भुताटकी बस
भुताटकी बस


सकाळी सकाळी मला माझ्या मित्राचा फोन आला. त्याचे लग्न ठरले आणि येत्या ८ दिवसांनी त्याचा साखरपुडा आहे. त्याचा साखरपुडा कोकणातील गावात होता. मलाही कधीपासून कोकणला जायची इच्छा होती. म्हटलो चला या निमित्ताने तरी कोकण पाहूया. मला सोलो ट्रीपवर जायला खूप आवडायचे. एकांतात स्वतःला वेळ दिला जातो. शिवाय याच्या त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मी एकटेच गाडी काढून जायचे ठरवले. रात्री जेवण करून निघूया, सकाळपर्यंत तिकडे पोहोचू. साखरपुड्याला हजेरी लावून २ दिवस कोकण भटकून परत येऊ असा साधारण प्लॅन ठरवला.
साखरपुड्याच्या आदल्या रात्री ९ वाजता मी निघालो. आधी पेट्रोल भरून घेतले. गॅरेजवरून गाडी नीट असल्याची खात्री करून बाप्पाचे नाव घेऊन माझी सोलो जर्नी सुरू झाली. गुगल मॅप लावलेला म्हणून निवांत दाखवत असलेल्या डायरेक्शनवरून गाडी चालवत होतो. रस्त्यावर पण फार वर्दळ नव्हती. बघता बघता १ वाजला. आता गाड्या पण क्वचित येत जात होत्या. जंगलचा रस्ता चालू झाला. आजूबाजूला फक्त अंधार. माझ्या गाडीचाच काय तो लाईट होता. मी बऱ्याचदा असा रात्री प्रवास करायचो म्हणून याचे एवढे काही मला वाटत नव्हते. अचानक गाडी हळूहळू होऊन बंद पडली. काही केल्या सुरू व्हायचे नाव घेत नव्हती. येताना तर चेक केली तरी कशी बंद पडली काही सुचेना.
मी खाली उतरलो. कुठे गॅरेज दिसते का पाहू लागलो. पण जंगलात कुठे गॅरेज असेल इथे म्हणून मी मागून येणाऱ्या एखाद्या गाडीने पुढे गॅरेज असेल तिकडे जावू आणि त्या माणसाला इथे आणूयात म्हणून गाडी यायची वाट पाहू लागलो. एक फोर व्हीलर येताना दिसली. मी गाडी मागे येऊन त्याला थांबायचा इशारा करू लागलो. पण तो भरधाव निघून गेला. मी त्याला शिव्यांची लाखोली वाहू लागलो. परत गाडी येते का वाट पाहू लागलो. बघता बघता २ वाजले. एक खासगी मिनी बस येताना दिसली. मी मनात धावा केला की थांबू दे देवा या गाडीला.
ड्रायव्हर खरंच चांगला होता. त्याने गाडी माझ्या पुढ्यातच थांबविली. मी सांगितले की माझी गाडी खराब झाली आहे. कृपया मला पुढच्या गॅरेजवर सोडता का? तो मानेनेच हो म्हणाला. मी त्याचे आभार मानले आणि त्याच्या बाजूच्या सीटवर येऊन बसलो. मागे सगळे झोपलेले दिसत होते. अंधार होता म्हणून जास्त काही दिसत नव्हते की मागे किती लोक बसलेत पण गाडी पूर्ण भरलेली असावी असा मी अंदाज लावला. मी त्याला म्हणालो की मी गाडी चेक करून निघालेलो तरी कशी बंद पडली काय माहित? तो काहीच म्हणाला नाही. मी त्याला सांगू लागलो की कशी ती आधीची फोर व्हीलर समोरून भरधाव गेली पण साधी विचारपूस करण्याची त्याला माणुसकी नव्हती. तो अगदी गप्प. मी म्हणालो बरं झाले तुम्ही आलात नाहीतर मला कितीवेळ ताटकळत थांबायला लागले असते काय माहित? तरी तो गप्प.
मी उगाचच जास्त बडबडतोय हे लक्षात आल्यावर मी गप्प झालो आणि कुठे गॅरेज दिसते का पाहू लागलो. बराच वेळ होऊन पण गॅरेज काही दिसत नव्हते. इकडे हा ड्रायव्हर पण त्याच गतीत शांतपणे इकडेतिकडे न बघता गाडी चालवत होता. जरा विचित्रच वाटतोय असे मी मनातल्या मनात म्हणालो. खिशातून रूमाल काढताना माझा मोबाईल खाली पडला. मी खाली वाकून मोबाईल कुठे पडला ते पाहू लागलो. बघता बघता एका जागी माझे लक्ष गेले. ते पाहून माझ्या तोंडाचे पाणी पळाले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता म्हणून मी परत परत पाहू लागलो पण दृश्य तेच होते. घाबरून मागे कोणाला तरी सांगावे म्हणून मी मागे बघितले तर मागे पण तेच दृश्य होते.
मी मोबाईल उचलून परत बसलो. भितीने एक आवंढा गिळला. माझ्यात बोलण्याचे पण त्राण नाही असे वाटू लागले. ड्रायव्हरकडे बघण्याचे पण मला धाडस होत नव्हते. कसेबसे सगळा प्राण घशात आणून मी म्हणालो की थांबा मला उतरायचे आहे. त्याने लगेच गाडी थांबविली. मी गाडीतून उतरलो तशी ती परत निघून गेली. मी घाबरून कुठे उतरलो आहे हे पण मला कळले नाही. दूरवरून एक प्रकाश दिसत होता. मी जवळपास पळतच तिथे गेलो. एक छोटी चहाची टपरी दिसत होती. मी तिथे जाऊनच थांबलो. जोरजोरात श्वास घेऊ लागलो. माझी हालत बघून टपरीवरील दोघे धावत आले. मला बसायला खुर्ची देऊन पाणी दिले.
मी घटाघटा पाणी पिले. ते म्हणाले की काय झाले का पळत आलात. मी त्यांना सांगितले की, माझी गाडी बंद पडली म्हणून एका मिनी बसमधून मी येत होतो. माझा पडलेला मोबाईल उचलायला जेव्हा मी खाली वाकलो तेव्हा मी पाहिले की त्या ड्रायव्हरचे पाय उलटे होते. मागे पाहिले तर मागच्यांचे पण उलटे होते. खूप भयानक होते ते. खूप भयंकर होते. एवढा भितीदायक प्रसंग मी जन्मात कधी अनुभवला नव्हता. त्यांचे डोळे मोठे झाले. दैव बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात. ते म्हणाले की तुम्ही सांगताय त्यावरून एक घटना आठवतेय. काही वर्षांपूर्वी एक संपूर्ण कुटुंब मिनी बस करून याच रस्त्यावरून चाललेले. ड्रायव्हरचा अचानक डोळा लागला आणि इथून पुढे असणाऱ्या एका नदीत त्यांची बस पडली.
बसमधील सगळे बुडून मेले. काहीजण म्हणतात की बरोबर त्याच दिवशी ही बस पुन्हा प्रवास करते आणि तिथेच नदीत पडते. तुम्ही उतरला नसता तर तुम्ही पण बुडून मेले असता. नशीबवान जे तुम्ही मृत्युच्या दारातून परत आलात. माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगावरून मला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागला. ४ वाजता जेव्हा त्यांच्या शेजारील गॅरेज उघडले तेव्हा मी त्याला घेऊन गाडीकडे गेलो. काय आश्चर्य की गाडी लगेच चालू झाली. माझ्यासोबत हे काय घडतेय मला कळतच नव्हते. मला पुढे जायची इच्छा होत नव्हती. मी गाडी चालू करून परत यु टर्न मारून माझ्या घरी निघून आलो. पण अजूनही मी त्या रस्त्याने पुन्हा गेलोच नाही.