चालतंय की
चालतंय की


सध्या गणेशोत्सवाची धूम जोरात चालली आहे. अबालवृद्ध सारे गणपती बाप्पाच्या सहवासात अगदी तल्लीन होऊन गेले आहेत. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे विघ्णहर्ता गणराया आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिद्दीने ठाम राहण्याचा संदेश जणू देत असतो.
आज हो या कल तेरा काम होगा नेक
बस करके बुलंद हौसला तू आगे बढ के देख
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात विविध समस्या आणि अडथळे कायम येत असतात. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात समस्या येतात त्यापेक्षाही अधिक समस्या यशस्वी व्यक्तींच्या जीवनात येतात.
परंतु एवढे होऊनही ते यशस्वी होतात कारण ते त्या समस्यांना आव्हाने आणि संधी म्हणून पाहतात. आपण मात्र त्याच्या परिणामांत इतके गुंतून जातो की त्यावर मात करण्याची आपली हिंमतच होत नाही. आपण आपले संपूर्ण सामर्थ्य आणि कौशल्य जर पणाला लावले तर आपणही त्या आव्हानांचा नक्कीच सामना करू शकतो.
परवा आमच्या कॉलनीतल्या मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या नियोजनाच्या बैठकीला उपस्थित राहिलो. तिथे सर्वजण विसर्जनावेळी कोणती खबरदारी घ्यायची आणि कोणाच्या वाट्याला काय जबाबदारी येणार याबाबत चर्चा सुरु होती. त्याचवेळी सातवी आठवीत शिकणारे दोन युवा कार्यकर्ते आपल्या वाट्याला काय काम येते याची उत्सकतेने वाट पाहत होते. त्याचवेळी मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने त्या दोघांवर मिरवणुकीच्या रथात विराजमान असणाऱ्या गणपतीला हाताने आधार द्यायचा असे सांगितले. तेवढ्यात एक काका संतापाने म्हणाले , अरे ही मुले उतावळी आहेत गणपती नीट नाही पकडला तर उगाच अनर्थ होईल'. परंतु बाकी पदाधिकाऱ्यांनी त्यांना विश्वासात घेऊन ती जबाबदारी त्या मुलांकडे सोपविण्याचा निर्णय झाला.
परंतु त्यानंतर ते काका लगेच त्या मुलांना उद्देशून बोलले, " मोठ्या मिजासीने जबाबदारी घेताय पण जर त्यात काही गफलत झाली तर मग बघतोच तुमच्याकडे"
त्यातला एक मुलगा काकांच्या त्या दरडावून सांगण्याने पुरताच भांबावला मात्र त्यातला दुसरा मुलगा हसला आणि काकांकडे पाहून बोलला, "चालतंय की!"
बैठकीत चांगलाच हशा पिकला ते काका मात्र त्या मुलाकडे पाहतच राहिले.
खरं तर सध्या टीव्हीवर धुमाकूळ घालणाऱ्या "तुझ्यात जीव रंगला" मालिकेतील राणादा चा डायलॉग म्हणून "चालतंय की!" म्हणणे नक्कीच हास्यप्रद होते. परंतु ज्याप्रमाणे त्या मुलाने क्षणाचाही विलंब न करता प्रत्युत्तर दिले त्यातून त्याचा त्याच्या जबाबदारीप्रती असणारा विश्वास दिसून आला. त्या मुलाला काकांनी थोडी भीती दाखविण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असलेल्या त्या मुलाने कशाचीही पर्वा केली नाही.
मित्रांनो या छोट्याशा प्रसंगातून म्हणा किंवा त्या राणादाच्या डायलॉगमधून म्हणा पण आव्हाने स्वीकारायला आपण शिकले पाहिजे. आपल्या समोर येणाऱ्या कामाकडे एक आव्हान म्हणून पाहायला हवे.
नाही हा शब्द तर आपल्या मनाच्या शब्दकोशातून कायमचाच काढून टाका. नकारात्मक विचार करून एखाद्या कामाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यावर पर्याय शोधायला शिका. स्वतःला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढून काहीतरी नाविन्यपूर्ण आणि हितकारक करण्याचा प्रयत्न करा.
"काही चुकणार तर नाही ना", "उगाचच रिस्क कशाला?, "आपल्याला नाही हे झेपणार" असे नकारात्मक डायलॉग मारू नका. अशावेळी योग्य निर्णय घ्या, एक दीर्घ श्वास घ्या मनाची तयारी करा आणि आत्मविश्वासाने म्हणा, "चालतंय की!"