Priyanka Kumawat

Horror Thriller

4.0  

Priyanka Kumawat

Horror Thriller

भूत खरच असतात

भूत खरच असतात

7 mins
482


जीवनाला मी खूप कंटाळलेलो. सारखे बायको सोबतचे भांडण. खूप कंटाळा आलेला. दर वेळेस बायको पंख्याला साडी लावून मरणाची धमकी द्यायची आणि मी चूक नसतानाही माघार घ्यायचो. या वेळेस तर भांडणाचा अतिरेक झाला. बायको पंख्याला साडी बांधायच्या आत मी गाडीला किक मारून बाहेर पडलो. दिशा मिळाली तिकडे गाडी चालवत होतो. बर्याच दूर गेल्यावर जरा माझी तंद्री भंगली. मी कुठे आहे हे आजूबाजूला नजर टाकून पाहू लागलो. हा परिसर मला नवीन होता. विचार करता करता कुठे येऊन पोहोचलो तेच कळेना. गाडी बाजूला लावून मी जरा परिसर नीट निरखू लागलो. 

एकतर आज अमावस्येमुळे आकाशात चंद्र नव्हता त्यामुळे सगळीकडे गुडुप अंधार होता. पण माझ्या जीवनात पसरलेल्या अंधारापुढे हा अंधार काहीच नव्हता. रातकिडे जोरजोरात किरकिरत होते. आज प्रथमच रातकिडे इतक्या जोरजोरात किरकिरत आहे असे वाटत होते. जाऊदे तिकडे तिच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा ह्या रातकिड्यांचा आवाज परवडला. ती बहुदा अशी पडिक जागा वाटत होती. आज जीवनात काहीच शिल्लक नाही असे उगाचच वाटत होते. दुरवर असे कठडे दिसत होते. बहुदा ते एखाद्या विहिरीचे असावे. आज जीव द्यायची ईच्छा इतकी तीव्र झालेली की नकळत पाऊले विहीरीकडे पडू लागली. कायमच सुटायचे म्हणून निघालो. 

५-६ पाऊले पुढे जाताच मला घुंगरांचा आवाज आला. दचकून मी मागे वळून पाहिले पण कोणीच नव्हते. मी खूप जास्त विचार करतोय म्हणून भास झाला असेल अशी समजूत मी मनाची करून घेतली. ५-६ पाऊले पुढे जाताच परत तोच घुंगरांचा आवाज ऐकू आला. यावेळी मी जागी स्तब्ध होऊन परत आवाज येतो का ते ऐकू लागलो. परत आवाज आला. आता मात्र मी जाम घाबरलो. परिसर तर सुनसान होता. कोणी तेव्हा दिसत नव्हते मग अचानक हा आवाज? हडळ, चेटकीण तर नसेल ना? हा विचार करून मला दरदरून घाम फुटला. मागे वळण्याचे धाडस होत नव्हते पण खात्री करून घ्यायची होती की कोणी खरच मागे तर नाही ना? 

हळूहळू मागे वळून पाहिले तर एक सावली झाडाच्या मागे लपताना मला दिसली. माझी तर भितीने गाळण उडाली. कोण आहे हे बोललो पण घाबरून आवाज तोंडातच अडकला. परत कोण आहे हे कसेतरी उच्चारले तर एक तरूणी निदर्शनास आली. काय गोजीरे रूपडे होते तिचे. एक क्षण तिला पाहतच राहिलो. पण लगेच भानावर येऊन कोण आपण असे तिला विचारले. दोन मिनिटे ती काहीच बोलली नाही. मग अचानक चालत चालत जवळ आली आणि म्हणाली हे काय मी इकडेच राहते. तुम्हाला पाहिले तेव्हा घाबरले म्हटले भूतबीत आहे की काय? एकतर आज अमावास्या आहे आणि अमावस्येला भूत बाहेर पडतात. 

मी आवंढा गिळत तोंडावर उसने हसू आणून काय तुम्ही पण भूतबीत काही नसते. त्यावर ती म्हणाली की अहो असतात, आता तुम्ही शिकलेली माणसे यावर कधी विश्वास ठेवणार काय माहित? मी तिला म्हणालो की मग एवढ्या रात्री तुम्ही घरात थांबायचे सोडून बाहेर काय करताय? त्यावर हातातील हंडा दाखवून ती म्हणाली की घरातील पाणी संपले म्हणून मी विहिरीवर आले. मी तिला म्हणालो की घरात कोणी पुरूष मंडळी नाही का? एवढ्या रात्री तुम्ही येण्याऐवजी त्यांना पाठवायचे. तर ती म्हणाली की माझा बा आता म्हातारा झालाय त्याला रात्रीच दिसत नाही. तिच्या बोलण्यावर मी फक्त मान डोलावली. 

आता तिने प्रश्नांचा घाट घातला. तुम्ही कोण? इथे कसे आलात? कुठे राहतात? इथे एवढ्या रात्री काय करतात? तिच्या या प्रश्नांनी मला रडू कोसळले. एकतर इतक्या दिवसात कोणीतरी प्रथमच माझी विचारपूस करत होते. सहसा पुरुष बायकांसमोर रडत नसतात पण मृत्यू कडे पाऊल टाकणार्या माणसाला पुरूषी स्वाभिमानाचा विसर पडतो. मी ढसाढसा रडू लागलो. ती माझे सांत्वन करत होती. असे रडू नका, काय झाले सांगा? मी रडून रडून तिला आतापर्यंत चे सगळे सांगितले. जीव द्यायला आलो आहे हे ही. मन मोकळे झाल्यावर जरा अश्रू आवरले. त्यावर ती अगदी नाराज झाली. असा जीव देणे सोपे असते का? मृत्यू किती कठीण असतो तुम्हाला काय कळणार? तिच्या या वाक्यावर मी ही अशी का बोलतेय हा विचार करू लागलो. 

तेवढ्यात तिने मला खेचले आणि एका मोठ्या झुडपामागे बसवले. मी काही विचारणार एवढ्यात माझ्या तोंडावर हात ठेवून शांत रहा सांगितले आणि एकीकडे बोट दाखवले. मी शांत राहून पाहू लागलो. एक धिप्पाड माणूस चालत विहिरीच्या दिशेनेच येत होता. तिला विचारले की काय झाले? ती म्हणाली की हे एक भूत आहे. मी जरासे हसून काहीही काय सांगता म्हणालो. तर ती सांगू लागली की अहो खरच. इथे जवळपास एक मुलगी राहत होती तिच्या बा सोबत आधी.या माणसाची तिच्या वर नजर गेली. या माणसाने तिच्यावर बलात्कार करून तिला याच विहिरीत फेकून दिले. मग त्या मुलीच्या आत्म्याने बदला घेतला. त्याला याच विहिरीत आत्महत्या करायला भाग पाडले. मी तिला म्हणालो अहो या असल्या भाकड ऐकीव कथांवर विश्वास ठेवता तुम्ही? 

माझ्या या प्रश्नावर ती भयानक चिडली. म्हणाली मी कधी खोटे बोलत नसते. बघा आता पुढे हा येऊन विहिरीत उडी मारेल. हे ऐकून मी सावध होऊन बसलो. त्या माणसाने माझ्या समोरच विहिरीत उडी टाकली. ए आई अशी आरोळी माझ्या तोंडून निघाली. धावत जाऊन मी विहिरीच्या कड्यावरून आत पाहिले तर आतमध्ये कोणीच नव्हते. एक जोरदार असा मानसिक धक्का मला बसला. ती मागून येऊन म्हणाली काय असतात ना भूत? माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. कसाबसा मी हो म्हणालो, तुम्हाला कस काय माहित पण की हाच तो भूत आहे? ती म्हणाली अहो माहीत आहे मला. हा माझा नेहमीचा परिसर. मी म्हणालो पण तुम्ही अजिबात घाबरला नाहीत? ती म्हणाली अहो माझ्याच जागेत मी का घाबरू? 

थोडा स्थिर झाल्यावर मी विचार करू लागलो की जे घडले ते खरच घडले का? की हे दोघे मला एकटा बघून काहीतरी मजाक करताय? मी तिला म्हणालो की तुम्ही दोघे मिळून माझी मजाक तर करत नाही ना? ते काय prank का काहीतरी? कुठे आहे तो तुमचा साथीदार? बोलवा त्याला. ती म्हणाली की तुमचा विश्वास नाही का? मी त्या माणसाला उद्देशून ए निघ रे बाहेर, मजाक बस झाली. मी काय घाबरतो का? चल ये. ती म्हणाली अहो त्याला बोलवू नको. मी म्हटलो तुम्ही गप्प बसा जरा. मी परत त्याला म्हणालो बाहेर ये नाहीतर बघ. कुठे आहे तू? म्हणत मी मागे वळलो तर तो ठीक माझ्या पुढे उभा. त्याचे अंग पुर्ण ओले होते. तो घोगरा आवाजात म्हणाला की मला का बोलावले. मी म्हणालो की ए बस जरा गपचूप. मजाक बंद कर. तो म्हणाला कसली मजाक? ती तरूणी म्हणाली की का बोलावले याला. ए तू जा. तो माणूस म्हणाला याने मला बोलावले आता मी परत जाणार नाही. 

मी पण तिला म्हणालो की मजाक नाही तर का पाठवत आहे त्याला? ती म्हणाली जरा गप्प बसा तुम्ही. त्याच्या कडे वळून त्याला रागात म्हणाली की परिसर माझा आहे हा, तू गेलेच पाहिजे. तो जायला निघाला तेव्हा मी त्याला आवाज देऊ लागलो. ती म्हणाली का त्या भुताला बोलवत आहात? मी म्हणालो तो काही भूत नाही. ती म्हणाली अहो मीच मारले त्याला मला माहीत नसणार का? तिच्या या वाक्यावर मी चमकलो. बघतो तर काय हळूहळू दोघांचे शरीर पहिल्या सारखे नसून पाण्यात सडल्यासारखे झालेले. माझी बोबडीच वळली. ती त्याला म्हणाली की ही माझी शिकार आहे मी आधी याला पाहिले तू गपचूप जा इथून. हे ऐकून तर मी पार गारठलो. 

मी इथे मरायलाच आलेलो पण म्हणून हे असे मरण? मी थेट पळत सुटलो. वाटेत एका म्हातार् याला जाऊन धडकलो. तो म्हणाला काय रे बाबा बघत चल ना? मी त्या म्हातार्याचा अक्षरश हात हातात घेऊन रडून तिथे भूत आहे मला वाचवा असे म्हणालो. म्हातारा म्हणाला कुठे? विहिरीकडे का? अहो तिथे तर माझी मुलगी पाणी घ्यायला गेलीय एकतर मला रात्री च दिसत नाही.कृपया मला मदत करा असे म्हणत तो घाबरत पुढे जायला लागला. मला तिने जी भुताटकी गोष्ट सांगितली त्यात तिच्या बा ला पण रात्री च दिसत नव्हते. सहज लक्ष त्याच्या पायाकडे गेले तर त्याचे पाय उलटे होते. ते पाहून मी चक्कर येऊन कोसळलो. 

जेव्हा मला जाग आली तेव्हा सूर्य चांगला डोक्यावर आलेला. उठून पाहिले तर आसपास त्या तिघा भूतांपैकी कोणी नव्हत. रात्री काय झाले ते देखील आठवत नव्हते. मरूदे म्हटले जीव तर वाचला. मी वाट फुटेल तिकडे पळत सुटलो. पळता पळता रस्ता ओळखीचा वाटू लागला. घर येईपर्यंत पळत सुटलो. घर आल्यावर घराबाहेर जरा गर्दी दिसत होती. मी खूप घाबरलो. बायकोने या वेळी खरच आत्महत्या केली की काय? पळत आत गेलो तर बायको आत धाय मोकलून रडत होती. तिला बघून सुटकेचा निश्वास सोडला. मग विचार केला की मेल तरी कोण मग? सहज बॉडी कडे लक्ष गेले तर ती माझीच होती. मटकन खाली बसलो. शेजारच्या बाईचे बोलणे कानावर आले. बायकोला कंटाळून दूर कुठल्याशा जागी जाऊन याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 

ते ऐकून माझ्या सगळ्या संवेदना गेल्या. म्हणजे तिने शिकार केलीच शेवटी पण मी तर बेशुद्ध झालो होतो मग हे कधी झाले? मी तिथे असूनही कोणाला दिसत नव्हतो. बायकोला हात लावायला गेलो तर हात आरपार जात होता. तिला किती आवाज दिले पण प्रतिसाद शून्य. मी खरच मेलेलो. खिडकी बाहेर ती कालचीच तरूणी गालात हसत होती. भूत खरच असतात हे मी स्वतः भूत बनल्यावर कळले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror