भांबावून सोडणारा प्रवास
भांबावून सोडणारा प्रवास


मी ऑफिस कामानिमित्त कायम फिरतीवर असायचो प्रत्येकवेळी वेगळ्या ठिकाणी जसा माझा प्लॅन असेल त्या प्रमाणे. हा महाराष्ट्र दौरा करताना खूप वेगवेगळे अनुभव घेतले त्यातीलच हा एक भांबावून सोडणारा प्रवास आहे.
नेहमीप्रमाणे पुण्यावरून सांगलीसाठी निघालो. दोन दिवस सांगलीमधील काम आवरून मी माझ्या ऑफिस मित्राला एका महत्त्वाच्या कामासाठी वडूजला जायचे प्लॅन करण्यास सांगितले. वडूज हे सांगलीपासून अंदाजे ११० किमी आणि नेहमी आम्ही हे अंतर दुचाकीने जायचो. जसे आमचे नेहमी प्लॅन असायचे तसे सकाळी लवकर म्हणजे ७ वा. जायचे ठरले. तसा तो जुलै महिना होता आणि जुलै महिना म्हणजे जोराचा पाऊस त्यातल्यात्यात सांगली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण हे जादा असतेच. ठरल्याप्रमाणे सकाळी ७ वा. मी गांधी चौक मिरज येथे पोहोचलो. माझा ऑफिस मित्र पण वेळेत येऊन वाट बघत होताच. पावसाचे दिवस होते म्हणून दोघांनी एकच बॅग घेतली त्यात आमचे सगळे साहित्य, कागदपत्रे ठेवली.
रेनकोट हा अंगावर अडकवूनच निघायचे नियोजन झाले. पाऊस तर नव्हता पण हवेत गारठा खूप होता त्या पासून संरक्षण म्हणून पूर्ण रेनकोट घालायचे ठरविले. मिरजेतून निघालो पहिला स्टॉप तासगाव तिथे नाष्टा केला आणि मायणी, खटावमार्गे वडूजला जायला निघालो. पावसाळ्याचे दिवस म्हटले की चहूबाजूने हिरवळ आणि रस्त्यावर पाणी, खड्डे, पाण्यानी भरलेले खड्डे इ. चा आनंद लुटत, गप्पा मारत दोघे जात होतो. या रोड वर तशी रहदारीही खूप कमीच असते कारण हा एकपदरी रोड आहे. वडूजमध्ये पोहोचलो. काम सुरू केले आणि दुपारी २.३० वाजेपर्यंत सगळे काम आवरून जेवण करून परतीचा प्रवास सुरुकेला.
आम्ही जेवण करून त्या हॉटेलमधून बाहेर पडून वडूजच्या वेशीवर येताच मुसळधार तुफान पाऊस सुरू झाला. जोपर्यंत आमचे काम सुरु होते आणि आम्ही जेवत होतो तो पर्यंत पावसाचे काहीच संकेत नव्हते, वातावरण अगदी नॉर्मल. पण जेवतानाच्या त्या अर्ध्या तासात सगळे वातावरण पूर्ण बदलले आणि जोरात बरसायला सुरुवात झाली. तसा त्या भागात जादा पाऊस नसतो पण त्या दिवशीचं काय माहीत नाही इतका पाऊस कसा.
जसे गावच्या बाहेर पडलो तसे जे काही वादळ सुरू झाले की समोरचं काहीच दिसत नव्हते. मित्र कसाबसा हळूहळू दुचाकी चालवत होता. वादळ इतके बेकार होते की आमची गाडी ही सरळ रस्त्यावर सुद्धा नागमोडी वळणात चालू लागली. वाऱ्याच्या वेगामुळे गाडीही एकबाजूने झुकली होती आणि तशीच तो चालवत होता. नशीब इतकेच की आमच्या दोघांकडे रेनकोट होता आणि त्याच्याकडे हेल्मेट. त्या हेल्मेटचा सहारा घेत तो पुढील रस्ता बघत होता. एका हाताने हेल्मेटवरील पाणी पुसायचा. तेवढ्यातून हळूच पुढचा रस्ता बघून घ्यायचा आणि त्याच अंदाजवर तिथपर्यंत हळूहळू जात होतो. कुठे थांबायचे म्हटले तर रस्त्याकडेला काहीच सहारा नव्हता. ना घर ना एखादे हॉटेल, झाडे होती पण आकाशात पाहिले तर वीज जोरात कडकडत होती आणि वीज ही नेहमी झाडाचा आधार घेते म्हणून आम्ही त्या झाडांचाही आधार घेऊ शकत नव्हतो.
कसे बसे हळूहळू पुढे जात राहिलो. येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नव्हता. ती एकदम जवळ आल्यानंतर समजायचे की पुढे काही तरी आहे. आमच्यासारखे समोरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांचे होत होते. त्यांनाही समजत नव्हते. पण या मार्गावर फक्त आम्ही दोघेच दुचाकीवर होतो बाकी जादातर चारचाकी वाहने त्यांचा तर तो वायपर काम करत नव्हता. तसेच कसेबसे आम्ही पुढे जात राहिलो आणि तेवढ्यात आम्हाला पुढे खटाव हे गाव दिसले, थोडा जिवात जीव आला. जसे आम्ही त्या गावात गेलो तर तिथेही पूर्ण गावातील रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत होते, कारण त्यावेळी तिथे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
त्या गावात बस स्थानकाजवळ एक छोटे हॉटेल दिसले. आम्ही दोघे तिथे थोडा वेळ थांबायचा विचार केला. जेणेकरून पाऊसही कमी होईल आणि भिजून थंडी वाजत तर होतीच, एकदाचा चहा घेऊन ती थंडी घालवावी विचार केला. जसे आम्ही त्या हॉटेलमध्ये बसलो तेवढ्या कडलल्लल्लल असा जोरात आवाज आला. तो आवाज इतका जोराचा होता की, अक्षरशः आमच्या कानठळ्या बसल्या. काही वेळासाठी आम्हाला काय झाले हेच सुचत नव्हते. त्या हॉटेलमध्ये आम्ही दोघे ग्राहक आणि हॉटेल मालक असे तिघेच होतो. त्या हॉटेल मालकांनाही काही समजायला तयार नव्हते की नेमकं काय झाले. काही वेळासाठी आम्हा तिघांची परिस्थिती ही बहिऱ्या लोकांसारखी झाली. आम्ही बाहेर जाऊ शकत नव्हतो. कारण तो मुसळधार पाऊस. त्या काकांना आम्ही कडक स्पेशल चहा बनवायला सांगितला.
काकांनी तेवढ्यातून विचारले, कांदा भजीपण आहे... देऊ का गरमागरम... माझ्या मनात पाल चुकचुकली. सोन्याहून पिवळे झाले. लगेच काकांना बोललो हो द्या दोन प्लेट, एकतर इतका भिजलो होतो. असे वातावरण झाले होते गरम खाण्याची गरजच होती. ते बनेपर्यंत आम्ही दोघे गप्पा मारत बसलो आणि माझ्या मित्राने मला सांगितले की समोरच बसस्थानक आहे तू सांगली बसमधून ये उगाच भिजू नको. ही बॅग तुझ्याजवळ घे आणि बसने ये तेवढ्यात काकांनी गरमागरम भजी समोर आणून ठेवल्या. पहिलाच त्या भजीच्या वासाने मन तृप्त झाले होते. कधी एकदा खाऊ असे वाटत होते. पण ती इतकी गरम होती की थोडा वेळ तिला फोडून हातात पकडली आणि मित्राला म्हटले येताना आपण दोघे सोबत आलो आहोत तर मग मी बसने का जाऊ??
तो बोलला, अरे वेड्या एकतर इतका पाऊस सुरू आहे तुला सवय नाही आजारी पडशील आणि बॅगमधील कागदपत्रे भिजतील. मी हसत भजीच्या पहिल्या तुकड्याचा आस्वाद घेत त्याला उत्तरले, अरे आपण सोबत आलो आहे. तुला एकट्याला इतक्या मुसळधार पावसात कसा सोडून जाऊ... तू भजी खा, आपण सोबतच जायचे. भजी खाऊन झाल्या काकांनी स्पेशल चहा आणून दिला. कडक चहाचा पहिला भुरका भुर्रर्र करून पिला आणि जणू स्वर्गात जाऊन आल्याचा अनुभव आला. भजी आणि चहाचा आनंद घेऊन मन एकदम फ्रेश झाले होते. तेवढ्यात बाहेर बघतो तर हा पाऊस काही कमी झाला नव्हता. काकांनी आम्हाला सांगितले, बाळानु इतका भिजून आलाय, थोडा चुलीजवळ उभा राहा. तोपर्यंत पाऊसही कमी होईल. पुढचे १०-१५ मिनिट आम्ही आपल्या गप्पा मारत उभे होतो. पाऊस थोडा ओसरला. तेवढ्यात आम्ही तिथून पळ काढला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
जसे तिथून निघालो पुढे बघतो तर काय भलेमोठे वृक्ष उन्मळून पडले होते. जो आवाज आला होता तो आवाज म्हणजे ती वीज याच झाडावर पडली होती. झाड इतके मोठे होते की पूर्ण रस्ता अडून गेला. आमचे तसे नशीबच चांगले म्हणा आम्ही तो चहा प्यायला थांबलो आणि ती वीज त्या झाडावर पडली. म्हणतात ना जर वेळ आला पण काळ नाही तशी गत होती. स्थानिकांच्या मदतीने ते झाड बाजूला करण्यास सुरुवात झाली. आम्हीही थोडा हातभार लावला. थोडी जागा झाल्यावर आमची गाडी कशीबशी काढून घेतली. तिथून पुढे मी गाडी चालवण्यास घेतली. पाऊस तसा थोडा ओसरला होता. जसजसे पुढे जात राहिलो तर खूप झाडे उन्मळून पडलेली दिसत होती. रस्त्यावरील खड्यामध्ये पाणी भरले होते. त्यामुळे रास्ता आणि खड्डा ओळखत नव्हता. तसाच सावध होत पुढे येत राहिलो आणि मायणीमध्ये पोहोचलो.
५ मिनिटांचा बायो ब्रेक घेतला आणि परत पुढचा प्रवास सुरु झाला. वातावरण तसे काळेकुट्ट झाले होते. सोबत सोसाट्याचा वाराही येत होता. हे सगळे संकेत होते ते म्हणजे तो पुन्हा येणार तो पुन्हा येणार याचे. मायणीपासून थोडे अंतर गेल्यावर पुन्हा जोराची सर आली. तसेच आम्ही त्याकडे लक्ष न देता पुढे चालत राहिलो आणि कसेबसे तासगाव मध्ये 4.30-4.45 वाजता पोहोचलो.
याच तासगावमध्ये आमच्या आवडीचा एक चहावाला होता. त्याच्याकडे गेलो. पुन्हा चहा घेतला. पण पाऊस काय कमी व्हायला तयार नव्हता. संध्याकाळचे साधारण ५ वाजले होते. तरीही वातावरणामुळे अंधार सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुन्हा एकदा सोसाट्याचा वारा, पावसासोबतच जोरात कडाडणारी वीज सगळे बघून मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. थोडावेळ विचार केला आणि आम्ही ठरविले इथून पुढचा प्रवास हा बस किंवा वडाप(शेअरिंग गाडी) करायचा. दुचाकी तासगावमधील मित्राच्या घरी ठेवली. त्या मित्राने बस स्थानकाजवळ सोडले. तेवढयात आम्हला वडाप भेटले. त्यामध्ये आम्ही तिघेच होतो. ड्रायव्हर, माझा मित्र आणि मी असा आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. तर पाहतोय तर काय त्या गाडीची पुढची काच अशी होती की त्यामधून तो ड्रायव्हरच बघू शकत होता.
आम्हाला नीट काहीच दिसत नव्हते. माझा मित्र ड्रायव्हर साईड सीटवर बसला होता आणि मी मध्ये आडव्या सीटवर बसलो होतो. हळूहळू पुढे येत आम्ही सोलापूर-मिरज रोडला लागलो. तिथे तर अजून जोराचा पाऊस पडत होता आणि गाडीचे हेड लाइट लावल्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण आम्हाला नंतर समजले की या गाडीला एकच हेड लाइट आहे दुसरा बंद पडला आहे. सोलापूर-मिरज हा तसा चांगल्या रहदारीचा रस्ता, त्यामुळे तिकडे वाहनेही जादा आणि वेगही जास्त असतो. पाऊस मुसळधार आणि अंधार पडल्यामुळे सगळी वाहने एकतर हॉटेल बघून थांबली होती किंवा एका बाजूने इंडिकेटर लावून हळूहळू चालली होती. आम्हीही तसेच एका बाजूने चालत होतो एक हेड लाइट सुरू दुसरा बंद तर इंडिकेटरचा प्रश्नच नव्हता. कारण ते सगळे फुटले होते. अधूनमधून ड्रायव्हर कापड काढून काच आतून पुसून घ्यायचा आणि बोलायचा साहेब आत्ता मला सगळं नीट दिसतं बघा समोरचं देव जाणे त्यालाच कासंकाय दिसत होतं.
त्याला मी एकच सांगत होतो वेळ झाला तरी चालेल पण गाडी एकदम हळू चालली पाहिजे. तेवढ्यात समोरून एक ट्रक आला. त्याला आमच्या गाडीचे हेड लाइट दिसलेच नाहीत आणि अगदी एका बाजूला नकळत घासून गेला. मी त्या ड्रायव्हरला शिव्या घालायला सुरुवात केली आणि बोललो सोड तिथंच आम्हाला आणि घे तुझे पैसे... तेवढ्यात माझा मित्र मला बोलला, शांत हो काही नाही झाले. मी मनातल्या मनात देवाचे नाव घेत तसाच डोळे झाकून गप्प बसलो होतो. पावसाचे पाणी दरवाजामधून आतमध्ये आले आणि माझे डोळे उघडले. तेवढ्यात पुढे बघतो तर काय एक बाई डाव्या बाजूला गाडीच्या आडवी येऊन लिफ्ट मागत होती. तेवढ्यात आजूबाजूला कोणीच नव्हते. ती बाई एकटीच होती. माझा मित्र बोला बाई एकटीच दिसते. आपण तिला घेऊ. तेवढ्यात तो ड्रायव्हर बोलला, साहेब हा रोड इतका सहज लिफ्ट देण्यासारखा नाही... नको थांबायला. ती बाई नसून काहीही असू शकते कारण या सुनसान रोडवर गाडी थांबत नाही आणि ती बाई कशी काय?
तसेच आम्ही गप्पा मारत पुढे निघालो. थोड्या अंतरावर मला एक बाई रोडच्या मधोमध उभी आहे आणि ती सर्व गाडीला हात करत होती लिफ्टसाठी. मी ड्रायव्हरला ओरडतोय, अरे पुढे बघ अरे पुढे बघ... तो आपला तसाच चालत होता. उलट त्याने स्पीड वाढवला. मला काय सुचायला तयार नाही मी फक्त ओरडायला लागलो, अरे पुढे एवढ्यात मी जोराचा किंचाळलो... मेली मेली मेली... आणि त्या ड्रायव्हर ने 300-400 मीटरवर जाऊन गाडी थांबवली. त्याला कोल्हापुरी शिव्या देतच बोललो, तुला दिसले नाही का तू एका बाईला उडवले आहेस. तोही गडबडला, साहेब काय बोलताय तुम्ही मी २५ वर्षे झाली गाडी चालवतोय अजून कोणाला उडवले नाही.
तेवढ्यात माझा मित्र म्हटला, काय झाले ते पहिलं सांग. त्याला सांगितले, अरे रस्त्यावर एक बाई गाडीला हात करत होती. तिला याने उडवले. मी बोलत होतो, समोर बघ समोर बघ तोपर्यंत उडवलं. हे ऐकताच कच्चकन ब्रेक लावला आणि गाडी यु टर्न घेतली, चला बघू कोणाला उडवले. जसा यु टर्न घेतला तसे माझे हातपाय कापायला लागले, माझी तर बोबडी वळली होती. आम्ही जाताना डाव्या बाजूला बघत बघत चाललो तर कोणी दिसायला तयार नाही. आम्ही जवळपास १ किमी शोधत पाठी गेलो पण जाताना डाव्या बाजूला कोणी दिसले नाही. मग परत आम्ही यु टर्न घेतला आणि येतना डाव्या बाजूला बघत बघत आलो पण कोणीच दिसायला तयार नाही. त्याने गाडी एके ठिकाणी थांबवली आणि मला सांगितले साहेब तुम्हाला भास झाला असेल. असे कोणीच नाही, आपण बघून आलो. मी घाबरत घाबरत त्याला बोललो, जाऊ दे बाबा चल आत्ता पुढे जाऊ. तोवर त्याने सांगितले साहेब मी २५ वर्ष झाले या रोड वर गाडी चालवतो आहे. असे खूप अनुभव घेतले आहेत मी. तुमच्या सोबत जसे झाले तसे मलाही खूप वेळा झाले आहे या रोडवर. हे ऐकताच परत डोळे मिटून गप्प बसलो आणि मनात देवाचे नामस्मरण करत बसलो. मोबाईलवर गाणे लावायचे पाहिले पण पावसामुळे नेटवर्क येत नव्हते त्यामुळे भक्तीगीत ऐकता आले नाही. थोड्या वेळात कसाबसा मिरजजवळील हॉटेल्स दिसले आणि जीवात जीव आला. जसा मिरजमधील गांधी चौक दिसला मनाला थोडे बरे वाटले.
परत रिक्षा केली आणि हॉटेलवर जाऊन मस्त फ्रेश झालो. मनात तोच प्रसंग वारंवार येत होता. काही केल्या डोळ्यासमोरून जायला तयार नव्हता. जेवणाची ऑर्डर दिली. कसाबसा जेऊन झोपी गेलो. जसा सकाळी उठलो तर डोके जड झाले होते. कदाचित पावसात भिजल्यामुळे. पूर्ण दिवस हॉटेलवर झोपून काढला आणि विचार केला आत्ता पहिलं पुणे गाठले पाहिजे आणि घरी जायला पाहिजे. मी माझी कार हॉटेलमध्येच ठेवली होती आणि बाईकचा आनंद घेण्यासाठी बाईकवर गेलो होतो. मित्र पण बोलला, जाऊ बाईकवर कशाला कार घेतो. दुसऱ्या दिवशी कार घेऊन पहिलं पुणे गाठले आणि पूर्ण महिना हा किस्सा काही केल्या डोक्यातून जायला तयार न्हवता.
असा हा भांबावून सोडणारा खराखुरा प्रवास.