...असहाय अस्तित्व ...
...असहाय अस्तित्व ...
तिचे नाव सुधा वय ४७ .
एक सामान्य गृहिणी . गृहिणी अश्यासाठी कारण सुप्त गुणांना पंख कधी फुटलेच नाही ...
अंगी खुप कला आहेत पण त्या कला मनापासुन जोपासणे जमलंच नाही कधी ..असो .
१७ व्या वर्षी लग्न झालं. ओळखीतलं स्थळ म्हणून जास्त चौकशी न करता उरकून टाकलं वडिलांनी .
घरी अशीही गरिबी. वडील तरी कोणाला विनंती करणार की मुलगा, घरातली माणसे कशी आहेत बघा जरा म्हणून ....
म्हणतात ना , गरिबी माणसाला खुप लाचार बनवते !
तसंच काहीसं ...
सासरी १३ माणसांचं कुटुंब .घरात हिच पहिली सून .सासू एकटीच होती घरात राबणारी . आता एकीला दोघी ...
पण सासूने मात्र सून आल्यावर सगळी जबाबदारी सुधावर टाकली .
पदरात पडलेलं दान स्वीकारून , सुधा माहेरी दोन घासाला महाग .. पण इथे पोटभर मिळतंय म्हणून खुश होती. नवरा पण नव्या नवलाईत खुश होता . लग्न झालं , मग लागोपाठ दोन मुली आणि घराण्याला वारस हवा म्हणून सासरच्या माणसांच्या हट्टाने तिसरा मुलगा .कुटुंब पूर्ण झालं ..
८ - ९ वर्षात सगळ्या दिरांची लग्न होवून ,सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मग सुधा आणि तिचा नवरा वेगळे राहायला लागले .अर्थात एक हक्काची , बिन पगारी कामवाली आता मालकीण होवून आपल्यावर तोरा मिरवणार म्हणून घरातील इतर सदस्य मात्र त्यांच्या प्रगतीवर जळू लागले .त्यांनी हळूहळू येणं जाणं कमी केलं .गरज असेल तेव्हा मात्र सुधाच्या अधिकाराची त्यांना जाणीव होत असे ...
एकत्र होते तोपर्यंत सारं काही ठीक होतं . पण वेगळं राहिल्यावर मात्र नवऱ्याने त्याचे रंग दाखवायला सुरवात केली . त्याचा बाहेरख्यालीपणा वाढला .
चार भिंतीच्या आत आपल्या सौख्याची चौकट आखलेली , आपलं एवढंच जग आहे या भ्रमात असणारी सुधा ह्या प्रकाराने खचून गेली . पदरात तीन लहान मुले . कसं होणार पुढे ? ह्या विचारांनी तिला हतबल करून टाकलं .वेगळं राहिल्या पासून घरच्यांची जवळपास सारं नातं तोडून टाकलेलं ,त्यांना काही सांगावं तर ते तिलाच दोष देणार . दुःखी मन मुलांकडे बघून बळेच उभारी घेत राहायचं . नवरा वासनेने पिसाटलेला पशुच झाला होता . रोज नवीन नवीन नाटकं कळायची त्याची .घरी कधीतरी यायचा . पैसे देणं नाही की मुलांची जबाबदारी नाही . अशात मग सुधाच्या माहेरच्यांनी पैसे भरून तिला शिलाई मशीन घेवून दिली , पार्लर चा कोर्स करून पार्लर चालू केले . पोटपुरतं कमावत होती . मन सतत विचारात असायचं , का माझ्या वाटेला हे भोग ? मी कधी कशाची अपेक्षा केली नाही मग हे असं माझ्या नशिबात का ?
पण मुलांकडे बघून निराश मनाला , आनंदाचा मुखवटा , लावून स्वतःला बळेच उभारी द्यायची .
दिवस जात होते . मुलं पण मोठी होत होती .हळूहळू सुधाचा पण जम बसत होता . नवऱ्याकडून काहीच अपेक्षा न ठेवता ती स्वतः परिस्थिती सावरत होती .
हे सावरणं मात्र इतरांसाठी होतं , तिला मात्र स्वतःला सावरणे कधी कधी खूप अवघड व्हायचे .
" मनाला रमवण सोपं असतं पण शरीराला ?? "
तिचं वय पण तसं जास्त नव्हतं की तिला काही गरज वाटत नसेल .
त्यातूनही ती सगळ्या परिस्थितीवर मात करत स्वतःला मुलांसाठी उभारी देत होती .
खूपदा तिच्या मनात यायचं की नवरा साऱ्या जबाबदाऱ्या सोडून त्याचं सुख बाहेर मिळवतो , मग मी साऱ्या जबाबदाऱ्या निभावून माझे सुख का मिळवू नये ? ते सुख जर एवढं गरजेचं असतं मग मला ही ते मिळायलाच हवं ना ?
मन मारून मारून मी का जगावं ?
मला ही इच्छा आहेत ,अपेक्षा आहेत , ज्या कधी पूर्ण पण होतील का नाही माहित नाही . स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क नाही का ?
कायम मनाला मुरड घालत , समाज काय म्हणेल ? हा विचार करून करूनच जीवन संपवायचं का ? प्रवाहाविरुद्ध पुरुष जर वागला तर त्याच कौतुक केलं जातं मग एखाद्या गरजू स्त्रीने ,फक्त तिच्या सुखासाठी एखादा वेगळा मार्ग निवडला तर बिघडले कुठे ??
पण हे वादळ मनातच घोंगवायचे आणि मनातच विरून जायचे .ते वादळ बाहेर येणं ना तिच्या साठी योग्य होत ना तिच्या मुलांच्या भविष्यासाठी ...
फिरून पुन्हा वर्तमान जगणं एवढंच तर तिच्या हातात होतं ....
" विचारांच्या प्रवाहाला
कुठे मर्यादा असते ??
मर्यादेच्या चौकटीचे ,
माणसाला बंधन असते !...."
असेच मन मारून जगत , मर्यादेच्या चौकटीत राहून ,स्वतःच्या इच्छांना बाजूला सारत ,मुलांना वाढवत सुधा एक एक दिवस काढत होती .
मुलं आता बऱ्यापैकी मोठी झाली होती .५ - ६ वर्षाने नवरा जरा घरात पैसे पुरवू लागला . इतर कशात लक्ष देत नसायचा पण फक्त पैसे देण्याचे काम करत होता . आता त्याला बायकोच्या कामाची लाज वाटायला लागली .त्याने तिचे काम करणे बंद करून टाकले .पण सोबतच तिच्या त्या पंखांनाही छाटले जे तिच्या सुप्त गुणांना उडण्याचे स्वप्न दाखवत होते . मला करायचंय म्हणून हट्ट केला तर , " घर सोडून जायचं आणि बाहेर काय दिवे लावायचे ते लाव " हे कठोरपणे ऐकवायचा . आणि असे म्हणल्यावर एक स्त्री काय करणार ? मुले आणि घरालाच प्राधान्य देणार ना ! पुन्हा एकदा तिची स्वप्न , स्वप्नातच विरून गेली...
नवरा मग तिला अजून बंधनात ठेवायला लागला .तिचे कामाशिवाय बाहेर पडणे त्याला मान्य नसायचे , तिने कोणाशी बोलत बसलेलं त्याला आवडत नसे , त्याची संशयी वृत्ती वाढू लागली . सुधा मात्र मुलांसाठी सगळं सहन करत राहिली . आणि सहन न करून कोणाला सांगणार होती ? माहेरी कोणाचा आधार नाही .सासरी कोणी समजून घेणारं नाही .आणि नवऱ्याला सोडून स्वतःचं अस्तित्व नव्याने सुरू करता येतं ,एवढी बुध्दी तिला नव्हती . असा प्रयत्न जरी तिने केला असता तरी ती कोणाची मदत घेणार होती ? मुलांना घर आणि त्यांच्या शिक्षणासाठी वडिलांच्या पैश्याची गरज होती .तीन तीन वयात आलेल्या मुलांचे संगोपन ती स्वबळावर करू शकेल एवढे तिच्यात धाडस नव्हते .
सुधा मात्र याही परिस्थितीत इथे राहून , स्वतःचं अस्तित्व विसरून ,एक शोभेची बाहुली म्हणून त्या घराची शान वाढवत होती . जगणे सुखावह नाही , पण मरण्याचे धाडस नाही .
हल्ली तर तिने कशाचाच विचार करणे सोडून दिले होते .नवरा त्याची खोटी प्रतिष्ठा , पैसा भरपूर कमावत होता .आणि सुधा तिचा एक एक क्षण , एकेका स्वप्नांना तिलांजली देत जगण्याची कसरत करत होती .......
मुलींची लग्न झाली त्या त्यांच्या संसाराला लागल्या ,थोड्या दिवसांनी मुलाचे लग्न होईल ,साऱ्यांचे सारं काही व्यवस्थित झालं , होईल...
मुलांना आईच्या संघर्षाची जाणीव आहे पण त्यांना त्यांचं विश्व आहे भरारी घ्यायला ..
आयुष्याच्या एका विशिष्ठ टप्प्यावर एका जोडीदाराची गरज भासते , ती पूर्ण होणार नाही हे मनाला कसे सांगायचे ?
आपला जोडीदार आपल्याला फक्त त्याच्या प्रतिष्ठेसाठी सांभाळतो ,बाकी त्याला आपली गरज कशासाठीही नाही , याची जाणीव पदोपदी होत असेल तर त्या जीवनाला काय अर्थ उरतो ?
इथे मग नक्की कोणाला समजावयाचे ?? आपल्या अस्तित्वाला की त्या दबलेल्या मनाला ??
नवरा बायकोचं नातं खुप पवित्र आहे .ते शेवटपर्यंत जपायचे असते , हे मान्य करून फक्त तडजोड करत राहायचं का ? ह्या अश्या एकतर्फी तडजोडीला काय अर्थ असतो ?
हे मनाला समजावयाचं की अस्तित्व पणाला लावणाऱ्या नाशवंत या देहाला ???
चेहऱ्यावर आनंदाचा मुखवटा ओढता येतो ..
रडणाऱ्या , दुःखी मनाला कसं सांभाळायचं ??
कोण देणार ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ? होतो आपापल्या व्यापात व्यस्त असतो. कोणाला एवढं वेळ असतो आपले दुःख ऐकायला ?
म्हणतात ना .
" आलेल्या भोगाशी , असावे सादर !
