बंध मुक्त
बंध मुक्त
राघवने खुप विचार करून नुकत्याच लागलेल्या नोकरीचा राजीनामा दिला .ऑफिसमध्ये त्याचे लेटर मॅडम यायच्या आधीच त्याने रामू काकांना नेवून दिले .
घरी येवून जरा आराम केला आणि पुन्हा नव्याने दुसऱ्या कामाच्या शोधात बाहेर पडला .
एक दोन ठिकाणी त्याने कामासाठी अर्ज केला आणि संध्याकाळी जेवणाचा डबा घेवून निवांत घरी आला .
जरावेळ गेला असेल तोच त्याच्या ऑफिस मधला केतन त्याच्या घरी आला .
तो सांगत होता , " ऑफिसमध्ये त्याच्या राजीनाम्याची चर्चा आज खुप रंगली होती . कोणालाच काही कळत नव्हते की तू असा अचानक राजीनामा का दिला असावा ? तुझे तर प्रमोशन लेटर आले होते . प्रमोशन झाल्यावर तुझे राहणीमान सुधारले असते , कंपनीकडून गाडी , घर मिळाले असते आणि तू मात्र हे सगळे सोडून आलास ? "
" सगळ्यांच्या मते राघवने चालून आलेल्या लक्ष्मीला नाकारले होते . मॅडम पण आज सगळ्यांना नाही नाही ते बोलत होत्या .त्यांच्या चिडण्याचे कारण कोणालाच कळत नव्हते ."
केतन राघवला एवढे शांत बसलेले पाहून म्हणाला , " राघव मी तुला खुप वर्षापासून ओळखतो आहे . चालून आलेली संधी सोडण्यामागे नक्की काय कारण आहे हे मला जाणून घ्यायचे आहे . "
राघव त्याला म्हणाला , " हे प्रमोशन घेणे म्हणजे माझा स्वाभिमान विकण्यासारखे होते . मला माझे भविष्य उज्वल करायचे आहे पण त्यासाठी मला माझे अस्तित्व पणाला नाही लावायचे . सहजतेने जुळून येणाऱ्या सगळ्या संधींचे मला स्वागत आहे पण ओढून ताणून मला कोणतीही गोष्ट नको आहे ."
केतनला समजत नव्हते राघव काय म्हणतो आहे ते . त्याला संभ्रमात बघून राघव त्याला म्हणाला ,
" मॅडमला मी आवडतो , त्यांना एका जोडीदाराबद्दल ज्या अपेक्षा आहे त्या सगळ्या माझ्यामध्ये आहेत असे त्यांना वाटते . त्या मनाने खुप चांगल्या आहेत पण मी कधी त्यांचा अश्या रीतीने विचारही करू शकत नाही . त्यांचे आणि माझे राहणीमान , आणि इतरही बऱ्याच गोष्टी अश्या आहेत की त्या कधीच जुळणार नाहीत , मला माझ्या आई आणि बहिणीची जबाबदारी आहे . आज मी फक्त त्यांच्यासाठी इथे एकटा आहे , पण याचा अर्थ असा नाही की मी मनमौजी व्यक्ती आहे . माझे काही नियम आहेत आणि त्या नियमात मॅडम कुठेही बसत नाही . सुरवातीला त्यांना इग्नोर केलं , पण नंतर त्यांचे वागणे जरा जास्त पजेसिव झाले , माझ्या जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात आणि मी त्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी म्हणून मला प्रमोशनचे आमिष दाखवले पण मी एक गावाकडून आलेला सरळमार्गी व्यक्ती आहे , कामाशी प्रामाणिक राहणे हे माझे कर्तव्य आहे .पण त्यांच्या स्वार्थासाठी मी माझा मार्ग कधीही बदलणार नाही . मी मॅडमला खूपदा समजावून सांगितले की आपले मार्ग वेगळे आहेत , ते कधीही एकत्र येवू शकणार नाही .पण त्या काही ऐकायला तयार नाही . मग माझ्यापुढे राजीनामा देणे हा एकच पर्याय होता ."
" माझी बहिण अजून शिकत आहे , तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभे करून , तिचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न नाही करणार . पण तोपर्यंत मॅडमला फेस करणं मला खुप अवघड झालं असतं . यासाठी मी ती नोकरीच सोडून दिली ."
केतन म्हणाला , " अरे तू काय सांगतो आहेस ? तुझ्यासारखा वेडा माणूस दुसरा कोणी नसेल . का तू या गोष्टीला तयार नाही झालास ? पुढे जाऊन कधीतरी लग्न करणारच आहेस ना , मग ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी तू हातून घालवत आहेस ? तुला समजते आहे का तू किती मुर्खासारखे वागला आहेस ?"
राघव जोरात ओरडला , " केतन शांत बस , मी स्वार्थी नाही आणि पैश्याचा भुकेला नाही की त्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान विकून टाकीन. "
" प्रेमाची आणि जोडीदाराची अपेक्षा अशी कशीही आणि कोणाकडूनही पूर्ण नाही करून घेवू शकत . त्यासाठी मनाची तयारी लागते आणि मन नकळत तिथे गुंतावे लागते , बळजबरीने काही साध्य नाही करू शकत .माझ्या जोडीदाराच्या अपेक्षा खुप वेगळ्या आहेत . तुम्हाला मी चुकीचा वाटतो याचं मला काही घेणं देणं नाही . जे मला पटत नाही तिथे मी गुंताण्याचा प्रश्नच येत नाही . मला वाटतं तुला सारं काही समजलं असावं , तू निघू शकतोस . "
केतन तिथून निघून गेला . राघव मग जेवण करून घेवून शांत झोपून गेला.
