यांना अटक झालीच पाहिजे. आणि हो, त्या डॉक्टरला सुद्धा अटक झाली पाहिजे. " रिया खूप रागात होती. "आणि हो इंदू.. तू घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. तू बिनधास्तपणे पोलिसांना सगळं सांग." नचिकेत इंदूला बोलला. पोलीस आले आणि त्यांनी इंदूची बाजू ऐकून, गणपत, त्याचे घरचे आणि त्या डॉक्टर विरुद्ध अटक करण्याचा आदेश जाहीर केला. इंदू खूप खुश झाली, पण आता ह्यापुढे आपण कसं जगायचं आणि बाळाला घेऊन कुठे जायचं हा प्रश्न तिला सतावू लागला. "इंदू, माझ्या ओळखीचं एक महिलाश्रम आहे. तूला आम्ही तिकडे पाठवतो. तुझी आणि तुझ्या होणाऱ्या बाळाची तुला काही काळजी करण्याची गरज नाही. मी तिकडे येत राहील तुझ्या चेकअप साठी. " डॉक्टर इंदूला बोलले. हे सर्व रिया आणि नचिकेत ऐकत होते. "डॉक्टर... आम्ही इंदूला आमच्यासोबत घरी घेऊन जातो" नचिकेतचं हे निर्णय ऐकून रिया खूप खुश झाली आणि इंदूच्या हि चेहऱ्यावर हसू उमललं.
इंदूच्या घरी येण्याने , नचिकेत आणि रियाच्या आयुष्याला कुठलं वळण मिळेल?
क्रमशः