भूत आला रे... भूत...
भूत आला रे... भूत...


गावातील सीमेजवळ आलेल्या विहिरीजवळ सर्व लोक सण साजरा करण्यात रंगले होते. ते सर्वे तेथे एका कोंबड्याचा बळी देणार होते. राजू आणि त्याचे वडील मनोहरभाऊ देखील तेथे होते. दुपारी उत्सव पूर्ण झाला सगळे आपआपल्या घरी गेले. मार्गात राजूने त्याच्या वडिलांना विचारले, "बाबा आपण का प्रत्येक वर्षी त्या विहिरीला कोंबड्याचा बळी अर्पण करतो?"
मनोहरभाऊ हसून म्हणाले, "बाळा ह्या गावच्या फार जुन्या विधी आहेत."
राजूने आश्चर्याने विचारले, "पण बाबा, विधी करण्या मागे काही कारण तर असल पाहिजे न?”
मनोहरभाऊला एका झाडाची सावली आढळली ते तिथे बसत म्हणाले, "ऐक, आपल्याच गावाची वाडवडिलांनी सांगितलेली ही फार जुनी गोष्ट आहे. फार वर्षांपूर्वी हरिभाऊ नावाचे एक शेतकरी राहत होते. कुठल्यातरी कामाने ते तातडीने एकादिवसासाठी शेजारच्या गावांत गेले होते. आपले काम आटपून ते त्याच दिवशी घरी परत येणार होते पण त्याचे काम लवकर आटपले नाही म्हणून घरी परत निघण्यास त्यांला उशीर झाला. संध्याकाळी सगळीकडे काळोख पसरत होता. ते घनदाट जंगल हळूहळू काळोख्याच्या मिठीत जात होते. हरिभाऊने त्यां भयानक जंगलातून रात्र होण्यापूर्वीच घर गाठण्याचा विचारकरून घाई घाईने पाउल उचलू लागले. अचानक त्यांना वाटले की कोणीतरी त्यांचा पाठलाग करीत आहे. हे लक्षात येताच त्यांच्या अंगात भीतीची एक शिरशिरी उठली. तर सुद्धा हिंमत करून ते ओरडले "कोण आहे तिथे?".
हरिभाऊंच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पाऊलांचा आवाज थांबला.
हरिभाऊंला आता भासत होती ती निरव शांतता.
हरिभाऊंनी पाठलाग करणाऱ्याला बघण्यासाठी इकडेतिकडे नजर फिरवली पण त्यांना कोणी दिसले नाही. आता हरिभाऊने घर गाठण्यासाठी गावाच्या दिशेने घाईघाईने चालणे सुरू केले. अजून थोडच अंतर त्यांनी कापले असेल तेव्हा एक नवल घडलं. हरिभाऊंच्या पाठीवर एक दगड येऊन पडला. हरिभाऊ थांबले आणि दगड कोणी मारला हे बघण्यासाठी मागे वळून पाहिले. त्याच वेळी समोरच्या आंब्याच्या फांद्या हलल्या आणि पाने थरथरली! हे पाहून हरिभाऊंना थरकाप सुटला. मागेपुढे न बघता त्यांनी गावाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. ते खूप भयभीत झाले होते. पुष्कळसे अंतर धावल्या नंतर ते दमले. त्यांना आता पावलांचा आवाज ऐकू येत नव्हता त्यामुळे ते काही वेळ श्वास घेण्यासाठी थांबले. पुन्हा एकदा त्यांना पूर्वी ऐकले होते तसा पावलांचा आवाज एकू येता ते पुष्कळ घाबरले आणि शक्य तितकं घरी लवकर पोहोचण्यासाठी ते धावायला लागले. गावाची सीमा आता थोड्याच अंतरावर दिसत होती. तेव्हांच सिमेजवळच्या त्या विहिरी जवळून जसे ते पुढे गेले तसे त्यांना कोणितरी विहिरीमध्ये उडी मारल्या सारखा “धबाक...” असा आवाज आला आणि त्याच बरोबर त्यांच्या कानावर शब्द आले “वाचलास रे... वाचलास...”. हे ऐकून हरिभाऊ भीतीने कंपायला लागले, ते इतके घाबरले की “भूत आला रे... भूत...” अशी किंकाळी पाडून आणि मागे वळून न बघता तसेच सुसाट पळाले आणि सरळ जाऊन थांबले ते गावांत! गावांत येऊन त्यांनी सर्व गावकर्यांना जंगलात त्यांच्या बरोबर जे घडले होते ते सांगितले आणि बेशुद्ध झाले. जेव्हा हरीभाऊ शुद्धीत आले तेव्हा गावातील एक म्हातारा माणूस म्हणाला, “आज पौर्णिमा आहे. आजच्या रात्रि अनेक असंतुष्ट आत्मे जंगलात वावरत असतात. हरिभाऊचे नशीब! नाहीतर अश्या भुतांच्या तावडीतून कोण निसटते? प्रत्येक प्रेत-आत्माचे विशिष्ट क्षेत्र असते आणि त्यांत ते खूप शक्तिशाली असतात. स्वत:च्या क्षेत्रा बाहेर गेल्यावर त्यांची शक्ति कमी होते. म्हणून कुठलाही प्रेतात्मा कोणत्याही परिस्थितित त्यांची क्षेत्र मर्यादा सोडत नाही. असाच एक असंतुष्ट प्रेतात्मा आज हरिभाऊंच्या मागे पडला होता पण नशीब की तो कोणत्याही प्रकारची हानी करेल त्या आधी हरिभाऊ सुखरूप गावाच्या सीमेत आले. त्या प्रेतात्माची सीमा जंगल पर्यंतच मर्यादित असावी. आपली शिकार हातातून निसटत आहे हे पाहून तो प्रेतात्मा चिडला. हरिभाऊने परत मागे यावं त्यासाठी त्याने विहिरीत उडी घेतली पण हरिभाऊ शहाणे होते त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या जाळ्यात हरिभाऊ फसले नाही आणि सुखरूप जंगलातून बाहेर पडले हे पाहून तो प्रेतात्मा हरिभाऊंला उद्देशून म्हणाला “वाचलास रे..... वाचलास...”
भयभीत गावातील लोकांनी त्यां वयस्कर म्हाताऱ्याला विचारले “आजोबा, मग आता आपण काय करायचं? तो प्रेतात्मा तर गावकऱ्यांना असाच सतवत राहील!”
ह्यावर तो वयस्कर म्हातारा म्हणाला, “तो प्रेतात्मा आता कोणालाही त्रास देणार नाही कारण आता प्रत्येक वर्षी पौर्णिमेला आपण विहीरतल्या प्रेतात्माला कोंबड्याचा बळी देऊ. ज्या मुळे तो प्रेतात्मा आपल्या गावांतल्या लोकांवर प्रसन्न राहील आणि आपल्याला त्रास देण्याच्या ऐवजी उलट तो आपले संरक्षण करेल!"
*****
ही जुनी गोष्ट सांगून मनोहरभाऊ झाडा खालून उठले आणि राजूला म्हणाले “आता बुवा समजलास का? कोंबड्याचा बळी आपण का देतो ते?”
कथा ऐकून राजू म्हणाला, "होय बाबा... आता मी पण दरवर्षी ह्या कार्यक्रमात भाग घेईन कारण मला पण रोज ह्या विहीरीच्या जवळुनच शाळेत जायचे असते.” मनोहरभाऊ राजूचा हाथ धरून घरी परत जाण्यासाठी निघाले.
मनोहरभाऊ प्रसन्न दिसत होते कारण त्यांचा मुलगा गावाची जुनी परंपरा समजला होता!
काही वर्षा पूर्वीची वाडवडिलांना माहित नसलेली गोष्ट
त्याचं गावांत केशव नावाचा एक चोर राहत होता. तो रात्री चोरी करायचा आणि दिवसा गावांत समाजासमोर एका प्रतिष्ठित व्यक्ती सारखा मिरवायचा! एकेदिवशी गावातील लोकांना त्याच्यावर शंका आली. गावातील होणाऱ्या चोऱ्या केशवच करीत आहे हे कित्येक गाववाल्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही हकीकत सरपंचा समोर मांडली.
जेंव्हा केशवला गावातील सरपंच त्याच्या घराची तपासणी करणार आहे अशी माहिती मिळाली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. केशवनी पुष्कळ विचार केल्यानंतर एक योजना तैयार केली आणि ती योजना अमलात आणण्यासाठी तो रात्र होण्याची वाट पाहू लागला. जसे सर्वत्र काळोख पसरला तसे केशवने एका पिशवीत आपल्या सर्व चोरीच्या वस्तू गोळा केल्या, आणि त्याचे गाठोडे तैयार करून, कोणी त्याला बघत तर नाही ना? ह्या गोष्टीची खात्री करून घरातून बाहेर पडला. कांही अंतर गेल्यावर त्याचा लक्षात आले की त्याच्या पुढे कोणी तरी चालत होता. त्याच्या पाऊलाचा आवाज ऐकून अचानक पुढचा तो व्यक्ति थांबला आणि केशवच्या दिशेने मागे वळला. हे पाहून केशवला धडकी भरली. “आता काय करायचे?” तितक्यात केशवचे लक्ष एका झाडावर जाता तो त्वरेने त्या झाडा मागे जाऊन लपला. पुढच्या व्यक्तीने इथे तिथे बघितले आणि जोरात ओरडला “कोण आहे तिथे?” केशव घाबरला “त्यां व्यक्तीने त्याला लपताना पाहिले की काय? आता?” पण थोड्याच वेळात तो माणूस तेथून निघून गेला, केशवनी निरांतीचा श्वास सोडला आणि झाडा मागून बाहेर आला. सहज त्याने झाडाकडे पाहिले तर ते आंब्याचे झाड होते. त्यावर पिकलेले आंबे लगडत होते. आंबे खाण्याची इच्छा जागृत होताच त्यांनी एक दगड उचलला आणि आंब्याच्या झाडावर फेकला पण त्याचा नेम चुकला म्हणून त्यांनी फांद्या हलवून आंबे मिळविण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. आता केशवने आंबे पाडण्यात वेळ घालवण्या ऐवजी त्याच्या कामावर लक्ष देण्याचा विचार करून चोरीची मालमत्ता असलेली गाठोडी उचलली आणि तेथून पुढे निघाला. अखेर तो सिमे जवळ आलेल्या विहीरी जवळ आला आणि त्यांत ती गाठोडी फेकली. त्याच बरोबर “धबाक” असा आवाज आला.
केशवची योजना यशस्वी झाली होती त्याने मनोमन विचार केला की, “कोणीही मला विहिरीत गाठोडे फेकतांना पाहिले नाही. आता सरपंचानी जरी माझ्या घराची तपासणी केली तरी त्याला काही सापडणार नाही. मग थोड्या दिवसानंतर मामला शांत झाल्या वर मी परत येऊन ह्या विहिरीतून माझे गाठोडे काढून घेईन.”
ह्या सर्व बाबींचा विचार केल्यावर, केशव आनंदित होत स्वत:लाच म्हणाला "वाचलास रे... वाचलास....”
≈≈≈
मुलांनो, जर त्यां दिवशी हरिभाऊनी धाडस करून मागे वळून पाहिले असते तर त्यांला विहिरी जवळ केशव दिसला असता! आणि कितीतरी गोष्टी वाचल्या असत्या! संपूर्ण गांव खोट्या अंधश्रद्धेत पडताना वाचले असते. वायफळ कार्यक्रमामागे जाणारा पैसा आणि वेळ वाचला असता आणि वाचले असते आज पर्यंत बळी होणारे ते निर्दोष कोंबडे! म्हणून सांगतो की जर अंधश्रद्धेच्या जाळेत आडकलेले रहाल तर झाडाची फांदी जरी हालली तरी किंकाळी पाडाल की “भूत आला रे... भूत...”